सबवर्जन : हस्तकांकरवी देश पोखरून काढण्याचे शत्रूचे पद्धतशीर कारस्थान !

सध्या भारतात अराजक माजले आहे. विविध गटांमध्ये / समुदायांमध्ये वाद सुरू झाले आहेत. गुन्हेगारांना मोकाट रान तर संतांना कैद आणि चौकश्यांना सामोरे जावे लागत आहे. जेएन्यू, स्त्री स्वातंत्र्यवाले, तथाकथित पुरोगामी, अन्य धर्मीय इत्यादींसारख्यांना स्वतःवर होत असलेल्या (तथाकथित) अन्यायाची जाणीव व्हायला लागली आहे अन् त्या विरोधात त्यांनी लढा देण्यास सुरूवात केला आहे. प्रत्येक क्षेत्रात असेच चित्र दिसते. हे अचानक कसे झाले ? या मागे काय कारण आहे ? हा एखाद्या आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा भाग तर नाही ना ?

श्री. सारंग लेले यांनी ‘रावणाचे उदात्तीकरण’ या विरोधात फेसबूकवर २ पोस्ट्स टाकल्या होत्या. त्यानंतर एका गटात या विषयावर चर्चा चालू होती. एकंदरीतच श्रीरामाला आपल्या देशात विरोध कसा होऊ शकतो, हे त्या चर्चेतील सूत्र होते. त्या गटातील एकाने त्या वेळी सबवर्जन हा विषय काढला. सबवर्जन समवेत जोडून नाव आले ते युरी बेझमेनोव्ह उपाख्य टॉमस शुमन यांचे !

 

१. युरीची धोरणे आणि भारतात घडणार्‍या घटना यांतील साम्य !

युरी बेझमेनोव्ह या माणसाविषयी उत्सुकता निर्माण झाली आणि त्याविषयी उपलब्ध असलेल्या सर्व चित्रफिती शोधून काढून त्या पाहिल्या. युरीने जे काही मांडले आहे, ते पाहून डोके चक्रावून गेले. भारतात सध्या जे चालू आहे आणि यापूर्वी जे काही होऊन गेले आहे त्यामागे असलेली धोरणे युरीने ३० वर्षांपूर्वी दिलेल्या त्याच्या मुलाखतीमध्ये मांडली आहे. त्यामुळे त्याने सांगितलेल्या सुत्रांना फार महत्त्व आहे.

 

२. कोण आहे युरी बेझमेनोव्ह ?

युरी हा रशियाच्या केजीबी या गुप्तहेर संघटनेचा सदस्य. त्याचा जन्म वर्ष १९३९ मध्ये मॉस्को येथे झाला. त्याचे वडील रशियन सैन्यात होते. त्यामुळे कम्युनिस्ट छळवादी राजवटीत सामान्य जनतेपेक्षा युरीचे बालपण चांगले गेले. महाविद्यालयात असतांना राजकारण आणि भारत या २ गोष्टींचा त्याने विशेष अभ्यास केला होता. १९६०च्या दशकात युरी रशियाच्या केजीबी या गुप्तहेर संस्थेत रूजू झाला. भारताविषयी अभ्यास असल्यामुळे केजीबीच्या वतीने त्याची भारतात नेमणूक करण्यात आली.

गुप्तहेरी करण्यासाठी युरी भारतात संपादक बनून आला. नंतर भारताच्या, येथील नागरिकांच्या आणि येथील संस्कृतीच्या तो प्रेमात पडला. केजीबी जगभरात आणि भारतात जे काही करते आहे ते फार चुकीचे आहे. साम्यवाद्यांच्या स्वार्थासाठी इतर देशांचा आणि तेथील लोकांचा बळी जात आहे, या जाणिवेने त्याने केजीबीला सोडचिठ्ठी दिली. जीव वाचवण्यासाठी तो भारतात हिप्पी बनून राहिला आणि नंतर कॅनडाला पळून गेला. वर्ष १९९३च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. कसा ते कुणालाच समजले नाही.

 

३. सबवर्जन म्हणजे काय ?

Deception was my job या एका वाक्यात गुप्तहेर म्हणून करत असलेल्या कामाचे स्वरूप युरीने मांडले आहे. खोटे असलेले खरे बनवून दाखवणे, समाजाला भूरळ पाडणे, आपल्या बोलावत्या सरकारला हवे ते चित्र उभे करणे आणि परराष्ट्रांमध्ये जनमत आपल्याला हवे त्या बाजूला वळवणे, हे काम युरी आणि त्याच्यासारखे अनेक गुप्तहेर करत होते आणि आजही करत आहेत. या सर्व गोष्टींना त्याने सबव्हर्ट हा शब्द वापरला आहे. सबवर्जन हेच युरी आणि अनेक गुप्तहेरांचे काम आहे.

सबवर्जनचा सिद्धांत सुन त्झे या एका चायनीज विद्वानाने २ सहस्र वर्षांपूर्वी मांडला होता. रक्ताचा एक थेंबही न सांडता शत्रूला काबीज करणे, त्याच्या देशात आपल्याला अनुकूल मत निर्माण करणे आणि मग हळूहळू शत्रूला काबीज करून घेणे, हा या सिद्धांतामागील गाभा आहे. आता हे सर्व करायचे, तर त्याची एक विशिष्ट पद्धत असायला हवी. इतर देशांना नियंत्रित करण्यासाठी केजीबी जे काही करत होती किंवा आजही अनेक देश जे काही करत आहे त्याची तपशीलवार माहिती युरीने त्याच्या मुलाखतीत दिली आहे. सबवर्जन ही एक दीर्घकालिन प्रक्रिया आहे आणि ती अंमलात आणण्यासाठी लागणारा संयम सर्व देशांकडे आहे.

 

४. सबवर्जनचा उद्देश काय ?

एखाद्या देशात राजकीय, आर्थिक वा सामाजिक अस्थिरता निर्माण करणे, हा सबवर्जनचा उद्देश आहे. गुप्तहेर संघटनांच्या तरतूदींपैकी ८५ टक्के निधी यासाठी वापरला जातो. जेथे सामाजिक सीमारेषा फार मजबूत नसतात, समाज हा अधिक विचारी नसतो, तसेच राजकीय नियंत्रण अत्यल्प असते, त्या देशांना अशा पद्धतीने नियंत्रणात आणणे फार सोपे असते.

 

५. सबवर्जनच्या वापरातील टप्पे !

सबवर्जनमध्ये असणारी एकेक पायरी पाहिली, तर कोणत्याही सजग नागरिकाला उदाहरणासहित समजेल की समाजाचे खच्चीकरण करणे, ही त्याची एक पायरी आहे.

 

अ. पाठ्यपुस्तकांत चुकीची माहिती प्रसिद्ध करणे !

यासाठी १५ ते २० वर्षांचा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे. एवढाच कालावधी का ? कारण या कालावधीत एक पिढी शाळा-महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडते. त्या वेळी आपल्याला हवे असलेली मूल्ये त्यांच्यावर बिंबवली, तर त्यांचा कल पालटता येतो. कोवळ्या मनांवर आपली मते लादणे आणि आपल्याला हवा त्या विषयाचा प्रचार करणे, हे या टप्प्यात केले जाते. मग त्यांच्या पाठ्यपुस्तकांत चुकीची माहिती छापणे, हाही त्यातलाच एक भाग. उदाहरण आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आले असेलच ! शिक्षणाचे केंद्र असणारी महाविद्यालये अथवा विद्यापिठे यांत दुय्यम दर्जाचे शिक्षण दिले जाते. प्राचार्य आणि विद्यार्थी, तसेच सरकार आणि विद्यार्थी यांच्यात वाद निर्माण केले जातात. स्त्रीवादी, समलिंगी विद्यार्थ्यांच्या चळवळी उभ्या रहातात. समाजाला अचानकपणे त्यांच्या हक्कांची जाणीव होऊ लागते !

 

आ. समाजासाठी आदर्श असणार्‍या व्यक्तींविरुद्ध चुकीची माहिती पसरवणे !

समाजासाठी आदर्श असणार्‍या, तसेच सामान्यजन ज्यांच्यावर श्रद्धा ठेवतात अशा व्यक्तींविरुद्ध चुकीची अन् विद्रोही माहिती पसरवणे, हाही त्यातीलच एक भाग. असे झाले की, मग कर्ण चांगला वाटू लागतो, रावण हा भाऊ असावा, असे वाटते आणि महिषासुर दिन साजरा केला जातो. समाजाला आपले मूळ आदर्श विसरायला लावणे, हा हेतू साध्य होऊ लागतो.

 

इ. देशविरोधी चळवळींना पाठिंबा देणे !

धार्मिक मान्यता, शिक्षणपद्धती, सामाजिक जीवन, व्यवस्थापनाची पद्धत, कायदा आणि सुव्यवस्था, कामगार यंत्रणा आदी क्षेत्रे गढूळ करून असंतोष निर्माण करणे, हादेखील सबवर्जनचाच एक टप्पा. मग त्यात आजूबाजूला चालू असलेल्या वेगवेगळ्या देशविरोधी आणि समाजघातक चळवळींना पाठिंबा दिला जातो. वैचारिकदृष्ट्या सक्षम असलेल्या लोकांपेक्षा अविचारी, आततायी आणि प्रसिद्धीलोलुप लोकांना हेरून मोठे केले जाते.

 

ई. प्रसिद्धीमाध्यमांद्वारे वारंवार खोट्या आणि
एकसुरी बातम्या प्रसारित करून समाजात अस्थिरता निर्माण करणे !

त्यात प्रसिद्धीमाध्यमे अर्थात् मीडिया हा एक मोठा भाग हातात घेतला जातो. सर्वसामान्य दर्जाचे पत्रकार समाजाचा आणि देशाचा आवाज बनवले जातात ! प्रसिद्धीमाध्यमांद्वारे खोट्या आणि एकसुरी बातम्या वारंवार प्रसारित केल्या जातात. समाजात अस्थैर्य निर्माण होईल, असे सर्व प्रयत्न प्रसिद्धीमाध्यमांद्वारे केले जातात.

 

उ. राजकीय व्यवस्था आणि न्यायव्यवस्था
गढूळ करणे, तसेच गुंडांचे उदात्तीकरण करणे !

राजकीय व्यवस्था आणि न्यायव्यवस्था गढूळ केल्या जातात. गुंडांचे पद्धतशीररित्या उदात्तीकरण केले जाते. परिणामी गुंड प्रवृत्तीची माणसे नायक (हिरो) वाटायला लागतात. सत्शील, सद्प्रवृत्त माणसाला बावळट आणि कुचकामी ठरवले जाते. गुंड हे समाजाचे शोषण करणारे नसून ते परिस्थितीचे बळी आहेत, असे भासवले जाते.

 

ऊ. चित्रपट क्षेत्रातील मंडळी, बुद्धीवादी, वलयांकित व्यक्ती,
स्वार्थी आणि खोटारडे यांचा उपयोग करून समाजात अस्थिरता निर्माण करणे !

एकंदरित समाजात अशांतता माजवण्याचे, पाश्‍चात्त्य विचारसरणी बिंबवण्याचे शक्य तेवढे प्रयत्न केले जातात. यालाच युरी डीस्टेबिलायझेशन (Destabilization) असे म्हणतो. डीस्टेबिलायझेशन नंतर समाजावर राजकीय नियंत्रण मिळवून मग हवे असलेले इप्सित साध्य केले जाते. एकदा समाजाचे नियंत्रण हाती आले, की मग समाजातील जी काही प्यादी अशांतता माजवण्यास उपयोगी पडलेली असतात त्यांनाच पद्धतशीररित्या संपवले जाते. नवीन राज्यकर्त्यांना त्या व्यक्तींची वा चळवळीची आवश्यकता राहिलेली नसते. सबवर्जनसाठी उपयोगी पडणार्‍या सामाजिक घटकांची एक सूचीच युरीने एका दुसर्‍या मुलाखतीमध्ये दिली आहे. ही सूची ऐकली किंवा वाचली, तर धक्काच बसेल. चित्रपटक्षेत्रातील मंडळी, स्वत:ला बुद्धीवादी म्हणवून घेणारे लोक, स्वत:भोवती वलय उभे करून स्वत:चे महत्त्व समाजात वाढवणारे स्वार्थी, खोटारडे लोक आदींचा उपयोग समाजात अस्थिरता निर्माण करण्यासाठी केला जातो.

 

६. अलीकडे घडलेल्या घटनांचे युरीने जणू भाकितच केले असणे !

भारतात लहान मुलांच्या पुस्तकात चुकीचा इतिहास छापून येतो, त्यांच्या कोवळ्या मनावर आणि बुद्धीवर फुटीरतेचे संस्कार केले जातात, अचानक कुणीतरी विद्यालयातील मुले एकदम मोठी होतात, त्यांना समाजाचे नेतृत्व मानले जाते, प्रसिद्धीमाध्यमांकडून एकाच बाजूच्या बातम्यांचा मारा होतो, चित्रपट क्षेत्रातली मंडळींना देश आपला वाटेनासा होतो. या आणि अशा अनेक घटनांचे जणू भाकीत युरीने आपल्या मुलाखतीत मांडले आहे.

 

७. सबवर्जन रोखण्याचे उपाय !

युरी म्हणतो, सबवर्जन रोखायचे असेल, तर ते चालू होत असतांनाच रोखणे आवश्यक आहे. ज्या वेळी समाजाची मूलभूत मूल्ये पाश्‍चात्त्य मूल्यांच्या पंखाखाली जाऊ लागतात, त्या आधीच ते थांबवणे महत्त्वाचे असते.

 

८. समाजात घडणार्‍या घटनांनी आपण भारावून जात असू किंवा त्याच
घटना बरोबर आहेत, असे आपल्याला वाटत असेल, तर आपण सबवर्ट झालो आहोत, असे समजावे !

आपल्या देशातील घटना असो वा इजिप्तमधील तथाकथित राज्यक्रांती, सर्वांचा क्रम एकसारखा आहे. रशियासारख्या देशाच्या एका दलालाने (एजंटने) ही माहिती उघड-उघड मांडली आहे. या पलीकडे चालणार्‍या अनेक गोष्टी आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या बुद्धीच्या पलीकडच्या असतील. त्या आपल्याला उभ्या आयुष्यात समजणारही नाहीत. एखादा माणूस जीव तोडून सत्य लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो; पण आपल्यावर असलेल्या खोट्याच्या प्रभावामुळे आपण सत्य स्वीकारत नाही. याच गोष्टीला युरीने आयडीओलॉजिकल सबवर्जन (ideological subversion), असे म्हटले आहे. त्यामुळे समाजात घडणार्‍या घटनांनी आपण जर भारावून जात असू किंवा त्याच घटना बरोबर आहेत असे आपल्याला वाटत असेल, तर आपण सबवर्ट झालो आहोत म्हणजेच असत्याचे बळी झालो आहोत, असे समजायला हरकत नाही !

– श्री. सारंग लेले

संदर्भ : श्री. सारंग लेले यांच्या फेसबूकवरून साभार