सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज

प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रत्यक्ष
कृपाशीर्वादाने स्थापन झालेली सनातन भारतीय संस्कृती संस्था !

bhaktaraj_maharaj
सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज

‘सनातन संस्था कशी स्थापन झाली ? हे तुम्हाला आठवतं का ? वर्ष १९९१ मध्ये एकदा डॉ. सौ. कुंदाताईंचा मला फोन आला, ‘बाबा (प.पू. भक्तराज महाराज) नाशिकला आले आहेत. आपण उद्या त्यांना भेटायला जाऊ.’ दुसर्‍या दिवशी मी, डॉ. आठवले आणि सौ. कुंदाताई नाशिकला गेलो. तो दिवस आम्ही प.पू. बाबांच्या सान्निध्यात घालवला. तेव्हा प.पू. बाबांचा निवास उंटवाडीत रहाणारे श्री. गिरीश दीक्षित यांच्या घरी होता. आम्हीही रात्री तिथेच थांबलो. दुसर्‍या दिवशी सकाळी बाबा पलंगावर झोपले होते. त्यांच्या समोर डॉ. आठवले बसले होते. दादासुद्धा (प.पू. रामानंद महाराज) होते आणि आम्ही सगळे जण बाजूला बसलो होतो. त्या वेळी डॉक्टर म्हणाले, ‘आपण सनातन धर्माचा प्रचार करण्यासाठी एक संस्था स्थापन केली पाहिजे !’ यावर प.पू. बाबा म्हणाले, ‘फार चांगला विचार आहे. तुम्ही चालू करा. यासाठी पुढाकार घ्या. हे करा.’ ही सगळी चर्चा झाल्यानंतर असा प्रश्‍न पडला की, संस्थेला नाव काय द्यायचे ? तेवढ्यात पलंगावर झोपलेल्या अवस्थेत प.पू. बाबा मोठ्याने ओरडून म्हणाले, ‘सनातन भारतीय संस्कृती संस्था !’ तेव्हापासून सनातन भारतीय संस्कृती संस्था जन्माला आली !’ – श्री. जयंत बोरकर, विक्रोळी, मुंबई. (२३.२.२०१५)

प्रत्यक्षातही १.८.१९९१ या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सनातन भारतीय संस्कृती संस्थेची स्थापना झाली. त्यानंतर प.पू. डॉक्टरांनी घेतलेले अभ्यासवर्ग, आयोजित केलेले प.पू. बाबांचे गुरुपौर्णिमा महोत्सव, तसेच वर्ष १९९६ ते वर्ष १९९८ या कालावधीत त्यांनी घेतलेल्या शेकडो जाहीर सभा यांमुळे सहस्रो जिज्ञासू आणि शेकडो साधक संस्थेशी संलग्न झाले. पुढे अध्यात्मप्रसाराची व्याप्ती वाढल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २३ मार्च १९९९ या दिवशी सनातन संस्थेची स्थापना केली. प.पू. भक्तराज महाराज यांचा सदैव आशीर्वाद लाभलेल्या या संस्थेच्या कार्याचा विस्तार आज अनेक पटींनी वाढला असून सहस्रो साधक सनातनच्या मार्गानुसार आणि प.पू. गुरुदेव डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधनारत आहेत. – संपादक, दैनिक सनातन प्रभात