देवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत (संपूर्ण कृती)

अनुक्रमणिका


देवाचे दर्शन अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य पद्धतीने घेतल्यास ईश्वराकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याचा आणि त्याच्या कृपाप्रसादाचा परिपूर्ण लाभ आपल्याला होतो. त्यादृष्टीने देवळात दर्शन घेण्याच्या टप्प्यांविषयीची माहिती या लेखात पाहू.

 

 

१. देवळात जायला निघण्यापूर्वी घरी करावयाची प्रार्थना

‘हे …..(देवतेचे नाव घ्यावे), तूच दिलेल्या प्रेरणेने मी तुझ्या दर्शनाला येऊ शकत आहे. मला तुझे भावपूर्ण दर्शन होऊ दे.’

 

२. देवळापाशी पोहोचल्यावर व्यक्त करावयाची कृतज्ञता

‘हे ….. (देवतेचे नाव घ्यावे), तूच मला तुझ्या दर्शनाची संधी दिलीस, यासाठी मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे.’

 

३. देवळात प्रवेश करण्यापूर्वी करावयाच्या कृती

३ अ. अंगावरील चामड्याच्या वस्तू काढून ठेवाव्यात.

३ आ. देवळाच्या आवारात चपला वा जोडे घालून जाऊ नये, तर देवालयक्षेत्राच्या बाहेरच काढावेत. हे अशक्य असल्यास किंवा देऊळ रस्त्यावर असल्यास देवाची क्षमा मागून देवळात प्रवेश करावा. देवालयाच्या आवारात वा देवळाबाहेर चपला वा जोडे काढावे लागत असल्यास ते देवाच्या उजव्या कडेस काढावेत.

३ इ. पाय धुण्याची सोय असल्यास पाय धुवावेत.

३ ई. पाय धुतल्यावर हातात पाणी घेऊन ‘अपवित्रः पवित्रो वा…’, हा श्लोक येणार्‍यांनी तो तीनदा म्हणून अथवा ‘पुंडरिकाक्षाय नम:’ हे तीनदा उच्चारून स्वतःच्या सर्वांगावर तीनदा पाणी शिंपडावे.

३ उ. गळ्याभोवती कोणतेही वस्त्र लपेटू नये.

३ ऊ. एखाद्या देवळात प्रवेश करण्यापूर्वी पुरुषांनी अंगरखा (शर्ट) काढून ठेवण्याची पद्धत असल्यास त्या पद्धतीचे पालन करावे. (हे व्यावहारिकदृष्ट्या योग्य वाटत नसले, तरी देवळाची सात्त्विकता टिकवण्यासाठी अशी पद्धत काही ठिकाणी आहे.)

३ ए. देवळात दर्शनाला जातांना सर्वसाधारण पुरुष-भाविकांनी डोक्यावर टोपी घालावी किंवा डोक्याला पवित्र वस्त्र बांधावे, तर स्त्री-भाविकांनी डोक्यावरून पदर घ्यावा. या संदर्भात स्थानिक परंपरेनुसार करावे.

३ ऐ. देवळाचे प्रवेशद्वार आणि गरुडध्वज यांना नमस्कार करावा.

३ ओ. देवळात प्रवेश करतांना करायच्या प्रार्थना

१. देवळात प्रवेश करतांना प्रार्थना करावी, ‘हे ….. (देवतेचे नाव घ्यावे), माझे लक्ष इकडेतिकडे न जाता नामजपाकडेच राहू दे. तुझ्या कृपेमुळे मला येथील सात्त्विकता जास्तीतजास्त मिळू दे.’

२. ‘हे …. (देवतेचे नाव घ्यावे), तुझ्या कृपेमुळे मी देवळात प्रवेश करत आहे. तुझ्या दर्शनाचा मला लाभ होऊ दे. देवळात माझे नामस्मरण वाढू दे. येथील सात्त्विकता मला मिळू दे.’

 

४. देवळाच्या कळसाचे दर्शन घ्यावे आणि कळसाला नमस्कार करावा.

देवळाच्या आवारात आल्यावर तेथून देवळाच्या कळसाचे दर्शन घ्यावे आणि कळसाला नमस्कार करावा.

 

५. ओळीत (रांगेत) असतांना पुढे-मागे असणार्‍या लोकांशी बोलणे टाळणे

देवळात दाटी (गर्दी) असल्यास ओळीत दर्शन घ्यावे. देवतेच्या दर्शनासाठी जातांना नामजप करत रहावे. त्यामुळे सत्त्वगुण पुष्कळ प्रमाणात मिळतो. ओळीत उभे असतांना पुढे-मागे असणार्‍या लोकांशी बोलणे टाळावे.

 

६. देवळाच्या आवारातून सभामंडपाकडे जाण्यास निघणे

६ अ. आवारातून सभामंडपाकडे जातांना हात नमस्काराच्या मुद्रेत ठेवावेत. (दोन्ही हात जोडून ते अनाहतचक्राच्या ठिकाणी शरिरापासून काही अंतरावर ठेवावेत.)

६ आ. ‘गुरु किंवा देवता यांना भेटण्यास जात आहोत’, असा भाव ठेवावा. ‘आपले गुरु किंवा देवता आपल्याकडे पहात आहेत’, असाही भाव ठेवावा.

 

७. देवळाच्या पायर्‍या चढणे

७ अ. देवळाच्या पायर्‍या चढता चढता उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श करून हात आज्ञाचक्राच्या ठिकाणी ठेवावा.

 

८. सभामंडपात प्रवेश करणे

८ अ. सभामंडपात प्रवेश करण्यापूर्वी प्रथम सभामंडपाच्या द्वाराला दुरून नमस्कार करावा.

८ आ. सभामंडपाच्या पायर्‍या चढता चढता उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श करून हात आज्ञाचक्राच्या ठिकाणी ठेवावा.

८ इ. सभामंडपात पाऊल टाकतांना प्रार्थना करावी, ‘हे देवते, तुझ्या मूर्तीतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याचा मला पुरेपूर लाभ होऊ दे.’

 

९. सभामंडपातून गाभार्‍याकडे जाणे

९ अ. सभामंडपाच्या डाव्या अंगाने चालत गाभार्‍यापर्यंत जावे. (देवाचे दर्शन झाल्यानंतर सभामंडपाच्या दुसर्‍या, उजव्या अंगाने बाहेर पडावे.)

९ आ. दर्शनासाठी रांगेत उभे रहावे लागल्यास त्या वेळी पुढे-मागे असणार्‍या लोकांशी गप्पागोष्टी न करता सतत नामजपाकडे लक्ष द्यावे.

 

१०. देवतेचे दर्शन घेण्यापूर्वी करावयाच्या कृती

१० अ. देवळातील घंटा शक्यतो वाजवू नये. वाजवायचीच असल्यास अतिशय लहान नाद होईल ‘जणूकाही घंटानादाने आपण देवाला जागृतच करत आहोत’, असा भाव ठेवून वाजवावी.

१० आ. शिवालयात पिंडीचे दर्शन घेण्यापूर्वी नंदीच्या दोन्ही शिंगांना हात लावून नंदीचे दर्शन घ्यावे. याला ‘शृंगदर्शन’ असे म्हणतात.

शृंगदर्शनाची पद्धत

नंदीच्या उजव्या अंगाला बसून किंवा उभे राहून डावा हात नंदीच्या वृषणावर ठेवावा. उजव्या हाताची तर्जनी (अंगठ्याच्या जवळचे बोट) आणि अंगठा नंदीच्या दोन शिंगांवर ठेवावे. दोन्ही शिंगे आणि त्यांवर ठेवलेली दोन बोटे यांच्यामधील पोकळीतून शिवलिंग न्याहाळावे.

१० इ. सर्वसाधारणतः गाभार्‍यात जायला प्रतिबंध (मनाई) असतो; परंतु काही देवळांत गाभार्‍यात जायची सोय असते. अशा वेळी गाभार्‍यात जातांना गाभार्‍याच्या प्रवेशद्वारावर श्री गणपति आणि कीर्तीमुख असल्यास त्यांना नमस्कार करून मगच गाभार्‍यात जावे.

‘शृंगदर्शन’ याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘क्लिक’ करा !

 

११. देवतेच्या मूर्तीचे दर्शन घेतांना करावयाच्या कृती

११ अ. देवतेचे दर्शन घेण्यासाठी देवतेची मूर्ती आणि तिच्या समोर असलेली कासवाची प्रतिकृती यांच्यामध्ये, तसेच शिवालयात पिंडी अन् तिच्या समोर असलेली नंदीची प्रतिकृती यांच्यामध्ये उभे न रहाता किंवा न बसता कासव किंवा नंदी यांची प्रतिकृती आणि देवतेची मूर्ती किंवा पिंडी यांना जोडणार्‍या रेषेच्या अंगाला उभे रहावे.

११ आ. देवतेचे दर्शन घेतांना पहिल्या टप्प्यात देवतेच्या चरणांशी दृष्टी ठेवून, नतमस्तक होऊन ‘अहंचा लय व्हावा’, यासाठी देवतेला प्रार्थना करावी. दुसर्‍या टप्प्यात देवतेच्या छातीशी, म्हणजेच अनाहतचक्राशी मन एकाग्र करून देवतेची आळवणी करावी. दर्शनाच्या तिसर्‍या, म्हणजे शेवटच्या टप्प्यात देवतेच्या डोळ्यांकडे पहावे आणि तिचे रूप डोळ्यांत साठवावे.

११ इ. ‘देवतेच्या चरणी लीन होत आहोत’, या भावाने देवतेला नमस्कार करावा. नमस्कार करतांना पुरुषांनी डोके झाकू नये (डोक्यावरील टोपी काढावी); मात्र स्त्रियांनी डोके झाकावे.

 

१२. देवतेचे दर्शन झाल्यानंतर करावयाच्या कृती

देवळात गेल्यावर अधिकाधिक ईश्वरी तत्त्व ग्रहण होण्याच्या दृष्टीने पूर्वीच्या देवळांची रचना आदर्श असायची. अशा आदर्श पद्धतीच्या देवळामध्ये सभामंडप आणि गर्भगृह यांना जोडणारे ‘गर्भागार’, तसेच गर्भगृहाच्या उजव्या अंगाला ‘यज्ञकुंड’ आणि डाव्या अंगाला ‘सूर्यनारायणाचे देऊळ’ असे. (पुढील आकृती पहा.) गोव्यात आजही अशी देवळे पहायला मिळतात.

 

१२ अ. गर्भागारात असलेल्या आपल्या उजव्या हाताकडच्या द्वारातून बाहेर पडून अग्निदेवतेचे, म्हणजे यज्ञकुंडाची स्थापना केलेल्या मंडपाचे (असल्यास) दर्शन घ्यावे.

१२ आ. पुन्हा गर्भागारात येऊन आपल्या डाव्या हाताकडच्या द्वारातून बाहेर पडून सूर्यनारायणाच्या मूर्तीचे (असल्यास) दर्शन घ्यावे.

१२ इ. त्यानंतर गर्भागारात येऊन परत देवतेचे दर्शन घेऊन मग गर्भागाराच्या मुख्य द्वारातून बाहेर पडावे.

वरील चित्रात क्रमांक १ ते ६ हे दर्शन घेण्याचा मार्ग दाखवतात.

 

१३. देवतेला प्रदक्षिणा घालणे

१३ अ. प्रदक्षिणा घालण्यापूर्वी गर्भगृहाच्या (गाभार्‍याच्या) बाहेरच्या भागात डाव्या कडेस उभे रहावे आणि मग प्रदक्षिणेला आरंभ करावा.

(प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर उजव्या अंगाला उभे राहून देवतेचे दर्शन घ्यावे.)

१३ आ. प्रदक्षिणा घालण्यापूर्वी देवतेला प्रार्थना करावी, ‘हे ….. (देवतेचे नाव उच्चारावे), तुझ्या कृपेने प्रदक्षिणा घालतांना पडणार्‍या माझ्या प्रत्येक पावलागणिक माझी पूर्वजन्मीची पापे जळून जाऊ देत आणि तुझ्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य मला अधिकाधिक ग्रहण होऊ दे.’

१३ इ. हात जोडून नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात.

१३ ई. प्रदक्षिणा घालत असतांना गाभार्‍याला बाहेरच्या अंगाने (बाजूने) स्पर्श करू नये.

१३ उ. प्रदक्षिणा घालतांना देवतेच्या पाठीमागे थांबून नमस्कार करावा.

१३ ऊ. सर्वसाधारणतः देवांना सम संख्येने (उदा. २, ४, ६, ८) आणि देवींना विषम संख्येने (उदा. १, ३, ५, ७) प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा जास्त घालायच्या असल्यास त्या किमान प्रदक्षिणेच्या संख्येच्या पटीत घालाव्यात.

१३ ए. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवतेला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी.

१३ ऐ. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर देवतेला शरणागतभावाने नमस्कार करावा आणि नंतर मानस प्रार्थना करावी.

 

१४. देवतेला धन, नारळ इत्यादी दान करणे

देवतेला अर्पण करावयाची वस्तू देवतेच्या अंगावर न टाकता तिच्या चरणांवर अर्पण करावी. जर मूर्ती दूर असेल, तर ‘मूर्तीच्या चरणांवर अर्पण करत आहोत’, असा भाव ठेवून ती देवतेसमोरील ताटात ठेवावी.

 

१५. तीर्थ आणि प्रसाद ग्रहण

१५ अ. तीर्थग्रहण

प्रदक्षिणेनंतर उजव्या हाताच्या पंज्याच्या मध्यभागी तीर्थ घेऊन प्यायल्यावर हाताचे मधले बोट आणि अनामिका यांची टोके हाताच्या तळव्याला लावून ती बोटे दोन्ही डोळ्यांना लावावीत आणि मग ती कपाळावरून डोक्यावर सरळ वरच्या दिशेने फिरवावीत, म्हणजे ब्रह्मरंध्र, मस्तक आणि मान या ठिकाणी लावावीत.

१५ आ. प्रसादग्रहण

१. प्रसाद घेतांना नेहमी उजव्या हातात घ्यावा.

२. प्रसाद घेण्यासाठी नम्रतेने वाकावे. (पुरेसे अंतर नसल्यास थोडे तरी वाकावे.)

३. प्रसादाकडे बघून आपली उपास्यदेवता किंवा गुरु यांचे स्मरण करावे.

४. प्रसाद घेतल्यावर त्वरित सरळ न होता हळूवारपणे सरळ व्हावे. त्यामुळे प्रसाद घेतांना निर्माण झालेली सात्त्विकता शरिरात जास्त काळ टिकून रहाते.

५. देवळातच बसून प्रथम थोडा वेळ नामजप करावा आणि त्यानंतर प्रसाद शक्यतो देवळात बसूनच ग्रहण करावा.

६. प्रसाद ग्रहण केल्यानंतर उभे राहून देवाला मानस नमस्कार करावा.

७. प्रसाद घरी न्यायचा असल्यास स्वच्छ वस्त्रात गुंडाळून न्यावा.

 

१६. देवळातून निघतांना करावयाच्या कृती

१६ अ. देवळातून निघतांना देवतेला परत एकदा नमस्कार करून ‘तुझी कृपादृष्टी माझ्यावर सदैव असू दे’, अशी तिला प्रार्थना करावी.

१६ आ. देवालयातून दर्शन घेऊन परत फिरतांना देवाकडे पाठ न फिरवता सात पावले मागे यावे.

१६ इ. देवळाबाहेर आल्यानंतर आवारातून परत एकदा कळसाला नमस्कार करावा आणि मगच प्रस्थान करावे.

 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘देवळात दर्शन कसे घ्यावे ?’

 

Leave a Comment