अनंताचे आनंददायी शास्त्र अध्यात्म ! – प.पू. डॉ. जयंत आठवले

१. शब्दज्ञान नव्हे, तर सूक्ष्मज्ञान असणे अध्यात्मात महत्त्वाचे असणे !

एखाद्याला शब्दज्ञान किती आहे, याला अध्यात्मात किंमत नाही. टप्प्याटप्प्याने आध्यात्मिक शक्ती, भाव, चैतन्य, आनंद व शांती या गोष्टी ओळखता येणे व त्या स्वतःत असणे, हे आध्यात्मिक उन्नतीचे लक्षण आहे. आपल्यापेक्षा २ टप्पे पुढच्या अवस्था ओळखता येतात; म्हणून शक्तीपातळीवाल्यांना भाव व चैतन्य असलेले ओळखता येतात; पण आनंद व शांती या स्थितींतील संत ओळखता येत नाहीत. पुढे या गोष्टी स्वतःतही निर्माण होतात.

 

२. पंचज्ञानेंद्रिये , मन व बुद्धी यांच्या पलीकडे अध्यात्म आहे म्हणजे काय ?

एखाद्याचे अक्षर सुंदर आहे, हे डोळ्यांना दिसते, ते मनाला आवडते. आवडण्याचे कारण अक्षर सुंदर आहे, हे बुद्धीला कळते. याउलट पंचज्ञानेंदि्रये, मन व बुद्धी यांच्या पलीकडे गेलेल्यांना सूक्ष्मातील स्पंदने कळतात. त्यामुळे त्यांना संतांचे अक्षर चांगले नसले, त्यांनी वेड्यावाकड्या रेखाट्या ओढल्या, तरी त्यांत चैतन्य असल्याचे जाणवते; म्हणून ते चांगले आहे, असे ते म्हणतात.

 

३. अध्यात्म अनंत असल्याने नाविन्याच्या ज्ञानाचा आनंद सतत अनुभवता येणे !

ज्ञानात आनंद असतो. ज्ञान अनंताचे आहे. त्यामुळे आनंदही सतत मिळत रहातो. व्यवहारातील उदाहरण पहायचे झाले, तर एखादे गणित कसे सोडवायचे, हे आपल्याला एकदा कळल्यानंतर त्या गणितात नवीन असे काही उरत नाही. असेच जगातील इतर विषयांच्या बाबतीत मर्यादा येते. फक्त अध्यात्मातच अनुभूती येतात व ज्ञानात आनंद मिळतो. अध्यात्म हे अनंताचे शास्त्र असल्याने रोज नवीन काहीतरी शिकायला मिळते व ज्ञानामुळे सतत आनंद मिळतो. नाविन्याशिवाय कोणी जगू शकत नाही, उदा. आपल्याला आईस्क्रीम आवडते; पण आपण त्यातही वेगवेगळ्या चवीचे आईस्क्रीम खाण्याचा प्रयत्न करतो. अध्यात्माशिवाय इतर कोणत्या विषयात नाविन्याने अनुभूती येत नाहीत.

 

४. सात्त्विक बुद्धीने अध्यात्म जाणा !

अध्यात्मात बुद्धीचा काही उपयोग नाही. बुद्धीने अध्यात्म, म्हणजे सूक्ष्म समजणार नाही, असे सांगितले जाते. काहींना प्रश्न पडतात, असे कसे ? बुद्धीनेच तर आपण सर्वकाही समजून घेत असतो. तेव्हा बुद्धी सोडून द्या, असे कसे काय सांगण्यात येते ? विश्वबुद्धी वगैरे बाबी मग कशासाठी आहेत ? साधारणपणे अध्यात्मात बुद्धीचा काही उपयोग नसल्याने बुद्धी सोडून द्या, असे जेव्हा सांगितले जाते, तेव्हा ते राजसिक व तामसिक बुद्धींच्या संदर्भात असते. त्या नष्ट केल्यानंतर उरते ती सात्त्विक बुद्धी. १०० टक्के सात्त्विक बुद्धीने व सूक्ष्मातून समजलेले एकच असते; कारण तेव्हा सात्त्विक बुद्धीला जे समजते, ते विश्वबुद्धीकडूनच ध्यानात समजते.

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment