नामजपाचे काही वैशिष्ट्यपूर्ण लाभ

Article also available in :

अनुक्रमणिका

१. हालाहल प्राशन केल्यामुळे होणारा शिवाच्या अंगाचा दाह रामनामामुळे थांबणे, तसा नामधारकाला होणारा मायेचा दाह नामामुळे थांबणे

२. नामामुळे सिद्धीप्राप्ती होणे

३. नामामुळे आध्यात्मिक उन्नती जलद होणे

४. अहं न उरणे

४ अ. थोडासा अहं घालवण्यासाठीही गुरूंनी १ लाख नामजप करण्यास सांगणे

५. नामामुळे सद्गुरूंची प्राप्ती होणे

६. नामामुळे भगवंताशी एकरूप होता येणे / अद्वैत साधले जाणे

७. नामामुळे मृत्यूनंतरही लाभ होणे

८. समष्टीच्या दृष्टीकोनातून लाभ


 

केवळ ईश्वराच्या नामाने मानव ईश्वराशी एकरूप होऊ शकतो. नामाने सिद्धीप्राप्ती, आध्यात्मिक उन्नती, अहं नष्ट होणे यांसारखे अनेकविध लाभ होतात. नामाच्या या वैशिष्ट्यपूर्ण लाभांचे प्रस्तूत लेखात सविस्तर विवेचन केले आहे.

 

१. हालाहल प्राशन केल्यामुळे होणारा शिवाच्या अंगाचा दाह
रामनामामुळे थांबणे, तसा नामधारकाला होणारा मायेचा दाह नामामुळे थांबणे

‘देव आणि दानव यांनी समुद्रमंथन करतांना ‘हालाहल’ नावाचे विष (जहर) उत्पन्न झाले. त्यामुळे जगातील सर्व प्राणी मरण्याची भीती उत्पन्न झाली. तेव्हा शिवाने ते विष प्राशन केले. त्यामुळे त्याचा कंठ निळा झाला. (म्हणून त्याला ‘नीलकंठ’ हे नाव प्राप्त झाले.) कपाळावर चंद्र आणि डोक्यावर गंगा असूनही त्याच्या अंगाचा दाह थांबेना. तेव्हा त्याला ‘राम’नामाची आठवण झाली. त्याने रामनाम घ्यावयास आरंभ केला. तेव्हा त्याच्या अंगाचा दाह थांबला. `शंभु राम नाम घेई यदा । दाह कमी होई तदा ।।’ हालाहल प्राशन केल्यामुळे होणारा शिवाच्या अंगाचा दाह जसा रामनामामुळे थांबला, तसा रामनाम घेऊन (नामजप करून) सर्व पापांचा (मायेचा) दाह नष्ट होतो.’

 

२. नामामुळे सिद्धीप्राप्ती होणे

एखादा विशिष्ट जप केल्यास त्या विशिष्ट तत्त्वावर नियंत्रण मिळविता येते आणि त्यानुसार काही सिद्धी प्राप्त होतात, उदा. सूर्य-देवतेच्या जपाने तेजतत्त्वावर नियंत्रण मिळविता आले की, उष्णतेचा त्रास होत नाही.

 

३. नामामुळे आध्यात्मिक उन्नती जलद होणे

‘नामाचे साधन हे जलद गाडीप्रमाणे आहे. मधली स्टेशने, उदा. रंग दिसणे, प्रकाश दिसणे, नाद ऐकू येणे, ही सोडून नाम एकदम भगवंताकडे नेऊन पोहोचवते.’

 

४. अहं न उरणे

अ. ‘विस्तवाजवळ तूप ठेवले की ते विरघळते, तसे नामाच्या शेगडीजवळ अभिमान वितळतो.’

आ. ‘एखाद्याच्या घरी दत्तक म्हणून गेल्यावर त्याची मालमत्ता मिळण्यासाठी आपले आधीचे नाव विसरून नवीन नाव लावावे लागते. तसेच देवाची कृपा मिळविण्यासाठी अहं सोडणे आणि आपले नाव विसरून त्याचे नाव लावणे (नाम घेणे) आवश्यक असते, म्हणजे साधकाने नामजपात गुंग होऊन स्वतःला विसरले पाहिजे अन् नामाशी एकरूप झाले पाहिजे.’ – प.पू. भक्तराज महाराज

थोडासा अहं घालवण्यासाठीही गुरूंनी १ लाख नामजप करण्यास सांगणे

‘एकदा कार्यक्रम झाल्यावर श्रीकाका आपल्या खोलीत एकटेच बसून कार्याचे सिंहावलोकन करत असतांना स्वतःविषयीचा छोटासा अहंकार त्यांच्या मनात उत्पन्न झाला. श्री महाराजांना श्रीकाकांचा हा छोटासा अहंकारही सहन झाला नाही. त्यांनी दोन-चार दिवसांतच श्रीकाकांना श्रीक्षेत्र गोंदवल्याला पाठवून एक लाख जप करण्यास सांगितले.’

 

५. नामामुळे सद्गुरूंची प्राप्ती होणे

‘नाम सद्गुरूंकडून घेणे चांगले; पण सद्गुरु भेटले नाहीत, तरी नामस्मरण करत रहावे; कारण तेच नामस्मरण सद्गुरूंची भेट घडवून आणते.

अ. मधूचा लागतां सुगावा । जैशा मक्षिका घेती धांवा ।
वा साखरेचा पाहून रवा । मुंग्या येती धांवून ।। – गजानन विजय, अध्याय ५, ओवी १५०

आ. मधु तेथें माशा जमती । न लगे करणें आमंत्रण ।। – गजानन विजय, अध्याय ३, ओवी ५

मध असला तर मधमाशांना आणि साखर असली तर मुंग्यांना कोणी बोलावते का ? त्याचप्रमाणे भगवंताचे नामस्मरण करणार्‍याकडे संत येतात, त्याला मार्ग दाखवतात आणि त्याच्यावर कृपेचा वर्षाव करतात.’

 

६. नामामुळे भगवंताशी एकरूप होता येणे / अद्वैत साधले जाणे

अ. ‘शरिराच्या पिंजर्‍यातील आत्म्याला नामस्मरणाने सोडवता येते.

आ. गवत आणि अग्नी एकत्र आले की, गवत जळते अन् जळून अग्नीरूप होते. भगवंताचे नाम घेतले, तर नाम सारी पापे जाळून टाकते आणि भक्त भगवंताशी एकरूप होतो.

इ. एका भांड्यात पाणी ओतले, तर पाण्याचा आकार त्या भांड्याच्या आकाराचाच होतो. तद्वत मन ज्या वस्तूचे चिंतन करते, तीच वस्तू ते बनत असते; म्हणून मनात ईश्वराचा नामजप सतत चालू ठेवल्यास मन नामरूपी, म्हणजेच ईश्वररूपी बनते.

ई. सीता त्रिजटेला म्हणाली, ‘`मी सतत रामाचे चिंतन करते; म्हणून (कीटक-भ्रमर न्यायाने) मी राम झाले, तर मग माझ्या दांपत्यसुखाचे काय होईल ?’’ त्यावर त्रिजटा म्हणाली, ‘`जितके तू रामाचे ध्यान करत आहेस, तितकेच रामही तुझे ध्यान करत आहे; म्हणून राम सीता होईल आणि तुझे दांपत्यसुख कायम राहील.’’

उ. नामजप करतांना नामधारक नामाशी एकरूप झाला, नाम-नामी एक झाले किंवा नामधारक, ज्याचे नाव घेतो तो देव आणि नाम घेण्याची क्रिया, या तिन्ही गोष्टी एक झाल्या, म्हणजे त्रिपुटी नष्ट झाली की, अद्वैताची स्थिती प्राप्त होते.

 

७. नामामुळे मृत्यूनंतरही लाभ होणे

‘जडातील सर्वांत सूक्ष्म गोष्ट म्हणजे नाम. ते मृत्यूच्या वेळी लिंगदेहासमवेत जाते. नामधारकाला मरण नाही, तर नामाशी मीलन आहे. नाम घेता घेता साधकाचे नामाशी मीलन होते, म्हणजे तो नामाशी एकरूप होऊन जातो.’ – प.पू. भक्तराज महाराज

 

८. समष्टीच्या दृष्टीकोनातून लाभ

व्यष्टी (वैयक्तिक) स्तरावर नामजप उपयोगी आहेच, पण त्यासह समष्टी (समाज) स्तरावरही तो कसा उपयुक्त ठरतो, हे पुढे दिलेल्या काही सूत्रावरून लक्षात येईल.

अ. नामजपामुळे समष्टी कार्य (उदा. धर्मजागृती, राष्ट्ररक्षण) करणार्‍या साधकांचे वाईट शक्तींपासून रक्षण करता येते.

आ. नामजपामुळे धर्मकार्यात येणार्‍या आध्यात्मिक अडचणींचे निवारण करता येते.

सामूहिक नामजपाच्या माध्यमातून हिंदु धर्माचे पुनरुत्थान आणि हिंदूंचे संघटिकरण करता येणे

आज हिंदु धर्माची अत्यंत दुर्दशा झाली आहे. हिंदु धर्म, देवता, संत, राष्ट्रपुरुष आदींची विटंबना करणार्‍या विविध घटना सर्वत्र आढळून येत आहेत. ही धर्महानी होण्यामागील विविध कारणांपैकी प्रमुख कारण म्हणजे हिंदूंचा धर्माभिमान जागृत नसणे. हिंदूंमध्ये धर्मजागृती होण्याच्या दृष्टीने सनातन संस्थेसह अन्य काही हिंदुत्ववादी संघटना आणि जागरूक हिंदू यांनी सामूहिक नामजपाच्या उपक्रमाला, म्हणजे नामदिंडीला आरंभ केला. या नामदिंडीत हिंदूंच्या देवतांचे सामूहिक नामस्मरण करण्यात येते. दिंडीत सहभागी होणार्‍यांच्या हातात ‘धर्महानी करणार्‍यांना रोखा !’, असा आशय सांगणारे फलकही असतात. हिंदूंच्या अशा एकत्रित नामगजराचा मोठा परिणाम म्हणून अनेक हिंदूंच्या मनात हिंदु धर्म आणि देवता यांच्याप्रती अधिक आस्था निर्माण होऊ लागली. धर्म आणि देवता यांच्या होणार्‍या विटंबनेविषयी हिंदू हळूहळू जागृत होऊ लागले. विविध ठिकाणच्या नामदिंड्यांना लाभलेल्या हिंदु धर्माभिमान्यांच्या उत्तम प्रतिसादावरून हे लक्षात आले.

बर्‍याचदा संप्रदायाची देवता वा उपासनापद्धत यांवरून संप्रदायसंप्रदायामध्ये भेद केला जातो. अन्य पंथीय जसे संघटित असतात, तसे हिंदु धर्मियांच्या संदर्भात आढळून येत नाही. नामदिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात सहभागी होणारे हिंदू आपली संघटनात्मक ओळख, सांप्रदायिक परिचय किंवा समाजातील आपले पद काही काळासाठी तरी एकीकडे ठेवून एक शुद्ध धर्मकार्य म्हणून नामदिंडीकडे पहातात. नामदिंडीच्या माध्यमातून हिंदूंमध्ये एकात्मतेची भावनाही हळूहळू निर्माण होऊ लागली. त्यामुळे नामदिंडी धर्मजागृती करण्यासह विखुरल्या गेलेल्या सांप्रदायिकांच्या आणि अनेक हिंदूंच्या मनांना सांधणारा दुवादेखील ठरली आहे.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘नामजपाचे महत्त्व आणि लाभ’

Leave a Comment