अंतकाळ आणि नामस्मरण

अनुक्रमणिका

१. अंतकाळी नामस्मरण कोणाचे होते ?

२. अंतकाळी देवाचे नामस्मरण होण्याचे महत्त्व

३. अंतकाळी देवाचे नामस्मरण होत असल्यास चांगली गती मिळणे

४. तुकारामगाथेतील विवेचन

५. जन्मभर नामजप केला, तरच मृत्यूच्या वेळी नाम तोंडात येणे

६. जीवन्मुक्तालाही नाम आवश्यक असणे

७. केवळ नामजपानेच वाईट शक्तींना हरवता येणे शक्य असणे


‘मृत्यूसमयी मुखात हरिनाम असावे’, असे संतांनी म्हटलेले आहे. या लेखातून आपण हे सूत्र सविस्तररीत्या जाणून घेऊया.

 

१. अंतकाळी नामस्मरण कोणाचे होते ?

ज्याचे निरंतर चिंतन । त्याचे अंतकाळी चिंतन ।

 

२. अंतकाळी देवाचे नामस्मरण होण्याचे महत्त्व

अ. म्हणौनि यापरी मातें । अंतकाळीं जाणतसाते ।
जे मोकलिती देहातें । ते मीचि होती ।। ६८ ।।
आणि मरणीं जया जें अठवे । तो तेचि गतीतें पावे ।
म्हणौनि सदा स्मरावें । मातेंचि तुवां ।। ७५ ।। – ज्ञानेश्वरी, अध्याय ८

स्पष्टीकरण : अंतकाळी भगवंताचे नाम घेत मृत्यू आला, तर तो माझ्या (ईश्वराच्या) स्वरूपाला जाऊन मुक्त होतो. अंतकाळी एखाद्याची जशी मनःस्थिती असते, त्याप्रमाणे त्याला गती मिळते; म्हणून सदा भगवंताचे नाम घेत रहावे.

आ. `अन्ते मतिः सा गतिः ।’ म्हणजे मृत्यूच्या वेळी मनात जो विचार असतो, त्याप्रमाणे मृत्यूनंतर गती मिळते. (मृत्यू कधी येईल ते ज्ञात नसल्यामुळे) ‘सर्वेषु कालेषु मामनुस्मर ।’ म्हणजे सदा सर्व काळ (प्रत्येक कार्य करतांना) माझे स्मरण ठेव, असे भगवंताने गीतेत (अध्याय ८, श्लोक ७) सांगितले आहे.

 

३. अंतकाळी देवाचे नामस्मरण होत असल्यास चांगली गती मिळणे

अ. माझें नाम अवचटें आल्या अंतीं ।
रंक लाहे सायुज्यमुक्ती । – एकनाथी भागवत, अध्याय २९, ओवी ६३६

अर्थ : (भगवंत उद्धवाला सांगतो,) माझे नाम अंतकाळी अकस्मात जरी मुखात आले, तरी रंकालासुद्धा सायुज्यमुक्ती प्राप्त होते.

आ.ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन् ।
यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ८, श्लोक १३

अर्थ : (श्रीकृष्ण म्हणतो) ‘ॐ’ या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार आणि माझे स्मरण करत असता, जो देहाचा त्याग करून जातो, तो अत्यंत श्रेष्ठ अशा गतीला पावतो.

इ. अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ।
यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ८, श्लोक ५

अर्थ : मरणाच्या वेळी जो केवळ माझेच स्मरण करत शरिराचा त्याग करून जातो, तो मत् स्वरूप पावतो, याविषयी संशय नाही.

 

४. तुकारामगाथेतील विवेचन

अंतकाळी देवाचे नामस्मरण व्हावे, म्हणून प्रार्थना
नको धन मान न वाढे संतान । मुखीं नारायण प्राण जावा ।। – तुकारामगाथा, अभंग ४४४३, ओवी २

 

५. जन्मभर नामजप केला,तरच मृत्यूच्या वेळी नाम तोंडात येणे

‘मरतांना नाम घेतले, तर आयुष्यातील सर्व पापे नष्ट होतात; पण मरतांना तोंडात नाम येईल का ? १००० विंचू चावल्यावर जेवढे दुःख होईल, तेवढे दुःख प्राण जातांना होते. त्या वेळेस भगवंताचे नाम आठवेल का ? मरतांना मन, बुद्धी आणि इंद्रिये माणसाच्या नियंत्रणात नसतात; म्हणून जन्मभर नामस्मरणाचा अभ्यास करावा, नाम घ्यावे.’

– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे.

 

६. जीवन्मुक्तालाही नाम आवश्यक असणे

‘एखादा जीवन्मुक्त झाला, तरी देह असेपर्यंत इतर इंद्रियांच्या कर्मांप्रमाणेच त्याने वाणीने प्रणवजपही (नामजपही) करावा.’

 

७. केवळ नामजपानेच वाईट शक्तींना हरवता येणे शक्य असणे

कलियुगात नामजप हा सर्वोत्तम साधनामार्ग सांगितला असला, तरी गुरुप्राप्ती किंवा ईश्वरप्राप्ती शीघ्र होण्यासाठी नामजपासह सत्संग, सत्सेवा, सत् साठी त्याग इत्यादी पुढच्या पुढच्या टप्प्याचे साधनाप्रकार अवलंबणे श्रेयस्कर ठरते. सूत्र ‘वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ करावयाचा नामजप’ यामध्ये वाईट शक्तींमुळे मनुष्याला त्रास कसा होतो आणि त्याच्या निवारणासाठी नामजप कसा उपयुक्त ठरतो, याचे थोडक्यात विश्लेषण केले आहे. या संदर्भात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाईट शक्तींना सत्संग, सत्सेवा, त्याग आदी कोणत्याही साधनेने हरवता येत नाही, तर ती क्षमता केवळ नामातच आहे. याचे एक कारण म्हणजे वाईट शक्तींवर जय मिळविण्यासाठी आवश्यक अशी ईश्वराच्या मारक रूपाची शक्ती केवळ नामानेच आपल्यात येऊ शकते. दुसरे कारण म्हणजे नामाविना इतर कोणतीही साधना अखंडपणे करता येत नाही; केवळ नामानेच वाईट शक्तींशी सतत लढता येते.

योग्य नामजपानेही प्रारंभी वाईट शक्तींमुळे त्रास होणे

एखाद्याला भूत, करणी आदींमुळे वाईट शक्तींचा त्रास असला, तर त्याला योग्य नामजपानेही प्रारंभी त्रास होऊ शकतो; मात्र तो हळूहळू घटून थांबतो. प्रारंभी त्रास होण्याचे कारण असे की, वाईट शक्ती आणि नामजपाने निर्माण होणारी चांगली शक्ती यांच्यातील संघर्षामुळे तो त्रास होत असतो.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘नामजपाचे महत्त्व आणि लाभ’

Leave a Comment