नामजप : परिपूर्ण साधना

अनुक्रमणिका

१. कोणत्याही साधनेतील पूर्णत्वासाठी नाम आवश्यक असणे

२. परिपूर्ण साधना

३. नामाची सर्वसमर्थता

४. सर्वश्रेष्ठ साधना

५. नाम हेच सर्वकाही

६. नाम घेणे हे कर्तव्य असणे

७. नामधारक हाच सुधारलेला मनुष्य

८. संतांनी सांगितलेले नामाचे महात्म्य

९. नामस्मरणसिद्धीने एकच सिद्धी, म्हणजे ईश्वरप्राप्ती करून देणे


 

‘यज्ञानां जपयज्ञोस्मि ।’ अर्थात ‘कलियुगात सर्व यज्ञात ‘मी’ जपयज्ञात आहे.’ भगवान श्रीकृष्णाने महाभारतात सांगितलेले हे वचन नामाचे महत्त्व स्पष्ट करते. केवळ नामानेच ‘वाल्ह्या’चा ‘वाल्मिकी होऊ शकतो, यांतच नामाचे विशेषत्व, सर्वश्रेष्ठत्व सिद्ध होते. या लेखातून ईश्वराच्या नामाचे विशेष महत्त्व जाणून घेऊन वाचकांनी योग्य नामसाधनेला आरंभ करावा, हीच भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !

 

१. कोणत्याही साधनेतील पूर्णत्वासाठी नाम आवश्यक असणे

याचे एक उदाहरण पुढे दिले आहे. वेदोक्त कर्मातले दोष काढून टाकून त्याला साद् गुण्य प्राप्त होण्यासाठी नामाची आवश्यकता असते; म्हणूनच `कर्मांच्या अंती विष्णुस्मरण करावे’, असे सांगितले आहे. नाम सफल करण्याकरिता मात्र कर्मांची आवश्यकता नाही.

 

२. परिपूर्ण साधना

देहधर्म आणि मनोधर्म पाळून केलेली साधना, ही परिपूर्ण साधना असते. नामजप ही अशीच एक परिपूर्ण साधना आहे; म्हणूनच सहजावस्थेकडे जाण्याचे ते एक उत्तम साधन आहे.

 

३. नामाची सर्वसमर्थता

‘भगवंताचे सर्वज्ञत्व, सर्वशक्तीमत्व, दयासिंधुत्व इत्यादी जे अलौकिक गुण आहेत, ते त्याच्या नामात आहेत. जो दुसर्‍याच्या साहाय्यावाचून एकटाच सर्व प्राप्त करून देऊ शकतो आणि ज्याच्या साहाय्यावाचून दुसरे काही करू शकत नाहीत, त्याला `समर्थ’ म्हणतात. ‘नाम’ हे असे सर्वसमर्थ आहे.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. (श्रीमद्भागवतातील अजामिळाच्या आख्यानावरून, स्कंध ६, अध्याय १ ते ३)

 

४. सर्वश्रेष्ठ साधना

‘नामजपाविना सगळी साधने नद्यांसारखी आहेत. नाम हे सागरासारखे आहे. सर्व नद्यांना शेवटी सागरालाच मिळावे लागते आणि सागराला मिळाल्यावर नद्यांचे नदीपण नाहीसे होते. आपण नामजपाच्या सागरात गेल्यावर आपल्याला अन्य साधनांची काय आवश्यकता आहे ? वास्तविक ज्याला सत्संग घडून नामाचा महिमा कळला आहे, त्याने इतर सर्व साधना मागच्या जन्मी केलेल्या असतात. त्यामुळे त्याला त्या साधना करण्याची आवश्यकता नसते.’

– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

 

५. नाम हेच सर्वकाही

नामैव परमं दानं नामैव परमा क्रिया ।
नामैव परमो धर्मः नामैवार्थः प्रकीर्तितः ।।

अर्थ : नाम हेच मोठे दान आहे. नाम हीच मोठी क्रिया आहे. नाम हाच मोठा धर्म आहे. नाम हाच सांगितलेला अर्थ आहे. (नाम हेच धन आहे.)

 

६. नाम घेणे हे कर्तव्य असणे

‘नाम घेणे हे कर्तव्य आहे. आपल्याला ज्या ईश्वराने बनविले आहे, त्याचे ऋण फेडण्यासाठी श्वासोच्छ्वासी नाम घ्यायला हवे.’- प.पू. भक्तराज महाराज

 

७. नामधारक हाच सुधारलेला मनुष्य

‘सुधारणा म्हणजे ‘जे शिव आहे किंवा मंगल आहे, त्याची धारणा’ होय. या दृश्य जगातील कोणतीही वस्तू अशी पूर्ण मंगल असणे शक्यच नाही; कारण जग हे त्रिगुणात्मक असल्यामुळे जेथे चांगले तेथे वाईट असते, जेथे उजेड तेथे अंधार असतो, जेथे मंगल तेथे अमंगल असते. जर दृश्य वस्तूमध्ये ‘पूर्ण मंगल’ नाही, तर ते सूक्ष्मातच असले पाहिजे. रूप हे दृश्य आहे आणि नाम हे सूक्ष्म आहे; म्हणून भगवंताच्या नामाच्या इतके पूर्ण मंगल असे दुसरे काहीही नाही. अर्थात ज्याने भगवंताचे नाम अंतःकरणात धारण केले, तोच खरा सुधारलेला मनुष्य होय.’

 

८. संतांनी सांगितलेले नामाचे महात्म्य

अ. ‘जो नामस्मरण करतो, त्याच्या दारात मी कुत्रा होऊन राहीन.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे.

आ. ‘प्रतिदिन सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जो नाम घेतो, त्याच्या रात्रीच्या नामस्मरणाचे दायित्व (जबाबदारी) मी घेईन.’ – ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

 

९. नामस्मरणसिद्धीने एकच सिद्धी, म्हणजे ईश्वरप्राप्ती करून देणे

‘नामस्मरण ही एकच सिद्धी ईश्वरप्राप्ती करून देते. अन्य सर्व सिद्धी ईश्वरप्राप्तीच्या आड येत असतात. नामस्मरणसिद्धी प्राप्त झाली की, ईश्वराच्या प्राप्तीचीही इच्छा नष्ट होत असते. त्या वेळी ईश्वर दर्शन देतो आणि आपल्या मागे अष्टसिद्धी घेऊन लागतो.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘नामजपाचे महत्त्व आणि लाभ’

Leave a Comment