कोणतीही सेवा श्रीकृष्णाच्या कृपेने होत असल्याच्या अनुभूती दर्शवणारी भावपूर्ण चित्रे (भाग ३)

७. श्रीकृष्ण नेतृत्व करत असलेल्या धर्मयुद्धात सहभागी होऊन श्रीकृष्णाचा घाम पुसण्याची सेवा करणे

balak_bhav_2_C17_b

‘श्रीकृष्ण नेतृत्व करत असलेल्या धर्मयुद्धात मी सहभागी झाले आहे आणि रथात अर्जुनाच्या ठिकाणी नमस्काराच्या मुद्रेत सर्व साधक उभे आहेत. मी श्रीकृष्णाच्या शेजारी उभी राहून त्याचा घाम पुसण्याची सेवा करत आहे.’ – सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (२३.७.२०१२)

७ अ. चित्राची वैशिष्ट्ये

१. बालकभावातील साधिका तिच्या मनातील आनंदासमवेतच वातावरणातील इतर घटकांना झालेल्या आनंदातही समरस झाल्याचे चित्र

‘या चित्रात रथाच्या चाकाचा मध्य आनंददायी फुलाच्या कलाकृतीने (नक्षीने) रेखाटला आहे, म्हणजेच ‘श्रीकृष्ण परमात्माच रथ चालवत असल्याचा आनंद रथाच्या चाकांनाही झाला आहे’, हेच यातून स्पष्ट केले आहे. साधिकेने केसात घातलेले फूल, रथाच्या चाकाला असलेले फूल आणि घोड्याच्या अंगावर असलेल्या दागिन्यातील कलाकृतीची (नक्षीची) फुले एकसारखीच आहेत. यातूनच या चित्रातील रथ, घोडे आणि बालकभावातील साधिका एकमेकांशी आनंदाच्या रूपात या फुलांयोगेही एकरूप झाले आहेत, असे वाटते.

२. चित्रातील घोड्यांचे रेखाटन अर्धेच केलेले असले, तरी घोड्यांच्या चेहेर्‍यावर काय भाव असतील, याचे चित्र पहाणार्‍याच्या मनात आपोआपच उमटते, इतके हे चित्र सामथ्र्यवान असणे

या चित्रात घोड्यांचे रेखाटन पूर्ण नसूनसुद्धा त्यांच्या चेहेर्‍यावर काय भाव असतील, याचे चित्र आपोआपच मनात उमटते. इतके हे चित्र सामर्थ्यवान झाले आहे. एखाद्या चित्रातून स्पष्ट होणारा भावार्थ काही ठराविक रेखाटनातून परिपूर्णरित्या स्पष्ट होत असेल, तर उगीच अनावश्यकपणे ‘चित्राला पूर्ण करायचे म्हणून ते पूर्ण केले’, असा मानसिक स्तरावरचा विचार या चित्रात कोठेही केलेला आढळत नाही, म्हणजेच ईश्वर अनावश्यक असणारी अशी कोणतीच गोष्ट करत नाही, हेही लक्षात येते.

३. ‘श्रीकृष्ण ज्या रथाचा सारथी आहे, तो रथ हवेत उडणाराच असेल’, असा भावार्थ ‘रथातील आथरणावर (गालिचावर) रेखाटलेल्या फुलपाखराच्या कलाकृतीतून’ स्पष्ट करणारे चित्र !

चित्रात त्याच्या चरणांशी पसरलेल्या आथरणावर (गालिचावर) फुलपाखराची कलाकृती साधिकेने दाखवली आहे. यातूनच श्रीकृष्ण, म्हणजे प्रत्यक्ष भगवंतच ज्या रथाचा सारथी आहे, तो रथ वायूवेगानेच जाणारा आहे, हे या कलाकृतीतून स्पष्ट करून दाखवले आहे. रथाने वेग धारण केल्यानंतरही आपल्याला भीती न वाटता उलट हवेत उडतांना फुलपाखराला जसा आनंद होतो, तसाच आनंद आपल्यालाही होईल, हेही फुलपाखराच्या कलाकृतीतून स्पष्ट करून दाखवण्यास साधिका विसरलेली नाही.’ – सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.९.२०१२)

(‘चित्रामध्ये श्रीकृष्णाच्या मानेचा घाम पुसण्यासाठी बालकभावातील साधिका चवड्यावर उभी आहे. असे अनेक बारकावे प्रत्येक चित्रात आढळून येतात.’ – (प.पू.) डॉ. आठवले

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘‘बालकभावा’तील चित्रे (भाग २) (धर्मसंदेश देणारी श्रीकृष्णाची चित्रे अनुभूतींसह)’

Leave a Comment