मलमूत्रविसर्जन हे मार्ग, गोठा, पाणी इत्यादी ठिकाणी केल्याने होणारे तोटे

अनुक्रमणिका

१. मार्गावर मलमूत्रविसर्जन का करू नये ?
२. नांगरलेल्या भूमीवर मलमूत्रविसर्जन केल्याने होणारे तोटे
३. वारुळावर मलमूत्रविसर्जन करू नये
४. मलमूत्रविसर्जन गोठ्यात का करू नये ?
५. पाण्यात मलमूत्रविसर्जन न करण्यामागील शास्त्र काय ?
६. जलाशयापासून दहा हातांच्या आत मलमूत्रविसर्जन करू नये
७. जीर्ण देवालयाच्या ठिकाणी मलमूत्रविसर्जन केल्याने होणारे अपलाभ
८. यज्ञवेदी आणि भस्म यांच्या ठिकाणी मलमूत्रविसर्जन करणे अयोग्य का ?
९. अग्नि, सूर्य, चंद्र, जल, ब्राह्मण आणि गाय यांच्यासमोर मलमूत्रविसर्जन करू नये


प्रस्तूत लेखात आपण मलमूत्रविसर्जन याविषयी पाळावयाचे आचार पहाणार आहोत. यांत प्रामुख्याने मलमूत्रविसर्जन हे मार्गावर, पाण्यात, जीर्ण देवालयाच्या ठिकाणी तसेच अग्नि, सूर्य, चंद्र, जल, ब्राह्मण आणि गाय यांच्यासमोर का करू नये हे त्याच्या अध्यात्मशास्त्रीय कारणमीमांसेसह जाणून घेऊया.

१. मार्गावर मलमूत्रविसर्जन का करू नये ?

१ अ. मार्गावर मलमूत्रविसर्जन केल्यास क्षेत्र
रज-तमात्मक वायूमंडलाने भारित होऊन वाईट शक्तींचा संचार वाढणे

शास्त्र – ‘मार्गावरून अनेक पांथस्थ मार्गक्रमण करीत असतात. या मार्गात मलमूत्रविसर्जनासारखी रज-तमजन्य कृती केल्यास मार्गावरून जाणारे पांथस्थ रज-तमात्मक वायूमंडलाने भारित होऊन ते ज्या क्षेत्रात जातील, तेथील क्षेत्रालाही आपल्या संसर्गातून रज-तमाने भारित बनवतात. अशा पद्धतीने अनेक ठिकाणची क्षेत्रे दूषित होऊ शकतात; म्हणून रस्त्यावर मलमूत्रविसर्जनाची कृती टाळावी. ही कृती समष्टी पापास कारणीभूत होते. तसेच अशा रज-तमात्मक क्षेत्री वाईट शक्तींचा संचारही वाढल्याने सर्वांनाच न्यून-अधिक प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ७.१२.२००७, दुपारी १२.५०)

संकलक : ‘मार्गावर मलमूत्रविसर्जन का करू नये’, याचे कारण आपण सांगितले आहे. काही वेळा रस्त्यावर मलमूत्र पडलेले असते. ते ओलांडून न जाण्यामागील कारणही असेच आहे का ?

एक विद्वान : ‘ओलांडण्याची प्रक्रिया ही स्वयं वायूधारणात्मक हालचालीशी संबंधित आहे. यांतून निर्माण होणार्‍या वायूच्या सूक्ष्म-नादझोताकडे मुत्रातील रज-तमात्मक स्पंदने आकृष्ट होतात. यामुळे मूत्र ओलांडणार्‍या जिवाभोवती रज-तमात्मक लहरींनी युक्त असे वायूभारित क्षेत्र निर्माण होते. वाईट शक्तीही वायूरूप असल्याने त्यांच्याही निवासाला हे क्षेत्र पूरक असते; म्हणून मार्गातील मूत्र ओलांडून जाऊ नये.’ – (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २५.१२.२००७, सायं. ७.४५)

२. नांगरलेल्या भूमीवर मलमूत्रविसर्जन केल्याने होणारे तोटे

२ अ. नांगरलेल्या भूमीवर मलमूत्रविसर्जन केल्यास भूमीचे शक्तीरूपी चेतनातत्त्व हरपून भूमी नापीक होणे

शास्त्र – ‘भूमी नांगरल्याने भूमीत सुप्त असणार्‍या शक्तीरूपी भूगर्भलहरी कार्यरत होतात. या लहरींच्या उत्सर्जनाने वायूमंडल भूगर्भलहरींनी भारित बनते. या भूगर्भलहरी बीमधून निघणार्‍या अंकूररूपी पोषणास पूरक असतात. भूगर्भलहरींनी भारित क्षेत्रालाच ‘सुपीक भूमी’ अशी संज्ञा दिली जाते.

अशा भूमीत मलमूत्रविसर्जनासारखी अपवित्र कृती करू नये. या कृतीमुळे भूमीशी संलग्न रज-तमात्मक लहरींचे वायूमंडल निर्माण झाल्याने भूमीची सात्त्विकता घटून ती नापीक बनू शकते, तसेच वाईट शक्तींच्या आक्रमणाला बळी पडू शकते. या कृतीमुळे भूमीचे शक्तीरूपी चेतनातत्त्वच हरपते.

३. वारुळावर मलमूत्रविसर्जन करू नये.

३ अ. वारुळावर मलमूत्रविसर्जन केल्यास वारुळाची भूमीलहरी उत्सर्जनाची क्षमता घटणे

शास्त्र – वारुळात असणार्‍या नागदेवता या शिवरूपी कनिष्ठ गणदेवतांशी संबंधित असतात, तसेच वारुळातून होणार्‍या छिद्ररूपी वायूविजनातून भूमीतत्त्वाशी संबंधित लहरी कारंज्यासारख्या वायूमंडलात उसळत असतात. या लहरींमुळे त्या त्या वायूमंडलातून जाणार्‍या जिवाच्या प्राणदेहाची शुद्धी होत असते.

वारुळाच्या ठिकाणी मलमूत्रविसर्जनासारखी अपवित्र कृती केल्याने वारुळाची भूमीलहरी उत्सर्जनाची क्षमता उणावते; कारण कोणत्याही गोष्टीत रज-तमाचे होणारे संक्रमण हे जडत्वालाच कारणीभूत होणारे असल्याने त्या त्या घटकाची त्या त्या स्तरावरील शक्तीस्वरूप लहरी प्रक्षेपित करण्याची क्षमता आपोआपच घटते; म्हणून अशी पापजन्य कृती शक्यतो टाळणे इष्ट ठरते.

४. मलमूत्रविसर्जन गोठ्यात का करू नये ?

४ अ. गोठ्यात मलमूत्रविसर्जन केल्यास सत्त्वगुणवर्धक
लहरींच्या प्रक्षेपणातून वायूमंडल शुद्ध ठेवणारे पवित्र क्षेत्र अपवित्र होणे

शास्त्र – गोठ्यात असणारे गोमूत्र, शेण, तसेच गायीचे वायूरूपी हुंकार आणि तिचे प्रत्यक्ष देवताजन्य अस्तित्व या घटकांमुळे ते ठिकाण सत्त्वगुणवर्धक लहरींच्या प्रक्षेपणातून वायूमंडल सतत शुद्ध ठेवण्यास कारणीभूत होत असते. गोमूत्र आणि शेण यांतून प्रक्षेपित होणारा सूक्ष्म-वायू हा देहातील प्राणवायूच्या गतिमान संचारणास पूरक असतो. यामुळे ज्या ठिकाणी गायीचा गोठा असतो, तेथील जिवांचे आरोग्य आणि मन नेहमीच चांगल्या स्थितीत राहिल्याने जीवनही आनंदी बनते. म्हणून अशा पवित्र क्षेत्री रज-तमाला आमंत्रण देणारी मलमूत्र विसर्जनासारखी कृती निषिद्ध मानली आहे.

५. पाण्यात मलमूत्रविसर्जन न करण्यामागील शास्त्र काय ?

५ अ. पाण्यात मलमूत्रविसर्जन केल्यास पाण्याचा साठा अशुद्ध बनून
पाण्याकडे ब्रह्मांडातील रज-तमात्मक लहरी आकृष्ट होऊन संपूर्ण वायूमंडल अशुद्ध होणे

शास्त्र – पाणी हे सर्वसमावेशक आहे. पाण्याच्या स्त्रोताला शुद्ध आणि पवित्र ठेवले, तर त्याच्याकडे ब्रह्मांडमंडलातून आकृष्ट होणार्‍या देवतांच्या सात्त्विक पंचतत्त्वात्मक लहरींचा लाभ त्या परिसरात रहाणार्‍या अनेक जिवांना मिळून त्यांच्या देहाची, तसेच वायूमंडलाचीही शुद्धी होण्यास साहाय्य होते. पाण्यात मलमूत्रविसर्जन केले, तर पाण्याचा साठा अशुद्ध बनून त्याच्याकडे ब्रह्मांडातील रज-तमात्मक लहरी आकृष्ट होण्यास आरंभ होतो. अशा प्रकारे संपूर्ण वायूमंडल अशुद्ध बनते. अशी कृती समष्टी जीवनात अनेक विघातक रोगांना आमंत्रित करते. तसेच ते पाणी प्यायल्याने पाण्यासह वाईट शक्तींचा देहात शिरकाव होण्याचीही शक्यता असते.

६. जलाशयापासून दहा हातांच्या आत मलमूत्रविसर्जन करू नये

६ अ. जलाशयापासून दहा हातांच्या आत मलमूत्रविसर्जन
केल्याने वायूमंडल दूषित होऊन संपूर्ण परिसर अशुद्ध बनणे आणि त्यामुळे अनेक
वाईट शक्ती त्या परिसराच्या आश्रयाला येऊन त्यांनी पाण्याचा स्त्रोत त्रासदायक शक्तीने युक्त बनवणे

शास्त्र – जलाशयाच्या दहा हातांच्या आतला परिसर हा जास्त प्रमाणात आर्द्रतादर्शक असतो. तो सूक्ष्मदृष्ट्या सर्व प्रकारच्या पंचतत्त्वात्मक लहरींच्या वायूमंडलात होणार्‍या उत्सर्जनास पोषक असतो. या आर्द्रतादर्शक वायूमंडलाच्या आधारे अनेक दिव्यात्मे त्या त्या नदीच्या तिरावर साधना करत असतात, तर काही पितरही या परिसरात राहून साधना करत असतात. म्हणून नदीच्या तिरावर किंवा कुठल्याही सरोवराच्या तिरावर मलमूत्रादी विसर्जन करू नये. त्यामुळे वायूमंडल दूषित बनून त्यातून रज-तमात्मक लहरींचे सर्वत्र वेगाने प्रसारण होऊन संपूर्ण परिसर अशुद्ध बनतो. यामुळे या परिसराच्या आश्रयास अनेक वाईट शक्ती येऊन पाण्याच्या स्त्रोतालाच त्रासदायक शक्तीने युक्त बनवतात. अशा दूषित पाण्याने सर्वांनाच वाईट शक्तींचा त्रास होण्याची शक्यता असते.

७. जीर्ण देवालयाच्या ठिकाणी मलमूत्रविसर्जन केल्याने होणारे अपलाभ

७ अ. जीर्ण देवालयाच्या ठिकाणी मलमूत्रविसर्जन केल्याने
रजतमात्मक लहरी आणि वायू यांचे उत्सर्जन होऊन पवित्र वायूमंडल अपवित्र बनणे

शास्त्र – ‘जीर्ण’ म्हणजे अतिशय पुरातन. अशा देवालयाच्या ठिकाणी कालांतराने त्या त्या देवतेचे शक्तीरूपी वायूमंडल भूमंडलाशीच घनीभूत झालेले असते. जीर्ण देवालयाच्या भग्न अवशेषांतून ऊर्ध्व वायूमंडलात बाहेर पडणारी देवताजन्य चेतना जरी उणावली असली, तरी त्या त्या देवतेचे कनिष्ठरूपी पृथ्वी आणि आप या तत्त्वांशी संबंधित अस्तित्वरूपी शक्तीस्वरूप वायूमंडल भूमंडलाशी घनीभूततेच्या स्तरावर सुप्तरूपात असल्याने, ते एक पवित्र वायूमंडलच असते. अशा पवित्र ठिकाणी रज-तमात्मक लहरी आणि वायू यांच्या उत्सर्जनास कारणीभूत होणारी मलमूत्र विसर्जनासारखी कृती केल्याने त्या ठिकाणी असणारे पवित्र वायूमंडल अपवित्र होते आणि ते एक पापजन्य कर्म बनते.

८. यज्ञवेदी आणि भस्म यांच्या ठिकाणी मलमूत्रविसर्जन करणे अयोग्य का ?

८ अ. यज्ञवेदी आणि भस्म यांच्या ठिकाणी मलमूत्रविसर्जन
केल्याने त्या त्या ठिकाणी असणारे पवित्र वायूमंडल अशुद्ध होणे

शास्त्र – भस्म आणि यज्ञवेदी यांच्या ठिकाणी तेजरूपी सुप्त शक्तीस्वरूपी वायूमंडल त्या त्या पोकळीत घनीभूत अवस्थेत असते. या ठिकाणी रज-तमात्मक लहरींच्या, तसेच वायूच्या उत्सर्जनास कारणीभूत होणारी मलमूत्रविसर्जनासारखी कृती केल्याने त्या त्या ठिकाणी असणारे पवित्र वायूमंडल अशुद्ध होऊ शकते आणि हे एक पापजन्य कर्म बनते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ७.१२.२००७, दुपारी १२.५०)

९. अग्नि, सूर्य, चंद्र, जल, ब्राह्मण
आणि गाय यांच्यासमोर मलमूत्रविसर्जन करू नये.

९ अ. अग्नि, सूर्य, चंद्र, जल, ब्राह्मण आणि गाय या मांगलिक अन् तेजवर्धक
घटकांसमोर मलमूत्रविसर्जनासारखी कृती करणे, हे महापातक मानलेले असणे

शास्त्र – ‘अग्नि हे दिव्यतेजाचे, सूर्य प्रत्यक्ष किंवा प्रकट तेजाचे, चंद्र शीतल तेजाचे, जल हे सर्वसमावेशक अशा पवित्र कार्यरूपी पंचतत्त्वात्मक तेजाचे, ब्राह्मण ब्राह्मतेजाचे आणि गाय हे तेजतत्त्वदर्शक देवत्वरूपी प्रवाहाचे प्रतीक असल्याने अशा मांगलिक आणि तेजवर्धक घटकांसमोर मलमूत्रविसर्जनासारखी कृती करणे, हे महापातक मानले गेले आहे. मलमूत्रादी विसर्जनातून प्रक्षेपित होणार्‍या सूक्ष्म रजतमयुक्त लहरींमुळे, तसेच वायूमुळे या तेजदायी घटकांनी युक्त असा परिसर दूषित बनवण्याचे पातक त्या जिवास लागण्याची शक्यता जास्त असल्याने अशी पापजन्य कृती करू नये.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ७.१२.२००७, दुपारी ३.०३ आणि ३.११)

(प्रवास, आपत्काल इत्यादी कारणांमुळे मार्गाच्या ठिकाणी मलमूत्रविसर्जन करावेच लागले, तर त्या वेळी देवाची क्षमा मागून, देवाची प्रार्थना करून नामजप करत ते कर्म करावे. – संकलक)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दिनचर्येशी संबंधित आचार आणि त्यांमागील शास्त्र’

Leave a Comment