स्नान : महत्त्व, लाभ, प्रकार, कोठे करावे ?

आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य कृती म्हणजे स्नान करणे होय ! प्रस्तूत लेखात आपण स्नानाचे महत्त्व काय, त्याने होणारे लाभ; स्नानाचे प्रकार आणि स्नान कोठे करावे यांविषयीचे अध्यात्मशास्त्र जाणून घेणार आहोत.

१. स्नानाचे महत्त्व

‘स्नान केल्याने जिवाच्या देहाभोवती आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण आणि जिवाच्या देहातील रज-तम यांचे उच्चाटन होऊन जिवाच्या देहातील पेशी-पेशी चैतन्य ग्रहण करण्यास पोषक होतात. तसेच तोंड धुणे आणि शौचक्रिया यांमुळे जिवाच्या देहातून बाहेर न पडलेल्या त्रासदायक घटकांचे स्नानाच्या माध्यमातून विघटन होते.’

– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १९.६.२००७, दुपारी ३.५१)

२. स्नान केल्याने होणारे लाभ

२ अ. ‘स्नानामुळे जिवाच्या देहातील रज-तम कणांचे प्रमाण घटून जीव वायूमंडलात प्रक्षेपित होत असलेल्या सत्त्वलहरी सहजतेने ग्रहण करू शकतो.

२ आ. स्नान केल्यामुळे जिवाच्या बाह्यमंडलात स्थिरता येण्यास साहाय्य होते. त्यामुळे स्नानानंतर देवपूजा करतांना जीव वृत्ती अंतर्मुख करून वायूमंडलाशी पटकन एकरूप होऊ शकतो आणि वायूमंडलाच्या पोषकतेच्या अनुषंगाने देवतेच्या लहरी ग्रहण करू शकतो.’

– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १६.४.२००७, सायं. ६.१३)

२ इ. प्रातःस्नानाचे लाभ

२ इ १. प्रातःस्नानाने (सकाळी केलेल्या स्नानाने) तेजोबल आणि आयुष्य वाढते आणि दुःस्वप्नांचा नाश होतो.

२ इ २. ‘सूर्योदयापूर्वी मंगलस्नान केल्याने जीव अंतर्-बाह्य शुद्ध होऊन त्या काळातील सात्त्विक लहरी ग्रहण करू शकतो.’

– श्री गणपति (सौ. प्रार्थना बुवा यांच्या माध्यमातून, ११.१०.२००५, दुपारी १२.२५)

३. स्नानाचे प्रकार

हे समजून घेण्यापूर्वी काळाच्या संदर्भातील पुढील ज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. सूर्योदयापूर्वी २ घटिका (४८ मिनिटे) ‘उषःकाल’ असतो. उषःकाल म्हणजे अंधार संपून उजेड दिसायला लागण्याचा काळ. यालाच ‘तांबडे फुटायला लागले’, असे म्हणतात. उषःकालाच्या पूर्वीच्या ३ घटिका (७२ मिनिटे, म्हणजे १ घंटा १२ मिनिटे) ‘ब्राह्ममुहूर्तकाल’ असतो. सूर्योदयाच्या वेळेनुसार उषःकाल आणि ब्राह्ममुहूर्तकाल यांच्या वेळाही पालटतात.

३ अ. ब्राह्ममुहुर्तावर स्नान करणे

‘ब्राह्ममुहुर्तावर स्नान करणे, म्हणजे जिवाद्वारे देवपरंपरेचे पालन करणे. ब्राह्ममुहुर्तावर केलेले स्नान हे ‘देवपरंपरा’ या श्रेणीत येते. देवपरंपरेमुळे जिवाला पुढील लाभ होतात.

३ अ १. जिवावर शुद्धता, पवित्रता आणि निर्मळता हे संस्कार होणे :

‘ब्राह्ममुहुर्ताच्या वेळी जिवाचा मनोदेह स्थिर-अवस्थेत असतो. त्यामुळे त्या कालावधीत स्नान केल्याने जिवावर शुद्धता, पवित्रता आणि निर्मळता हे संस्कार कालाच्या आधारे होतात.

३ अ २. ब्राह्ममुहुर्ताच्या वेळी प्रक्षेपित होत असलेले ईश्वरी चैतन्य आणि देवतांच्या लहरी ग्रहण करण्यास जीव समर्थ बनणे :

ब्राह्ममुहुर्ताच्या वेळी देवतांच्या लहरी अन्य कालापेक्षा जास्त पटीने कार्यरत असतात. ‘स्नान करणे’ यासारख्या प्रत्यक्ष आवाहनदर्शक कृतीच्या माध्यमातून देवतांचे तत्त्व जिवाकडे आकृष्ट होते. तसेच या कालावधीत जिवावर स्नानाच्या माध्यमातून झालेल्या स्थूल आणि सूक्ष्म स्वरूपांच्या संस्कारांमुळे जीव ब्राह्ममुहुर्तावर प्रक्षेपित होत असलेले ईश्वरी चैतन्य आणि देवतांच्या लहरी ग्रहण करण्यास समर्थ होतो.

३ अ ३. ईश्वराच्या पूर्णात्मक चैतन्याशी एकरूप होता येणे :

शुद्धता, पवित्रता आणि निर्मळता या तीन संस्कारांच्या माध्यमातून जिवाला ईश्वराच्या संकल्प, इच्छा आणि क्रिया या तीन प्रकारच्या शक्ती आणि या तीन शक्तींच्या अनुषंगाने ज्ञानशक्तीही ग्रहण करता येऊन ईश्वराच्या पूर्णात्मक चैतन्याशी एकरूप होता येते.’

– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ७.१०.२००६, दुपारी ५.५९)

३ आ. अभ्यंगस्नान

३ आ १. अर्थ

१. ‘अभ्यंगस्नान म्हणजे पहाटे उठून डोक्याला आणि शरिराला तेल लावून नंतर कोमट पाण्याने स्नान करणे.

२. पिंडाच्या अभ्युदयासाठी केलेले स्नान म्हणजेच अभ्यंगस्नान

‘अभ्यंगस्नाना’विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे ‘क्लिक’ करा !

३ इ. नैमित्तिक सचैल (अंगावरच्या वस्त्रासह) स्नान

अजीर्ण; वांती; श्मश्रूकर्म (केस कापणे); मैथूनसेवन; शवस्पर्श; रजस्वलास्पर्श; दुःस्वप्न; दुर्जन, श्वान, चांडाल आणि प्रेतवाहक यांचा स्पर्श यांनंतर सचैल स्नान करावे, पाण्यात बुडी घ्यावी.

३ ई. पुण्यप्रद आणि पापक्षय स्नान

१. गुरुवारी अश्वत्थ वृक्षातळी आणि अमावास्येला जलाशयात (नदीत) स्नान केल्यास प्रयागस्नानाचे पुण्य लाभते आणि समस्त पातकांचा नाश होतो.

२. पुष्यनक्षत्र, जन्मनक्षत्र आणि वैधृती योग यांच्या समयी नदीत स्नान केल्यास सर्व पापांचा क्षय होतो.

३ उ. काम्यस्नान

‘धनप्राप्ती, रोगपरिहार आदी काम्यकर्मानिमित्त, म्हणजे काही कामनेने केलेले धर्मकर्मातील स्नान म्हणजे काम्यस्नान होय.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

४. स्नान कोठे करावे ?

४ अ. नदी आणि जलाशय यांमध्ये केलेले स्नान उत्तम, विहिरीत
केलेले स्नान मध्यम आणि घरात केलेले स्नान निकृष्ट होय.

४ अ १. नदी आणि जलाशय यांमध्ये केलेले स्नान ‘उत्तम’ समजले जाण्याचे कारण

‘नदी आणि जलाशय यांचे पाणी प्रवाही असल्याने या पाण्यात प्रवाहरूपी नादातून सुप्त स्तरावर तेजदायी ऊर्जा निर्माण करण्याची, तसेच ती घनीभूत करण्याची क्षमता असते. या ठिकाणी स्नान केल्याने पाण्याच्या तेजदायी स्पर्शाने देहातील चेतना जागृत होऊन ती देहाच्या पोकळीत साठलेल्या आणि घनीभूत झालेल्या रज-तमात्मक लहरींना जागृत करून बाहेरच्या दिशेने ढकलते. अशा ही रज-तमात्मक ऊर्जा पाण्यात उत्सर्जित होऊन त्यातील तेजातच विघटित केली जाते. त्यामुळे देह हा सूक्ष्म-स्तरावरही शुद्ध आणि पवित्र बनतो; म्हणून हे स्नान ‘उत्तम’ समजले जाते. पाणी जेवढे प्रवाही, तेवढे ते तेजतत्त्वाच्या स्तरावर रज-तमात्मकरूपी कणांना विघटित करणारे असते.

४ अ २. विहिरीत केलेले स्नान ‘मध्यम’ समजले जाण्याचे कारण

विहिरीतील पाण्यात त्यामानाने प्रवाहीपण अल्प असल्याने तेजाच्या स्तरावर ऊर्जा निर्माण करण्याची, तसेच ती घनीभूत आणि प्रदान करण्याची पाण्याची क्षमताही अल्प असते. प्रवाहीपणाच्या अभावामुळे पाण्यात एकप्रकारचे जडत्व निर्माण होते. हे जडत्व अनेक रज-तमात्मक जीवजंतूंना, तसेच रज-तमात्मकरूपी वाईट शक्तींना आपल्या ठिकाणी निवास करण्यास आमंत्रित करणारे ठरते. पाण्याचे प्रवाहीपण जेवढे अल्प, तेवढी त्याची त्रासदायक लहरी स्वतःत घनीभूत करण्याची क्षमता वाढल्याने हे पाणी जिवाला अल्प प्रमाणात शुद्धतेच्या स्तरावर, म्हणजेच रजतमात्मक लहरींचे विघटन करण्याच्या स्तरावर लाभ करून देणारे ठरते.

४ अ ३. घरात केलेले स्नान ‘निकृष्ट’ समजले जाण्याचे कारण

घरातील वातावरण हे संकुचित, म्हणजेच बाह्य वायूमंडलातील व्यापकतेशी अल्प प्रमाणात संबंध दर्शवणारे असल्याने वास्तूत रहाणार्‍या जिवांच्या स्वभावाप्रमाणे त्या त्या वास्तूत त्या त्या लहरी भ्रमण करण्याचे प्रमाणही वाढते. या लहरी कालांतराने त्या ठिकाणीच घनीभूत होतात. कलियुगातील बहुतांश जीव रज-तमात्मकच असतात. अशा त्रासदायक, आघातदायी आणि घर्षणात्मक स्पंदनांनी भारावलेल्या संकुचित वास्तूत ठेवलेल्या पाण्याच्या बादलीच्या भोवती त्यातून उत्पन्न होणार्‍या वायूमंडलातील प्रवाही आपतत्त्वात्मक कोषाकडे वास्तूतील त्रासदायक लहरींचे गमन चालू होते. या लहरी बादलीतील पाण्यात संक्रमित झाल्याने स्नानाच्या माध्यमातून या लहरी जिवाच्या देहात संक्रमित होतात. म्हणून घरातील मर्यादित कक्षेत केले जाणारे स्नान निकृष्ट दर्जाचे समजले जाते. ज्या प्रक्रियेतून त्रास होण्याची शक्यता जास्त असते, ती प्रक्रिया निकृष्ट समजली जाते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २५.१२.२००७, रात्री ८.५६)

४ आ. जलस्त्रोताच्या ठिकाणी स्नान केल्याने जिवाला पंचतत्त्वांच्या साहाय्याने देहाची शुद्धी करता येणे

‘जिवाने शक्य असल्यास नदी, तलाव, विहीर आदी जलस्त्रोतांच्या ठिकाणी स्नान करावे. प्राकृतिक वातावरणात स्नान केल्यामुळे जिवाला पंचतत्त्वांच्या साहाय्याने देहाची शुद्धी करता येते. त्यामुळे जिवाच्या देहात असलेले रज-तम कणांचे मोठ्या प्रमाणावर विघटन होण्यास आरंभ होतो. जिवाचा प्राणदेह, मनोदेह, कारणदेह आणि महाकारणदेह यांची शुद्धी होऊन सर्व देह सात्त्विकता ग्रहण करण्यास सज्ज होतात आणि जीव काही प्रमाणात निर्गुण स्तराची ऊर्जा आणि उच्च देवतेचे तत्त्व ग्रहण करू शकतो. तसेच जिवाचे बाह्य वायूमंडल ब्रह्मांड-वायूमंडलाच्या संपर्कात आल्यामुळे जीव ब्रह्मांडात असलेले तत्त्वही काही प्रमाणात पिंडाच्या माध्यमातून ग्रहण करून प्रक्षेपित करू शकतो.’

– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १६.४.२००७, सायं. ६.१३)

(याच कारणास्तव एखाद्या तीर्थस्थळी धार्मिक विधी करायला गेल्यावर पुरोहित पवित्र नदी किंवा सरोवर यांत स्नान करण्यास सांगतात. – श्री. निषाद देशमुख)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दिनचर्येशी संबंधित आचार आणि त्यांमागील शास्त्र’

Leave a Comment