हिदूंनो, पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण टाळा आणि धर्माचरणाद्वारे कर्महिदू बनून आनंदी व्हा !

१. पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणाचे दुष्परिणाम

Sharvari_Bakare_feb2015
कु. शर्वरी बाकरे

सध्या प्रत्येक क्षेत्रात पाश्‍चात्त्य संस्कृतीने स्वतःचे असे वेगळे (मानाचे ?) स्थान प्राप्त केले आहे. मग ती वेशभूषा असो, आहार असो किंवा शिक्षण असो, सर्वच ठिकाणी पाश्‍चात्त्य संस्कृतीचे ठसे उमटतांना दिसत आहेत.

१ अ. वेशभूषा

आपली संस्कृती, चालीरिती आदी लोप पावत आहेत. साडी आणि धोतर यांची जागा जीन्स आणि शॉर्टस् यांनी, तर अंबाडा अन् शेंडी यांची जागा बॉबकट आणि पोनीटेल यांनी घेतली आहे.

१ आ. आहार

आजकालच्या मुलींना साधी धान्ये वा कडधान्येही ओळखता येत नाहीत; कारण आज बाजरी, कुळीथ आणि मूग यांची जागा जॅम, सॉस आणि पिचकू यांनी; तर भाकरी-पिठल्याची जागा पिझ्झा आणि बर्गर यांनी घेतली आहे. या पालटलेल्या आहाराचा परिणाम म्हणजे विविध नवीन व्याधींशी जोडलेली घनिष्ठ मैत्री आणि घटत चाललेले आयुर्मान ! आज माणूस शतायुषी सोडाच; पण साठी झाली की, आकाशाला हात टेकल्याच्या समाधानात वावरत असतो. त्याच्या समवेत औषधरूपी साथीदार असतातच ना !

१ इ. शिक्षण

शिक्षण देणे आणि घेणे याला आज व्यावसायिक स्वरूप आले आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना पात्रता असूनही शिक्षणाला मुकावे लागते. आपल्या पराक्रमी विरांच्या कथा आज इतिहासातून पुसल्या जात आहेत. आईची जागा मॉमने, तर वडिलांची जागा डॅडने घेतली आहे.

शिक्षणाचा आरंभ हा लहान मुलांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. शिक्षणाद्वारेच या बालमनांवर आपली संस्कृती आणि आपला गौरवशाली इतिहास यांचे संस्कार कोरले जात असतात; मात्र आजच्या शिक्षणपद्धतीमुळे हे संस्कार आणि लहान मुलांचे बालपणच त्यांच्यापासून हिरावले जात आहे. आपली उद्याची नवी पिढी संस्कारांपासून दूर जात आहे.

 

२. हिंदु संस्कृतीनुसार आचरण न केल्याने होणारे गंभीर दुष्परिणाम

या सर्वांचे पडसादही दुसर्‍या बाजूने आपल्याला दिसत आहेत. पालक आणि मुले यांच्यामधील वाढता दुरावा, वाढता ताण अन् असुरक्षिततेची भावना यांमुळे आत्महत्या, महिलांवरील अत्याचार इत्यादींमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे.

 

३. भारतियांना पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या
अंधानुकरणापासून वाचवण्याच्या दृष्टीने धर्मशिक्षणाची आवश्यकता

हिंदूंनो, एखाद्या झाडाचे मूळच कापले जात असेल, तर त्या झाडाचा उद्या वृक्ष कसा होणार ? त्यासाठी मूळ कापणे थांबवायला हवे आणि त्याच्याच जोडीला त्या झाडाचे पोषणही व्हायला हवे. या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. अगदी तसेच आपल्या पुढच्या पिढीला वाचवायचे असेल, तर आजच्या या स्थितीला कारणीभूत असणारे पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण थांबवणे आणि धर्मशिक्षण घेणे-देणे आवश्यक आहे.

धर्मशिक्षण म्हणजेच आपली संस्कृती, परंपरा, चालीरिती आणि संस्कार या सर्वांचे रक्षण आणि संवर्धन करून तेच आज दृढ करण्याची आवश्यकता आहे. भारतीय संस्कृतीनुसार आचरण केल्यास पुन्हा तणावविरहित जीवन, पूर्वीची संपन्नता आणि समृद्धी प्राप्त होईल ! चला तर मग आजपासूनच जन्महिंदू नव्हे, तर कर्महिंदू (हिंदु संस्कृतीनुसार आचरण करणारा) बनून आनंदी जीवन जगूया !

 

४. धर्माचरण करू अन् आनंदाने नांदू !
होऊनी कटीबद्ध, करूया प्रयत्न धर्माचरणाचा ।
अनुभव घेऊ मग ताणविरहित जीवन जगण्याचा ॥ १ ॥

करता जतन आपली संस्कृती आणि परंपरा ।
मग आपोआप मिळेल तिथे सद्गुणांना आसरा ॥ २ ॥

मागू त्यासाठी देवाचा आशीर्वाद ।
श्रद्धा ठेवू मनी आणि दूर ठेवू विवाद ॥ ३ ॥

असे करून आपण बनू कर्महिंदु ।
सर्व जण एकत्रित आनंदाने नांदू ॥ ४ ॥

– कु. शर्वरी बाकरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.२.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात