दु:ख : महत्त्व आणि लक्षणे

जगाच्या पाठीवर एकही मनुष्य असा नसेल की जो ‘मला दु:ख आवडते’ असे म्हणेल. या लेखात आपल्या प्रत्येकाला तिटकारा असलेल्या याच दु:खाचे महत्त्व काय आहे आणि आपण त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास काय लाभ होतात, हे जाणून घेणार आहोत. तसेच दु:खाची नेमकी लक्षणेही या लेखातून आपल्याला लक्षात येतील.

अनुक्रमणिका

१. दुःखाचे महत्त्व

अ. सुख पोषक; पण दुःख बोधक

आ. दुःख भोगल्यानंतर सुख मिळणे

इ. दुःखामुळे भगवंताचे स्मरण होणे

२. दुःखाची लक्षणे

अ. दुःखाविषयीची प्रतिक्रिया


 

१. दुःखाचे महत्त्व

अ. सुख पोषक; पण दुःख बोधक

सुख पोषक असले, तरी ते मनुष्याला मोहमायेत फसवू शकते. सुख जीवनसागरात कसे पोहावे, ते शिकवते. दुःख जीवनरूपी महासागरात बुडी मारून महान तत्त्वरूपी मोती काढून आणण्याची कला शिकवते अन् बळ देते. याचे उदाहरण म्हणजे, दारिद्र्यात जीवन कंठणार्‍या मनुष्याची अकस्मात नोकरी गेल्यास त्याला उरल्यासुरल्या तुटपुंज्या धनात चरितार्थ चालवावा लागतो. त्यामुळे तो काटकसरीपणाने जगू लागतो. अशाने ‘काटकसरीपणा’ हा ईश्वराचा गुण, एक महान तत्त्व त्या मनुष्याच्या वृत्तीत येण्यास साहाय्य होते, तसेच कठीण परिस्थितीतून मार्ग काढतांना त्याच्या मनाची खंबीरताही वाढते. जीवनाला समजण्याची बुद्धी आणि जीवन जगण्याचे सामथ्र्य दुःखातून मिळते.

आ. दुःख भोगल्यानंतर सुख मिळणे

१. मुलगी कान-नाक टोचून घेण्याचे दुःख भोगण्यास का सिद्ध होते ? अलंकार घालण्याचे सुख मिळावे यासाठी.

२. मातेला प्रसूतीवेदना भोगल्यानंतरच अपत्यसुख भोगता येते.

३. सदा माझे डोळा । जडो तुझी मूर्ती ।
हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।
गुण गायीन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ।
तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ।

तुकाराम महाराज गर्भवासाचे दुःख भोगण्यास का सिद्ध होतात, तर गर्भवासाचे दुःख भोगल्यावर मनुष्यजन्माचे सुख मिळते. सुख अशा अर्थाने की, मनुष्यजन्मात भगवंताची सेवा आणि भक्ती करता येते.

४. चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे ।

इ. दुःखामुळे भगवंताचे स्मरण होणे

‘कुंती म्हणते, ‘‘देवा, तू आम्हाला सतत दुःखात ठेवले आहेस. दिवसेंदिवस एकापेक्षा एक सरस असे दुःखाचे डोंगर आमच्यावर कोसळत आहेत; पण त्यातसुद्धा अंतःकरण पिळवटल्यामुळे ज्या ज्या वेळी आम्ही तुझा धावा केला, त्या त्या वेळी तू प्रत्यक्ष प्रकट होऊन आमच्या दुःखाचे निवारण केलेस; पण दुसर्‍या भक्तांचे बघ ना ! ते नेहमी सुखातच असतात. तरीसुद्धा ज्या ज्या वेळी ते तुला हाक मारतात, त्या त्या वेळी तू प्रकट होतोस. खरोखर तू पक्षपाती नाहीस; सर्वांवर सारखाच प्रेमाचा वर्षाव करणारा आहेस; पण आमच्या श्रद्धेतच भेद आहे. सुखात असणारे भक्त आमच्यापेक्षा श्रेष्ठ होत; कारण सुखातसुद्धा त्यांचे नामस्मरण अखंड टिकते; म्हणून तू त्यांना सुखी ठेवतोस. आम्हीसुद्धा तुझे भक्तच; पण आमच्या हृदयात तुझे स्मरण अखंड तेवत ठेवण्यासाठी तू आम्हाला दुःखात ठेवतोस. तुझ्या कृपेचे हे रहस्य न कळल्यामुळे लोक दुःखी होत असतात आणि ते त्यांच्या दुःखाचे खापर नेहमी तुझ्यावर फोडत असतात. अशाने तुला दोष देण्याचे पाप डोक्यावर घेतल्यामुळे ते जन्म-मरणाच्या फेर्‍यातून कधीच सुटत नाहीत आणि उत्तरोत्तर दुःखी होत असतात. देवा, आम्ही मायेच्या प्रभावामुळे सुखासाठी तुला कितीही प्रार्थना केली, तरी आम्हाला सुखी ठेवू नकोस. दुःखात तुझे स्मरण आम्हाला होत असल्यामुळे तू आम्हाला नेहमी दुःखातच ठेव. दुःखाने होरपळल्याविना तुझ्या कानापर्यंत ऐकू जाईल, असा तुझा धावा आम्ही करू शकत नाही. जे सुख तुझे विस्मरण करते, त्या सुखाला मी दुःख समजते आणि ज्या दुःखामुळे तुझे स्मरण होते, त्या दुःखाला मी सुख समजते.’’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

साधकांनी दुःखाचे महत्त्व कळण्याच्या दृष्टीकोनातून वरील लिखाण वाचावे. साधकांनी देवाकडे दुःख वा सुख मागू नये. जीवनात प्रारब्धानुसार येणार्‍या सुखदुःखांकडे साक्षीभावाने पहावे आणि साधना करावी. दुःख सहन करण्याची शक्ती मात्र देवाकडे मागावी.

 

२. दुःखाची लक्षणे

दीनता आणि मुखमालिन्य हे दुःखाचे परिणाम होत.

– प्रशस्तपादाचार्य

अ. दुःखाविषयीची प्रतिक्रिया

प्रायेण नीचा व्यसनेषु मग्ना निन्दन्ति दैवं कुकृतं न तत्तत् ।

– महाभारत, कर्णपर्व, अध्याय ६७, श्लोक १

अर्थ : नीच लोक संकटात सापडले म्हणजे दैवाला दोष लावतात. ते आपल्या दुष्कर्माला बोल लावत नाहीत.

‘दु:ख पूर्णत: कसे टाळता येईल ?’ याविषयी जाणून घेण्यासाठी येथे ‘क्लिक’ करा !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अध्यात्म – शाश्वत आनंदप्राप्तीचे, म्हणजे ईश्वरप्राप्तीचे शास्त्र’

Leave a Comment