कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व

 

१. पुण्यकारक

कुंभपर्व हे अतिशय पुण्यकारी असल्यामुळे त्या वेळी प्रयाग, हरद्वार (हरिद्वार), उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक येथे स्नान केले असता अनंत पुण्यलाभ होतो. म्हणूनच कोट्यवधी भाविक अन् साधूसंत त्या ठिकाणी जमतात.

अ. ‘कुंभमेळ्याच्या काळात अनेक देवदेवता, मातृका, यक्ष, गंधर्व आणि किन्नरही भूमंडलाच्या कक्षेत कार्यरत असतात. साधना केल्याने या सर्वांचा आशीर्वाद मिळून आपली कार्यसिद्धी अल्प कालावधीत होते.

आ. गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी अन् क्षिप्रा’ या नद्यांच्या क्षेत्री कुंभमेळ्यांचे आयोजन केलेले असते. नदीच्या पुण्यक्षेत्री वास करणार्‍या अनेक देवता, पुण्यात्मे, ऋषिमुनी, कनिष्ठ गण यांनाही या वेळी जागृती आलेली असल्याने यांचा आशीर्वाद मिळण्यासही साहाय्य मिळते.

इ. या काळातील पुण्यकर्माची सिद्धी अनंतपटींनी इतर काळापेक्षा अधिक असते. या काळात कर्माला कृती पूरक होते, तर कृतीला कर्माची संमती मिळते.

र्इ. कुंभमेळ्याच्या काळात आपतत्त्वदर्शक पुण्यलहरींचे भ्रमण सर्वत्र असल्याने मानवाच्या मनाचे शुद्धीकरण होऊन त्यात निर्माण होणार्‍या विचारांयोगे कृतीही फलदायी होते, म्हणजेच ‘कृती आणि कर्म’ दोन्ही शुद्ध होते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, आश्विन कृष्ण पक्ष २, कलियुग वर्ष ५११४, ३१.१०.२०१२़, सकाळी १०.२२)

 

२. पापक्षालक

पवित्र तीर्थक्षेत्रांत स्नान करून पापक्षालन करावे, या हेतूने अनेक भाविक कुंभपर्वात कुंभक्षेत्री स्नान करतात.

 

३. गंगास्नान

Ganga_mahatmya_666

या कुंभपर्वांच्या वेळी प्रयाग (गंंगा), हरद्वार (गंंगा), उज्जैन (क्षिप्रा) आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक (गोदावरी) येथील तीर्थांत गंगा गुप्त रूपाने रहाते. कुंभपर्वात गंगास्नान धार्मिकदृष्ट्या विशेष लाभ देणारे असल्याने भाविक अन् संत कुंभमेळ्यात स्नान करतात.

अ. कुंभमेळ्याच्या वेळी सत्पुरुषांनी गंगास्नान करण्याचे कारण

कुंभमेळ्याच्या वेळी सत्पुरुष गंगेत स्नान करतात; कारण त्या वेळी इतरांच्या स्नानामुळे अशुद्ध झालेली गंगा ही सत्पुरुषांच्या शक्तीमुळे शुद्ध होते.

आ. कुंभक्षेत्रे आणि गंगा नदी यांचा एकमेकांशी असलेला संबंध !

१. प्रयाग आणि हरद्वार येथील कुंभमेळे प्रत्यक्ष गंगा नदीच्याच तिरावर भरतात.

२. त्र्यंबकेश्वर-नाशिक येथील कुंभमेळा गोदावरी नदीच्या काठावर भरतो. गौतमऋषींनी गंगेला ‘गोदावरी’ या नावाने त्र्यंबकेश्वर-नाशिक क्षेत्री आणले. ब्रह्मपुराणात ‘विंध्य पर्वताच्या पलीकडील गंगा ही गौतमी (गोदावरी) या नावाने ओळखली जाते’, असे म्हटले आहे.

३. उज्जैन येथील कुंभमेळा क्षिप्रा नदीच्या काठावर भरतो. उत्तरवाहिनी असलेली ही पवित्र नदी ज्या ठिकाणी पूर्ववाहिनी होते, त्या ठिकाणी प्राचीन काळी एकदा तिला गंगा मिळाली होती. आज तेथे गणेश्वर नावाचे शिवलिंग आहे.

अशा प्रकारे सर्व कुंभक्षेत्रांचा इतिहास गंगा नदीशी संबंधित आहे.

 

४. पितृतर्पण

गंगेचे प्रयोजनच मुळी ‘पितरांना मुक्ती देणे’ हे आहे. त्यामुळे कुंभपर्वात गंगास्नानासह पितृतर्पण करण्याची धर्माज्ञा आहे. ‘वायुपुराणा’त कुंभपर्व श्राद्धकर्मासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले आहे.

 

५. हिंदूंची विश्वातील सर्वांत मोठी धार्मिक जत्रा

कुंभमेळा म्हणजे एक प्रकारची धार्मिक जत्राच असते. कुंभमेळ्यामध्ये सर्व पंथ आणि संप्रदाय यांतील
साधूसंत, सत्पुरुष आणि सिद्धपुरुष सहस्रोंनी एकवटतात. कोट्यवधी भाविकही कुंभपर्वात देवदर्शन, गंगास्नान, साधना, दानधर्म, तीलतर्पण, श्राद्धविधी, संतदर्शन इत्यादी धार्मिक कृती करण्यासाठी जातात. कोट्यवधींच्या उपस्थितीत पार पडणारे कुंभक्षेत्रांवरील मेळे म्हणजे हिंदूंची विश्वातील सर्वांत मोठी धार्मिक जत्राच होय !

 

६. संतसत्संग

कुंभमेळ्यात भारतातील विविध पिठांचे शंकराचार्य, १३ आखाड्यांचे साधू, महामंडलेश्वर, शैव आणि वैष्णव सांप्रदायिक, अनेक विद्वान, संन्यासी, संतमहात्मे एकत्र येतात. त्यामुळे कुंभमेळ्याचे स्वरूप अखिल भारतवर्षातील संतांच्या संमेलनासारखे भव्यदिव्य असते. कुंभमेळ्यामुळे भाविकांना संतसत्संगाची सर्वांत मोठी संधी उपलब्ध होते.

संदर्भ : सनातन – निर्मित ग्रंथ ‘कुंभमेळ्याचे महत्त्व आणि पावित्र्यरक्षण’