सुखदु:ख आणि आनंद

सुख पहाता जवापाडे । दुःख पर्वताएवढे ।’ याचा अनुभव बहुतेकांना असतो. कलियुगात सर्वसाधारणतः मनुष्याच्या जीवनात सुख सरासरी २५ प्रतिशत आणि दुःख ७५ प्रतिशत असते. आनंद हा यांपलीकडे असून सुखदु:ख आणि आनंद यांतील भेद, सुख आणि आनंद यांची तुलना, सुखदु:खाच्या तुलनेत आनंद कोठे आहे इत्यादी अभ्यासपूर्ण माहिती या लेखातून करून घेऊया.

 

१. सुख आणि आनंद हे शब्द
निरनिराळ्या अर्थाने वापरल्याने होणारा गोंधळ

सुख आणि आनंद हे शब्द आध्यात्मिक लिखाणात काही वेळा एकमेकांविषयी वापरले जातात. ज्या अर्थाने आनंद हा शब्द ‘अध्यात्म’ या लेखमालिकेत वापरला आहे, त्या अर्थी सुख हा शब्द वापरलेला आढळतो. तसेच या लेखमालिकेतील सुख या शब्दाच्या अर्थाने आनंद हा शब्द वापरलेला आढळतो. कधी कधी समानार्थी म्हणूनही हे शब्द वापरलेले आढळतात. विषय समजण्यात गोंधळ होऊ नये; म्हणून पुढे सूत्र ‘२. सुख, दुःख आणि आनंद यांतील भेद’मध्ये दिल्यानुसार हे शब्द आम्ही वापरले आहेत. सुख आणि आनंद यांचा अर्थ निरनिराळा घेऊन वेगवेगळे लेखक कसे लिहितात, याची काही उदाहरणे याप्रमाणे आहेत.

अ. ‘आनंद दोन प्रकारचे असतात. विषय असतांनाचा आनंद (खाणेपिणे, वस्त्रे, अलंकार यांपासून मिळणारा) यालाच सुख म्हणतात. विषय नसतांनाचा आनंद. यालाच पारमार्थिक आनंद म्हणतात.’

आ. ‘सुखाचे ऐहिक, पारलौकिक आणि आध्यात्मिक असे तीन प्रकार प्रसिद्ध आहेत. ऐहिक म्हणजे या लोकातील सुख आणि पारलौकिक म्हणजे परलोकातील सुख होय. या दोन्ही सुखांना विषयांची अपेक्षा असते; मात्र आध्यात्मिक सुख हे विषयनिरपेक्ष असते. आध्यात्मिक सुख आत्मभूत असल्याने ते सर्व सुखांत उत्तम मानले जाते. ऐहिक आणि पारलौकिक सुखापेक्षा आध्यात्मिक सुख श्रेष्ठ आहे; कारण ते नित्य असून त्याच्याशी कोणत्याही दुःखाचा संबंध नाही. हे अध्यात्मसुख म्हणजेच निःश्रेयस होय. हे जे निःश्रेयस त्यालाच मोक्ष म्हणतात.’

इ. ‘जर कोणत्याही प्रकारे अविद्येचा नाश झाला, तर आत्मा आणि दृश्य जगत यांच्या तथाकथित संयोगाचा वियोग होऊन जीव दुःखांपासून निश्चितपणे सदाचाच सुटून जातो. याच अवस्थेच्या प्राप्तीला सांख्य ‘नित्यसुख’ म्हणतात.’

ई. ‘धि’ स्पंदनलहरींना ‘ख’पर्यंत, म्हणजे ब्रह्मरंध्रातील पोकळीपर्यंत पोहोचवता आले की सुख, आणि नाही आले की, दुःख होते.

 

२. सुख, दुःख आणि आनंद यांतील भेद

अ. सुख आणि आनंद यांच्या व्याख्या

सुख म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि / किंवा बुद्धी यांच्याद्वारे जिवाला अनुभवास येणारी अनुकूल संवेदना. आनंद म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील जीवात्म्याला किंवा शिवरूपाला अनुभूतीस येणारी अनुकूल संवेदना.

सुखाचा अनुभव आपल्यापैकी सर्वांनाच असतो. तो पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या माध्यमातून येत असल्याने त्याची व्याख्या आपल्याला समजू शकते. याउलट आनंदाची अनुभूती बहुतेकांना नसल्याने आणि पंचज्ञानेंद्रिये, मन अन् बुद्धी यांच्या पलीकडे अनुभूती घेण्यासारखे काही असू शकते, याची कल्पनाच बहुतेकांना नसल्याने आनंदाच्या व्याख्येचा अर्थ कळणे कठीण जाते. दृश्य स्वरूपात जग दिसते, हे एखाद्या जन्मांधाला कितीही समजावून सांगितले, तरी पटणे जसे कठीण आहे किंवा एखाद्या बालकाला ‘लैंगिकता म्हणून काहीतरी आहे’, हे कितीही समजावून सांगितले, तरी समजणे जसे कठीण आहे, तसेच आनंदाचा अर्थ समजावून देणे कठीण आहे. तो शब्दांत सांगता येत नाही. त्याची अनुभूतीच घ्यायची असते.

सुख आणि आनंद हा विषय समजावून सांगण्यासाठी त्यातल्यात्यात जवळचे उदाहरण म्हणजे सोन्याच्या बांगड्या. त्यातील सोन्यापासून, म्हणजे निराकार, आकार नसलेल्या वस्तूपासून मिळणार्‍या अनुकूल संवेदनेला आनंद आणि बांगड्यांपासून, म्हणजे साकार अशा वस्तूपासून मिळणार्‍या अनुकूल संवेदनेला सुख म्हणता येईल. खरे म्हटले, तर दिसणार्‍या सोन्यापासून सुखच मिळते; पण कल्पना करण्यासाठी त्याहून जास्त चांगले उदाहरण उपलब्ध नसल्याने हेच उदाहरण येथे दिले आहे.

आ. सुख आणि आनंद यांची तुलना

सुख

आनंद

१. दुःखाचा अंश आहे नाही, तसेच सुखाचा अंशही नसणे
२. अवधी थोडा अ.निर्बीज समाधीच्या कालानुसार

आ. सातत्याने (सहजावस्था)

इ. पुढील जन्मीही

ई. चिरकाल (मोक्ष)

३. दर्जा अल्प सर्वोत्तम
४. प्रमाण मर्यादित अमर्याद (अज्ञानात सुख, तर ज्ञानात केवढा आनंद असेल !)
५. कंटाळा, तिटकारा केवळ कंटाळाच नाही, तर सुख उपभोगणार्‍यास त्याविषयी वैराग्य, उदासीनता येऊ शकते. येत नाही, कारण तो स्वभावआहे, उदा. साखरेला तिच्यागोडीचा कंटाळा येत नाही !
६. तृप्ती (समाधान) तात्पुरती अवधीप्रमाणे

 

प्रश्न : साधकाला असा कोणता आनंद होतो की, तो ऐहिक सुख सोडून अध्यात्माकडे वळतो ?

उत्तर : ऐहिक सुखदुःखे ही कर्मजन्य आहेत. आध्यात्मिक आनंद हा कर्मजन्य नाही, तर तो प्रेमजन्य आहे. ज्याला आध्यात्मिक आनंद झाला आहे, त्याच्यावर ऐहिक सुखदुःखाचा परिणाम होत नाही; म्हणूनच गीतेत आध्यात्मिक आनंदालाच ‘योग’ असे म्हटले आहे. ‘समत्वं योग उच्यते । – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ४८’

 

इ. दुःखाश्रू आणि आनंदाश्रू

दुःखाश्रू उष्ण असतात, तर आनंदाश्रू थंड असतात.

 

३. सुखदुःखाच्या तुलनेत आनंद कोठे आहे ?

‘उदासीन स्थान (Neutral Point )’ या नियमाप्रमाणे सुख आणि दुःख यांच्या मध्ये आनंद नाही, तर तो सुखदुःखाच्या पलीकडे आहे. सुखाची अपेक्षा संपते, तेथे आनंद आरंभ होतो.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अध्यात्म – शाश्वत आनंदप्राप्तीचे, म्हणजे ईश्वरप्राप्तीचे शास्त्र’

3 thoughts on “सुखदु:ख आणि आनंद”

Leave a Comment