संतांच्या उपस्थितीत प.पू. रामानंद
महाराज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार


मुंबई – सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी आणि सनातनचे स्फूर्तीस्थान प.पू. रामानंद महाराज यांच्या पार्थिवावर १२ मार्च या दिवशी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी इंदूर येथील रामबागेतील मुक्तीधाम स्मशानभूमीत संतांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आला. प.पू. रामानंद महाराज यांचे पुत्र श्री. लोकेश उपाख्य राजू निरगुडकर यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. या वेळी प.पू. रामानंद महाराज यांचे विविध भागांतून आलेले ६०० हून अधिक भक्त उपस्थित होते.


तत्पूर्वी सकाळी ९ वाजता भक्तवात्सल्याश्रमातून प.पू. रामानंद महाराज यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी इंदूर येथील प.पू. अण्णा महाराज, प.पू. बेहरे महाराज, प.पू. श्रीराम महाराज, मुंबई येथील प.पू. जोशीबाबा, प.पू. भक्तराज महाराज यांचे पुत्र श्री. नंदू कसरेकर, सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत आठवले यांच्या पत्नी डॉ. (सौ) कुंदा आठवले, तसेच ठाणे जिल्ह्यातील वांगणी येथील गणेश महाराजांचे भक्त आणि गणेशभक्त अमृतफळे महाराजांचे भक्त उपस्थित होते. तसेच मुंबई, गोवा, देहली इत्यादी ठिकाणांवरून आलेले प.पू. रामानंद महाराजांचे भक्त उपस्थित होते. दुपारी अंत्यसंस्कार झाल्यावर निरगुडकर परिवाराने प.पू. रामानंद महाराज यांना संत आणि भक्त यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहिली.

भक्तांच्या दर्शनासाठी ११ मार्च या दिवशी दिवसभर प.पू. रामानंद महाराज यांचे पार्थिव भक्तवात्सल्याश्रमात दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

संदर्भ : दैनिक 'सनातन प्रभात'

Leave a Comment