॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १८ – मोक्षसंन्यासयोग

श्री. अनंत आठवले
श्री. अनंत आठवले

गीतेतील शिकवणीच्या संदर्भात श्री. अनंत आठवले यांनी स्वतः केलेले विवेचन खाली दिले आहे. – संकलक

अर्जुनाला गीता लगेच कळली !

आपल्याला गीता अनेकदा वाचूनही कळत नाही. काही काळाने आपण गीतेचा अभ्यास करणे सोडून देतो; मात्र श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता एकदाच सांगितली. त्याला ती कळली आणि त्याने तिच्यातील शिकवणीनुसार आचरण केले. यावरून हे लक्षात येते की, आपण अर्जुनासारखा भाव ठेवला, तरच आपल्याला गीता कळेल. – (प.पू.) डॉ. आठवले

 

॥ श्रीकृष्णाय नम: ॥

अध्याय १४ आणि १७ मध्ये वर्णित त्रिगुणांचे अधिक विवरण या अध्यायातही आहे.

१. तत्त्वज्ञान

१ अ. त्याग

काही पंडीत सकाम कर्मांच्या त्यागाला संन्यास म्हणतात, तर काही विचारवंत सर्व कर्मांच्या फळांच्या त्यागाला त्याग म्हणतात.

१ आ. सत्कर्मे फळांचा त्याग करून करणे

यज्ञ, दान आणि तप ही कर्मे मनुष्याला पवित्र करतात; म्हणून त्यांचा त्याग करू नये, असा आपला निर्णय असल्याचे श्रीकृष्णांनी सांगितले आहे. पुढे ते म्हणतात, ही कर्मेही त्यांच्यातील आसक्ती आणि त्यांच्या फळांचा त्याग करून करावीत.

१ इ. त्यागाचे प्रकार

१ इ १. तामसी

शास्त्रसंमत नित्यकर्मांचा संन्यासाच्या मोहाने (अज्ञानाने) त्याग करणे (शास्त्रविहित कर्मे चित्तशुद्धी करत असल्याने त्यांच्या त्यागाचा निषेध केला आहे.)

१ इ २. राजसी

कर्मांनी दुःखच होते, असे मानून शरिराला कष्ट नकोत; म्हणून कार्य न करणे.

१ इ ३. सात्त्विक

शास्त्रविहित कर्मे कर्तव्य म्हणून आसक्ती आणि फळ यांचा त्याग करून करणे.

१ ई. कर्म आणि कर्माचे फळ

१ ई १. कर्माचे फळ मिळणे वा न मिळणे

त्याग न करणार्‍यांना अनिष्ट, इष्ट आणि मिश्र अशी फळे मिळतात. आसक्ती आणि कर्तेपणाचा अभिमान यांचा त्याग करणार्‍यांना कर्मांचे फळ नसते.

१ ई २. कोणतेही कर्म सिद्ध होण्यासाठी पाच कारणे आवश्यक असल्याने स्वतःलाच कर्ता मानणे अयोग्य

सर्व कर्मे सिद्ध होण्यासाठी, म्हणजे घडण्यासाठी अधिष्ठान (आधार, आश्रय), कर्ता, करण (साधन), वेगवेगळे प्रयत्न आणि दैव ही पाच कारणे असतात. विषय स्पष्ट करण्यासाठी शेतीचे उदाहरण घेऊ. येथे शेत हे अधिष्ठान, शेतकरी हा कर्ता, नांगर हे करण, नांगर चालवणे आणि पाणी देणे हे प्रयत्न आहेत; म्हणून केवळ स्वतःला कर्ता मानणे अयोग्य आहे.

१ ई ३. कर्तेपणा नसणार्‍याला पाप न लागणे

ज्याच्यात कर्तेपणाचा भाव नाही आणि ज्याची बुद्धी सांसारिक पदार्थ अन् कर्म यांपासून अलिप्त आहे, त्याला कुठल्याही कर्माचे फळ, पापसुद्धा बांधत नाही.

१ ई ४. कर्माचे प्रेरक

ज्ञाता (जाणणारा), ज्ञान आणि ज्ञेय (जाणण्यास योग्य) हे कर्माचे प्रेरक आहेत.

१ ई ५. कर्मसंग्रह

करण, कर्म आणि कर्ता हे कर्मसंग्रह आहेत. यांच्या संयोगाने कर्म होते.

 

१ उ. सात्त्विक, राजसी आणि तामसी ज्ञान, कर्म अन् सुख

१ ऊ. चातुर्वर्णांची गुणांनुसार कर्मे

ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची स्वभावांमुळे उत्पन्न गुणांनुसार वेगवेगळी कर्मे असतात जी पुढे दिली आहेत.

१ ऊ १. वर्णाश्रमानुसार कर्माचे महत्त्व

अ. ज्या ईश्‍वरापासून सर्व उत्पन्न झाले, त्याची आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करून मनुष्य ज्ञाननिष्ठेची योग्यतारूपी सिद्धी प्राप्त करतो.

आ. आपले स्वाभाविक कर्म गुणरहित वाटले, तरीही दुसर्‍या वर्णाचे कर्म करू नये.

इ. सर्व कर्मे कोणत्या ना कोणत्यातरी दोषांनी युक्त असतात; पण दोषयुक्त वाटले, तरी वर्णाश्रमानुसार असलेल्या आपल्या स्वाभाविक कर्माचा त्याग करू नये. अशा कर्मांनी पाप लागत नाही. अशा कर्मांना गीतेत स्वधर्म, सहजकर्म, स्वकर्म, स्वभावज कर्म, स्वभावनियत कर्म इत्यादी म्हटले आहे.

संदर्भ : गीताप्रेस, गोरखपुरद्वारा प्रकाशित श्रीमद्भगवद्गीता पदच्छेद, अन्वय और साधारण भाषाटीकासहित. सं.२०४२ मे प्रकाशित. पृष्ठ ४३५, ४३६

 

१ ए. मनुष्याला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होणे

आसक्तीरहित, कामनारहित आणि मन वश केलेला मनुष्य संन्यासाने, म्हणजे सांख्ययोगाने नैष्कर्म्य (सर्वकर्म परित्याग) सिद्धीला प्राप्त होतो. (अध्याय १८, श्‍लोक ४९)

विवेचन

आपला आत्मा क्रियाविहीन ब्रह्मच आहे, हे ज्ञान झाल्याने सर्व कर्मे निवृत्त होऊन नैष्कर्म्य भाव होतो. याने ब्रह्म कसे प्राप्त होते ? शुद्ध बुद्धीने; आत्मसंयम करून; विषयांचा त्याग करून एकांतात राहून; मिताहारी राहून; अहंकार, दर्प, काम आणि क्रोध यांचा त्याग करून अंतःकरण शांत झालेला मनुष्य ब्रह्माशी एकरूप होण्यास पात्र होतो (अध्याय १८, श्‍लोक ५२, ५३). त्याला पराभक्ती प्राप्त होते.

तत्त्वज्ञानाची पराकाष्ठा, म्हणजे पराभक्ती. यालाच ज्ञानाची परानिष्ठा (अध्याय १८, श्‍लोक ५०), परमनैष्कर्म्यसिद्धी (अध्याय १८, श्‍लोक ४९), परमसिद्धी म्हटले आहे.

संदर्भ : गीताप्रेस, गोरखपुरद्वारा प्रकाशित श्रीमद्भगवद्गीता पदच्छेद, अन्वय और साधारण भाषाटीकासहित. सं.२०४२ मे प्रकाशित.

आद्य शंकराचार्यांनीही सांगितले आहे की, अध्याय ७ श्‍लोक १६, १७ आणि १८ मध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञानी होऊन केलेली भक्ती, म्हणजे स्वस्वरूप जाणून त्याच्याशी एकरूप होणे, ही पराभक्ती आहे. (श्‍लोक ५४ वरील शांकरभाष्य)

पराभक्तीने मनुष्य ब्रह्माला यथावत् जाणतो आणि तत्काळ ब्रह्माशी एकरूप होतो. (अध्याय १८, श्‍लोक ५५)

 

१ ऐ. अर्जुनाला त्याची प्रकृती युद्ध
करायला लावील, असे श्रीकृष्णांनी सांगणे

श्रीकृष्ण अर्जुनाला (हे सर्वांनाच लागू आहे) म्हणतात, अहंकारामुळे मी युद्ध करणार नाही, असे मानलेस, तर तो तुझा निश्‍चय व्यर्थ आहे; कारण प्रकृती (क्षत्रिय स्वभाव) तुला युद्ध करायला लावील. जे कर्म करणार नाही, असे मोहाने, अज्ञानाने ठरवतोस, ते कर्म आपल्या स्वाभाविक कर्मांशी बांधील असल्याने विवश होऊन करशील. (अध्याय १८, श्‍लोक ५९ आणि ६०)

 

१ ओ. श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेले आश्‍वासन !

शेवटी हित करण्याच्या दृष्टीने श्रीकृष्ण सांगतात, माझ्यात मन लाव. माझी भक्ती कर. माझी पूजा कर. मला नमस्कार कर. श्रीकृष्ण प्रतिज्ञापूर्वक सांगतात, असे केल्याने तू मलाच प्राप्त होशील. (अध्याय १८, श्‍लोक ६५) सर्व धर्मांचा (धर्मात सांगितलेल्या कर्मांचा) त्याग करून मला अनन्य शरण ये. मी तुला सर्व पापांतून मुक्त करीन.(अध्याय १८, श्‍लोक ६६)

विवेचन

वर्णाश्रमविहित धर्माचाही त्याग का सांगितला आहे ? सर्व धर्मनिषिद्ध कर्मे सांगून ती न करण्यास आणि आचरणीय कर्मे करण्यास सांगतात. सर्व धर्म-कर्मांचा मनापासून त्याग केल्यावर त्या कर्मांचे पाप-पुण्यरूपी फळ भोगावे लागत नाही.

 

२. साधना आणि फळ

२ अ. वर्णाश्रमधर्मानुसार कर्माचे फळ

वर्णाश्रम धर्मानुसार निर्धारित आणि शास्त्रविहित कर्मे करून त्या कर्मांनीच ईश्‍वराची पूजा करून चित्तशुद्धी अन् परमात्मप्राप्तीची योग्यतारूपी सिद्धी प्राप्त होते (अध्याय १८, श्‍लोक ४५, ४६). ही कर्मयोगासारखी साधना आहे.

विवेचन

कर्मांनी ईश्‍वराची पूजा करणे

परमात्म्यालाच आपले सर्वस्व मानून, ईश्‍वराचेच चिंतन करत तन-मन-धनाने आपली स्वाभाविक आणि शास्त्रविहित कर्मे ईश्‍वरालाच अर्पण करीत करणे, हे आपल्या कर्मांनीच ईश्‍वराची पूजा करणे आहे.

 

२ आ. सांख्ययोगाने नैष्कर्म्यसिद्धी मिळणे

सर्व आसक्ती सोडून, अंतःकरणाला स्ववश करून, सर्व कामनांचा त्याग करून, सर्वकर्मसंन्यासाने, म्हणजे सांख्ययोगाने नैष्कर्म्यसिद्धी मिळते (अध्याय १८, श्‍लोक ४९). ही सांख्ययोगाची साधना आहे.

विवेचन

पाचव्या अध्यायाच्या तेराव्या श्‍लोकात श्रीकृष्णांनी सांगितले आहे, योगी सर्व कर्मांना मनाने सोडून, त्यांचा त्याग करून काहीही न करता आणि न करवता आनंदाने परमात्मस्वरूपात स्थित असतो. ब्रह्म निष्क्रिय असते. तशी निष्क्रियतेची स्थिती सर्वकर्मसंन्यासाने होते.

 

२ इ. भक्तीसह निष्काम कर्माची साधना

ईश्‍वरपरायण होऊन निष्काम भावाने सर्व कर्मे करूनही ईश्‍वराच्या कृपेने अविनाशी परम पद मिळते (अध्याय १८, श्‍लोक ५६). ही भक्तीसह निष्काम कर्माची साधना आहे.

 

२ ई. अंतःकरणात स्थित ईश्‍वराला शरण जाणे

सर्वांच्या अंतःकरणात ईश्‍वर स्थित आहे. त्याला पूर्ण भावाने शरण गेल्याने त्याच्या कृपेने परम शांती आणि ब्रह्म हे अढळ स्थान प्राप्त होईल. (अध्याय १८, श्‍लोक ६२)

विवेचन

सर्व भावाने शरण जाणे, यात निष्कामता इत्यादी आधी सांगितलेले पूर्ण दोषनिवारण येते.

 

२ उ. कार्य-अकार्याचा त्याग करणे

शास्त्रनिर्धारित सर्व कार्य-अकार्याचा त्याग करून केवळ ईश्‍वरात मन लावणे आणि केवळ त्याला शरणागत होणे, याने ईश्‍वर सर्व पापांतून मुक्त करील. (अध्याय १८, श्‍लोक ६५, ६६)

 

३. अध्यायाला मोक्षसंन्यासयोग म्हणण्यामागील कारण

ज्यात मोक्षाचासुद्धा संन्यास होतो, म्हणजे मोक्षाच्याही इच्छेचा त्याग होतो, अशा भगवद्भक्तीचे वर्णन मुख्य असल्याने अध्यायाचे नाव मोक्षसंन्यासयोग आहे.

 

४. श्रीकृष्णाच्या उपदेशाचा सारांश !

४ अ. मुक्त व्हा, म्हणजे मुक्त व्हाल !

कामना, ममता आणि अहंकार यांपासून मुक्त व्हा, म्हणजे आत्मज्ञान होऊन जन्म-मरणाच्या फेर्‍यांतून मुक्त व्हाल.

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

– अनंत बाळाजी आठवले, बी.ई. (सिव्हिल), शीव, मुंबई. (१०.१२.२०१३)

संदर्भ : सनातन-निर्मित आगामी ग्रंथ ‘गीताज्ञानदर्शन’

Leave a Comment