॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १२ – भक्तियोग

अर्जुनाला गीता लगेच कळली !

श्री. अनंत आठवले
श्री. अनंत आठवले

आपल्याला गीता अनेकदा वाचूनही कळत नाही. काही काळाने आपण गीतेचा अभ्यास करणे सोडून देतो; मात्र श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता एकदाच सांगितली. त्याला ती कळली आणि त्याने तिच्यातील शिकवणीनुसार आचरण केले. यावरून हे लक्षात येते की, आपण अर्जुनासारखा भाव ठेवला, तरच आपल्याला गीता कळेल. – (प.पू.) डॉ. आठवले

गीतेतील शिकवणीच्या संदर्भात श्री. अनंत आठवले यांनी स्वतः केलेले विवेचन येथे दिले आहे. – संकलक

 

॥ श्रीकृष्णाय नमः ॥

१. तत्त्वज्ञान

१ अ. सगुणोपासक श्रेष्ठ असणे

सगुण ईश्‍वराची उपासना आणि अविनाशी, अव्यक्त ब्रह्माची उपासना यांत ११ व्या अध्यायाच्या ५५ व्या श्‍लोकात सांगितल्यानुसार ईश्‍वराप्रीत्यर्थ कर्म करणारे सगुणोपासक श्रेष्ठ आहेत.

१ आ. अव्यक्तोपासकांना गती प्राप्त करणे कठीण असणे

इंद्रियांचा संयम करून समत्व बुद्धीने अव्यक्ताची उपासना करणारेही ईश्‍वरालाच प्राप्त करतात; परंतु या अव्यक्तोपासकांना अधिक कष्ट होतात; कारण उपासनेसाठी कसलाच आधार नसल्याने अव्यक्त गती प्राप्त करणे कठीण जाते.

१ इ. भक्ताचा ईश्‍वराने उद्धार करणे

जे सर्व कर्मे ईश्‍वराला अर्पण करून त्याची अनन्यभक्ती करतात त्यांचा मृत्यूरूप संसारसागरातून ईश्‍वरच उद्धार करतो.
(अध्याय १२, श्‍लोक ६ आणि ७)

१ ई. अनन्यभक्तीने ईश्‍वरदर्शन होणे

सगुणाच्या उपासकाला अनन्य भक्तीने ईश्‍वराचे दर्शनही होऊ शकते. (अध्याय ११, श्‍लोक ५४)

 

२. वेगवेगळ्या साधना

अ. मन आणि बुद्धी ईश्‍वरात लावणे (अध्याय १२, श्‍लोक ८)

आ. हे जमत नसेल, तर ईश्‍वरप्राप्तीची इच्छा ठेवून मन आणि बुद्धी ईश्‍वरात लावण्याचा सराव करणे
(अध्याय १२, श्‍लोक ९)

इ. सराव जमत नसेल, तर (आसक्ती आणि स्वार्थ सोडून) सर्व कर्मे ईश्‍वरासाठी करणे (अध्याय १२, श्‍लोक १०)

ई. सर्व कर्मे ईश्‍वरार्पण करणे जमत नसेल, तर मनाचा संयम करून सर्व कर्मांच्या फळांचा त्याग करणे
(अध्याय १२, श्‍लोक ११)

उ. मर्म न समजता केलेल्या सरावापेक्षा ईश्‍वराच्या स्वरूपाचे ज्ञान अप्रत्यक्ष, म्हणजे अनुभूती न आलेले असले, तरी ते श्रेष्ठ असल्याने ईश्‍वराच्या स्वरूपाच्या ज्ञानप्राप्तीचा प्रयास करणे (अध्याय १२, श्‍लोक १२)

ऊ. अप्रत्यक्ष स्वरूप ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे; म्हणून ध्यानसाधना करणे (अध्याय १२, श्‍लोक १२)

ए. ध्यानापेक्षा सर्व कर्मांच्या फळांचा त्याग करणे श्रेष्ठ आहे; म्हणून सर्वकर्मफलत्याग करणे (अध्याय १२, श्‍लोक १२) (त्यागेनैके अमृतत्त्वमानशु:-कैवल्योपनिषद् मंत्र ३)

विवेचन : इथे सर्वकर्मफलत्यागाचे महत्त्व सर्वांत अधिक सांगितले आहे. उपनिषदातही म्हटले आहे.
त्यागेनैके अमृतत्त्वमानशु: ।

अर्थ : एकट्या त्यागानेच अमरत्त्व म्हणजे जीवन-मरणाच्या फेर्‍यातून मुक्त होता येते.

 

३. फळ

अ. ध्यान, सराव, ईश्‍वराच्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न, कर्मे ईश्‍वराला अर्पण करणे, यातील कुठल्याही साधनेने क्रमाक्रमाने चित्तशुद्धी होऊन ईश्‍वरप्राप्ती होते.
आ. श्रद्धेने ईश्‍वरपरायण झालेले भक्त ईश्‍वराला अतिशय प्रिय होतात.
इ. सर्व कर्मफळांचा त्याग करणे, हेसर्वांत श्रेष्ठ असून अशा त्यागाने तत्काळ शांती मिळते. (अध्याय १२, श्‍लोक १२). अशी शांती हे ब्रह्मप्राप्तीचे लक्षण आहे.

 

४. ईश्‍वराला प्रिय असलेल्या भक्ताची लक्षणे

कोणाचाही द्वेष न करणारा, करुणामय, ममत्वरहित, सुख-दुःखादी सर्व द्वंद्वांमध्ये सम रहाणारा, क्षमाशील, सदा संतुष्ट, मन आणि इंद्रिये यांना स्ववश केलेला, मन अन् बुद्धी ईश्‍वरात लावलेला, ज्याच्यापासून दुसर्‍यांना उद्वेग होत नाही आणि जो दुसर्‍यांमुळे वैतागत नाही असा, अपेक्षारहित, अंतर्बाह्य शुद्ध, सर्व कर्मांच्या आरंभीच कर्तेपणाचा त्याग केलेला, भक्त असतो अन् असा भक्त ईश्‍वराला प्रिय असतो.

विवेचन

अ. भक्ताचे वरील गुण आरंभी अंगी बाणवावे लागतात. पुढे तो सहजस्वभाव बनतो आणि असा भक्त ईश्‍वराला अत्यंत प्रिय होतो.

आ. भक्ती करण्यातील अडथळा

भक्तीमार्ग सोपा वाटतो; पण होते असे की जप, पूजा इत्यादी करतांना मनुष्य आपला संबंध ईश्‍वराशी मानतो; पण धनप्राप्ती, कुटुंबपालन इत्यादी व्यावहारिक क्रिया करतांना त्याचे वेगवेगळे उद्देश असतात. यामुळे भक्तीची निरंतरता खंडित होते आणि अनन्यभक्ती होत नाही.

 

अध्यायाचे नाव भक्तियोग असण्याचे कारण

या अध्यायात भक्तीच्या अनेक प्रकारच्या साधना आणि ईश्‍वराला प्रिय भक्ताची लक्षणे सांगितली असल्याने अध्यायाचे नाव भक्तियोग आहे.

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

– अनंत बाळाजी आठवले, बी.ई. (सिव्हिल), शीव, मुंबई. (१६.१२.२०१३)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘गीताज्ञानदर्शन’

Leave a Comment