॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय ९ – राजविद्याराजगुह्ययोग

अर्जुनाला गीता लगेच कळली !

श्री. अनंत आठवले
श्री. अनंत आठवल

आपल्याला गीता अनेकदा वाचूनही कळत नाही. काही काळाने आपण गीतेचा अभ्यास करणे सोडून देतो; मात्र श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता एकदाच सांगितली. त्याला ती कळली आणि त्याने तिच्यातील शिकवणीनुसार आचरण केले. यावरून हे लक्षात येते की, आपण अर्जुनासारखा भाव ठेवला, तरच आपल्याला गीता कळेल. – (प.पू.) डॉ. आठवले

गीतेतील शिकवणीच्या संदर्भात श्री. अनंत आठवले यांनी स्वतः केलेले विवेचन येथे दिले आहे. या लेखमालिकेत काही ठिकाणी परिशिष्ट पहा असे म्हटले आहे. परिशिष्ट गीताज्ञानदर्शन या ग्रंथात दिले आहे. त्यावरून वाचकांना विषय अधिक सुस्पष्ट होईल. – संकलक

 

॥ श्रीकृष्णाय नमः ॥

१. तत्त्वज्ञान – ईश्‍वराचे स्वरूप

१ अ. अव्यक्त आणि सर्वव्यापी

ईश्‍वर अव्यक्त आणि सर्वव्यापी आहे.

१ आ. ईश्‍वर प्राण्यांचा उत्पत्तीकर्ता असणे

ईश्‍वर प्राण्यांचा उत्पत्तीकर्ता आणि त्यांना धारण करणारा आहे.

१ इ. प्राणीमात्रांचे विलीन होणे आणि त्यांची उत्पत्ती होणे

कल्पाच्या (अध्याय ८ मध्ये सांगितलेला ब्रह्माच्या एक दिवसाच्या) अंती सर्व प्राणीमात्र ईश्‍वराच्या त्रिगुणमयी अपरा प्रकृतीत विलीन होतात आणि पुढच्या कल्पाच्या आरंभी ईश्‍वर त्यांना पुन्हा उत्पन्न करतो. (अध्याय ९, श्‍लोक ७)

१ ई. ईश्‍वराला कर्मांचे बंधन न लागणे

उत्पत्ती आणि विनाश हे ईश्‍वराचे कर्म नाही. ईश्‍वराला त्या कर्मांचे बंधन लागत नाही. त्याचा कर्तेपणाच ईश्‍वराकडे येत नाही; कारण ईश्‍वर त्या कर्मांविषयी उदासीन आहे, असक्त आहे.

विवेचन

कर्मबंधन न लागण्यासाठी उदासीनता

समर्थ रामदासस्वामी सांगतात,
उदासीनता तत्त्वता सार आहे । सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥ – मनाचे श्‍लोक, श्‍लोक ५७
उदासीन रहाणे, म्हणजे त्यात रुची-अरुची नसणे. अशी उदासीनता हे तत्त्वज्ञानाचे सार आहे; कारण त्याने मनुष्य सृष्टीत गुंतत नाही. असङ्गो न हि सज्जते । (बृहदारण्यकोपनिषद्, अध्याय ३, ब्राह्मण ९, वाक्य २६), म्हणजे निःसंग असलेला जगरहाटीत, संसारात अडकत नाही, तर मुक्त रहातो. ब्रह्मही असेच निःसंग असते.

 

२. विविध प्रकृतींच्या आश्रयाचे फळ

राक्षसी, आसुरी आणि मोहिनी (पहा : परिशिष्ट क्रमांक १, सूत्र क्रमांक ७) प्रकृतींचा आश्रय घेणार्‍यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ जातात, तर महात्मा लोक दैवी प्रकृतीचा आश्रय घेतात. (दैवी प्रकृती १६ व्या अध्यायात सांगितली आहे.)

 

३. मृत्यूत्तर मिळणारी गती

३ अ. सकाम कर्म करणारे जन्ममृत्यूच्या फेर्‍यांत अडकणे

वेदविहित (वेदांत सांगितलेली) यज्ञादी कर्मे करणार्‍यांची पापे नष्ट होऊन त्यांना पुण्य प्राप्त होऊन ते स्वर्गात जातात आणि देवतांचे स्वर्गीय सुखोपभोग घेतात. भोग भोगून पुण्य संपल्यावर ते पुन्हा मर्त्यलोकात जन्मतात. अशा रितीने सकाम कर्म करणारे पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूला प्राप्त होतात.

३ आ. निष्काम भक्ताचा योगक्षेम ईश्‍वराने वाहणे

जे अनन्य निष्काम भावाने सतत ईश्‍वराची भक्ती करून ईश्‍वराशी जुडलेले (जोडणे म्हणजे दुसर्‍याने जोडण्याची क्रिया करणे, तर जुडणे म्हणजे स्वत: ती क्रिया करणे.) रहातात, त्यांचा योगक्षेम (पहा : परिशिष्ट क्रमांक १, सूत्र ८) स्वतः ईश्‍वर वाहतो.

 

४. ईश्‍वराने अर्पणाचा स्वीकार करणे

जो पान, फूल, फळ, तसेच पाणी ईश्‍वराला भक्तीने अर्पण करतो. त्याच्या या अर्पणाचा ईश्‍वर स्वीकार करतो.

विवेचन

वस्तूतः ईश्‍वर निष्काम आहे. त्याला हवे असे काहीच नाही (अध्याय ३, श्‍लोक २२). तो कोणाकडून काहीही घेत नाही (अध्याय ५, श्‍लोक १५). येथे तात्पर्य हे आहे की, ईश्‍वर तुमच्या निष्काम अनन्यभक्तीला प्रतिसाद देतो.

 

५. साधना – ईश्‍वराची अनन्यभक्ती करणे

ही भक्ती वेगवेगळ्या प्रकारे केली जाऊ शकते.
अ. ईश्‍वराचे सतत स्मरण, कीर्तन, दम (इंद्रियांचे दमन करणे) आणि शम (अंतःकरणाचा निग्रह करणे) आदी करणे (अध्याय ९, श्‍लोक १४)

आ. द्वैत किंवा अद्वैत भावनेने उपासना करणे

ज्ञानरूप यज्ञ ही भक्ती दोन प्रकारे करता येते. (अध्याय ९, श्‍लोक १५) एकत्वेन – एक परमात्मा वासुदेवच सर्वकाही आहे आणि आपणही त्याचेच अंश आहोत, अशा एकीभावाने भक्ती करणे. पृथक्त्वेन – सूर्य, इंद्र इत्यादींमध्ये तोच परमात्मा आहे, अशा भावनेने त्याची वेगवेगळ्या रूपांत उपासना करणे किंवा द्वैतभावनेने उपासना करणे. (वेगवेगळ्या रूपांत उपासना आणि द्वैतभावना यांमध्ये अंतर आहे. द्वैतामध्ये मी ईश्‍वरापेक्षा वेगळा आहे, अशी भावना असते.)
इ. सर्व कर्मे ईश्‍वरार्पण करणे. श्रीकृष्ण सांगतात, जे काही करशील, खाशील, देशील आणि तपश्‍चर्या करशील, ते सर्व मज, ईश्‍वराला अर्पण कर.
ई. मन ईश्‍वरात लावणे
उ. ईश्‍वराने घालून दिलेल्या उदाहरणाचे अनुकरण करून उदासीन रहाणे

विवेचन

वरील तत्त्वज्ञानात सूत्र क्रमांक १ ई मध्ये सांगितले आहे, ईश्‍वर सर्व सृष्टीचा उत्पत्तीकर्ता असूनही त्याला त्या कर्मांचे बंधन लागत नाही; कारण तो त्या कर्मांविषयी उदासीन, असक्त असतो. त्याचप्रमाणे मनुष्याने आपल्या कुटुंबाचे भरण, पोषण आणि संरक्षण करतांना अहंता किंवा ममता न करता निर्लिप्त रहावे.

 

६. फळ – ईश्‍वरत्व प्राप्त होणे

६ अ. कर्मबंधने न लागता मुक्त होणे

सर्व कर्मे ईश्‍वरार्पण केल्याने संन्यासयोगाचा लाभ होतो. कर्मांची बंधने लागत नाहीत आणि मुक्त होऊन ईश्‍वरालाच प्राप्त होतो. (अध्याय ९, श्‍लोक २८)

६ आ. ईश्‍वराशी जुडले जाणे

मन सतत ईश्‍वरात लावल्याने आणि ईश्‍वराची अनन्यभक्ती केल्याने भक्त ईश्‍वराशी सतत जुडलेला रहातो आणि ईश्‍वरालाच प्राप्त होतो. (अध्याय ९, श्‍लोक ३४)

 

७. अध्यायाचे नाव राजविद्याराजगुह्ययोग असण्यामागील कारण

श्रीकृष्णांनी मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना । (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्‍लोक ४), म्हणजे मी अव्यक्त असून सर्व जग व्यापलेले आहे, असा जो उपदेश केला आहे, तो सर्वश्रेष्ठ उपदेश, म्हणजे सर्व विद्यांचा राजा आहे. निष्काम आणि अनन्यभावाने ईश्‍वरात मन लावणे अन् सर्व कर्मे ईश्‍वरार्पण करणे, असे जे सांगितले आहे, ते संपूर्ण गोपनीय भावांचा राजा आहे. या दोन्हींना तत्त्वाने समजून घेतल्यावर ईश्‍वराशी नित्ययोगाचा अनुभव येतो; म्हणून या अध्यायाचे नाव राजविद्याराजगुह्ययोग आहे.

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

– अनंत बाळाजी आठवले, बी.ई. (सिव्हिल), शीव, मुंबई. (१०.१२.२०१३)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘गीताज्ञानदर्शन’

Leave a Comment