॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय ७ – ज्ञानविज्ञानयोग

श्री. अनंत आठवले
श्री. अनंत आठवले

गीतेतील शिकवणीच्या संदर्भात श्री. अनंत आठवले यांनी स्वतः केलेले विवेचन खाली दिले आहे. – संकलक

 

 

अर्जुनाला गीता लगेच कळली !

आपल्याला गीता अनेकदा वाचूनही कळत नाही. काही काळाने आपण गीतेचा अभ्यास करणे सोडून देतो; मात्र श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता एकदाच सांगितली. त्याला ती कळली आणि त्याने तिच्यातील शिकवणीनुसार आचरण केले. यावरून हे लक्षात येते की, आपण अर्जुनासारखा भाव ठेवला, तरच आपल्याला गीता कळेल. – (प.पू.) डॉ. आठवले

 

॥ श्रीकृष्णाय नमः ॥

१. तत्त्वज्ञान

१ अ. ईश्वराच्या दोन प्रकृती

ईश्वराच्या परा आणि अपरा अशा दोन प्रकारच्या प्रकृती आहेत. अपरा (निकृष्ट) प्रकृती अष्टधा आहे – पाच महाभूते, मन, बुद्धी आणि अहंकार. परा प्रकृती जीवरूप, म्हणजे प्राणधारणेचे निमित्त अशी चेतन प्रकृती आहे.

१ आ. ईश्वराची परा प्रकृती न जाणल्याने चुकीची धारणा होणे

ईश्वर आधी अव्यक्त होता आणि आता प्रकट झाला, ही चुकीची भावना आहे आणि ती ईश्वराची परा प्रकृती न जाणल्याने होते.

१ इ. भक्तांचे चार प्रकार

भक्त चार प्रकारचे असतात – संकटात असलेला, भगवद्तत्त्व जाणण्यास इच्छुक, धनेच्छु आणि ज्ञानी. श्रीकृष्णाला सगळेच भक्त प्रिय असले, तरी ज्ञानी भक्त अत्यंत प्रिय असतो; कारण तो ईश्वराचेच स्वरूप असतो.

विवेचन

ईश्वराला ज्ञानी भक्त अतीव प्रिय असणे

ईश्वर ज्याप्रमाणे निष्काम आणि ज्ञानमय असतो, त्याचप्रमाणे ज्ञानी भक्त निष्काम आणि ज्ञानमय असल्याने ईश्वराला तो अत्यंत प्रिय असतो. श्रीकृष्ण म्हणतात, ‘ज्ञानी भक्त माझेच स्वरूप आहे’. पहिल्या तीन प्रकारचे भक्त त्यांची इच्छापूर्ती झाली की, ईश्वराची कास सोडू शकतात. वस्तुतः जे सकाम भक्ती करतात, ते ईश्वराची नव्हे, तर आपल्या सुख-सुविधेची भक्ती करतात; म्हणून इच्छा पूर्ण झाल्यावर त्यांची एकाग्रता, कळकळ अल्प होते.

 

२. सकाम भक्तांची श्रद्धा दृढ करण्यासाठी श्रीकृष्णाने(ईश्वराने) त्यांची कामनापूर्ती करणे

२ अ. देवतांची उपासना करणे आणि ईश्वराची भक्ती करणे

कामनापूर्तीसाठी लोक वेगवेगळ्या देवतांची त्यांच्यासाठी निर्धारित पद्धतींनुसार उपासना करतात. त्यांची श्रद्धा दृढ करण्यासाठी त्या देवतांच्या माध्यमांतून ईश्वरच (श्रीकृष्णच) भक्तांच्या वांछित भोगांची पूर्ती करतात; पण ते सर्व भोग अंत होणारे असतात. देवतांची उपासना करणारे त्या देवतांची प्रसन्नता आणि इच्छित फळ प्राप्त करतात, तर ईश्वराची भक्ती करणारे ईश्वरालाच प्राप्त करतात.

विवेचन

सकाम आणि निष्काम भक्ती कामनेनें फळ घडे ।
निःकाम भजनें भगवंत जोडे ।
फळभगवंता कोणीकडे । महदांतर ॥ – दासबोध, दशक १०, समास ७, ओवी २०

अर्थ : सकाम भक्ती केली, तर कामना पूर्ण होईल. निष्काम भक्ती केली, तर भगवंत मिळेल. नाशवंत कामभोग आणि ईश्वर यांच्या प्राप्तीमध्ये किती अंतर आहे !

 

३. आत्मज्ञान

अनेक जन्मांच्या साधनेनंतर आत्मज्ञान होऊन ‘सर्वकाही वासुदेवच आहे’, या तत्त्वज्ञानाचा अनुभव येतो.

विवेचन

उपनिषदांमध्येही ‘सर्वकाही ब्रह्मच आहे’, असे सांगितले आहे.

सर्वं खल्विदं ब्रह्म । – छान्दोग्योपनिषद्, अध्याय ३, खण्ड १४, वाक्य १

अर्थ : (चराचर, परा-अपरा, जड-चेतन) हे सर्व खरोखर ब्रह्म(च) आहे.

 

४. विश्वाची उत्पत्ती आणि विनाश यांचे कारण

अपरा आणि परा या दोन्ही प्रकृती सर्व भुतांची (प्राणीमात्रांची) योनी, म्हणजे कारण आहेत. हा द्विधा प्रकृतीस्वरूपी ईश्वर सर्व विश्वाची उत्पत्ती आणि विनाश यांचे कारण आहे.

 

५. विवेकहीन मनुष्य परा प्रकृतीला न समजू शकण्याचे कारण

इच्छा आणि द्वेष यांपासून उत्पन्न होणारी प्रिय-अप्रिय इत्यादी सर्व द्वंद्वे मनुष्याला मोहात टाकतात. मोहाच्या वशीभूत होऊन सर्व प्राणी जन्म घेत रहातात. हे इच्छाद्वेषादी त्रिगुणात्मक विकार अपरा प्रकृतीतील आहेत. त्यांनी मोहित होऊन, म्हणजे विवेकहीन होऊन मनुष्य परा प्रकृतीला समजू शकत नाही.

 

६. साधना

६ अ. सर्व सृष्टीचा आदर करणे

वासुदेवः सर्वमिति । (अध्याय ७ श्लोतक १९), म्हणजे सर्व जड आणि चेतन सृष्टी ईश्वरच आहे, हे जाणून तिचा आदर करणे

६ आ. अपरा प्रकृतीच्या मोहात न गुंतणे

आपले शरीर आणि सर्व सांसारिक वस्तू अष्टधा, म्हणजे अपरा प्रकृतीच्या आहेत. परा प्रकृती जीवरूप, चेतन असल्याने आपल्या जीवात्म्याचा नित्य संबंध परा प्रकृतीशी आहे. हे जाणून विनाशशील अपरा प्रकृतीच्या मोहात न गुंतणे.

६ इ. ज्ञानी भक्त बनणे

कामी भक्त नव्हे, तर आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून निष्काम ज्ञानी भक्त बनणे.

 

७. फळ

मायेला तरून जातो (अध्याय ७, श्लो क १४). जन्म-मरणाच्या फेर्‍यातून सुटतो.

 

८. अध्यायाचे नाव ‘ज्ञानविज्ञानयोग’ असे ठेवण्यामागील कारण

श्रीकृष्ण (ईश्वर) संपूर्ण जगाच्या उत्पत्तीचे कारण आहेत, असे जाणणे हे ज्ञान आहे आणि वासुदेवः सर्वमिति । म्हणजे सर्वकाही श्रीकृष्ण (ईश्वरच) आहेत, असा अनुभव होणे हे विज्ञान आहे; म्हणून या अध्यायाचे नाव ज्ञानविज्ञानयोग आहे. (एखादी गोष्ट मानणे म्हणजे श्रद्धा, ती जाणणे म्हणजे ज्ञान असते आणि प्रत्यक्ष अनुभवणे, हे विज्ञान होय.)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

– अनंत बाळाजी आठवले, बी.ई. (सिव्हिल), शीव, मुंबई. (१६.१२.२०१३)

संदर्भ : सनातन-निर्मित आगामी ग्रंथ ‘गीताज्ञानदर्शन’

Leave a Comment