॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय ४ – ज्ञानकर्मसंन्यासयोग

सर्व चराचर ब्रह्मच आहे हे ज्ञान आणि कर्माच्या फळांचा त्याग
हा संन्यास, असे शिकवणारा अध्याय ४ – ज्ञानकर्मसंन्यासयोग

श्री. अनंत आठवले
श्री. अनंत आठवले

गीतेतील शिकवणीच्या संदर्भात श्री. अनंत आठवले यांनी स्वतः केलेले विवेचन खाली दिले आहे. या लेखमालिकेत काही ठिकाणी परिशिष्ट पहा असे म्हटले आहे. परिशिष्ट गीताज्ञानदर्शन या ग्रंथात दिले आहे. त्यावरून वाचकांना विषय अधिक सुस्पष्ट होईल. – संकलक

 

अर्जुनाला गीता लगेच कळली !

आपल्याला गीता अनेकदा वाचूनही कळत नाही. काही काळाने आपण गीतेचा अभ्यास करणे सोडून देतो; मात्र श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता एकदाच सांगितली. त्याला ती कळली आणि त्याने तिच्यातील शिकवणीनुसार आचरण केले. यावरून हे लक्षात येते की, आपण अर्जुनासारखा भाव ठेवला, तरच आपल्याला गीता कळेल. – (प.पू.) डॉ. आठवले

 

॥ श्रीकृष्णाय नम: ॥

१. तत्त्वज्ञान

१ अ. धर्मसंस्थापनेसाठी ईश्‍वराने अवतार घेणे

जेव्हा जेव्हा धर्माची अवनती होते, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुर्जनांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी ईश्‍वर प्रत्येक युगात अवतार घेतो. (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्‍लोक ७ आणि ८)

१ आ. सकाम भक्ती

कर्मांचे फळ इच्छिणारे देवतांचे पूजन करतात आणि त्यांना फळही लवकर मिळते.

१ इ. चातुर्वर्णांची निर्मिती

श्रीकृष्णांनी गुणकर्मविभागावर (परिशिष्ट क्रमांक १, सूत्र ४) चातुर्वर्णांची निर्मिती केली.

१ ई. नि:स्पृहतेमुळे पाप-पुण्यरूपी बंधन न लागणे

१. श्रीकृष्णांना कर्मांच्या फळांची स्पृहा (इच्छा) नाही; म्हणून त्यांना कर्मापासून पाप-पुण्यरूप बंधन लागत नाही.

२. कामनारहित होऊन आणि सर्व भोगसामुग्रीचा त्याग करून केवळ शरीरयापनासाठी (निर्वाहासाठी) केलेल्या कर्मांनी पाप-पुण्यरूपी बंधन लागत नाही.

३. कामना आणि संकल्प यांचा त्याग करून अन् प्रखर ज्ञान (अध्याय २ मध्ये सांगितलेले ज्ञान) जागृत ठेवून जो कर्म करतो, त्याच्या कर्मांची पाप-पुण्यरूप सर्व फळे ज्ञानाग्नी जाळून टाकतो.

विवेचन

म्हणजे त्या ज्ञानानुसार आचरण करतो त्याला कर्मांची फळे भोगावी लागत नाहीत.

 

२. श्रीकृष्णांनी सांगितलेले विविध यज्ञ

यज्ञ म्हणजे केवळ अग्नीत आहुती देणे, असे नसून यज्ञाचे इतरही अनेक प्रकार श्रीकृष्णांनी सांगितले आहेत.

२ अ. शम

इंद्रियांचा संयम करणे

विवेचन

म्हणजे संयमरूप अग्नीत इंद्रियांची आहुती देणे

२ आ. दम

ज्ञानेद्रियांचे दमन करणे

विवेचन

म्हणजे त्यांच्या शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या विषयांची ज्ञानेद्रियांत आहुती देणे

२ इ. संयम

सर्व कर्मेद्रियांच्या कर्मांचा आणि प्राणांच्या कर्मांचा संयम करणे,

विवेचन

म्हणजे आत्मसंयमात त्यांची आहुती देणे

२ ई. द्रव्ययज्ञ

विवेचन

धनाचा दुसर्‍यांच्या हितासाठी वापर करणे

२ उ. तपोयज्ञ

 विवेचन

उपवास, व्रते इत्यादी करून शरीर कृश करणे, हा तपोयज्ञ, हठयोग किंवा अष्टांगयोगरूप यज्ञ होय.

२ ऊ. ज्ञानयज्ञ

विवेचन

आत्मज्ञानाविषयीच्या ग्रंथांचा अध्ययनरूपी ज्ञानयज्ञ

२ ए. प्राणायाम यज्ञ

विवेचन

अपानात प्राणाचे आणि प्राणात अपानाचे हवन हा यज्ञ
असे यज्ञाचे अनेक प्रकार आहेत. त्यांनी दोषांचे, पापांचे क्षालन होते. प्रत्येक प्रकारच्या यज्ञात कशाचा तरी त्याग असतो. संन्यास म्हणजेही त्यागच !

 

३. द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ !

सर्व यज्ञ कर्मरूपीच असतात. सर्व द्रव्यमय यज्ञांपेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. द्रव्यमय यज्ञ फळ देतात, तर ज्ञानयज्ञात फळाचा ज्ञानप्राप्तीच्या कर्मांसह अंत होतो. सर्व कर्मांचे पर्यवसान शेवटी ज्ञानातच होते. आत्मज्ञानासारखी पवित्र गोष्ट दुसरी नाही. ते ज्ञान कोणत्याही योगाने परिपक्वता आल्यावर स्वतःतच मिळते. (कर्मे करून ज्ञान कसे मिळेल, यासाठी (परिशिष्ट क्रमांक १, सूत्र ६)

 

४. कर्म विलीन होणे

ईश्‍वरासाठी किंवा इतरांसाठी केलेले कर्म विलीन होते, फलोन्मुखी होत नाही.

 

५. ज्ञानप्राप्ती

५ अ. ब्रह्मबुद्धी होणे

यज्ञात अर्पण करण्याचे साधन पळी, ज्यात अर्पण करतो तो अग्नी, जी अर्पण करतो ती आहुती आणि स्वतः यज्ञकर्ता हे सर्व ब्रह्मच आहे.

विवेचन

हे ज्ञानकर्मसंन्यासयोगातील ज्ञान आहे. सर्व कर्मांमध्ये तथा सर्वत्र ब्रह्मबुद्धी होणे

५ आ. कर्मसंन्यास

कर्माच्या फळाची आसक्ती सोडणे.

विवेचन

हा ज्ञानकर्मसंन्यासयोगातील कर्मसंन्यास आहे. संन्यासात सोडणे असते.

 

६. साधना

६ अ. ज्ञानप्राप्तीसाठी साधना – ज्ञानी महात्म्यांकडून ज्ञान प्राप्त करणे

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्‍नेन सेवया ।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्‍लोक ३४
अर्थ : ते ज्ञान तू तत्त्वसाक्षात्कारी ज्ञानी लोकांकडे जाऊन समजून घे. त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्‍न विचारल्याने, परमात्मतत्त्व उत्तम रितीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील.

विवेचन

तत्त्वज्ञानाच्या ग्रंथांमध्ये श्रवण, मनन आणि निदिध्यासन हा ज्ञानप्राप्तीचा मार्ग, म्हणजे साधना सांगितली आहे. आपल्या आत्म्याचे जे ब्रह्म हे स्वरूप आहे, ते आत्मज्ञानी महापुरुषांकडून अथवा ग्रंथांच्या अभ्यासाने जाणून घेणे, त्यावर सखोल विचार करून शंकानिरसन करून घेणे आणि निःसंदेह झालेले ज्ञान आत्मसात् करणे, आपला स्वभाव बनवणे आणि अहंमध्ये भिनवणे, तसेच आपला आत्मा आणि परमात्मा हे अभिन्न आहेत, हे ज्ञान आपल्या अस्तित्वातच रुजवणे, यात येते.

६ आ. कर्मसंन्यासासाठी साधना

इच्छा आणि भोगवस्तू यांच्या संग्रहाचा त्याग करून कर्म करत रहाणे. जे आणि जेवढे मिळेल त्यात संतुष्ट रहाणे

 

७. फळ

अ. सर्व वस्तूंमध्ये आणि कर्मांमध्ये ब्रह्मच पहाणारा ब्रह्मातच विलीन होतो.

आ. यज्ञात अर्पण करून शिल्लक राहिलेले अमृतरूपी प्रसाद समजून ग्रहण करणार्‍याला यज्ञात अर्पणरूपी त्याग आणि अल्पसंतुष्टत्व यांमुळे चित्तशुद्धी होऊन त्याला यथासमय ब्रह्मप्राप्ती होते.

विवेचन

यज्ञात अर्पण करून शिल्लक राहिलेले, म्हणजे आपले धन, वस्तू इत्यादींनी दुसर्‍यांची सेवा केल्यानंतर जे उरते, ते आपल्या देहधारणेसाठी आवश्यक तेवढेच ईश्‍वराचा कृपाप्रसाद समजून स्वतःसाठी वापरणे. यज्ञासाठी म्हणजे स्वार्थ, सुखोपभोग आणि आसक्ती यांच्या आहुती देऊन कर्म करणार्‍याचे, कर्म विलीन होते म्हणजे फलोन्मुख होत नाही. त्या कर्मापासून पाप-पुण्य काहीच लागत नाही.
इ. ज्ञानासाठी सांगितलेली साधना करून आत्मज्ञान झालेल्याला परम शांती तत्काळ मिळते (अध्याय ४, श्‍लोक ३८). ही ब्रह्मपदप्राप्तीची स्थिती असते.

 

८. अध्यायाला ज्ञानकर्मसंन्यासयोग नाव असण्याचे कारण

या अध्यायात आत्मज्ञानाची प्राप्ती आणि कर्मसंन्यास म्हणजे कर्माच्या फळांचा त्याग हा संन्यास यांचे उपाय सांगितलेले असल्याने अध्यायाचे नाव ज्ञानकर्मसंन्यासयोग असे आहे.

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

– अनंत बाळाजी आठवले, बी.ई. (सिव्हिल), शीव, मुंबई. (१०.१२.२०१३)

संदर्भ : सनातन-निर्मित आगामी ग्रंथ ‘गीताज्ञानदर्शन’

Leave a Comment