॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय २ – सांख्ययोग (भाग २)

 

श्री. अनंत आठवले
श्री. अनंत आठवले

गीतेतील शिकवणीच्या संदर्भात श्री. अनंत आठवले यांनी स्वतः केलेले विवेचन येथे दिले आहे.

या लेखमालिकेत काही ठिकाणी परिशिष्ट पहा असे म्हटले आहे. परिशिष्ट गीताज्ञानदर्शन या ग्रंथात दिले आहे. त्यावरून वाचकांना विषय अधिक सुस्पष्ट होईल. – संकलक

 

अर्जुनाला गीता लगेच कळली !

आपल्याला गीता अनेकदा वाचूनही कळत नाही. काही काळाने आपण गीतेचा अभ्यास करणे सोडून देतो; मात्र श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता एकदाच सांगितली. त्याला ती कळली आणि त्याने तिच्यातील शिकवणीनुसार आचरण केले. यावरून हे लक्षात येते की, आपण अर्जुनासारखा भाव ठेवला, तरच आपल्याला गीता कळेल. – (प.पू.) डॉ. आठवले

 

२. बुद्धीयोग तत्त्वज्ञान

बुद्धीयोग हा कर्मयोग आहे. कर्मे कशी करायची, याविषयीची बुद्धी श्रीकृष्णांनी पुढीलप्रमाणे सांगितली आहे.

२ अ. फळाची इच्छा न करता कर्म करणे

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ४७

अर्थ : तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे, त्याच्या फळांवर नाही; म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नको; (पण) कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको.

२ अ १. विवेचन

आसक्ती सोडून कर्म करायचे आहे. कर्तव्यपालन करायचे आहे. ज्ञानयोगात, म्हणजेच सांख्ययोगात कर्माचे विधान नाही. कर्तव्यकर्म नाही. बुद्धीयोगात फलेच्छा सोडून कर्म करायचे आहे.

२ आ. बुद्धीयोग म्हणजे काय ?

यश-अपयशात समत्व साधणे, सम राहून कर्म करणे, हा बुद्धीयोग आहे.
योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय ।
सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ४८

अर्थ : हे धनंजय अर्जुना, तू आसक्ती सोडून, तसेच सिद्धी आणि असिद्धी यांमध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्यकर्मे कर. समत्वालाच योग म्हटले जाते.
बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते ।
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ५०

अर्थ : समबुद्धीचा पुरुष पुण्य आणि पाप या दोहोंचाही याच जगात त्याग करतो. अर्थात् त्यापासून मुक्त असतो; म्हणून तू समत्वरूप योगाला चिकटून रहा. हा समत्वरूप योगच कर्मांतील कौशल्य आहे, म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे.

स्पष्टीकरण : कर्म करतांना ते यशस्वी होईल अथवा नाही, त्याचा इच्छित परिणाम होईल किंवा नाही, त्यापासून सुख होईल अथवा दुःख होईल, या सर्वांमध्ये समबुद्धी ठेवणे, ही कर्म करण्यातील कुशलता आहे.

२ इ. त्रिगुणातीत होणे

वेद, वैदिक कर्मे त्रिगुणमयी आहेत; म्हणून फलदायी आहेत. त्या कर्मांची फळे भोगावी लागतात. कर्माचे फळ मिळावे, अशी आशा, इच्छा आणि कर्मांच्या फळांमुळे होणारी सुख-दुःख इत्यादी द्वंद्वे सोडून देणे म्हणजे त्रिगुणातीत होणे.
त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।
निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥- श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ४५

अर्थ : हे अर्जुना, वेद तिन्ही गुणांची कार्ये असणारे भोग आणि त्यांची साधने सांगणारे आहेत; म्हणून तू ते भोग अन् त्यांच्या साधनांमध्ये आसक्ती बाळगू नकोस. सुख-दुःखादी द्वंद्वांनी रहित शाश्‍वत असणार्‍या परमात्म्यात स्थित, योगक्षेमाची इच्छा न बाळगणारा आणि अंतःकरणाला नियंत्रणात ठेवणारा हो.

२ ई. साधना

१. आसक्ती सोडून कर्मे करायची आणि कर्मांविषयी उदासीनही व्हायचे नाही.
२. लक्ष मुक्तीत ठेवायचे, संसारात नाही.
या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ६९

अर्थ : सर्व प्राण्यांना जी रात्र आहे (जे अगम्य आहे), त्या बोधस्वरूप परमात्म्यात योगी जागृत रहातो. ज्या क्षणभंगूर संसारात प्राणी जागृत रहातात, तो संसार योग्यासाठी रात्र असते. (त्यात त्याला रुची नसते.)
३. त्रिगुणातीत होणे
४. सर्व कामना, ममता आणि अहंता सोडून आचरण करणे

२ उ. फळ

२ उ १. कर्मांचे पाप-पुण्य न लागणे

बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते ।
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ५०

अर्थ : समबुद्धीचा पुरुष पुण्य आणि पाप या दोहोंचाही याच जगात त्याग करतो, म्हणजे त्यांपासून मुक्त असतो; म्हणून तू समत्वरूपी योगाचे आचरण कर. हा समत्वरूपी योगच कर्मातील कौशल्य आहे, म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे.

२ उ २. परमपदाची प्राप्ती

कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः ।
जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् ॥- श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ५१

अर्थ : बुद्धीयोगी (समबुद्धीने युक्त असलेले ज्ञानी लोक) कर्मांपासून होणार्‍या फळांचा त्याग करून जन्माच्या बंधनापासून मुक्त होतात आणि निर्दोष पदाला प्राप्त होतात.

२ उ ३. अंतकाळी ब्रह्मलीन होणे

सर्व कामना, ममता आणि अहंता सोडणार्‍याला शांती प्राप्त होते. ही ब्रह्ममय स्थिती असते. असा साधक अंतकाळी या स्थितीत राहून ब्रह्मात लीन होतो.

२ ऊ. विवेचन

या अध्यायातील सांख्ययोगात सांगितलेले आत्म्याचे ज्ञान आणि अध्याय २, श्‍लोक ७१ अन् ७२ मध्ये सांगितलेले बुद्धीयोगाचे ज्ञान हे गीतेच्या बहुतेक सर्व शिकवणीतील परमोच्च ज्ञान आहे.
विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्‍चरति निःस्पृहः ।
निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति ॥- श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ७१

अर्थ : जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून, ममतारहित, आणि अहंकाररहित होऊन निःस्पृहतेने आचरण करतो आणि इच्छा टाकून रहात असतो, त्याला शांती मिळते.
एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।
स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥- श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ७२

अर्थ : हे पार्था (पृथापुत्र अर्जुना), ही ब्रह्मप्राप्तीची स्थिती आहे. ही प्राप्त झाल्याने योगी कधीही मोहित होत नाही आणि अंतकाळीही या ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन ब्रह्मलीन होतो.

स्पष्टीकरण : जो सर्व कामना, ममता आणि अहंकार (परिशिष्ट क्र. १, सूत्र २) सोडून वागतो, त्याला शांती मिळते. ही ब्राह्मी, म्हणजे ब्रह्ममय होण्याची स्थिती आहे. अशी स्थिती प्राप्त झालेला मनुष्य मोहित होत नाही आणि अंतकाळीही याच स्थितीत राहून ब्रह्मलीन होतो.

२ ऊ १. बुद्धीयोगात अंतकाळापर्यंत निष्कामतेने कर्म करत रहावे लागणे

बुद्धीयोगात अंतकाळापर्यंत निष्कामतेने कर्म करत रहावे लागते. बुद्धीयोगात स्वरूपाचे ज्ञान आणि ज्ञाननिष्ठा सांगितलेली नाही; तर सांख्ययोगात, म्हणजे ज्ञानयोगात स्वरूपाच्या ज्ञानावर भर आहे. ते ज्ञान निःसंदेह होऊन मनुष्य तन्मय झाला की, तो तत्क्षणी जीवनमुक्त होतो. सांख्ययोग आचरण्यासाठी कुशाग्र बुद्धी आवश्यक असते. सांख्ययोगात अनित्य संसारापासून अलिप्त रहावयाचे असल्याने हा संन्यासाचा मार्ग आहे. ज्ञानयोगाने सद्योमुक्ती मिळते.

ज्ञानयोगानुसार आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून त्यात स्थित होणे आणि कर्मयोगानुसार कामना, ममता अन् अहंता सोडणे, हे मोक्षप्राप्तीचे दोन राजमार्ग आहेत.
खरेतर गीतेचे सर्वोच्च ज्ञान आणि मोक्षप्राप्तीचे मार्ग या अध्यायात सांगून झाले; पण प्रत्येकाच्या रुचीनुसार (परिशिष्ट क्र. १, सूत्र ३) वेगवेगळा साधनामार्ग मनुष्याला सोयीस्कर वाटतो; म्हणून श्रीकृष्णांनी पुढच्या अध्यायांत वेगवेगळे साधनामार्ग सांगितले आहेत.

२ ए. सर्व इंद्रियांविषयी सतत सावध रहाणे आवश्यक !

यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्‍चितः ।
इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ६०

अर्थ : इंद्रिये इतकी प्रबळ आणि उच्छृंखल आहेत की, हे अर्जुना, इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या विवेकी पुरुषाच्या मनालासुद्धा ती बळजोरीने आपल्याकडे ओढून घेतात.

२ ऐ. देहात असेपर्यंत बुद्धीयोग्याची स्थिती

प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् ।
आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ५५

अर्थ : हे पार्था, मनुष्य जेव्हा मनात येणार्‍या सर्व कामनांचा त्याग करतो आणि त्यामुळे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा आत्म्यातच संतुष्ट होते, तेव्हा तो स्थितप्रज्ञ झाला आहे, असे म्हटले जाते.

 

३. अध्यायाला सांख्ययोग असे नाव असण्याचे कारण

या अध्यायात सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग आणि बुद्धीयोग म्हणजे कर्मयोग सांगितले आहेत; पण कर्मयोगाचे अधिक ज्ञान पुढील अध्याय ३ मध्ये सांगितले आहे. मुख्य प्रतिपादन सांख्ययोगाचे असल्याने या अध्यायाचे नाव सांख्ययोग आहे. यात आत्मस्वरूपाचे ज्ञान असून त्यात स्थित राहिल्यास ब्रह्माशी योग होतो, ब्रह्माशी अभिन्नता होते; म्हणून याला सांख्ययोग म्हटले आहे.

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

– श्री. अनंत बाळाजी आठवले, बी.ई. (सिव्हिल), शीव, मुंबई. (१०.१२.२०१३)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘गीताज्ञानदर्शन’

Leave a Comment