॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय २ – सांख्ययोग (भाग १)

 

श्री. अनंत आठवले
श्री. अनंत आठवले

गीतेतील शिकवणीच्या संदर्भात श्री. अनंत आठवले यांनी स्वतः केलेले विवेचन येथे दिले आहे.

परिशिष्ट गीताज्ञानदर्शन या ग्रंथात दिले आहे. त्यावरून वाचकांना विषय अधिक सुस्पष्ट होईल. – संकलक

 

 

अर्जुनाला गीता लगेच कळली !

आपल्याला गीता अनेकदा वाचूनही कळत नाही. काही काळाने आपण गीतेचा अभ्यास करणे सोडून देतो; मात्र श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता एकदाच सांगितली. त्याला ती कळली आणि त्याने तिच्यातील शिकवणीनुसार आचरण केले. यावरून हे लक्षात येते की, आपण अर्जुनासारखा भाव ठेवला, तरच आपल्याला गीता कळेल. – (प.पू.) डॉ. आठवले

 

तत्त्वज्ञान

१. गीतेत सांख्ययोगाची सांगितलेली तत्त्वे ही सनातन धर्माची असणे

सांख्यशास्त्राची जी तत्त्वे आहेत, ती सनातन धर्माची, ज्याला आता हिंदु धर्म (पहा : परिशिष्ट क्र. १, सूत्र १) म्हटले जाते, त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. सनातन धर्म आणि इतर धर्म यांतील अंतर काय ? तेही या तत्त्वांनी स्पष्ट होते. ती तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत.

१ अ. सांख्यशास्त्राची तत्त्वे

१ अ १. आत्म्याचे अमरत्व

न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः ।
अजो नित्यः शाश्‍वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक २०

अर्थ : आत्मा (पहा : परिशिष्ट क्र. १, सूत्र ११) कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा (इतर वस्तूंप्रमाणे) एकदा उत्पन्न झाल्यावर (मरून) पुन्हा उत्पन्न होणारा नाही; कारण हा जन्म नसलेला, नित्य, शाश्‍वत आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले, तरी आत्मा मारला जात नाही.
स्पष्टीकरण : आत्मा अजन्मा आणि शाश्‍वत असून शरिराचा नाश झाल्यावरही याचा नाश होत नाही.

१ अ १ अ. जीवात्म्याची व्यक्ताव्यक्तता

अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।
अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक २८

अर्थ : हे अर्जुना, सर्व प्राणी म्हणजे जीवात्मे जन्मण्यापूर्वी आणि मृत्यूनंतर अव्यक्त असतात. केवळ जीवनकाळात व्यक्त होतात. मग अशा स्थितीत शोक कसला करायचा ?

१ अ १ आ. आत्मा अवध्य असणे

देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत ।
तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ३०

अर्थ : हे अर्जुना, हा आत्मा सर्वांच्या शरिरात नेहमीच अवध्य असतो (मारला जाऊ शकत नाही); म्हणून सर्व प्राण्यांविषयी तू शोक करणे योग्य नाही.

१ अ २. पुनर्जन्म होणे

न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः ।
न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक १२

अर्थ : मी कोणत्याही काळी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राजेलोक नव्हते, असे नाही आणि यापुढे आम्ही सर्व जण असणार नाही, असेही नाही.

१ अ २ अ. मरणार्‍याचा जन्म निश्‍चितच होणार !

जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक २७

अर्थ : जन्मास आलेल्याला मृत्यू निश्‍चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्‍चित आहे; म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टींविषयीही तू शोक करणे योग्य नाही.

१ अ २ आ. जीवात्म्याने नवे शरीर धारण करणे

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक २२

अर्थ : ज्याप्रमाणे जीर्ण वस्त्रे टाकून मनुष्य दुसरी वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे जीवात्मे जीर्ण शरीरे सोडून नव्या शरिरात जातात.

१ अ ३. सत्य चिरंतन असते !

नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक १६

अर्थ : असत् वस्तूला अस्तित्व नाही आणि सत् वस्तूचा अभाव नसतो. अशा प्रकारे या दोहोंचेही सत्य स्वरूप तत्त्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे.

विवेचन

उपनिषदांत सत्य हे ब्रह्माचे स्वरूप म्हटले आहे. सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म । (तैत्तिरीयोपनिषद्, ब्रह्मानन्दवल्ली, अनुवाक १), म्हणजे ब्रह्म म्हणजे सत्य, ज्ञान आणि अनंतत्व. आपण आत्मा, हे नित्य सत्य आहे. जे खरोखर आहे, त्याचा कधीही अभाव होत नाही. नासतो विद्यते भावो, म्हणजे जे नाशवान् आहे, ते असत्य आहे. जे चिरंतन असते, तेच सत्य असते.

१ अ ४. आत्मा अविकारी आहे !

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक २३

अर्थ : या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही.

अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च ।
नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक २४

अर्थ : हा आत्मा (शस्त्राने) न कापला जाणारा, न जळणारा, (पाण्याने) न भिजणारा आणि (वार्‍याने) वाळवता न येणारा आहे. तसेच हा आत्मा नित्य, सर्वव्यापक, अचल, स्थिर राहाणारा आणि सनातन आहे.

अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।
तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक २५

अर्थ : हा आत्मा अव्यक्त, अचिंत्य (मनाला अगम्य) आणि विकाररहित (टीप) आहे, असे म्हटले जाते; म्हणून हे अर्जुना, हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे, हे जाणून तू शोक करणे योग्य नाही.

(टीप) : उत्पत्ती, वृद्धी, स्थिती, विकृती, र्‍हास आणि नाश यांना विकार म्हणतात.

१ अ ५. देह आणि सुखदुःखादी विकार अनित्य अन् नाशवान असल्याने असत्य असणे

अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः ।
अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्य भारत ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक १८

अर्थ : या नाशरहित (अविनाशी), मोजता न येणार्‍या (अप्रमेय), शाश्‍वत जीवात्म्यांची ही शरीरे नाशवंत आहेत, असे म्हटले गेले आहे; म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू युद्ध कर.

१ अ ६. सुखदुःखादी विकार सहन करणे

मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः ।
आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक १४

अर्थ : हे कुंतीपुत्रा, इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी-उष्णता आणि सुख-दुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात अन् नाहीसे होतात; म्हणून ते अनित्य आहेत. तेव्हा हे भारता, ते तू सहन कर.

विवेचन

१ आ. सनातन धर्मातील आणखी काही महत्त्वाची तत्त्वे

१ आ १. कर्मफलन्याय

आपण जशी चांगली-वाईट कर्मे करू, त्यानुसार सुख-दुःखादी फळे आपल्याला मिळतात.

१ आ २. ईश्‍वर किंवा ब्रह्माशी एकरूप होऊ शकणे

आपण सदैव ईश्‍वराचे भक्त किंवा दास होऊन रहाणे आवश्यक नाही. आपण सायुज्य मुक्ती (ईश्‍वराशी एकरूप होणे) प्राप्त करू शकतो. त्याहूनही पुढे जाऊन आपण आपल्या मूळ स्वरूपात, म्हणजे ब्रह्मात विलीन झाल्यावर जन्ममरणाचा फेरा पूर्णतः थांबतो.

१ इ. साधना

देहामधील देही, म्हणजे आत्मा हा नित्य, अविनाशी आणि अविकारी आहे, तर देह अन् संसारातील सर्व वस्तू आणि इंद्रिये यांपासून मिळणारी सर्व सुख-दुःखे अनित्य, तसेच नाशवान आहेत; म्हणून देह इत्यादी अनित्याशी आपला किंचिन्मात्र संबंध मन अन् बुद्धी यांनी न मानणे, तसेच सर्वसंगपरित्याग मनापासून करणे.

१ ई. विवेचन – संन्यास म्हणजे कामनापूर्तीसाठीच्या कर्मांचा त्याग !

या असंगाच्या स्थितीत कोणतेही कर्तव्यकर्म उरत नाही; कारण सर्व कर्मे देह आणि संसार यांच्या पसार्‍याशीच संबंधित असतात. कर्तव्यकर्मे न उरल्याने संन्यास घडतो. संन्यास म्हणजे कामनापूर्तीसाठीच्या (इष्टप्राप्ती आणि अनिष्ट निवारण) कर्मांचा त्याग करणे

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १८, श्‍लोक २

देह आणि त्यापासून होणार्‍या सुख-दुःखांशी मन अन् बुद्धी यांची पूर्ण संबंधविच्छेदाची धारणा दृढ झाल्यावर धारणारूपाने न रहाता ती बोधामध्ये, म्हणजे अनुभवात परिणत होते. गुरु किंवा ग्रंथ यांपासून ज्ञान मिळेल. श्रवण, मनन आणि निदिध्यासन यांनी संदेह जातील; पण अनुभूती, बोध, म्हणजे स्वरूपाचा बोध मात्र स्वतःला स्वतःतच होतो. या जीवन्मुक्तावस्थेत देहात असेपर्यंत देहधारणेसाठी आवश्यक कर्मे घडतात; पण त्यांत रुची-अरुची रहात नाही.

१ उ. फळ – ब्रह्मात विलीन होणे

श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्‍लोक ३९

अर्थ : जितेंद्रिय, साधनतत्पर आणि श्रद्धाळू मनुष्याला ज्ञान मिळते अन् ज्ञान प्राप्त झाल्यावर तो तत्काळ भगवत्प्राप्तीरूपी परम शांतीला प्राप्त होतो.

स्पष्टीकरण : आत्मज्ञान झाल्यावर त्या ज्ञानानुसार ज्याचे स्वाभाविक आचरण होते, त्याला परम शांती, जी ब्रह्मातच असते, ती मिळते. तो ब्रह्मात विलीन होतो.

विवेचन

ज्ञानयोग हा सद्योमुक्तीचा, तत्काळ मुक्तीचा मार्ग आहे. इतर सर्व मार्गांनी न्यून-अधिक वेळ लागतो. (क्रमश:)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

– श्री. अनंत बाळाजी आठवले, बी.ई. सिव्हिल, शीव, मुंबई. (१०.१२.२०१३)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘गीताज्ञानदर्शन’

Leave a Comment