॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १ – अर्जुनविषाद

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ लेखकाने ‘विषाद’ हा योग कसा,
हे सांगणारे विवेचन केलेला अध्याय १ – अर्जुनविषादयोग

 

अर्जुनाला गीता लगेच कळली !

श्री. अनंत आठवले
श्री. अनंत आठवले

आपल्याला गीता अनेकदा वाचूनही कळत नाही. काही काळाने आपण गीतेचा अभ्यास करणे सोडून देतो; मात्र श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता एकदाच सांगितली. त्याला ती कळली आणि त्याने तिच्यातील शिकवणीनुसार आचरण केले. यावरून हे लक्षात येते की, आपण अर्जुनासारखा भाव ठेवला, तरच आपल्याला गीता कळेल. – (प.पू.) डॉ. आठवले

 

 

१. कुरुक्षेत्रामध्ये लढायला उभे राहिल्यावर अर्जुनाला विषाद होणे

श्रीमद्भगवद्गीतेतील ‘अर्जुनविषादयोग’ या प्रथम अध्यायात पुढील प्रसंगाचा उल्लेख आहे. कुरुक्षेत्रामध्ये लढायला उभे राहिल्यावर अर्जुनाला आपल्या विरुद्ध लढायला उभ्या राहिलेल्या लोकांमध्ये आपलेच बांधव, नातेवाईक, मामा, आजोबा, गुरु इत्यादी दिसले. आपल्याच आप्तांना मारावे लागणार, हे पाहून अर्जुनाला विषाद झाला. त्याला लढू नये, असे वाटले आणि त्याविषयीची पुढील कारणे त्याने भगवान् श्रीकृष्णांना सांगितली.

 

२. अर्जुनाने विषाद होण्याची सांगितलेली कारणे

अ. ज्या आप्तांना सुखी करण्यासाठी लढून राज्य आणि उपभोग प्राप्त करायचे, तेच समोर लढायला उभे आहेत. अशा आप्तांना मारून काय मिळणार ? त्यांना मारून पृथ्वीचेच काय; पण त्रैलोक्याचे राज्य मिळाले, तरी ते नको आहे.

आ. स्वजनांना मारून सुखी कसे होऊ ? उलट पापच लागेल.

इ. अनेक लोक मारले गेल्याने कुलक्षय होईल, कुलधर्म नष्ट होतील, अधर्म वाढेल आणि स्त्रिया बिघडून वर्णसंकर होईल. पितरांच्या पिंडउदक क्रियाही होणार नाहीत. ज्यांचा जातीधर्म आणि कुलधर्म नष्ट झाला, त्यांना दीर्घकाळ नरकात रहावे लागते, असे आपण ऐकतो.

विवेचन

 

३. अध्यायाला ‘अर्जुनविषादयोग’ असे नाव देण्यामागील कारण

आता असा प्रश्न निर्माण होतो की, हा विषाद तर झाला; पण हा योग कसा ? याला ‘विषादयोग’ असे नाव का दिले आहे ? याचे उत्तर मनुष्यांच्या प्रवृत्तीत आहे.

३ अ. दुःखातच ईश्वराची आठवण येणे

मनुष्याला केवळ दुःखातच ईश्वराची आठवण येते. संत कबीरांनी म्हटले आहे, ‘दुखमें सुमिरन सब करे, सुखमें करे न कोय ।’, म्हणजे दुःखातच मनुष्याला ईश्वराची आठवण येते. सुखात असतांना कोणीही ईश्वंराची आठवण काढत नाही.

३ आ. पुढच्या उन्नतीची पहिली पायरी ठरणारी श्रीरामांची विषण्णता

३ आ १. सर्व सुखोपभोग अशाश्वत वाटू लागणे

योगवासिष्ठ ग्रंथाच्या आरंभी असे आले आहे की, श्रीराम अतिशय उदास राहू लागले. त्याचे कारण विचारल्यावर ते म्हणाले, सुंदर वस्त्र, मिष्टान्ने, धनसंपत्ती, हत्ती, घोडे, रथ, विशाल राजवाडे, नोकर-चाकर, दास-दासी, सुंदर स्त्रिया इत्यादी सर्व मिळाले, तरी हे सर्व उपभोगून काय लाभ होणार ? आणि हे सदैव टिकणारेही नाहीत.

३ आ २. विषण्ण झालेल्या श्रीरामांना विश्वामित्र आणि वसिष्ठ मुनींकडून ज्ञान मिळणे

साधन चतुष्ट्यातील पहिले साधन आहे, ‘नित्यानित्यवस्तुविवेक’, म्हणजे ‘काय शाश्वत आहे आणि काय अशाश्वत आहे, याची विचाराने निश्चिती करणे’. श्रीरामांची तशी मनःस्थिती झाल्यावर प्रथम विश्वामित्र मुनींनी थोडेसे आणि नंतर वसिष्ठ मुनींनी त्यांना ज्ञान दिले. म्हणजे श्रीरामांची विषण्णता ही पुढच्या उन्नतीची पहिली पायरी ठरली.

३ इ. कुंतीने भगवान् श्रीकृष्णांना केलेली विनंती

विपदः सन्तु ताः शश्वकत् तत्र तत्र जगद्गुरो ।
भवतो दर्शनं यत् स्यात् अपुनर्भवदर्शनम् ॥ – श्रीमद्भागवत, स्कंध १, अध्याय ८, श्लोक २५

अर्थ : वेळोवेळी ती संकटे माझ्यावर निरंतर येत राहोत. त्यामुळे तुमचे दर्शन होत राहील, ज्याच्या योगे पुनर्जन्म होणार नाही. तात्पर्य हे की, दुःख, संकटे आली की, ईश्वराची आठवण येते, म्हणजे आपण ईश्वराशी जोडले जातो. आपला ईश्वराशी योग होतो; म्हणून अर्जुनाच्या विषादालाही योग म्हटले आहे.

४. संसारासंदर्भात विवेचन

संसार दुःखमय आहे आणि जी सुखे मिळतात, तीही सदैव सोबत रहात नाहीत. त्यामुळे दुःखविहीन निरतिशय आनंद कसा मिळेल, याचा विचार करणे. जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून कसे सुटायचे, ते शोधण्याचा प्रयत्न करणे.

 

५. साधनेसंदर्भात विवेचन

आपल्या स्वभावाला अनुरूप साधनामार्ग आपल्याला सापडेल.

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

– श्री. अनंत बाळाजी आठवले, शीव, मुंबई. (१६.१२.२०१३)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘गीताज्ञानदर्शन’

Leave a Comment