देवद (पनवेल) येथे ‘श्री दुर्गामाता दौड’चा प्रारंभ आणि समारोप सनातन आश्रमात !

पनवेल, २९ सप्टेंबर (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान यांच्‍या वतीने देवद गाव येथे २९ सप्टेंबर या दिवशी श्री दुर्गामाता दौड पार पडली. या वेळी धर्मध्‍वजाचे पूजन सनातनच्या आश्रमातील साधक श्री. निनाद गाडगीळ (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के) यांनी केले, तसेच सनातन संस्‍थेच्‍या साधिकांनी औक्षण केले. श्रीफळ वाढवल्यानंतर शंखनाद करून दौड मार्गस्‍थ झाली.

देवद येथील सनातन आश्रम येथून सकाळी साडेसहा वाजता दौडीस प्रारंभ होऊन गावातील गावदेवी मंदिर, विसपुते महाविद्यालय, पुष्‍पनारायण सोसायटी अशी फिरून पुन्हा सनातन आश्रमात येऊन दौडीची सांगता झाली. दौडीमध्‍ये ‘पुण्‍यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !’, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो !’, ‘श्री दुर्गादेवीचा विजय असो’, असे विविध वीरश्रीयुक्त जयघोष करण्‍यात आले. ठिकठिकाणी महिलांनी उत्स्फूर्तपणे ध्वजाचे पूजन केले. स्‍थानिक श्री गावदेवी मंदिरात दौड आल्‍यावर तेथे सुवासिनींनी धर्मध्‍वजाचे पूजन केले आणि मंदिरात दौडीत सहभागी झालेल्‍या हिंदुत्‍वनिष्ठांकडून आरती करण्‍यात आली. पाऊस असतांनाही दौडीमध्‍ये श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्थानचे धारकरी, महिला, मुले, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि सनातन संस्‍थेचे साधक सहभागी झाले होते. या वेळी विजयादशमीला पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या महादौडीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

 

सनातन संस्थेच्या वतीने सोलापूर येथे श्री दुर्गामाता दौडीत ध्वजपूजन !

ध्वजाचे पूजन करतांना सौ. सुनंदा म्हेत्रे, सौ. सुनीता न्यामणे आणि श्री. विनोद रसाळ, श्री. महादेव लटके

सोलापूर – विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सोलापूर यांच्या वतीने श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून चालू झालेली श्री दुर्गामाता दौड बाळी वेस येथे पोचताच, सनातन संस्थेच्या सौ. सुनीता न्यामणे आणि सौ. सुनंदा म्हेत्रे यांनी ध्वजाचे औक्षण करून विधीवत् पूजन केले. घटस्थापनेपासून चालू असलेली ही दुर्गामाता दौड हा हिंदु संस्कृतीचा जागर करणारा उपक्रम ठरला.

Leave a Comment