देशप्रेमी शिवराय !

shivaji_maharaj

काही शतकांपूर्वी आलेल्या इस्लामी लाटेला हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांमुळे वेसण घातली होती आणि त्यानंतर थोरले बाजीराव प्रभूतींनी ती परतवून लावली होती. मातृभूमीचे रक्षण करणे, हे हिंदूंचे कर्तव्यच आहे. सध्याचे हिंदू मात्र त्यावर काही करतांना दिसत नाहीत आणि पुन्हा छत्रपती यावेत अन् आपले रक्षण करावे, असे त्यांना वाटते काय ?

नुकतेच छत्रपती शिवरायांचे एक पत्र सापडले आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी ते औरंगजेबाच्या सरदारास काय लिहिताहेत, ते वाचा…

शिवरायांचा आठवावा साक्षेप
माझ्या मायभूमीचे रक्षण करणे माझे कर्तव्य !

छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या अधिकार्‍यांना पाठविलेले एक फार्सी पत्र दोन जुन्या पत्रसंग्रहांमध्ये समाविष्ट आहे. त्यावर तारीख नसली, तरी ते शाहिस्तेखानाच्या छाप्यानंतर लिहिले आहे, हे त्यातील उल्लेखांवरून स्पष्ट समजते. पत्राचा अनुवाद पुढीलप्रमाणे आहे.

गेली तीन वर्षे (औरंगजेबाचे) तालेवार उमराव या प्रदेशात येत आहेत. माझा मुलुख आणि माझे किल्ले काबीज करण्याचा हुकूम बादशाह त्यांना देतो. लवकरच काबीज करतो, असे उत्तर ते देतात. या दुर्गम मुलखात अफाट कल्पनाशक्तीचा घोडा दौडवणेही शक्य नाही. मग तो काबीज करणे तर दूरच. तरीही सत्य दडवून खोट्या गोष्टी लिहिण्यास त्यांना लाज वाटत नाही.

(बादशहाने पूर्वी काबीज केलेले) कल्याणी आणि बिदरचे किल्ले उघड्या मैदानात होते. माझी मायभूमी तशी नाही. तिच्यात २०० कोस लांब आणि ४० कोस रूंद अशा उत्तुंग डोंगरांच्या रांगा आहेत आणि ओलांडण्यास अवघड अशा नद्या आहेत. तिथे ६० किल्ले बांधले आहेत, ज्यांपैकी काही समुद्रकिनार्‍यावर आहेत.

आदिलशहाचा उमराव अफझलखान मोठे सैन्य घेऊन जावळीस आला आणि मृत्यूमुखी पडला. जे घडले, ते तुम्ही प्रामाणिकपणे बादशहाला का कळवत नाही ? गगनचुंबी पर्वतांच्या आणि पाताळापर्यंत जाणार्‍या दर्‍यांच्या या मुलखात मोहीम करण्यास अमीरूल उमरा (शाहिस्तेखान) याची नेमणूक झाली. त्याने तीन वर्षे खपून बादशहाला कळवले की, माझा (म्हणजे शिवाजी महाराजांचा) पूर्ण पराभव झाला आहे आणि थोड्याच दिवसांत माझा मुलुख काबीज होईल. शेवटी या खोटेपणाचे फळ तो कसे पावला आणि नामुष्की होऊन परत गेला ते जगजाहीर आहे.

माझ्या मायभूमीचे रक्षण करणे, हे माझे कर्तव्य आहे. आपली इज्जत राखण्यासाठी या उमरावांनी बादशहाला खोट्या गोष्टी लिहून कळवल्या असल्या, तरी ईश्‍वराच्या कृपेने, या विरक्त मनुष्याच्या प्रिय देशावर आक्रमण करणार्‍या कोणाच्याही इच्छेची कळी कधी उमललेली नाही.

ज्या रक्ताच्या नदीतून कोणी मनुष्य आपली होडी पलीकडे नेऊ शकला नाही त्या या नदीपासून शहाण्या मनुष्याने दूर रहावे.

या पत्रात महाराजांनी स्वत:चा उल्लेख विरक्त असा केला आहे. समर्थ रामदासस्वामींनी या जाणत्या राजाला लावलेले श्रीमंत योगी हे विशेषण किती सार्थ आहे.

– डॉ. अनुराधा कुलकर्णी

 

जनता जनार्दन राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा बाणेदारपणा !

आजही काही गोष्टींचे तुम्हाला आश्‍चर्य वाटेल. जगात खोबर्‍याचा व्यापार होत असे. त्यात राजापूरच्या खोबर्‍याला विशेष महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारपेठेतील वस्तूंची सूची पाहिल्यास त्यामध्ये खोबर्‍याच्या प्रकाराच्या यादीत राजापुरी खोबरे असे स्वतंत्र नाव नमूद केलेले असते. म्हणजेच राजापुरी खोबर्‍याला विशेष गुण असल्याविना आज इतकी वर्षे या खोबर्‍याला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र दर्जा मिळाला नाही. ब्रिटीश व्यापार्‍यांची राजापूरला वखार होती. त्यांनी तेथील व्यापार्‍यांना हातीशी धरून पैसे चारले आणि आपल्या शेतकरी बांधवांकडून ते अत्यंत पडेल भावाने हे खोबरे विकत घेतले. तेव्हा दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती. शेतकर्‍यांकडे त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी माल दुसर्‍या पेठेत पाठवण्याइतपत त्यांची आर्थिक कुवत नव्हती; म्हणून ते हतबल होते. त्यांना प्रचंड हानी सहन करावी लागली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहून याविषयी कळवले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्वरित इंग्रजांकडून जो माल महाराजांच्या मुलुखात येत होता, त्यावर २०० टक्के दंडात्मक आयात शुल्क बसवले, म्हणजे इंग्रजांच्या मालाची किंमत वाढून तो विकला जाऊ नये. या प्रकारामुळे इंग्रजांची तारांबळ उडाली. त्यांच्या मालाची विक्री अल्प झाली. त्यामुळे इंग्रजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहिले की, आमच्यावर दया करा, सीमाशुल्क अल्प करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्वरित राजपत्र पाठवले, मी शुल्क उठवण्यास एकाच अटीवर सिद्ध आहे की, तुम्ही आमच्या राजापूरच्या शेतकर्‍यांची जी हानी केली, ती भरपाईसह योग्य प्रकारे भरून द्या. ते भरून दिल्याची पोचपावती शेतकर्‍यांकडून आल्यावर मी दंडात्मक शुल्क उठवीन, अन्यथा नाही. शेवट ब्रिटिशांना माघार घ्यावी लागली. दुसर्‍या दिवसापासून त्यांनी त्या व्यापार्‍यांना गाठून त्यांच्याद्वारे सर्व शेतकर्‍यांना त्यांचे जितके रास्त पैसे होते, त्यासह हानीभरपाईची रक्कम देण्यास प्रारंभ केला. त्यानंतर शेतकर्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांची भरपाई मिळाली असून ते समाधानी असल्याचे कळवले. त्यानंतर महाराजांनी सीमाशुल्क उठवले.

 

छत्रपतींची सहिष्णुता !

शिवछत्रपतींच्या काळात आजचे पुरोगामी, डावे, समाजवादी आणि धर्मनिरपेक्षतावाले नव्हते, हे बरेच झाले ! अन्यथा तेव्हाही असहिष्णूतेचा कांगावा झाला असता !

छ. शिवाजी महाराजांनी जिचे बिजारोपण केले, ती काफरशाहीसारखी वाढतच गेली. तिने देहलीच्या मोगलाला खेळण्यातला राजा केला. ही काफरशाही अटकेचे पाणी पिऊन तृप्त आणि पुष्ट झाली. या काफरशाहीचे मूळ संस्थापक छ. शिवाजी महाराजांनी काफरसारखे अपशब्द वापरून मुसलमानांची हेटाळणी आणि छळवणूक कधी केली नाही; कारण ते सहिष्णू होते. त्यांची परंपरा उदार आणि सहिष्णू होती; परंतु येथे हेही ध्यानात ठेवले पाहिजे की, आत्मघात आणि मूर्खता यांच्या परमसीमा गाठणारी त्यांची सहिष्णुता नव्हती.

इतिहासाशी प्रतारणा नको !

कुराण या ग्रंथाचा त्यांनी मान राखला. परधर्मीय कुलस्त्रीचा मर्यादाभंग त्यांच्या हातून कधी घडला नाही; परंतु प्रसंगच आला, तेव्हा कल्याण-भिवंडीचे यवनी प्रार्थनामंदिर (मशिद) पाडून टाकावयास ते अगदी कचरले नाहीत. तेथील मुल्लांना त्यांनी बंदीगृह दाखवले. छत्रपतींसारख्या सहिष्णू आणि उदार राजालाही ज्याअर्थी हे करावे लागले, त्याअर्थी त्याला तशीच कारणेही असली पाहिजेत. छ. शिवाजीराजांनी जे काही केले, ते देशाच्या आणि देशबांधवांच्या हिताचेच असले पाहिजे, एवढा विश्‍वास आम्ही त्यांच्या विषयांत बाळगावा, असे त्यांचे कर्तृत्व अन् चारित्र्य होते; परंतु छत्रपतींसारख्या न्यायी आणि दूरदर्शी माणसाने जे अगदी निःसंकोच निडरपणे केले, ते सांगतांना आमच्या निधर्मीवाद्यांना संकोच वाटतो. कल्याण-भिवंडीच्या यवनी प्रार्थनामंदिराचा हा इतिहास दडवून ठेवण्याचा ते (निधर्मीवादी) आटोकाट प्रयत्न करतात; पण समकालीन परमानंदाने हा इतिहास आपल्या शिवभारतात लिहून ठेवला आहे. तो दडवण्याचे आम्हाला काही कारण नाही. तो दडवण्यात छत्रपतींचा अपमान आहे. सत्याशी प्रतारणा आहे. काल म्हणजे काही आज नव्हे; पण काल जो काही इतिहास घडला त्यापासून शहाण्या माणसांना धडा घेता येतो. असा धडा घेता यावा; म्हणून तर इतिहास लिहिला आणि वाचला जातो. तेव्हा या इतिहासाशी प्रतारणा करण्याचे आम्हाला कारण काय ? इतिहासाशी प्रतारणा म्हणजे अंती स्वतःशी आणि स्वहिताशी प्रतारणा ! महाराजांनी काही एका परिस्थितीत कल्याण-भिवंडीच्या यवनी प्रार्थनास्थळे भुईसपाट केली असतील, तर ते सत्य आम्ही मानलेच पाहिजे. त्यामुळे त्या थोर छत्रपतींच्या सहिष्णुतेला यत्किंचितही बाधा येत नाही. सहिष्णू तर ते होतेच ! छत्रपतींची ही सहिष्णुता शहाणी आणि कणखर होती; म्हणूनच ती हिंदवी स्वराज्याच्या साधनेत उठून दिसली अन् उपयुक्त ठरली !

– भाषाप्रभु पु.भा. भावे (२४.६.२००७)

 

छत्रपती शिवरायांचे राज्य निधर्मी नव्हे, तर धर्मराज्यच होते !

छ. शिवाजी महाराजांनी हिंदवी राज्याची स्थापना केली. हिंदवी राज्य म्हणजे हिंदूंचे राज्य. भावी पिढ्यांचा उगाच अपसमज होऊ नये, म्हणून ही हिंदूंच्या अधिराज्याची कल्पना छत्रपतींनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितली आहे. बखरकार आणि इतिहासकार यांनी तिचा अनेकदा पुनरुच्चार केला आहे; तरी शेवटी व्हायचे ते झालेच ! (मंदबुद्धी किंवा अप्रामाणिक माणसांशी गाठ पडली की, असेच होत असते.) शिवराज्याचे वर्णन अनेक आधुनिक पंडित निधर्मी राज्य म्हणून करू लागले. ते राज्य सगळ्यांचे होते, त्या राज्यात सर्व धर्मांना समान स्थान होते, असे ते अट्टाहासाने ओरडू लागले. आजच्या राज्यकर्त्यांच्या आणि स्वतःच्या मतांचा ते शिवराज्यावर आरोप करू लागले. महाराजांचे राज्य हे हिंदवी होते, हिंदूंचे होते, हे मान्य करतांना त्यांना संकोच वाटू लागला. तो काळ आणि त्या काळातील बलवत्तर धार्मिक प्रेरणांचा विसर पडल्याचे ढोंग ही मंडळी करू लागली. छ. शिवाजी महाराजांचे राज्य हे हिंदूंचे राज्य असण्यात आणि तसे म्हणण्यात जणूकाही छत्रपतींना अन् त्यांच्या सर्व सहकारी हिंदूंना फारच कमीपणा येतो, अशी या दीडशहाण्यांची कल्पना ! – भाषाप्रभु पु.भा. भावे

 

मराठी भाषेला सिंहासनाधिष्ठित
करून स्वराज्याचा संपूर्ण राज्यकारभार
मराठीतूनच चालवणारे छत्रपती शिवाजी महाराज !

१. पेशवा, सुरनीस, सरनौबत, मुजुमदार अशा असंख्य परकीय शब्दांऐवजी पंतप्रधान, सचिव, सेनापती, अमात्य असे आपले शब्द रूढ होत गेले.

२. मातृभाषा हा राष्ट्राचा प्राण आहे. भाषा म्हणजे राष्ट्राची संजीवनीच !

३. मराठीत प्रचलित झालेले परकीय शब्द : संत ज्ञानेश्‍वर महाराज समाधीस्त झाले आणि यादव रामराज्य बुडाले, तेव्हापासून मराठी भाषेवर यवनांचे आक्रमण होऊ लागले. इतकेच नव्हे, तर आम्हाला या परकीय नावारूपांचा अभिमान वाटू लागला.

अ. पुढे पुढे आमची नावे आणि आडनावेही पुसली जाऊ लागली. सुलतानराव, रुस्तमराव, हैबतराव, बाजीराव, शहाजी, पिराजी अशी नावे आली.

आ. वैदिक शास्त्री म्हणवून घेणार्‍यांनीही सुलतानभट, होशिंगभट अशी नावे स्वीकारली.

४. शिवसन्निध काळातील मराठी पत्र : शिवसन्निध काळातील शाही हुकुमनामे आणि अन्य पत्रव्यवहार वाचले, तर बुद्धी अवाक् होते. उदाहरणार्थ हे मराठी पत्र पहा. अजरख्तखाने शहाजीराजे दाम दौलतहु बजाने कारकुनानी आणि हवालदारांनी हाल अन् इस्तकबाल ..इत्यादी इत्यादी. या पत्रातील काही शब्दच मराठी आहेत. पत्राचे व्याकरण, त्यातील मराठी प्रत्यय, कर्ता, कर्म, क्रियापद सुदैवाने अर्थ समजण्याइतपतच वापरले आहेत; म्हणून या पत्राला मराठी म्हणायचे का ?

५. शिवाजी महाराज स्वतः छत्रपती झाल्यावर संपूर्ण मराठी संस्कृतीलाच छत्र आणि सिंहासन लाभणे : शिवाजी महाराज स्वतः छत्रपती झाले, सिंहासनाधीश्‍वर झाले, म्हणजे संपूर्ण मराठी संस्कृतीलाच छत्र आणि सिंहासन लाभले. तेव्हा स्वराज्याचा संपूर्ण राज्यकारभार मराठीतूनच चालत होता. त्यामुळे दैनंदिन जीवनातूनच मराठी भाषा बहरत आणि फुलत गेली.

– शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (कालनिर्णय दिनदर्शिका, डिसेंबर २००९)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात