क्रूर महंमद बिन कासीमला मारणार्‍या शूर सूर्यादेवी आणि परिमलादेवी !

हिंदुस्थानवरील मुसलमान आक्रमक आणि
त्यांच्या विरोधात उभे ठाकलेले हिंदू राजे अन् राजकन्या

१. मोगल काळात हिंदूंवर झोलेले नृशंस अत्याचार !

सहस्रो वर्षे ज्या भूमीकडे वाकड्या दृष्टीने कुणी पाहू शकले नव्हते, त्या भूमीवर वर्ष ७११ मध्ये सिंध प्रांतात जे आक्रमण झाले, ते महाभयंकर होते. त्या वेळी दाहीर राजा सिंध देशाचा अधिपती होता. राजा मारला गेला. राणीने जोहार केला. राजवाडा उद्ध्वस्त झाला. येणारे लोक आमच्यापेक्षा शूर होते असे नाही. त्यांची शस्त्रे आमच्यापेक्षा श्रेष्ठ असतीलही कदाचित; पण त्यांनी जी दहशत निर्माण केली, तिला तोड नव्हती. सहस्रावधी सशस्त्र लोक गावागावांतून शिरले. पूर्वी युद्धे रणांगणांवर होते. सशस्त्र लोक सशस्त्रांशी लढत. या आक्रमक, क्रूर, नृशंस लोकांनी स्त्रिया, मुले, वृद्ध यांनाही रहात्या घरात सपासफ कापून काढले. देवळे तोडली. मूर्ती फोडल्या. वेदशाळा उद्ध्वस्त केल्या. तरुण स्त्रियांवर बलात्कार केले. महाभीषण अत्याचार केले. माणूस इतका क्रूर असू शकतो, हे भारतीय संस्कृतीला ठाऊक नव्हते. या राक्षसी आक्रमणाने सारा समाज भयकंपित झाला. त्यामुळे आक्रमकांना सारे रान मोकळे मिळाले.

त्यातच बौद्ध मताच्या अहिंसा विचाराचा अतिरेक झाल्याने सैन्यसुद्धा युद्ध करण्यात कच खाऊ लागले. सिंध पराभूत झाले. रक्तपिपासू नरराक्षसांचा नंगानाच रक्तबंबाळ भूमीवर थयथयाट करत होता. भारताच्या पश्चिम क्षितिजावर अमंगल हिंदुद्वेषी यवनांचा अशा प्रकारे प्रवेश झाला. आमचे सद्गुणच आमचे दुर्गुण ठरले.

– प्रा. सु.ग. शेवडे

 

२. महंमद बिन कासीमला यमसदनाला पाठवून
राष्ट्राच्या 
अपमानाचा प्रतिशोध घेणार्‍या धन्य त्या दाहिरकन्या !

अखेर दाहीरचे हिंदु राज्य नष्ट झाले. त्याच्या दोन तरुण मुली सूर्यादेवी आणि परिमलादेवी यांना बगदाद येथे खलिफाकडे भेट म्हणून पाठवण्यात आले परस्त्रीला माता मानणारी संस्कृती कुठे आणि मुलींना आपल्या धर्मगुरूंकडे शय्यासमागमेसाठी पाठवणारी मानवजातीला कलंक आणणारी विकृती कुठे ? पण या दोघी मुली मोठ्या धाडसी होत्या. त्यांनी खलिफाचा विश्वास प्राप्त करून घेतला. मन जिंकून घेतले. पराधीन झालेल्या बिचार्‍या अशा त्या तरुणी स्वतःची शरीरे भ्रष्ट होण्यापासून वाचवू शकत नव्हत्या; परंतु त्यांनी काय केले पहा ! खलिफाच्या सहीशिक्क्यानिशी सिंधच्या महंमद बिन कासीमच्या सरदारांना पत्र पाठवले. त्या पत्रात महंमदला चामड्याच्या पोत्यात घालून ते पोते शिवून इकडे पाठवा, अशी आज्ञा दिली. खलिफाचीच आज्ञा ! त्या सरदारांनी आज्ञेबरहुकूम महंमदाला चामड्याच्या पोत्यात जिवंत गाडला. पोते शिवले आणि जहाजावरून बगदादला पाठवून दिले. १०-१२ दिवसांनी जहाज जेव्हा बगदादला पोहोचले, तेव्हा त्या महंमद बिन कासीमच्या प्रेतात अळ्या झाल्या होत्या. भयानक दुर्गंध सुटला होता.

 

३. अत्यंत स्वाभिमानाने खलिफाला उत्तर देणार्‍या
आणि 
राष्ट्रासाठी क्रूर अत्याचार सहन करणार्‍या भगिनी !

याला असा का पाठवला, याचा खलिफाने शोध घेतला. तेव्हा त्या शूर मुलींनी सांगितले, ‘‘आम्ही तुमच्या सहीने पत्र पाठवले होते. आमच्या देशात अनन्वित अत्याचार करणार्‍या या राक्षसाचा आम्ही प्रतिशोध घेतला आहे. हे आम्ही केले. आम्हाला त्याविषयी अभिमान वाटतो. आम्ही राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे. याचा काय होईल तो परिणाम भोगायला आम्ही सिद्ध आहोत.

संतापलेल्या खलिफाने त्यांचे केस घोड्यांच्या शेपटांना बांधले आणि त्या घोड्यांना चाबकाचे फटके मारून संपूर्ण बगदादभर पळवले. त्यांना घोड्यांच्या लाथा बसत होत्या. त्यांची शरीरे जमिनीवर सोलपटत होती. केस खेचले जात होते. त्यांची डोकी घोड्यांच्या गुडघ्यांनी बडवली जात होती. केवळ रक्तबंबाळ मुंडक्यांव्यतिरिक्त दोन्ही शरीरे झिजून-झिजून-तुटून-तुटून तुकड्या-तुकड्यांनी मार्गात विखरून पडली होती; पण राष्ट्राच्या अपमानाचा सूड घेतल्याच्या समाधानाने डोळ्यांत अश्रूही न आणता त्या युवतींनी हौतात्म्य स्वीकारले. राष्ट्रतेजाच्या अस्मितेचा सूर्यही तेव्हा पश्‍चिमेकडेच उगवला. (भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा सिंधच्या सीमेजवळ यांचे पुतळे उभारायला हवे होते.)

– प्रा. सु.ग. शेवडे (भारतीय संस्कृती, पृष्ठ क्र. ३७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात