विविध साधनामार्ग (योगमार्ग)

मनुष्याने ईश्वरप्राप्ती करण्याच्या प्रक्रियेला योग असे म्हणतात. या योग शब्दाची व्युत्पत्ती, कोणत्याही साधनामार्गाचे मर्म म्हणजे एक ईश्वरीतत्त्व कसे, योगमार्गांचे तौलानिक महत्त्व यांविषयीचे विवेचन या लेखात पाहू.

 

‘योग’ शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ

विविध योगमार्गांद्वारे वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती साध्य करता येते. संस्कृतमधील ‘युज्’ धातूपासून ‘योग’ शब्दाची व्युत्पत्ती झाली आहे. ‘युज्’ म्हणजे सांधणे किंवा जोडणे. जीव शिवाशी, म्हणजेच ईश्वराशी जोडला जाणे किंवा एकरूप होणे, म्हणजे योग. ईश्वरप्राप्ती करणे किंवा ईश्वराशी एकरूप होणे, हे आध्यात्मिक उन्नतीचे ध्येय आहे. भगवंताशी एकरूप होण्यासाठी भगवंताच्या गुणधर्मांशी एकरूप व्हावे लागते. ईश्वर दोषरहित, सर्वगुणसंपन्न आणि परिपूर्ण असल्यामुळे साधनेने त्याच्याशी एकरूप होतांना स्वभावदोष-निर्मूलन अन् गुणसंवर्धन करणे अपरिहार्य ठरते. अध्यात्माच्या मूलभूत सिद्धांनुसार ’व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’ आहेत. विश्वातील प्रत्येक व्यक्ती त्याला आवडेल त्या पद्धतीने आणि साधना करून ईश्वरप्राप्ती करू शकते.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘स्वभावदोष (षड्रिपू)-निर्मूलनाचे महत्त्व आणि गुणसंवर्धन प्रक्रिया’

 

प्रत्येक साधनामार्गानुसार (योगमार्गानुसार) परमात्म्याचे
संबोधन वेगळे असून कोणत्याही तत्त्वाची अनुभूती अंतिमतः एकच असणे

हिंदु धर्मातील अनेक तत्त्वांपैकी कोणत्याही तत्त्वाची आलेली अनुभूती अंतिमतः एकच असते. आत्मदर्शन, स्व-स्वरूपदर्शन, प्रकाशदर्शन, आनंददर्शन, चैतन्यदर्शन असे अनेक शब्द असले, तरी ते मूळ निर्गुण, निराकार आणि अव्यक्त अशा ईश्वराचे वर्णन आहे. साधनामार्गानुसार त्या परमात्म्याचे संबोधन वेगळे असते.’ – एक अज्ञात शक्ती (आधुनिक वैद्य चारुदत्त पिंगळे यांच्या माध्यमातून, २९.७.२००५, सकाळी ७.५५)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘साधना (सर्वसाधारण विवेचन आणि महत्त्व)

 

योगमार्गांचे तौलनिक महत्त्व : भावाला तळमळीची जोड
असल्यास साधकात ईश्वराचे गुण विकसित होण्यास साहाय्य होणे

`भावाला तळमळीची जोड असेल, तर साधकात ईश्वराचे अनेक गुण विकसित होण्यास साहाय्य होते. भावाचे इतके महत्त्व असल्यानेच भक्तीयोग हा कर्मयोग आणि ज्ञानयोग यांच्या तुलनेत श्रेष्ठ आहे. भावाला तळमळीची योग्य दिशा देण्यासाठी अन् साधकाला सूक्ष्मातून ईश्वराकडे जाण्यासाठी गुरूंची आवश्यकता असते. त्यामुळे गुरुकृपायोगाचे महत्त्व लक्षात येते.’

– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १९.३.२००६, सायंकाळी ७.२०)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ : ‘भावाचे प्रकार आणि जागृती’

 

विविध योगमार्गांतील अडथळे

कोणत्याही योगमार्गात नीतीमत्ता, सातत्य, चिकाटी, नियमितपणा, वक्तशीरपणा, तत्परता, एकनिष्ठता, प्रेमभाव, संयम, सहनशीलता, क्षमाशीलता, नम्रता, लीनता, आज्ञापालन करणे वगैरे गुण प्रत्येक साधकात असणे आवश्यक ठरते. यांपैकी काही गुण साधकांत अभावाने, तर काही अल्पांशाने आढळतात. गुणसंवर्धन योगसाधनेस पूरक ठरते.

संदर्भ : स्वभावदोष-निर्मूलन आणि गुणसंवर्धन : खंड १

 

कर्मयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग आणि गुरुकृपायोग

कर्मयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग आणि गुरुकृपायोग यांनुसार प्रगतीची गती आणि सूक्ष्मातून कळण्यातील वैशिष्ट्ये


टीप : गुरुकृपेविना कोणत्याही योगमार्गाने जास्तीतजास्त ६० टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंतच प्रगती होऊ शकते.

 

अनुष्ठानाची फलनिष्पत्ती न दिसण्याचे कारण आणि त्यावरील उपाय

नामजप, मंत्र, स्तोत्र, पोथीपठण इत्यादी ठराविक संख्येने, तसेच कर्मकांडातील अनुष्ठाने सांगितल्याप्रमाणे केली, तर काय लाभ होईल, ते सांगितलेले असते. तसा लाभ झालेला क्वचितच दिसून येतो. असे झाले की, ते करणार्‍यांचा विश्‍वास नष्ट होतो. त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, सांगितलेले सर्वसाधारणपणे सांगितले आहे. प्रत्येकाचे प्रारब्ध, भाव, तळमळ इत्यादी कमी-जास्त असल्यामुळे सांगितलेली संख्या झाल्यावर नामजप इत्यादींचे अनुष्ठान तसेच चालू ठेवले, तर कधी ना कधी फळ मिळतेच; कारण त्यामध्ये ऋषींचा किंवा संतांचा संकल्प असतो. – प.पू. डॉ. आठवले

Leave a Comment