हात-पाय धुणे आणि चूळ भरणे यांच्या संदर्भातील आचार

अनुक्रमणिका

१. मलमूत्रविसर्जनानंतर हात-पाय धुण्याची पद्धत

२. दुर्गंध जाईपर्यंत हात मातीने घासून धुणे

३. पाय धुणे

४. चूळ भरणे

५. हातातील दैवीगुणसंपन्न पाणी डोळ्यांना लावल्याने मस्तिष्कपोकळी शुद्ध होणे

६. आचमन करणे

७. विष्णुस्मरण करणे


मलमूत्रविसर्जनानंतर आपण हात-पाय धुऊन चूळ भरतो. हिंदु धर्मानुसार या कृती करण्याची नेमकी पद्धत आणि त्यामागील वैज्ञानिक कारण काय आहे, हे या लेखात आपण पहाणार आहोत. हिंदु धर्माने सांगितलेल्या अशा आचारांतून केवळ बाह्यशुद्धीच नाही, तर अंर्तशुद्धीही होते, हे वाचकाच्या लक्षात येईल.

१. मलमूत्रविसर्जनानंतर हात-पाय धुण्याची पद्धत

लघवी आणि शौचविधी झाल्यानंतर दुर्गंध जाईपर्यंत राखाडी किंवा माती यांच्या साहाय्याने हात घासून धुवावेत. (असे शक्य नसल्यास हात साबणाने धुवावेत.) त्यानंतर पाय धुवावेत आणि चूळ भरावी. नंतर ओंजळीतून पाणी घेऊन मुखावर फिरवावे, तसेच डोळे धुवावेत. त्यानंतर आचमन आणि विष्णुस्मरण करावे.

शास्त्र

‘हात आणि पाय धुणे या दोन्ही प्रक्रिया बाह्य शुद्धीशी संबंधित आहेत, तर शरिराची अंतर्गत शुद्धी होण्यासाठी त्यानंतर चूळ भरणे, आचमन करणे आणि विष्णुस्मरण करणे आवश्यक असते.

२. दुर्गंध जाईपर्यंत हात मातीने घासून धुणे

मातीमध्ये पृथ्वी आणि आप या तत्त्वांशी संबंधित गंधदर्शक भूमीलहरी सुप्तावस्थेत असतात. लघवी आणि शौच धारणा ही देहातील पृथ्वी आणि आप या तत्त्वांशी संबंधित टाकाऊ गंधप्रक्रियेतूनच उत्पन्न झालेली असल्याने या टाकाऊ गंधलहरींचे उच्चाटन करण्यासाठी या प्रक्रियेत अशुद्ध झालेला हात मातीने घासून धुतात. हाताला होणार्‍या मातीच्या मर्दनात्मक स्पर्शामुळे टाकाऊ गंधदर्शक लहरींचे मातीतील भूमीतत्त्वाशी संबंधित गंधलहरींनी उच्चाटन होते. त्यामुळे टाकाऊ गंधदर्शक लहरींचा शरिराला होणारा संपर्क उणावण्यास साहाय्य होते.

२ अ. दुर्गंध नष्ट करण्यासाठी पृथ्वी किंवा आप तत्त्वाचे प्राबल्य जास्त असलेले घटक वापरण्यामागील शास्त्र

संकलक

पृथ्वीतत्त्वाशी संबंधित टाकाऊ गंधाचे उच्चाटन करण्यासाठी माती, म्हणजे पृथ्वीतत्त्व वापरण्यापेक्षा पाणी, म्हणजे आपतत्त्व परिणामकारक का होत नाही ?

एक विद्वान

पाण्याने हात धुतल्यानेही पृथ्वीतत्त्वाशी संबंधित टाकाऊ गंधाचे उच्चाटन होऊ शकते; परंतु टाकाऊ गंधाचा स्थूल स्तरावरील त्वचेवर घनीभूत झालेला जडत्वदर्शक दुर्गंधीयुक्त परिणाम नष्ट करण्यासाठी त्या ठिकाणी मातीतील स्थूल गंधाचा वापर करून बाह्यतःसुद्धा मातीच्या गंधाने मन प्रसन्न करण्याची प्रक्रिया मानसिक स्तरावर टिकवण्याची उपाययोजना या प्रक्रियेतून केलेली आढळते. मातीच्या त्वचेवरील मर्दनाने त्वचेत घनीभूत झालेला जडत्वदायी टाकाऊ गंधयुक्त परिणाम नष्ट होऊन त्वचेतील पोकळ्या मृत्तिकागंधाने भरल्या जातात. त्यामुळे जिवाला मनाच्या स्तरावर वाटणारी दुर्गंधाची घृणाही नष्ट होण्यास साहाय्य होते.

स्थूल जडत्वदर्शक दुर्गंध नष्ट करण्यासाठी शक्यतो पृथ्वीतत्त्वाचे प्राबल्य जास्त असलेले घटक वापरले जातात, तर टाकाऊ वायूंच्या कार्यातून निर्माण झालेला सूक्ष्म-दुर्गंधदर्शक परिणाम नष्ट करण्यासाठी पृथ्वीतत्त्वाच्या पलीकडे जाऊन आपतत्त्वाचे साहाय्य घेतात.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १२.१२.२००७, दुपारी २.५५)

३. पाय धुणे

‘पाय धुतल्याने शौच आणि लघवी यांसारख्या कृती करतांना पायाच्या संपर्कात आलेल्या रज-तमात्मक लहरींचे पाण्यात विसर्जन होऊन देह शुद्ध होण्यास साहाय्य होते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ११.१२.२००७, दुपारी २.३४)

३ अ. पश्चिमेला तोंड करून पाय धुवावेत.

प्राड्.मुखोऽन्नानि भुञ्जीत्तोच्चरेद्दक्षिणामुखः । उदड्.मुखो मूत्रं कुर्यात्प्रत्यक्पादावनेजनमिति ।।

– आपस्तम्बधर्मसूत्र, प्रश्न १, पटल ११, काण्डिका ३१, सूत्र १

अर्थ : पूर्वेला तोंड करून अन्न ग्रहण करावे; दक्षिणेला तोंड करून मलाचा आणि उत्तरेला तोंड करून मुत्राचा त्याग करावा आणि पश्चिमेला तोंड करून पाय धुवावेत.

३ अ १. पश्चिमेला तोंड करून पाय धुण्यामागील शास्त्र

‘धर्माचाराप्रमाणे त्या त्या दिशेला त्या त्या वायूमंडलात ती ती कृती केल्याने वायूमंडलाचे स्वास्थ्य न बिघडता ब्रह्मांडातील त्या त्या शक्तीरूपी गतीलहरींमध्ये योग्य संतुलन राखले जाते. पश्चिम दिशा ही कर्माला, म्हणजेच विचारधारणेतील रजोगुणाच्या क्रियेला आवाहनीत (आमंत्रित करणारी) करणारी असल्याने या ठिकाणी पाय धुऊन शुद्धीकरण करून घेतल्याने पुढील क्रियेच्या अनुषंगाने जिवाच्या मनात त्या त्या विचारांच्या गतीचे पूरक चक्र निर्माण होऊन भविष्यकालीन कृतीविषयक कर्मरूपी सूक्ष्म विचारधारणेला गती मिळण्यास साहाय्य होते.

त्या त्या दिशेला तोंड करून त्या त्या लहरींच्या स्पर्शाच्या स्तरावर ते ते कर्म केल्याने पापाचे मार्जन आणि पुण्याचे प्राप्तन होण्यास साहाय्य होते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २.६.२००७, दुपारी १.५९)

४. चूळ भरणे

४ अ. चूळ भरल्याने रात्रभर देहातून उत्सर्जित होणारा
तमोगुणी वायूंचा तोंडात घनीभूत झालेला प्रवाह उत्सर्जित होणे

‘हात-पाय धुऊन झाल्यानंतर लगेचच वाकून उजव्या हातातून तोेंडात पाणी घेऊन तीनदा चूळ भरून बाहेर थुंकावी. ‘कराग्रे वसते लक्ष्मी: …’ हा श्लोक म्हटल्याने ओंजळीत आलेले देवत्व हाताच्या ओंजळीत घेतलेल्या पाण्यात संक्रमित होते आणि पाणी सर्वसमावेशक असल्याने या देवत्वरूपी लहरी ते लगेचच ग्रहण करते. हेच देवत्वरूपी दैवीगुणांनी संपन्न पाणी चूळ भरण्यासाठी तोंडात घ्यावे. रात्रभर तमोगुणी वायू देहात उत्सर्जित झालेले असतात; त्यामुळे ते घनीभूत होऊन तोंडात त्यांचा प्रवाह तयार झालेला असतो. हा प्रवाह पाण्याच्या प्रवाहासह चूळ थुंकण्याच्या क्रियेतून बाहेर उत्सर्जित केला जातो.

४ आ. वाकून चूळ भरल्याने तोंडाची आणि देहाची पोकळी स्वच्छ होऊन चैतन्यमय होणे

वाकून चूळ भरल्याने देहाच्या पोकळीतील ऊर्ध्व दिशेने वहाणारे सूक्ष्म-वायू कार्यरत झाल्याने हे वायूही देहाच्या पोकळीत घनीभूत झालेल्या इतर टाकाऊ वायूंना ऊर्ध्वगामी पद्धतीने बाहेर ढकलण्यास साहाय्य करतात. यामुळे तोंडाची आणि देहाची पोकळी स्वच्छ होऊन चैतन्यमय बनण्यास आरंभ होतो.

५. हातातील दैवीगुणसंपन्न पाणी डोळ्यांना लावल्याने मस्तिष्कपोकळी शुद्ध होणे

ओंजळीतील दैवीगुणसंपन्न पाणी डोळ्यांना लावल्याने ते डोळ्यांतील खोबण्यांना चैतन्य प्रदान करून आज्ञाचक्राला जागृती देते. यामुळे मस्तिष्कपोकळी शुद्ध होण्यास आरंभ होतो. आज्ञाचक्राला जागृती येणे, हे क्रियेच्या स्तरावर देहाला जागृती देण्याचेच प्रतीक आहे. यामुळे दिवसभर हातून घडणारे साधन योग्य पद्धतीने आणि आचारासहित घडते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)

६. आचमन करणे

‘आचमन करण्यातून मंत्रासहित शुद्धोदक प्राशन केल्यामुळे देहातील अंतर्गत पोकळ्यांतील रज-तमात्मक लहरींचे विघटन होते आणि देहाची अंतर्गत शुद्धी होते.

७. विष्णुस्मरण करणे

भावपूर्णरीत्या विष्णुस्मरण केल्यामुळे देहाभोवती संरक्षककवच बनण्यास साहाय्य झाल्याने जीव पुढचे कर्म करण्यास शुद्धतेच्या स्तरावर सिद्ध बनतो.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ११.१२.२००७, दुपारी २.३४)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दिनचर्येशी संबंधित आचार आणि त्यांमागील शास्त्र’

Leave a Comment