हिंदु राजे आणि त्यांचा गौरवशाली इतिहास

रघुवंशाचा श्रेष्ठतम सम्राट दिलीप, धर्मशास्त्राच्या आधारे सर्वत्र उत्तम व्यवस्था करणारा राजा विक्रमादित्य, मूर्तीभंजक, क्रूरकर्मा महंमद घोरीने डोळे फोडल्यानंतरही खचून न जाता सेवक चंदारामच्या साहाय्याने आणि धनुर्विद्येच्या कौशल्याने घोरीचा शिरच्छेद करणारा पृथ्वीराज चौहान, शंकराचार्य विद्यारण्यस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली विजनगरच्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवणारे हरिहर आणि बुक्कराय, अकबराच्या सैन्याला जेरीस आणणारा पराक्रमी महाराणा प्रताप आणि पाच पातशाह्या मोडून काढून हिंदवी स्वराज्याचे तोरण उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज यांसारखे पराक्रमी अन् धर्मवीर राजे हिंदु धर्मात होऊन गेले. या राजांच्या गौरवशाली इतिहासावर थोडक्यात टाकलेला प्रकाश….

 

सम्राट दिलीप

रघुवंशाचा श्रेष्ठतम सम्राट दिलीप, गायीकरिता तारुण्याने मुसमुसलेल्या स्वशरिराची आहुती द्यायला तत्पर असतो ! सागरापर्यंतच्या सर्व भूमीचा एकमात्र स्वामी, सार्वभौम, हाती घेतलेले कार्य तडीला नेणारा, स्वर्गापर्यंत रथातून यात्रा करणारा, देवराज इंद्राचा सहकारी, क्षत्रियाला योग्य असे विधीनुसार अग्नीहोत्र करणारा, याचकांचे मनोरथ आदरपूर्वक पुरवणारा, अपराध्याला योग्य शासन करणारा, वेळेवर निजणारा, वेळेवर उठणारा, देण्याकरिता-त्यागाकरिताच धन संपादन करणारा, मुखातून असत्य बाहेर पडू नये; म्हणून अत्यंत मोजकेच बोलणारा, विजयेच्छू, संततीकरिताच विवाह करणारा, उत्तरायुष्यात मुनीसारखे वानप्रस्थी जीवन जगणारा आणि अखेरीला योगाभ्यासाने शरिराची खोळ बाजूला सारणारा असा हा भारताचा सार्वभौम सम्राट दिलीप ! – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, २६.१.२००६, वर्ष पहिले, अंक ८)

 

राजा विक्रमादित्य (६ वे शतक)

Vikramaditya

उज्जैन येथे सहाव्या शतकात विक्रमादित्य राजा होऊन गेला. त्याच्या राज्यात धर्मशास्त्राच्या आधारे सर्वत्र उत्तम व्यवस्था होती. आदर्श राजसत्ता चालवण्यासाठी त्याच्या दरबारी ९ प्रमुख रत्ने होती.

राजसभेतील ९ रत्ने

१. कालीदास : शाकुंतल या महान ग्रंथाचा रचयिता, महाकवी, नाटककार आणि भारतातील प्रमुख संस्कृत भाषापंडित

२. अमरनाथ : संस्कृत अमरकोषाचा निर्माता

३. क्षपणक : ज्योतिषशास्त्रात ख्याती अर्जित केलेला कृष्णज्योतिषी

४. धन्वंतरी : एका रोगावर अनेक औषधी आणि उत्तम प्रकारची रोगचिकित्सा यांत प्रवीण अन् वैद्यकशास्त्रात निपुण असा वैद्य

५. वररुची : उत्कृष्ट व्याकरणकार आणि भाषाशास्त्रज्ञ

६. वराहमिहीर : जगन्मान्य बृहतसंहिता या ग्रंथाचा लेखक आणि होरा अन् सिद्धांत यांत प्रवीण असा ज्योतिषशास्त्र-तज्ञ

७. घटखरपर : शिल्पकला आणि वास्तूशास्त्र यांचा तज्ञ

८. शंकू : भू-मापनशास्त्र प्रवीण (भू-मापनात आजही हे नाव प्रसिद्ध आहे.)

९. वेतालभद्र : मंत्रशास्त्र, जारण, मारण व उच्चाटण यांत प्रवीण

परकीय आक्रमणे नसतांना भारतीय राजसत्ता सर्वार्थाने परिपूर्ण होती आणि देशात सर्वत्र शांतता आणि सुबत्ता नांदत होती, याचे हे उदाहरण आहे.

 

महाराणा प्रताप

Rana_Pratap

ख्रिस्ताब्द १५६८ मध्ये अकबर बादशहाने चितोडवर स्वारी करून राजपूत स्त्री-पुरुषांची मोठी कत्तल केली. चितोड जिंकून तो देहलीला परत गेला. त्या वेळी चितोडने प्रचंड अग्नीदिव्य केले. चितोडमधील सर्व राजपूत स्त्रियांनी जोहार करून आत्मबलीदान केले. त्या वेळी मेवाडचा राजा उदेसिंग हा युद्धात मारला गेला. त्याचा मुलगा महाराणा प्रताप सूडाने पेटला. त्याने अकबराविरुद्ध मेवाडमध्ये धर्मयुद्ध पुकारले. ख्रिस्ताब्द १५७२ मध्ये मेवाड राज्याचा अधिपती म्हणून त्याने स्वतःवर राज्याभिषेक करून घेतला.

या कालावधीत अकबराने भारतातील मोठमोठ्या राजसत्ता जिंकून देहलीतील एकछत्री मोगल सत्ता बलवान केली. महाराणा प्रताप हा शिल्लक राहिलेला एकच बलवान शत्रू होता. त्याच्यापासून मोगल सत्तेला असलेला धोका लक्षात घेऊन त्याचा निःपात करून मोगली सत्ता निष्कंटक करण्याचे अकबराने ठरवले.

महाराणा प्रतापवर स्वारी करण्यासाठी अकबराने आपल्या दरबारातील प्रमुख सेनापती राजा मानसिंग याला एक लक्ष घोडेस्वार, नवीन बंदुका, बाण अशी शस्त्रास्त्रे आणि अगणित हत्ती, घोडे, रथ, पायदळ असे सैन्य देऊन पाठवले. या वेळी महाराणा प्रतापजवळ केवळ तीन सहस्र घोडदळाचे कडवे योद्धे होते. विचार करून महाराणा प्रतापने अरवली पर्वतातील हळदी घाट या दुर्गम जागेवर मोर्चेबांधणी केली. मानसिंगाजवळ प्रचंड सैन्य असल्यामुळे त्याने एकाच वेळी चहूबाजूंनी महाराणा प्रतापवर आक्रमण केले. या आक्रमणात महाराणा प्रताप आणि त्याचे सैन्य यांनी लढण्याची शर्थ केली. प्रचंड मोगल सैन्याला त्यांनी नामोहरम करून सोडले.

युद्धाच्या वेळी महाराणा प्रतापसारखा दिसणारा त्याचा विश्‍वासू सरदार बिंदाझाला सर्व युद्ध परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत होता. युद्धाच्या धुमश्‍चक्रीत एका विशिष्ट आयुधाद्वारे महाराणा प्रतापचा शिरच्छेद करण्याची शत्रूसैन्याची कारवाई बिंदाझालाच्या नजरेतून सुटली नाही. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अत्यंत चपळाईने त्याने युद्धधुंद होऊन लढणार्‍या महाराणाच्या मस्तकावरील राजमुकुट स्वतःच्या मस्तकी धारण केला आणि तो शत्रूसैन्यावर तुटून पडला. शत्रूसैन्याने महाराणा प्रताप समजून त्याला ठार मारले. अतिशय थोडे सैन्य आणि युद्धाचा एकंदरीत रागरंग पाहून महाराणा प्रतापने बलीदान स्वीकारण्याऐवजी माघार घेऊन पुन्हा स्वारी करण्याचा निश्‍चय करून आपल्या सैन्यानिशी तो अरवली पर्वतात शत्रूसैन्यादेखत निघून गेला.

या युद्धात महाराणा प्रतापने मोगल सैन्याला इतके जेरीस आणले होते की, मोगलांनी महाराणा प्रतापचा थोडासुद्धा प्रतिकार केला नाही. महाराणा प्रतापला पकडणे मानसिंगला शक्य झाले नाही. तो देहलीस परत गेला. या युद्धानंतर महाराणा प्रतापने पुन्हा सैन्य जमवून युद्धाची सिद्धता केली. नंतर त्याने अकबराशी तीन वेळा युद्ध केले. या तीनही युद्धांत अकबराला महाराणा प्रतापचा पराभव करता आला नाही किंवा त्याला पकडताही आले नाही. महाराणा असून जंगलात रहाण्याची परिस्थिती येऊनही धैर्याने शत्रूशी शेवटपर्यंत झुंज देणार्‍या या शूर महापुरुषाचा ख्रिस्ताब्द १५९७ मध्ये मोठ्या आजारात अंत झाला.

 

पृथ्वीराज चौहान

ख्रिस्ताब्द ११९३ मध्ये पानिपतजवळ महंमद घोरी आणि भारतातील शेवटचा सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्यात युद्ध झाले. या युद्धात महंमद घोरीने पृथ्वीराज चौहानचा पराभव केला. त्याला कैद करून कडेकोट बंदोबस्तात गझनीला नेले. तेथे त्याचे दोन्ही डोळे काढून त्याला तुरुंगात ठेवले.

पृथ्वीराज चौहानच्या पराभवामुळे भारतातील हिंदूपद-पादशाही संपुष्टात येऊन देहलीवर मुसलमानी सत्ता आली. हे अनेकांना रुचले नाही. त्यापैकीच चंदाराम हा एक होता. पृथ्वीराज चौहान याच्या राजसभेत (दरबारात) मुख्य भाट म्हणून सेवा करत असलेल्या चंदाराम याने सूड उगवायचे ठरवले. यासाठी तो फकिराचा वेश करून गझनीला गेला. गझनी येथे फकिराच्या वेशातील चंदारामने महंमद घोरीचा विश्‍वास संपादन केला. महंमद घोरी आणि चंदाराम हे दोघे पृथ्वीराज चौहान याला कैदखान्यात येऊन भेटले. या वेळी चंदारामने पृथ्वीराज चौहानचे धनुर्विद्येतील कौशल्य सर्वांसमोर दाखवण्यास सागितले. महंमद घोरीसमवेत आलेल्या चंदारामचा आवाज ओळखून पृथ्वीराज चौहानने धनुर्विद्येतील कौशल्य सर्वांना दाखवण्यास संमती दिली. चंदारामने प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळी दोह्याच्या माध्यमातून माहिती देऊन पृथ्वीराज चौहानला सतर्क केले आणि चंदारामाच्या सांगण्यानुसार वेध घेऊन महंमद घोरीचा शिरच्छेद केला.

अनेक मंदिरे तोडतांना, देवतांच्या मूर्ती फोडतांना, अनेक स्त्रियांची अब्रू लुटतांना, अनेक निरपराध जिवांचे बळी घेतांना महंमद घोरीला कोणी अडवू शकले नाही, ते एका सामान्य भाटाने, आपल्या तीक्ष्ण बुद्धीने लीलया करून दाखवले. देव, देश आणि धर्म यांच्यासाठी काही करावेसे वाटल्यास सामान्य माणूस काय करू शकतो, याचे हे एक बोलके उदाहरणच आहे.

 

हरिहर आणि बुक्कराय

Harihar_Bukka
शंकराचार्य विद्यारण्यस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली विजयनगरच्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवणारे हरिहर आणि बुक्कराय यांनी विजयनगरच्या वैभवशाली हिंदु साम्राज्याचा पाया रचला. (इ.स. १३३६ ते १३७६) हरिहर आणि बुक्कराय यांच्या सुसज्ज लष्करी सेनेने दक्षिण भारतात धुमाकूळ घालणार्‍या मुघल आक्रमकांना निस्तेज केले.

हरिहर यांच्या निधनानंतर सम्राट बुक्कराय यांनी मदुरेच्या सुलतानाशी केलेल्या घनघोर लढाईत सुलतान मारला गेला आणि दक्षिण भारत बुक्करायांच्या अधिपत्याखाली आला. सम्राट बुक्कराय यांनी वैदिक धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी देशभरातील विद्वानांना एकत्र करून वेदग्रंथांवर नवी भाष्ये लिहून घेतली आणि हिंदु धर्मात बळावलेल्या दुष्प्रवृत्तींना आळा घातला. (दैनिक सनातन प्रभात, १४.८.२००७)

 

छत्रपती शिवाजी महाराज

shivaji_maharaj

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णु राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्धच्या लढ्यासाठी महाराष्ट्रातील डोंगर-दर्‍यांमध्ये अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही यांच्याशी लढा दिला आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य बलाढ्य असले, तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त स्थानिक सरदार आणि किल्लेदार यांच्यावर होती. ते सरदार/किल्लेदार जनतेवर अन्याय-अत्याचार करत असत. शिवाजी महाराजांनी त्या अत्याचारांतून जनतेची सुटका केली आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले. छत्रपतींच्या व्यक्तीमत्त्वाचा आणि कारकीर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता काही गोष्टी समोर येतात. शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक आणि नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा असे उच्च कोटीचे गुण त्यांच्यात एकवटलेले दिसतात.

 

असामान्य पराक्रमातून सातत्याने
स्फूर्ती देणार्‍या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई !

jhansi-ki-rani-lakshmibai-escape-from-jhansi-with-son
ज्यांच्याकडून आदर्श घ्यावा असे बरेच पराक्रमी वीर हिंदुस्थानातील १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात चमकले. त्या सर्वांमध्ये असामान्य पराक्रम गाजवणार्‍या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई !

७ मार्च १८५४ या दिवशी इंग्रजांनी एक राजघोषणा प्रसिद्ध करून झाशीचे संस्थान खालसा केले. राणी लक्ष्मीबाई या अन्यायामुळे जळफळत असतांनाच इंग्रज अधिकारी मेजर एलिस लक्ष्मीबाई यांना भेटण्यासाठी आला. त्याने झाशी संस्थान संपुष्टात आणले गेल्याची राजघोषणा वाचून दाखवली. संतापलेल्या राणी लक्ष्मीबाई यांच्याकडे एलिसने परत जाण्याची अनुज्ञा मागताच चवताळलेल्या वाघिणीप्रमाणे त्या म्हणाल्या, मेरी झाशी नही दूँगी!, हे ऐकून एलिस निघून गेला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात