देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातून वीरश्रीयुक्त जयघोषात दुर्गामाता दौडीस प्रारंभ

Article also available in :

दुर्गामाता दौडीमध्‍ये सहभागी हिंदू

पनवेल, १६ ऑक्टोबर (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान यांच्‍या वतीने देवद गाव येथे १६ ऑक्टोबर या दिवशी श्री दुर्गामाता दौड पार पडली. या वेळी शंखनाद झाल्यावर धर्मध्वजाचे पूजन सनातनच्या आश्रमातील साधक श्री. शंकर नरुटे (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्के) यांनी केले, तसेच साधिकांनी औक्षण केले. श्रीफळ वाढवल्यानंतर शंखनाद करून दौड मार्गस्‍थ झाली.

देवद येथील सनातन आश्रम येथून दौडीस प्रारंभ होऊन गावात फिरून पुन्हा आश्रमात येऊन दौडीची सांगता झाली. दौडीमध्‍ये ‘पुण्‍यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !’, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो !’, ‘श्री दुर्गादेवीचा विजय असो’, असे वीरश्रीयुक्त जयघोष करण्‍यात आले. ठिकठिकाणी महिलांनी ध्वजाचे पूजन केले. स्‍थानिक श्री गावदेवी मंदिरात दौड आल्‍यावर सुवासिनींनी पूजन केले आणि मंदिरात दौडीत सहभागी झालेल्‍या हिंदुत्‍वनिष्ठांकडून आरती करण्‍यात आली. दौडीमध्‍ये श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्थानचे धारकरी, महिला, मुले, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि सनातन संस्‍थेचे साधक सहभागी झाले होते.

राष्ट्र-धर्माच्या कार्यासाठी संघटित व्हा ! – संजय पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पनवेल

प्रतिवर्षी सनातनच्या आश्रमातून दौड निघणे हे भाग्य आहे. राष्ट्रासाठी समर्पित होऊन सनातन संस्था कार्य करत आहे. सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्र-धर्म यांच्या साठीचे कार्य करायला हवे !


मिरज येथे सनातन संस्थेच्या वतीने श्री दुर्गामाता दौडीचे उत्साहात स्वागत !

हिंदवी स्वराज्याच्या पुनर्स्थापनेसाठी आई जगदंबेने हृदयात वास करावा ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

सांगली – आई जगदंबेच्या चरणी आजची ही नववी माळ घालतांना हिंदवी स्वराज्याच्या पुनर्स्थापनेसाठी आई जगदंबेने आम्हा प्रत्येकाच्या हृदयात वास करावा, हृदयात विराजमान व्हावे आणि भारतमातेचे पांग फेडण्यासाठी आम्हाला बळ द्यावे, असा जोगवा आपण मागूया. परमेश्वराने या विश्वाच्या निर्मितीनंतर परिपूर्ण असे हे जगन्मातेचे रूप घेऊन आपल्या प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. प्रत्येक स्त्रीचा आदर करणे, हा तिच्या विविध रूपांचाच सन्मान आहे. लक्षावधी वर्षांचा इतिहास असलेल्या या भारतभूमीचा संसार हा आई जगदंबेच्या कृपेने निरंतर चालू आहे. आई जगदंबेच्या अधिष्ठानामुळेच भारत पुन्हा एकदा बलशाली होऊन विश्वगुरुपदावर विराजमान होईल, असे मार्गदर्शन पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी येथे केले. नवरात्रोत्सवातील श्री दुर्गादौडीच्या वेळी धारकर्‍यांना ते मार्गदर्शन करत होते.

मिरज येथे सनातन संस्थेच्या वतीने ध्वजपूजन !

मिरज येथील संभा तालीम चौक परिसरात सनातन संस्थेच्या वतीने ध्वजपूजन करून श्री दुर्गामाता दौडीचे उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी सनातन संस्थेचे श्री. प्रकाश जोशी, सौ. नयना जोशी, सौ. जयश्री भंडारे, श्री. किरण कुलकर्णी आणि श्री. विजय भट आदी उपस्थित होते.