सनातनच्या ५५ व्या संत पू. (श्रीमती) सुशीला शहाणेआजी

नामजपाच्या माध्यमातून सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात असलेल्या आणि सर्वांवर प्रेम करणार्‍या रत्नागिरी येथील पू. (श्रीमती) सुशीला शहाणेआजी (वय ९३ वर्षे) !

पू. (श्रीमती) सुशीला शहाणेआजी

राजापूर जिल्हा रत्नागिरी येथील श्रीमती सुशीला विष्णु शहाणेआजी संतपदी आरुढ झाल्याचे दिनांक ८ डिसेंबर या दिवशी घोषित करण्यात आले. पू. (श्रीमती) शहाणेआजी सनातनच्या ५५ व्या संत आहेत. त्यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

१. श्री. रविकांत शहाणे (आजींचा मुलगा), रत्नागिरी

दीपावलीनिमित्त आम्ही यंदा नाटे, रत्नागिरी येथे गेलो होतो. त्या वेळी आईविषयी जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.

१ अ. चांगली स्मरणशक्ती

कुणाला एखादा निरोप सांगायचा असो, कुणाकडून एखादी वस्तू आणायची असो किंवा कुणाला एखाद्या ठिकाणी जायचे असो, ते काम पूर्ण होईपर्यंत ती संबधित व्यक्तीचा पाठपुरावा करत असते.

१ आ. स्वावलंबन

सर्व जण तिला स्वतःचे कपडे न धुण्याविषयी सांगतात. ती हो हो म्हणते आणि स्वतःच धुते. स्वावलंबन तिच्या अंगातच मुरलेले आहे.

१ इ. सतर्कता

घरी गेल्यावर काही वेळाने तिने मला विचारले, ॐ चा नामजप आता बंद करायचा आहे ना कि पुन्हा करायला सांगितला आहे ? ते ऐकून सांगितलेल्या गोष्टी आपल्याकडून योग्य होत आहेत ना ?, याकडे आईचे पूर्ण लक्ष असते. ती त्याविषयी निश्‍चिती करून घेते, हे लक्षात आले.

१ ई. इतरांचे भरभरून कौतुक करणे

दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी सौ. देवश्रीने (श्रीमती आजींची नातसून) तिला अंगाला उटणे लावू का ?, असे विचारले. तेव्हा तिला इतका आनंद झाला की, तिने आपल्या सर्व सुनांना सांगितले, देवश्रीने मला तुझ्या अंगाला उटणे लावायचे का ?, असे विचारले. प्रत्येकाच्या चांगल्या गोष्टीचे ती भरभरून कौतुक करते.

१ उ. इतरांचा विचार करणे

१. एक दिवस दुपारी मी, कविता (श्रीमती आजींची सून) आणि आई माझ्या लहान भावाकडे जेवायला गेलो होतो. जेवून येईपर्यंत दुपारचे अडीच होऊन गेले होते. आई आपल्या खोलीत झोपायला गेली. तेवढ्यात वाडीतील एक वयस्कर महिला दळण घेऊन आली. मी ते ठेवून दिले. तिने आईची विचारपूस केली. तेव्हा तिला म्हटले, बघतो हां, बहुतेक झोपली असेल. आईच्या खोलीत जाऊन पाहिले, तर तिला झोप लागली नव्हती. मी म्हटले, बाहेर वाडीतील एक महिला आली आहे. आई क्षणाचाही विलंब न करता उठली आणि बाहेर येऊन तिच्याशी बोलू लागली. या वयातही आई तिच्याकडे आलेल्या व्यक्तीला भेटण्यासाठी तत्परतेने बाहेर आली. स्वतःच्या थकव्याचा तिने मुळीच विचार केला नाही.

२. त्या वेळी मीही आसंदीत बसून त्यांच्या गप्पा ऐकत होतो. मला झोप येत होती. त्यांचे बोलणे मोठ्याने चालले होते. तेवढ्यात आईने त्या महिलेला खुणेनेच झोपाळ्यावर पहुडलेल्या सुनेकडे बोट दाखवत हळू बोलायला खुणावले. त्यानंतर दोन मिनिटांत बोलणे संपवले आणि ती झोपायला गेली. सुनेची झोपमोड होऊ नये; म्हणून त्या महिलेला आईने हळू बोलायला सांगितले. मला झोपायला जाता यावे; म्हणून बोलणे लवकर आटोपले.

१ ऊ. प्रेमभाव

कुणी आजारी असेल, तर ती सतत त्याची विचारपूस करते, मग ती व्यक्ती घरातील असो अथवा बाहेरची !

(या धारिकेचे संकलन करतांना माझा नामजप होत होता. अजून एक संत मिळणार, याचा आनंद मला होत होता. – श्रीमती रजनी नगरकर (७.१२.२०१५))

 

२. सौ. कविता शहाणे (आजींची सून), रत्नागिरी

२ अ. आनंदी आणि उत्साही जाणवणे

आईंचा तोंडवळा आनंदी आणि उत्साही वाटतो.

 

२ आ. सतत नामजप करणे

आईंचा नामजप सतत चालू असतो, असे जाणवते. त्यांना कधी नामजपाला बसायला वेळ मिळाला नाही, तर माझा नामजप करायचा राहिला आहे, असे म्हणून त्या लगेच नामजप करायला बसतात.

 

२ इ. सतत कार्यरत असणे

त्यांचे वय ९३ वर्षे असूनही त्या सतत काहीतरी काम करत असतात. त्यांना कोणतेही काम अपूर्ण राहिलेले चालत नाही. काम पूर्ण आणि वेळेत झाले पाहिजे, असा त्यांचा सतत विचार असतो.

आम्ही कुठे बाहेर गेलो आणि आम्हाला एखादे काम करण्यास विलंब झाला अन् त्यांना तुम्ही काही काम करू नका. आम्ही करू, असे सांगितले, तरी त्या आम्ही काम करायची वाट पहात नाहीत. उलट त्या सांगतात, अग, तुम्हीही करताच ना, तुम्हीपण दमताच ! असे म्हणून त्या स्वतः काम करतात.

 

२ ई. इतरांना साहाय्य करणे

२ मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) माझ्या पायाला दुखापत झाली होती. तेव्हा त्या एक मास (महिना) घरातील सर्व कामांत मला साहाय्य करायच्या. मला उभे राहून काही करता येत नव्हते. तेव्हा त्या मला सर्व सामान आणून द्यायच्या.

श्रीमती सुशीला शहाणेआजी संत होण्याच्या संदर्भात मिळालेल्या पूर्वसूचना

१. या वेळी आईकडे पाहिल्यावर आनंद वाटत होता. दोन वेळा मनात आले, आई आता संत होईल. – श्री. रविकांत शहाणे

२. आम्ही १५ दिवसांपूर्वी नाटे, रत्नागिरी येथे आमच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्यांच्या सहवासात रहायला मिळाले. त्या स्वतः औषध सिद्ध करून माझ्या पायाला लावायच्या. तेव्हा त्या लवकर संत होतील, असा मनात विचार आला. – सौ. कविता शहाणे

 

पू. (श्रीमती) शहाणेआजी यांच्या सन्मानाच्या वेळी त्यांच्याविषयी त्यांचा नातू वेदमूर्ती श्री. केतन शहाणे यांनी सांगितलेली सूत्रे

१. आठवणीने विचारपूस करणे

मी रामनाथी आश्रमात रहात असल्यामुळे आजीचा सहवास जास्त लाभला नाही; मात्र मी जेव्हा घरी दूरभाष करतो, त्या वेळी आजीशी बोलणे होते. काही कारणाने बोलणे झाले नाही, तर आजी नंतर संपर्क करून विचारते, बरा आहेस का ?

२. मनातील द्वंद्व लक्षात येऊन तसे उत्तर ओव्यांच्या माध्यमातून देणे

७ डिसेंबरला माझ्या मनात ईश्‍वर आणि माया यांविषयी द्वंद्व चालू होते. याविषयी माझे आणि आजीचे बोलणे झाले नव्हतेे; मात्र आजी आली आणि तिने माझ्या डोक्यावरून हात फिरवला अन् ओव्या म्हणायला प्रारंभ केला. मग हसून निघून गेली. आजीने म्हटलेल्या ओव्यांचा आशय माया अशी असते, ईश्‍वर असा असतो आणि आपल्याला ईश्‍वराकडे जायचे आहे, असा होता. असे प्रसंग २-४ वेळा घडले आहेत.

३. योग्य मार्गदर्शन करणे

दीड-दोन वर्षांपूवी आई आणि काकू दळत असतांना त्या वेळी आजी येऊन म्हणाली, असं दळू नका. पण त्या दोघींना असंच दळायला हवं, असे वाटल्याने त्या त्यांच्या पद्धतीने दळत होत्या. त्या वेळी एकदा फिरवल्यावर खुंटा निघायचा, असे बराच वेळ झाले. त्यानंतर दोघींपैकी कोणाच्यातरी लक्षात आले की, आजींनी आपल्याला दळू नका, असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी आजीला सांगितले की, आता आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे दळतो. त्यानंतर व्यवस्थित दळले जाऊ लागले.

४. आजीच्या स्पर्शाने डोकेदुखी थांबवणे

८ डिसेंबरला वारा लागल्याने माझे डोके पुष्कळ दुखत होते. सर्दीही झाली होती. त्यामुळे मी डोळे बंद करून बसलो होतो. त्या वेळी आजी माझ्या डोक्यावर २ मिनिटे हात ठेवून उभी राहिली. त्यानंतर डोके दुखणे थांबले आणि थकवाही अल्प झाला. यापूर्वी तिने असे कधीच केले नव्हते.

५. देवतांचे नाद, प्रकाश रूपात दर्शन होते

आजीला एकदा विचारले होत की, तुला देवतांचे दर्शन होते का ? काय दिसते ? त्या वेळी आजी म्हणाली, देवतांचे स्वरूप दिसत नाही. प्रकाश रूपात देवतांचे दर्शन होते. वेगवेगळ्या रंगांचे गोळे दिसतात. नाद ऐकू येतो.

६. नामजप सतत चालू असणे

आजींचा अखंड नामजप चालू असतो.
– वेदमूर्ती श्री. केतन शहाणेगुरुजी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.