मीठ पाणी – फायदे आणि आध्यात्मिक लाभ

Article also available in :

मीठ आपण बऱ्याच ठिकाणी वापरत असतो. मीठ पाणी हे अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय आहेत. त्याचे पुढील लाभही आहेत. आपल्याला दिवसभर सुस्ती येणे, जडपणा वाटणे, निरुत्साह असणे, काही न सुचणे, चिंतातूर असणे, कोणतेही काम करतांना एकाग्रता नसणे, काही कारण नसतांना चिडचिड होणे, राग येणे किंवा शरीर व्याधीग्रस्त होणे, अशा प्रकारचा अनुभव येत असेल, तर त्या‍वर मात करण्यासाठी अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय म्हणजे मीठ पाणी उपाय आहेत. नियमितपणे मीठ पाण्याचे उपाय केल्यास शरीरातील अनिष्ट शक्ती नष्ट करणे शक्य होते.

आध्यात्मिक उपायांमुळे साधनेतील अडथळे दूर होतात. आपले शरीर, मन, तसेच बुद्धी यांवर आलेले नकारात्मक आणि अनिष्ट शक्तींचे आवरण दूर व्हायला साहाय्य होते. अनिष्ट शक्तींचा प्रतिकार करणे शक्य होते. आपण जेवढे आध्यात्मिक उपाय करू, तेवढे आपल्याभोवतीचे आवरण दूर होऊन आपल्याला हलके वाटते. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद पऱब्रम्ह डॉ. जयंत आठवले यांनी अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी, साधकांना चांगली साधना करता येण्यासाठी अनेक उपचार पद्धती शोधून काढल्या आहेत. त्यांपैकी एक असलेल्या मीठ-पाण्याच्या उपायांविषयी जाणून घेऊया.

मीठ पाणी - फायदे आणि आध्यात्मिक लाभ, कृती कशी करावी

 

१. अनिष्ट शक्तींमुळे आलेल्या आवरणाची लक्षणे

आपल्यावर अनिष्ट किंवा काळ्या शक्तींचे आवरण आले असल्याचे आपण कसे ओळखणार ?, त्याची काही लक्षणे आहेत. ती लक्षणे थोडक्यात खाली दिली आहेत.

दिवसभर सुस्ती येणे, जडपणा वाटणे, निरुत्साह असणे, काही न सुचणे, चिंतातूर असणे, कोणतेही काम करतांना एकाग्रता नसणे, काही कारण नसतांना चिडचिड होणे, राग येणे किंवा शरीर व्याधीग्रस्त होणे. अशा प्रकारचा अनुभव आपल्याला येत असेल, तर ‘आपल्यावर आवरण आले आहे’, असे आपण म्हणू शकतो. आवरण वाढले की, आपण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या दुर्बल होतो. असे होऊ नये; म्हणून आपण गांभीर्याने आध्यात्मिक उपाय करणे आवश्यक असते.

अ. आध्यात्मिक उपायांचे महत्त्व

वातावरणात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही शक्ती कार्यरत असतात. त्यांना आध्यात्मिक भाषेत अनुक्रमे दैवी आणि अनिष्ट शक्ती म्हणतात. दैवी शक्ती साधना करणार्‍या जीवांना साहाय्य करतात, तर अनिष्ट शक्ती साधना खंडित होण्यासाठी प्रयत्नरत असतात. हा एकप्रकारे देवासुर संग्राम आहे. तो अनादि काळापासून चालू आहे. वातावरणातील अनिष्ट शक्ती त्यांच्या सूक्ष्म काळ्या शक्तीने लोकांना त्रास देतात. अनिष्ट शक्ती व्यक्तीच्या शरिरात मोठ्या प्रमाणात अनिष्ट शक्तींची केंद्र बनवतात आणि नकारात्मक शक्ती साठवून ठेवतात. या अनिष्ट शक्तींचे निराकरण करण्यासाठी साधना करणे तसेच आध्यात्मिक उपाय करणे अत्यावश्यक आहे ! आध्यात्मिक उपायांमुळे अनिष्ट शक्तींचे निराकरण करणे शक्य होते. आध्यात्मिक त्रासाशी लढण्यात साधना खर्च होत नाही आणि साधनेचा उपयोग व्यक्तीच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी होतो.

 

२. मीठ-पाणी उपाय करण्यासाठी आवश्यक साहित्य

मीठ-पाणी उपाय हा एक सोपा आध्यात्मिक उपाय आहे. मीठ-पाणी उपाय करण्यासाठी पाण्याने अर्धी भरलेली एक मोठी बादली, तांब्या (मग), खडे मीठ, पाय पुसण्यासाठी कापड आणि पायपुसणी हे साहित्य आवश्यक असते. खडे मीठ उपलब्ध नसल्यास क्वचित् प्रसंगी बारीक मीठ चालू शकते; परंतु त्यामुळे उपायांची परिणामकारकता ३० टक्क्यांनी कमी होते.

मीठ पाणी - उपाय करण्यासाठी आवश्यक घटक

३. मीठ-पाणी उपाय करण्याची पद्धत

मीठ-पाणी उपाय कसे करायचे आहेत ?, ते जाणून घेऊया.

१. आरंभी अर्धी बादली पाणी घ्यावे.

२. त्यामध्ये दोन चमचे खडे मीठ घालावे.

३. मीठ-पाणी उपायांच्या माध्यमातून शरिरातील अनिष्ट शक्ती नष्ट करण्यासाठी देवाला आर्ततेने प्रार्थना करावी.

४. पाण्यात पाय बुडवून ताठ बसावे. दोन पावलांमध्ये २-३ सें.मि. अंतर ठेवावे. त्यामुळे शरिरातील जास्तीतजास्त काळी शक्ती बाहेर पडायला साहाय्य होते. जर पावले एकमेकांना चिकटून असतील, तर पावलांतून काळी शक्ती बाहेर पडण्यात अडथळा येऊ शकतो.

५. पाण्यात केवळ १०-१५ मिनिटे पाय बुडवून ठेवावेत. १५ मिनिटांपेक्षा अधिक काळ पाण्यात पाय बुडवून ठेवू नयेत; कारण जी काळी शक्ती मीठ पाण्याच्या उपायांमुळे शरीरातून बाहेर पडलेली असते, ती परत शरीरात प्रवेश करू शकते.

६. पाण्यात पाय बुडवून ठेवलेले असतांना नामजप करणे आवश्यक असते. ज्यांनी नुकतीच साधनेला सुरुवात केली असेल, ते उपाय करतांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करू शकतात, तर अध्यात्मप्रसाराच्या सेवेत सक्रीय आहेत त्यांनी ‘ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ।’ हा नामजप करावा.

७. उपाय पूर्ण झाल्यानंतर पाय अलगद वर उचलून अगोदरच घेऊन ठेवलेल्या दुसर्‍या तांब्यातील (मगातील) स्वच्छ पाण्याने त्याच बादलीत पाय धुवावेत आणि नंतर पाय कापडाने स्वच्छ पुसावेत.

८. त्यानंतर ‘भगवंताच्या कृपेमुळेच आपण उपाय करू शकलो आणि त्याने आपला त्रास दूर करून आपल्या भोवती चैतन्याचे संरक्षक-कवच निर्माण केले, नवीन सकारात्मक ऊर्जा दिली’, याविषयी भगवंताच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी.

९. शेवटी ते मीठ-पाणी शौचालयात ओतावे आणि बादली दुसर्‍या स्वच्छ पाण्याने धुवून ठेवावी.

मीठ पाणी उपाय करतांना जप आणि प्रार्थना केल्यामुळे शरिरातील काळ्या शक्तीचे विघटन व्हायला सुरुवात होते. मिठाच्या पाण्यात काळी शक्ती खेचून बाहेर काढण्याची क्षमता असते.

 

४. मीठ पाणी उपायांची परिणामकारकता ओळखण्याचे निकष

मीठ पाणी उपायांची परिणामकारकता ओळखण्याचे निकष कोणते आहेत, तर काळी शक्ती बाहेर पडत असतांना जांभया येणे, ढेकर येणे, कान आणि डोळे गरम होणे किंवा त्यातून उष्ण वाफा येणे, पायांमध्ये बधिरता जाणवणे, पायांची सूज उतरणे, कधी-कधी पाण्याचा रंग बदलून तो काळसर होणे, पाण्याला दुर्गंध येणे किंवा पाण्याचे तापमान वाढणे अशा प्रकारचे परिणाम दिसू शकतात.

 

५. मीठ पाणी उपाय दिवसातून किती वेळा करावे ?

आध्यात्मिक त्रासाची तीव्रता अधिक असल्यास मीठ-पाणी उपाय दिवसातून २-३ वेळा २-३ तासांच्या अंतराने करू शकतो; अन्यथा किमान एकदा तरी हे मीठ पाणी उपाय होतील, असे पहावे.

 

६. आंघोळीच्या आरंभी खडे मीठाचे पाणी अंगावर घेणे

आपण आंघोळीच्या वेळीही मीठ पाणी उपाय करू शकतो. ते कसे करायचे ?, हे आपण जाणून घेऊया. आपल्याकडे २ बादल्या असतील, तर एका बादलीत नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी गरम/गार पाणी घ्यावे. दुसर्‍या बादलीत ३-४ तांबे गरम/गार पाणी घेऊन त्यामध्ये २ चमचे खडे मीठ घालावे. आंघोळीला सुरुवात करतांना प्रथम खडे मीठाचे पाणी अंगावर घ्यावे. त्या वेळी आपल्या उपास्यदेवतेला प्रार्थना करावी, ‘हे भगवंता, या खडे मीठाच्या माध्यमातून माझ्या स्थूल आणि सूक्ष्म देहावर आलेले काळ्या शक्तींचे आवरण नष्ट होऊ दे, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’ प्रार्थनेनंतर खडे मीठाचे पाणी अंगावर घ्यावे. त्यानंतर नेहमीच्या पाण्याने आंघोळ करावी.

 

७. अनुभूती

मीठ पाणी उपाय केल्यानंतर कित्येक जणांनी त्यांचा थकवा दूर होणे, देहातील काळे आवरण दूर होणे, उत्साह वाटणे अशा अनुभूती घेतल्या आहेत.

 

८. वैज्ञानिकतेच्या कसोटीवरही मीठ पाणी उपाय प्रभावी सिद्ध होणे

या उपचारपद्धतीविषयी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ म्हणजे ‘यु.ए.एस्.’ या उपकरणाच्या माध्यमातून सनातनच्या आश्रमात संशोधन करण्यात आले होते. या संशोधनात असे आढळून आले की, मीठ पाणी उपाय केल्यानंतर व्यक्तीच्या शरीरातील नकारात्मकता दाखवणार्‍या ‘इन्फ्रारेड एनर्जी’ची नोंद (रिडिंग) १८० वरून शून्यावर आली. हा एक अतिशय मोठा सकारात्मक पालट आहे. त्याच जोडीला व्यक्तीची एकंदरित प्रभावळ म्हणजे ‘ऑरा’ १.४१ मीटरवरून २.२० मीटरपर्यंत वाढली. यातून वैज्ञानिकदृष्ट्याही मीठ-पाण्याचे उपाय व्यक्तीमधील नकारात्मकता कमी करतात, हे दिसून येते. आपल्या शास्त्रामध्येही समुद्रस्नानाच्या माध्यमातून एकप्रकारे मीठ पाण्याच्या आंघोळीचे महत्त्व प्रतिपादित केले आहे. यावरून हिंदूंचे धर्मशास्त्र वैज्ञानिकतेच्या कसोटीवरही १०० टक्के टिकणारे आहे, हे दिसून येते.

अधिक माहिती वाचा…मिठाच्या पाण्याच्या उपायाचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

 

अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे. आपण जेवढे सत्संगात शिकायला मिळालेले कृतीत आणू, तेवढा आपल्याला त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होईल. त्यामुळे आपण आजपासूनच प्रतिदिन मीठ पाणी उपाय करण्यास आरंभ करूया.

Leave a Comment