पादसेवन भक्तीतील आनंदाची अनुभूती घेणार्‍या सौ. प्राची मेहता !

१. भाववृद्धीसाठी प.पू. गुरुदेवांची मानसपूजा करतांना भक्तीभाव
किंवा आनंद न जाणवल्याने अपराधीपणा वाटणे आणि श्रीकृष्णाला
कोणत्याही अपेक्षेविना भावाचे प्रयत्न करायला शिकव, अशी प्रार्थना करणे

सौ. प्राची रोहन मेहता

काही दिवसांपूर्वी मी माहेरी गेले होते. तेव्हा माझे आजोबा-आजी (श्री. आणि सौ. हर्षे) यांना भेटले आणि त्यांना विचारले, मी भावजागृती आणि भाववृद्धी होण्यासाठी काय प्रयत्न करू ? त्यावर आजोबांनी (श्री. श्रीपाद हर्षे यांनी) मला प.पू. गुरुदेवांची मानसपूजा करायला सांगितली. त्यानुसार मी १-२ दिवस मानसपूजा करूनही त्यात मला भक्तीभाव किंवा आनंद जाणवत नव्हता; उलट कर्मकांडात अडकल्याप्रमाणे मला वाटत होते. तेव्हा मी मनातील अपराधीपणाचा विचार सांगतांना आजोबांना म्हटले, गुरूंची पाद्यपूजा करण्यातील आनंद अनुभवता येत नसल्याने मला कंटाळवाणे वाटत आहे.

त्यावर आजोबा आणि आजी म्हणाले, आम्हाला वाटतच होते की, कर्मकांडातील पाद्यपूजा न करता तू अजून सूक्ष्म म्हणजे भावाचा गंध, भावाश्रूंचे जल इत्यादी पूजासाहित्य वापरलेस, तर तुला अधिक आनंद मिळेल. नंतर तसे मी २-३ दिवस केले; पण मला पुष्कळ आनंद वाटत नव्हता. शेवटी मी श्रीकृष्णालाच प्रार्थना केली, हे श्रीकृष्णा, मला कोणत्याही अपेक्षेविना भावाचे प्रयत्न करायला शिकव, तसेच मला केवळ गुरूंप्रती पुष्कळ कृतज्ञता अनुभवयाला शिकव.

 

२. साधिकेची पाठ, टाच आदी दुखतांना गुरुदेव
९९ टक्के त्रास भोगत असतात, हा विचार मनात येऊन
कृतज्ञताभाव जागृत होणे आणि  नकळत प.पू. गुरुदेवांशी अनुसंधान
साधले जाणे अन् प.पू. गुरुदेवांचे सूक्ष्मातून हात-पाय चेपतांना आनंदाची अनुभूती येणे

नंतर एके दिवशी माझी पाठ, टाच इत्यादी पुष्कळ दुखत होते. तेव्हा मला उठता पण येत नव्हते. वेदनाशामक गोळी घेऊनही काही लाभ होत नव्हता. त्या वेळी अचानक माझाच आवाज आतून मला ऐकू आला, बघ, गुरुदेव आपला ९९ टक्के त्रास स्वतः भोगत असतांना १ टक्कासुद्धा त्रास तुला सहन होत नाही, तर त्यांची पाठ, पाय आदी अवयव किती दुखत असतील ? तत्क्षणी मला पुष्कळ कृतज्ञता वाटून डोळ्यांतून घळाघळा भावाश्रू येऊ लागले आणि नकळतच माझे प.पू. गुरुदेवांशी अनुसंधान जोडले गेले. मी एक दासी बनून नामजप करत त्यांचे सूक्ष्मातून हात-पाय चेपू लागले. हे एक घंटाभर चालू होते. तेव्हा माझ्यावर आध्यात्मिक उपाय झाल्याने माझे सर्व त्रास न्यून होऊन पुष्कळ हलके वाटले. त्या वेळी प.पू. गुरुदेव अन् श्रीकृष्ण यांनी माझ्याकडून सूक्ष्मातून सेवा करवून घेऊन मला कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि आनंदाची अनुभूती दिली, यासाठी त्यांच्याप्रती मला आणखी कृतज्ञता वाटली.

– सौ. प्राची रोहन मेहता, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.४.२०१५)

प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक, दैनिक सनातन प्रभात