होमिओपॅथी ‘स्वउपचारा’विषयीची मार्गदर्शक सूत्रे

Article also available in :

‘घरच्या घरी करता येतील, असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’

अनुक्रमणिका

आता आपण ‘आपल्‍या आजारावर नेमके गुणकारी औषध शोधणे, काही आजारांविषयी आरंभी लक्षणांची तीव्रता न्‍यून करणारे औषध घेणे आवश्‍यक असणे, औषध सिद्ध करायची पद्धत आणि औषधाचा परिणाम कसा ओळखायचा ?’, यांविषयीची माहिती पाहूया.

संकलक : होमिओपॅथी डॉ. प्रवीण मेहता, डॉ. अजित भरमगुडे आणि डॉ. (सौ.) संगीता भरमगुडे

१. होमिओपॅथी स्‍वउपचार नेमका कसा करायचा ?

आता आपण आजार झाला असतांना या लेखमालेच्‍या साहाय्‍याने प्रत्‍यक्ष स्‍वउपचार कसा करायचा ? ते क्रमवार समजून घेऊया.

१ अ. आजार झाल्‍यावर निर्माण झालेली लक्षणे, तसेच त्‍यांच्‍याशी संबंधित सूत्रे यांचे बारकाईने निरीक्षण करून ती लिहून काढणे

आपल्‍याला काहीही त्रास होऊ लागला (उदा. ताप आला), तर ‘दुखापत झाल्‍यानंतर, बाहेर थंड हवेत गेल्‍यानंतर, भिजल्‍यानंतर इत्‍यादी’ आजार व्‍हायचे (उदा. ताप यायचे) कारण, आपल्‍या तब्‍येतीत टप्‍प्‍याटप्‍प्‍याने झालेले पालट, तसेच आपल्‍याला तापासह जाणवणारी ‘चिडचिड वाढली आहे का ? तहान अधिक लागते का ? विशिष्‍ट काही खावे-प्‍यावेसे वाटते का ?’, इत्‍यादी अन्‍य सर्व लक्षणे, तसेच आपल्‍याला होणारा त्रास कशाने न्‍यून होतो ? कशामुळे वाढतो ? इत्‍यादी आपल्‍या आजाराशी संबंधित सर्व सूत्रे ‘सर्वांत महत्त्वाची आणि सर्वांत तीव्र, सर्वांत आधी’ या क्रमाने लिहून काढावी.

१ आ आपल्‍या आजारावरील प्रकरण वाचणे

त्‍यानंतर लेखमालेतील आपल्‍या आजाराचे (उदा. ताप) प्रकरण उघडून पूर्ण वाचावे. त्‍यात आपल्‍या आजाराची (उदा. तापाची) देण्‍यात येणारी माहिती वाचून, तसेच दिलेली अन्‍य सूत्रे वाचून, उदा. ‘थर्मोमीटर’ लावून ताप नेमका किती आला आहे ? याची खात्री करून घ्‍यावी. जर ताप केवळ १०० अंश फॅरन्‍हाइट एवढा आहे, तर लगेच औषध घ्‍यायची आवश्‍यकता नाही. त्‍याहून अधिक असेल, तर औषध घेणे आवश्‍यक आहे.

१ इ. आपल्या आजारावर नेमके गुणकारी औषध शोधणे

‘होमिओपॅथी’विषयी प्रसिद्ध करण्यात येणार्‍या ग्रंथात प्रत्येक आजाराच्या संक्षिप्त माहितीच्या नंतर त्या आजारावर गुणकारी होमिओपॅथीच्या औषधांची माहिती दिली आहे. यात प्रत्येक औषधाचे गुणधर्म थोडक्यात दिले आहेत. हे गुणधर्म वाचून आपल्या लक्षणांशी साम्य असलेले गुणधर्म असणारे औषध निवडायचे आहे, उदा. आपल्याला ताप आला असतांना त्यासह मन अस्वस्थ असणे आणि पुष्कळ तहान लागणे अन् त्यासाठी पुष्कळ प्रमाणात थंडगार पाणी पिणे, अशी लक्षणे असतील, तर त्यावर ‘ॲकोनाईट नॅपेलस (Aconite Napellus)’, हे औषध घ्यायचे असते; मात्र तापासह चेहरा लाल आणि फुललेला दिसणे, ताप आला असतांना तहान अजिबात नसणे, अशी लक्षणे असतील, तर त्यावर ‘बेलाडोना (Belladona)’, हे औषध घ्यायचे असते.

यावरून केवळ ताप या एकाच मुख्य लक्षणावर आधारित औषध निवडायचे नसते, तर त्या आजारावरील कोणत्या औषधाच्या विशिष्ट लक्षणांशी आपली लक्षणे सर्वाधिक जुळतात, हे पाहून ते औषध घ्यायचे असते.

ताप आल्यानंतर आपल्यामध्ये जाणवलेली विविध लक्षणे आणि त्या प्रकरणात दिलेल्या एखाद्या औषधाच्या गुणधर्माशी जिथे अधिकाधिक साधर्म्य दिसते, त्या औषधाचे नाव आपल्या कागदावर लिहावे. जर २-३ औषधांशी साधर्म्य जाणवत असेल, तर पुन्हा सर्व औषधांचे गुणधर्म वाचून त्यातील कोणत्या औषधाशी आपली लक्षणे सर्वाधिक जुळतात, ते पहावे.

१ ई. एकच औषध घेणे

जरी आपल्या आजाराच्या लक्षणांचे २-३ औषधांच्या गुणधर्मांशी साधर्म्य जाणवत असेल आणि त्यामुळे एकच औषध निश्चित करता येत नसेल, तरी एका वेळी त्यातल्या त्यात सर्वाधिक साधर्म्य असणारे एकच औषध आपण घ्यायचे असते.

१ उ. काही आजारांविषयी आरंभी लक्षणांची तीव्रता न्यून करणारे औषध घेणे आवश्यक असणे

काही आजारांविषयी, उदा. ‘पोटदुखी’, या आजाराच्या प्रकरणात ‘पोटामध्ये वेदना होत असतांना त्वरित वेदनामुक्ती व्हावी, यासाठी मॅग्नेशियम फॉस्फोरिकम् (Magnesium Phosphoricum) या औषधाच्या ४ गोळ्या अर्धा कप कोमट पाण्यामध्ये विरघळवून त्यातील १ चमचा पाणी प्रत्येक १५ मिनिटांनी वेदना थांबेपर्यंत घ्यावे’, असे दिलेले आहे. याप्रमाणे ज्या आजारांविषयी दिलेले असेल, तिथे त्या आजाराची लक्षणे चालू झाल्यावर उपचाराच्या आरंभी आधी ते औषध घ्यावे. त्यानंतर ‘सूत्र क्र. १’ मध्ये सांगितल्याप्रमाणे आपली लक्षणे त्या आजारावर गुणकारी औषधांपैकी ज्या औषधाच्या गुणधर्मांशी सर्वाधिक जुळतात ते औषध चालू करावे.

१ ऊ. औषध सिद्ध करायची पद्धत

बाजारात मिळणार्‍या होमिओपॅथीच्या औषधासाठी वापरात येणार्‍या करंगळीच्या लांबीच्या प्लास्टिकच्या बाटलीमध्ये ‘४०’ क्रमांकाच्या साखरेच्या गोळ्या भरून त्यात आपण निवडलेल्या औषधाचे ३-४ थेंब टाकून बाटलीचे टोपण लावून बाटलीतील गोळ्या वर-खाली कराव्या. यामुळे औषध प्रत्येक गोळीवर समान पसरते. त्यानंतर त्यातील ४ गोळ्या जिभेखाली ठेवाव्या. या बाटल्या आणि साखरेच्या गोळ्या होमिओपॅथी औषधाच्या दुकानात मिळतात.

बाजारात अनेक ‘पोटन्सी’ची (शक्तीची) औषधे उपलब्ध असतात; परंतु स्वउपचार करण्यासाठी आपण सामान्यतः केवळ ‘३०’ पोटन्सीचे औषध वापरायचे. यापेक्षा वेगळ्या ‘पोटन्सी’चे औषध वापरायचे असेल, तर तिथे आम्ही दिलेले आहे; अन्यथा अन्य पोटन्सीचे औषध केवळ तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.

१ ए. औषधांच्या बाटल्यांवर व्यक्ती आणि औषध यांच्या नावाची पट्टी (लेबल) लावणे आवश्यक असणे

घरात एकाच वेळी २-३ व्यक्तींना होमिओपॅथी औषध चालू आहे, असे होऊ शकते. अशा वेळी प्रत्येकासाठी औषधाच्या गोळ्या सिद्ध करण्यापूर्वी ती व्यक्ती आणि औषध यांचे नाव बाटलीवर घालून मगच त्यात साखरेच्या गोळ्या अन् औषधाचे थेंब घालून औषध सिद्ध करावे.

१ ऐ. औषध घ्यायची पद्धत

औषध घेतांना डबीतून ४ गोळ्या डबीच्या झाकणात (टोपणात) घेऊन त्या झाकणातून थेट जिभेखाली ठेवायच्या. त्या आपोआप विरघळतात. औषधाच्या गोळ्या गिळू नयेत. औषध सामान्यतः जिभेच्या खाली ठेवून घेतले जाते; परंतु नवजात शिशूंमध्ये ते त्यांच्या मनगटावर, पायांच्या तळव्यांना किंवा पायाच्या अंगठ्याच्या घडीमध्ये (big toe skin fold) लावू शकतो. ज्या प्रौढ व्यक्ती गोळ्या घेऊ शकत नाहीत, उदा. कोमामध्ये असलेल्या व्यक्ती, अशांना औषध हुंगायला देऊ शकतो. अशा वेळी औषधाचे झाकण काढलेली बाटली रुग्णाच्या नाकाखाली ३० सेकंद धरावी.

१ ओ. औषध घेतांना घ्यायची खबरदारी

अ. औषध घेण्याच्या १५ मिनिटे आधी आणि घेतल्यानंतर १५ मिनिटे काहीही खाऊ-पिऊ नये.

आ. अत्तर, कापूर, गरम मसाले (वेलची, मिरी) इत्यादी उग्र गंधांपासून, तसेच सूर्यप्रकाशापासून औषध लांब ठेवावे.

इ. औषध घेण्यापूर्वी आणि नंतर १ घंटा टूथपेस्ट (त्यात असलेल्या पुदिनामुळे (mint मुळे) वापरू नये. सर्दीची पोटात घ्यायची, तसेच त्वचेवर लावायची ‘व्हिक्स व्हेपोरब’सारखी औषधे (त्यांत असलेले कापूर, मेन्थॉल, निलगिरीचे तेल यांमुळे) टाळावी.

१ औ. औषध प्रतिदिन किती वेळा घ्यायचे ?

सामान्यतः औषध सकाळी, दुपारी आणि रात्री, असे ३ वेळा घ्यायचे असते; परंतु ताप, अतीसार अशा छोट्या कालावधीच्या आजारांसाठी (acute illnessesसाठी) आवश्यकतेनुसार दिवसातून ३ ते ८ वेळाही घ्यावे लागू शकेल. अपघात होऊन दुखापत झाली असेल, तर प्रत्येक घंट्यालाही औषध घ्यावे लागू शकते.

१ अं. औषधाचा परिणाम होत आहे, हे कसे ओळखायचे ?

होमिओपॅथी औषधांचा परिणाम व्यक्तीपरत्वे भिन्न असू शकतो. काही जणांमध्ये औषध चालू करताच लक्षणांमध्ये स्पष्ट घट दिसू लागते. काही जणांच्या लक्षणांमध्ये घट होण्यापूर्वी त्यांत काही प्रमाणात वाढ झाल्याचे आढळू शकते. काही जणांविषयी त्यांच्या आजाराच्या विशिष्ट लक्षणांत (उदा. त्वचेवरील पुरळ) फारसा पालट न होता, त्यांना एकूण शरीर आणि मन यांच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात सकारात्मक पालट जाणवतो. होमिओपॅथीमध्ये एकूण सकारात्मक पालट हे चांगले लक्षण मानले जाते; कारण असे होणे, हे ‘औषध आजारावर सर्वांत मूलभूत स्तरावर कार्य करत आहे’, याचे दर्शक असते. अर्थात् पुढे सर्वच लक्षणे जाणे अपेक्षित आहे आणि तसेच होते.

२. होमिओपॅथी ‘स्‍वउपचारा’विषयी मार्गदर्शक सूत्रे

२ अ औषध किती दिवस घ्‍यायचे ?

होमिओपॅथीमध्‍ये ‘अमुक दिवस औषध घ्‍यायचे’, असे नसते. औषध चालू केल्‍यावर जर १ ते २ दिवसांनी बरे वाटू लागले किंवा ज्‍या मात्रेनंतर (dose नंतर) बरे वाटू लागेल, त्‍यानंतर ते औषध घेणे बंद करावे. थोडक्‍यात ज्‍या क्षणापासून आपल्‍याला बरे वाटू लागेल, उदा. ताप उतरला किंवा जुलाब थांबले की, औषध घेणे बंद करायचे.

आजार नवीन आहे कि जुनाट ? यावरही औषध किती कालावधी घ्‍यायचे, हे ठरते, उदा. तापावर चालू केलेल्‍या औषधाचा परिणाम लगेच दिसतो. त्‍यामुळे ताप उतरला की, लगेच औषध बंद करायचे असते. याउलट संधीवात, दमा, पाठदुखी यांसारख्‍या जुनाट आजारांना बरे व्‍हायला काही कालावधी लागू शकतो. जर आपल्‍या आजारावर योग्‍य औषध शोधण्‍यात आपण यशस्‍वी झालो, तर आजार पूर्ण बरा होतो. अन्‍यथा जुनाट आजाराने डोके वर काढले असता आपण योग्‍य औषध शोधून ते घ्‍यावे आणि त्‍यानंतर आजाराचा त्रास ५० टक्‍के न्‍यून झाला की, औषध बंद करावे. काही कालावधीनंतर त्रास जर पुन्‍हा उद़्‍भवला, तर आधीचेच औषध पुन्‍हा चालू करायचे.

२ आ. औषध पालटण्‍याचा विचार केव्‍हा करायचा ?

औषध चालू केल्‍यानंतर काहीतरी सकारात्‍मक पालट दिसणे अपेक्षित आहे. छोट्या कालावधीचे आजार, उदा. ताप, जुलाब यांमध्‍ये औषध चालू करून १ दिवस उलटला, तरी जरा सुद्धा पालट होत नसेल, तर ‘हे औषध आजारावर काम करत नाही’, असा निष्‍कर्ष आपण काढू शकतो. त्‍यानंतर वर सांगितल्‍याप्रमाणे सर्व प्रक्रिया पुनश्‍च करून आपल्‍या आजारावर गुणकारी औषध शोधावे.

याउलट बर्‍याच मासांपासून किंवा वर्षांपासून असलेले दमा, संधीवात, कंबरदुखी, पाठदुखी इत्‍यादी जुनाट आजारांविषयी औषध पालटण्‍याचा निर्णय लगेच घेता येत नाही. अशा आजारांमध्‍ये आपल्‍यासाठी गुणकारी औषध शोधल्‍यावर ते प्रत्‍येकी ४ गोळ्‍या दिवसातून २ वेळा (सकाळी आणि रात्री) असे १५ दिवस घ्‍यावे. त्‍यानंतर आपल्‍या आजाराच्‍या स्‍थितीचा आढावा घ्‍यावा. आजाराची लक्षणे जर कमी झाली असतील, तर वाट पाहू शकतो. जर त्रास परत उद़्‍भवला नाही, तर औषध पुन्‍हा घ्‍यायला नको. जर त्रास पुन्‍हा चालू झाला किंवा न्‍यून झाला; परंतु पूर्ण बरा झाला नाही, तर पुन्‍हा १५ दिवस औषध घेऊन आधीप्रमाणे आढावा घ्‍यावा. एकूण १ मास औषध घेतल्‍यावरही बरे वाटत नसेल, तर पुन्‍हा आजारावर वर दिल्‍याप्रमाणे पुन्‍हा औषध शोधावे; शक्‍य असल्‍यास होमिओपॅथी डॉक्‍टरांचा सल्ला घ्‍यावा. जुनाट आजार बरा व्‍हायला काही कालावधी जावा लागतो; परंतु होमिओपॅथी औषधाने आजाराची तीव्रता न्‍यून होते आणि दोन दुखण्‍यांमधील कालावधी वाढत जातो.

२ इ. आजार बरा झाल्‍यानंतर शिल्लक राहिलेल्‍या औषधाचे काय करायचे ?

जर आजार बरा झाला; परंतु त्‍या आजारावरील औषधाच्‍या सिद्ध केलेल्‍या गोळ्‍या शिल्लक असतील, तर एका प्‍लास्‍टिकच्‍या पाकिटावर औषधाच्‍या नावाची पट्टी चिकटवून त्‍यात ती बाटली घालून ठेवायची. त्‍यानंतर ६ मास किंवा एक वर्ष यानंतरही जर कुणाला त्‍या औषधाची आवश्‍यकता भासली, तर आपण त्‍याचा उपयोग करू शकतो.

२ ई. होमिओपॅथी औषध चुकून अधिक प्रमाणात घेतले गेल्‍यास काय करावे ?

जर लहान मुलांनी चुकून होमिओपॅथी औषधाच्‍या संपूर्ण बाटलीभर गोळ्‍या खाल्‍ल्‍या, तरी काळजीचे कारण नाही. आपण त्‍यांना कॉफी प्‍यायला देऊ शकतो. कॉफी प्‍यायल्‍याने औषधाचा परिणाम निघून जातो. याचे कारण कॉफी हे होमिओपॅथी औषधांसाठी ‘हारक परिणाम’ (antidote) करणारे आहे.

२ उ. आपल्‍या लक्षणांशी साधर्म्‍य असलेले होमिओपॅथी औषध सापडलेच नाही, तर काय करायचे ?

जर आपल्‍या आजारांच्‍या लक्षणांशी जुळणारे गुणधर्म असणारे होमिओपॅथी औषध आपल्‍याला सापडले नाही, तर अशा वेळी आपण ‘बाराक्षार औषध’ घेऊ शकतो. प्रत्‍येक आजारासाठी कोणते ‘बाराक्षार औषध’ घ्‍यायचे, ते बहुतेक आजारांच्‍या प्रकरणांच्‍या शेवटी दिलेले आहे. काही आजारांमध्‍ये, उदा. ‘भाजणे’ यामध्‍ये आपण भाजलेल्‍या त्‍वचेवर कोणते होमिओपॅथी औषध (कॅन्‍थरिस व्‍हेसिकाटोरिया (Cantharis Vesicatoria)) लावायचे, हे नेमकेपणाने दिले असल्‍यामुळे त्‍या प्रकरणात बाराक्षार औषधाविषयी दिलेले नाही.

३. अन्‍य पॅथीनुसार उपचार चालू असल्‍यास काय करावे ?

होमिओपॅथी औषधे ऊर्जेच्‍या स्‍तरावर कार्य करतात. होमिओपॅथी औषधांच्‍या पांढर्‍या साखरेच्‍या गोळ्‍या या मूळ औषधाच्‍या केवळ वाहक आहेत. त्‍या गोळ्‍या स्‍वतः औषध नाहीत; म्‍हणूनच होमिओपॅथीची सर्व औषधे एकसारखीच दिसतात. होमिओपॅथी उपचारपद्धती ही निर्मूलनाच्‍या तत्त्वावर आधारित आहे – व्‍यक्‍तीच्‍या अस्‍तित्‍वात असमतोल निर्माण करणारे शरीर आणि मन (नकारात्‍मक विचार अन् भावना रूपी) यांतील विषजन्‍य (toxic) घटकांचे निर्मूलन करून पुन्‍हा समतोल घडवून आणणे. त्‍यामुळे होमिओपॅथी औषधे अन्‍य पॅथीच्‍या औषधांच्‍या कार्यात हस्‍तक्षेप करत नाहीत, तसेच अन्‍य पॅथीची औषधे होमिओपॅथी औषधांच्‍या कार्यावर परिणाम करत नाहीत. त्‍यामुळे अन्‍य पॅथीनुसार उपचार चालू असले, तरीही आपण होमिओपॅथी उपचार घेऊ शकतो. होमिओपॅथी उपचार चालू केल्‍यावर अन्‍य पॅथीचे उपचार मनाने बंद करू नयेत. अन्‍य पॅथीची औषधे कमी किंवा बंद करायची असल्‍यास त्‍या त्‍या पॅथीच्‍या तज्ञांचा सल्ला घेऊन त्‍यांच्‍या देखरेखेखाली तसे करावे.

सनातन चा आगामी ग्रंथ : ‘घरच्‍या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’

Leave a Comment