‘बालकभावा’तील चित्रांतून कृष्णभक्तीत रमवणार्‍या सौ. उमा रविचंद्रन् (उमाक्का) यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये

बालकभावाची चित्रे काढणार्‍या चेन्नई येथील चित्रकर्त्या सौ. उमा रविचंद्रन यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये प्रस्तूत लेखातून जाणून घेऊ.

१. व्यष्टी साधनेसाठी आवश्यक गुणवैशिष्ट्ये

१ अ. श्रीगुरु आणि श्रीकृष्ण यांच्यावर दृढ श्रद्धा असणे

`चेन्नई येथे मुळातच सनातनच्या साधकांची संख्या अत्यल्प आहे आणि त्यामानाने शहर पुष्कळ मोठे आहे. असे असूनही उमाक्का (सौ. उमा रविचंद्रन्), तसेच तेथील इतर सर्व साधक अत्यंत तळमळीने गुरुकार्यासाठी उत्साहाने प्रयत्नरत असतात. सनातनच्या तामिळ भाषेतील पंचांगालाही समाजातून चांगला प्रतिसाद लाभत आहे. चेन्नई येथे प्रत्येक आठवड्याला ३ सत्संग घेतले जातात. त्या ठिकाणी संस्थेचे अनेक उपक्रम सातत्याने राबवले जातात. याविषयी उमाक्कांंना विचारले, ‘‘अल्प साधक असूनही तुम्ही एवढे सगळे उपक्रम कसे काय करू शकता ?’’ त्या लगेच म्हणाल्या, ‘‘आम्ही कुठे काय करतो ? श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टरच आम्हाला शक्ती देतात अन् तेच आमच्याकडून सर्वकाही करून घेतात.’’ त्यांच्या शब्दांतून श्रीगुरु आणि श्रीकृष्ण यांच्यावरील असलेली त्यांची दृढ श्रद्धा लक्षात आली.

१ आ. गुरुकार्याची तीव्र तळमळ असल्याने अनेक सेवांमध्ये व्यस्त असणे

सौ. उमाक्का केवळ प्रत्यक्ष अध्यात्मप्रसारच नव्हे, तर धर्माभिमान्यांच्या संपर्कात रहाणे, विज्ञापने मिळवणे आणि इतर गोष्टींसाठी प्रायोजक मिळवणे इत्यादी विविध सेवांमध्ये व्यस्त असतात.

१ इ. साधे रहाणीमान

सौ. उमाक्का श्रीमंत असूनही त्यांचे राहणीमान अत्यंत साधे आहे, उदा. वातानुकूलीन व्यवस्था नसलेल्या गाडीमधून प्रवास करणे, साधा आहार घेणे, इत्यादी. अनेकदा कडक उन्हामध्येही त्यांची दुचाकीवरून सेवेला जाण्याची सिद्धता असते.

१ ई. अहं अल्प असणे

सौ. उमाक्का अत्यंत प्रतिभावान असून प्रवचन करणे, चित्र काढणे, गाणे म्हणणे, वीणा वाजवणे, दुचाकी आणि चारचाकी वाहन चालवणे इत्यादी कृती त्या उत्तम रितीने करतात. एवढे असूनही त्यांना स्वतःच्या कलांविषयी गर्व नाही. गुरुपौर्णिमेसारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये स्वतःकडे प्रवचनाची सेवा असतांनाही त्यांनी सभागृहाची स्वच्छता आणि सजावट करणे या सेवासुद्धा केल्या आहे.

१ उ. सतत भावावस्थेत असणे

सौ. उमाक्का प्रत्येक सेवा भावपूर्ण करतात. एकदा त्या बालकभावाविषयी सांगत असतांना उपस्थित सर्व साधकांचा भाव जागृत झाला. त्या नेहमीच भावावस्थेत असतात. त्या श्रीकृष्ण किंवा प.पू. डॉक्टर यांच्याविषयी बोलत असतांना त्यांचा भाव जागृत होतो.’

– चेन्नई येथील सर्व साधक

१ ऊ. परदेशात रहाणार्‍या स्वतःच्या मुलींनाही
प.पू. डॉक्टरांवर विश्वास ठेवण्यास सांगून साधनेसाठी प्रोत्साहन देणे

`सौ. उमा रविचंद्रन् यांची एक मुलगी अमेरिकेत नोकरी करते आणि दुसरी सिंगापूरला शिकते. मुलींना काही अडचणी आल्यास त्या प्रेमाने मार्गदर्शन करतात आणि प्रत्येक वेळी साधनेची आठवण करून देतात. त्यांना ‘तुम्ही प.पू. डॉक्टरांवर विश्वास ठेवा. ते तुमच्या समवेत आहेत. ते सर्व पाहून घेतील’, असे सांगून प्रोत्साहनही देतात.

१ ए. स्वतः काहीच करत नसून सर्वकाही ईश्वरेच्छेने होणार असल्याचे सांगणे

एकदा मी त्यांना म्हणाले, ‘‘उमाक्का, चेन्नईहून लवकरच आम्हाला चांगले वृत्त (त्यांची आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्याचे वृत्त) ऐकायला मिळेल, असे वाटते.’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘सर्व ईश्वरेच्छा ! मी काहीच करत नाही. मी केवळ जेवढे जमते, तेवढेच करते. सर्व काही प.पू. डॉक्टरच करणार आहेत.’’ हे सांगतांना त्यांचे डोळे पाणावले. प.पू. डॉक्टरांप्रती त्यांचा भाव पाहून माझाही भाव जागृत झाला.’

– सौ. स्मिता नवलकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (सप्टेंबर २०१२)

(३.९.२०१२ या दिवशी सौ. उमा रविचंद्रन् ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाल्या. – संकलक)

 

२. समष्टी साधनेसाठी आवश्यक गुणवैशिष्ट्ये

२ अ. कृष्णभक्ती साकार करणारी बालकभावातील चित्रे तरलतेने रेखाटणार्‍या
सौ. उमा रविचंद्रन् यांचे क्षात्रभावातील आगळेवेगळे रूप – ‘चेन्नईची झाशीची राणी’

२ अ १. नेतृत्वगुण

`योग्य पद्धतीने समन्वय साधून साधकांकडून सत्सेवा करवून घेण्यातील त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. त्या साधना नव्याने चालू केलेल्या जिज्ञासूंना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. त्यांनी विविध हिंदू संघटनांचे कार्यकर्ते आणि धर्माभिमानी यांच्याशीही आप्तसंबंध निर्माण केले आहेत.

२ अ २. क्षात्रतेज आणि क्षात्रवृत्ती

सौ. उमाक्कांमध्ये पुष्कळ प्रमाणात क्षात्रतेज आहे. त्यांच्या आवाजातच पुष्कळ क्षात्रवृत्ती आहे. अध्यात्माविषयीचे दृष्टीकोन त्या न घाबरता धैर्याने मांडतात. उमाक्का रात्रीच्या वेळी दुचाकी चालवणे, तसेच दूरवरच्या खेड्यांमध्ये जाऊन अध्यात्मप्रसार करणे, या कृती सहजतेने करतात. त्या नेहमीच अतिशय उत्साही असतात. त्या आमच्यासाठी ‘झाशीच्या राणी’प्रमाणे आहेत. रामनाथी, गोवा येथील `हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीच्या अखिल भारतीय हिंदु अधिवेशना’ला जाऊन आल्यावर चेन्नई येथे `हिंदु अधिवेशन’ घेऊन गुरुकृपा संपादन करण्यासाठी त्यांनीच आम्हाला उत्तेजन दिले.

२ अ २ अ. राष्ट्र आणि धर्म यांसंबंधी निदर्शनांत नेतृत्व करण्यास सदैव सिद्ध राहून निर्भिडपणे मत व्यक्त करणे

सौ. उमाक्का निर्भयपणे बोलतात. त्यांची क्षात्रवृत्ती त्यांच्या बोलण्यातून नेहमीच व्यक्त होत असते. निदर्शनांच्या वेळी समोरच्या गर्दीत पुरुषांची उपस्थिती जास्त असली, तरीही त्या न घाबरता विषय मांडतात. त्या न घाबरता त्यांचे मत व्यक्त करतात.

२ आ. प्रेमभाव

सौ. उमाक्का सर्व साधकांची पुष्कळ काळजी घेतात. एखादा साधक चेन्नई येथे आला असता त्याची निवासव्यवस्था स्वतःच्या घरी करण्याची त्यांची नेहमीच सिद्धता असते. ‘प्रत्येकाने साधनेमध्ये प्रगती करावी’, असा त्यांचा भाव असतो आणि त्यासाठी त्या साधकांना प्रोत्साहन देतात. कुटुंबातील व्यक्ती, साधक किंवा धर्माभिमानी या सर्वांशी उमाक्का जुळवून घेतात. घराचे दायित्व आणि साधना यांमध्ये त्या उत्कृष्टपणे समन्वय साधतात.’
– चेन्नई येथील सर्व साधक

२ इ. प्रौढावस्थेतील एक चांगली साधिका आणि
बाल्यावस्थेतील साधिका यांचा सुरेख संगम म्हणजे सौ. उमाक्का !

‘सौ. उमाक्का यांनी जुलै २०१२ मध्ये ‘बालकभावा’त काढलेली श्रीकृष्णाची भावपूर्ण चित्रे पाहिली. त्या वेळी त्यांच्यातील निरागस अशा ‘बालकभावा’ची प्रचीती आली.
या पूर्वी मी अनुभवलेल्या उमाक्कांंमध्ये मला नेहमीच साधकत्व असलेल्या एका प्रौढावस्थेतील साधिकेचे गुण लक्षात आले होते; पण त्यांनी ‘बालकभावा’च्या काढलेली चित्रे पाहून आणि दैनिक `सनातन प्रभात’मधील लेख वाचून श्रीकृष्णाने सनातनच्या आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण साधिकेच्या एका वेगळ्या पैलूचे दर्शन घडवले. यातून उमाक्कांमध्ये सनातनच्या प्रौढावस्थेतील (समष्टीसाठी उपयुक्त अशी) एक चांगली साधिका आणि बाल्यावस्थेतील (व्यष्टी स्तरावर ‘बालकभावा’त असलेली) साधिका यांचा सुरेख संगम असल्याचे जाणवले.’ – श्री. सुयोग आठवले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.९.२०१२)

२ ई. सौ. उमाक्कांमध्ये क्षात्रभाव, बालकभाव, वात्सल्यभाव असे सारेच भाव
असल्याने ‘ईश्वरी राज्याची स्थापना कशी होणार ?’ ही काळजी मिटल्याचे प.पू. डॉक्टरांनी सांगणे

‘१६.९.२०१२ या दिवशी सौ. उमाक्का चेन्नईला जाणार होत्या. त्या वेळी त्या प.पू. डॉक्टरांना भेटल्या. एका साधिकेची अनुभूती सांगतांना प.पू. डॉक्टर त्यांना म्हणाले, ‘‘तुमच्यामध्ये बालकभाव आहे, त्याप्रमाणे त्या साधिकेमध्ये क्षात्रभाव आहे.’’ तेव्हा उमाक्का म्हणाल्या, ‘‘माझी मुलगी मला ‘लेडी भगतसिंग’ म्हणते.’’ त्यावर प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘मला काळजी होती की, सर्वांमध्ये गोपीभाव, बालकभाव निर्माण झाला, तर ईश्वरी राज्याची स्थापना कशी होणार ? आता माझी काळजी मिटली; कारण तुमच्यातच क्षात्रभाव, बालकभाव, वात्सल्यभाव असे सर्व प्रकारचे भाव आहेत. सर्व प्रकारचे भाव एकातच कसे असतात, हे देवानेच तुमच्या माध्यमातून मला शिकवले.’’
– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१८.९.२०१२)

 

३. उमाक्कांची ‘बालकभावा’च्या चित्रांसंदर्भातील काही ठळक वैशिष्ट्ये

अ. उमाक्का यांच्यात श्रीकृष्णाविषयी बालकभाव असूनही विविध चित्रे काढल्यानंतर त्यांना काही चित्रांविषयी सारणीच्या स्वरूपात आध्यात्मिक ज्ञानही मिळाले आहे. हे सनातनमधीलच नव्हे, तर पृथ्वीवरीलही एकमात्र उदाहरण असावे !

आ. सौ. उमाक्कांनी काढलेली चित्रे हे चित्रांच्या माध्यमातून ‘बालकभाव’ अवर्णनीयरित्या व्यक्त होण्याचे इतिहासातील एकमेव उदाहरण आहे !

इ. भक्तीमार्गात काही जण बालकभावात, तर काही जण गोपीभावात असतात. दिवसभर हे त्याच भावात असतात. सौ. उमा रविचंद्रन् यांचे वैशिष्ट्य हे की, त्या चित्र काढण्यापुरत्या बालकभावात असतात. इतर वेळी मात्र कौटुंबिक आणि धर्मजागृतीचे उत्तरदायित्व सांभाळत असतांना त्या त्या अवस्थेत असतात. त्यामुळे सौ. उमा व्यष्टी आणि समष्टी अशा दोन्ही प्रकारच्या साधना करू शकतात. यामुळेच त्यांची आध्यात्मिक प्रगतीही जलद होत आहे.

ई. सौ. उमा रविचंद्रन् यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले नसतांनाही श्रीकृष्णाची अत्यंत भावमय अशी चित्रे काढली आहेत. साधना वाढू लागल्यावर साधकातील ईश्वराप्रती असलेल्या भावाचे प्रमाणही वाढते. तो भाव ज्या कलेतून उत्कटपणे व्यक्त होऊ शकतो, ती कला देवच त्या साधकामध्ये निर्माण करतो. त्या कलेतून इतरांना आनंद मिळतो आणि त्यांचाही भाव जागृत होतो. साधिका सौ. उमा यांनी काढलेली बालकभावाची चित्रेही अशीच आहेत. बालिका श्रीकृष्णाशी खेळतांना, त्याची पूजा करतांना, त्याच्यासमवेत नृत्य करतांना, यांसारखी कृष्णभक्तीमध्ये रममाण करणारी अनेक मधुर चित्रे या लेखमालिकेत दिली आहेत.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘‘बालकभावा’तील चित्रे (भाग १) (कृष्णभक्तीचा आनंद देणारी चित्रे त्यांच्या गुणवैशिष्ट्यांसह)’

Leave a Comment