आध्यात्मिक त्रास आणि नामस्मरण

दैनंदिन प्रपंचात व्यग्र असणार्‍या सर्वसामान्य सांसारिकांना आचरण्यास सुलभ असा, शुचिर्भूतता, स्थळकाळ आदी बंधनविरहित असा अन् भगवंताशी सतत अनुसंधान साधून देईल, अर्थात साधना अखंड चालू राहील असा एकमेव साधनामार्ग म्हणजे नामसाधना. नामजपामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास बरे होणे, दुःखांचा परिहार होणे, सर्व पापांचा नाश होणे आणि मृत्यूनंतरही लाभ होणे असे अनेक स्तरांवर लाभ होतात. प्रस्तुत लेखात नामजपाचे लाभ आणि विशेषतः आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी कोणत्या देवतेचा जप उपयुक्त आहे, तसेच वास्तू आणि पूर्वज यांमुळे होणारे त्रास दूर कसे करावे, यांविषयी विवेचन केले आहे.

 

१. नामजपाचे लाभ

नामजपाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा सर्व स्तरांवर पुढीलप्रमाणे लाभ होतात.

१ अ. शारीरिक

व्यसनापासून परावृत्त होता येणे, व्याधीचे स्वरूप प्रकट होण्यापूर्वीच त्याची लक्षणे समजू लागणे, मनःशांती, काही विकार दूर होणे

१ आ. मानसिक

मनोविकारांवरील उपचार, अंतर्मुखता आणि अंतर्निरीक्षण, मनाची एकाग्रता वाढणे

१ इ. आध्यात्मिक

इंद्रियांचे कार्य आध्यात्मिक कारणामुळे बिघडले असल्यास उपाय म्हणून उपयुक्त, वाईट शक्तींच्या त्रासावर मात करण्यासाठी.

 

२. त्रासांची विविध आध्यात्मिक कारणे आणि त्यांवरील उपाय

२ अ. इंद्रियांचे कार्य आध्यात्मिक कारणामुळे बिघडले असल्यास करावयाच्या देवतेचा जप

२ आ. कोणत्या आध्यात्मिक कारणासाठी कोणता जप उपयुक्त असतो

आध्यात्मिक कारणे

उपाय (उपासना)

१. प्रारब्ध कुलदेवी / कुलदेव उपासना
२. त्रासदायक शक्ती  (टीप १)
अ. भूतबाधा हनुमान, काली, श्री दुर्गादेवी वगैरेंची उपासना (टीप २)
आ. करणी हनुमान, काली, श्री दुर्गादेवी वगैरेंची उपासना
इ. पूर्वजांचे लिंगदेह जरासा त्रास : दत्ताची उपासना, उदा. पूजा,जप, देवळात जाणे.

जास्त त्रास : दत्ताच्या उपासनेसह त्रिपिंडी श्राद्ध, नारायण-नागबळी विधी.

ई. ग्रहपीडा ग्रहांप्रमाणे निरनिराळी
३. चांगल्या शक्ती
अ. कुलदेवता कुलाचारपालन
आ. ग्रामदेवता ग्रामदेवतेची पूजाअर्चा परंपरेनुसार करणे
इ. स्थानदेवता पूजा, होम वगैरे
ई. वास्तूदेवता वास्तूशांत, उदकशांत वगैरे
४. शरीरातील शक्तीशी संबंधित
अ. कुंडलिनीचक्र आणि नाडी यांत अडथळा बीजाक्षरमंत्र
आ़ प्राणशक्ती अल्प शंकर, श्रीविष्णु, श्री गणपति, श्री लक्ष्मी, पार्वती वगैरे उच्चदेवतांची उपासना आणि संतसहवास
५. इतर
अ. अन्न, कपडे वगैरे काही पदार्थ खायचे टाळणे वगैरे
आ़ काळ आपली साधना करीत रहाणे
इ. समष्टी पाप इतरांना साधना करायला लावणे
ई. शेष कारणाप्रमाणे

२ इ. समष्टी साधना करणार्‍यांनी वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ करावयाचा नामजप

समष्टी साधना म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाची साधना. समाजात धर्माचा प्रसार करणे, धर्माविषयी लोकांना जागृत करणे, तसेच समाजसाहाय्य आणि राष्ट्ररक्षण करणे, याला ‘समष्टी साधना’ म्हणतात. समष्टी साधना करणारा साधक धर्मजागृतीचे कार्य करत असल्याने त्याला अधर्मी वाईट शक्तींचा त्रास होण्याची शक्यता व्यष्टी साधना करणार्‍याच्या तुलनेत पुष्कळ जास्त असते. वाईट शक्तींच्या त्रासांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते.

१. वाईट शक्तींच्या त्रासांचे स्वरूप

वाईट शक्तींमुळे व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक त्रास होऊ शकतात किंवा तिच्या जीवनात सातत्याने काही ना काहीतरी अडचणी येऊ शकतात. बाह्यतः ‘हे त्रास किंवा अडचणी शारीरिक, मानसिक किंवा भौतिक कारणांमुळेच येत आहेत’, असे जरी वाटले, तरी त्यामागील खरे कारण ‘वाईट शक्तींचा त्रास’ हे असू शकते. वाईट शक्तींमुळे शारीरिक आणि / किंवा मानसिक त्रास होत असल्यास त्यासाठी स्थुलातील उपचार कितीही केले, तरी ते त्रास समूळ नष्ट होत नाहीत. जसे हिवतापाच्या जीवाणूंमुळे ताप आला असल्यास तापावरच्या अन्य कोणत्याही औषधांनी तो बरा होत नाही, तर केवळ हिवतापाच्या जीवाणूंना मारण्याची क्षमता असलेल्या प्रतीजैविकांनीच (अँटीबायोटिक्सने) जातो, तसेच हे आहे. वाईट शक्ती साधकांच्या साधनेतही अडथळे आणू शकतात. त्यामुळे साधकांना साधनेचे अपेक्षित फळ लाभत नाही; कारण वाईट शक्तींमुळे होणारा त्रास अल्प (कमी) करण्यासाठी त्यांची बहुतांश साधना वापरली जाऊ शकते. उदाहरणार्थ वाईट शक्तींमुळे एखाद्याची प्राणशक्ती घटली असल्यास ती भरून काढण्यासाठी त्याची बहुतांश साधना व्यय (खर्च) होऊ शकते. तसेच वाईट शक्ती साधकांच्या साधनेचा लाभ मिळवू शकतात; म्हणूनही साधकांना पुष्कळ साधना करूनही साधनेचे अपेक्षित फळ लाभत नाही. यावरून वाईट शक्तींचा त्रास दूर करण्याला प्राधान्य देणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते.

२. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणासाठी उच्च देवतेचा/देवतांचा नामजप करणे

वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ श्री गणपति, शिव, श्री दुर्गादेवी यांसारख्या उच्च देवतांचा नामजप करणे आवश्यक असते. सध्याच्या आपत्काळाला अनुसरून त्या त्या आठवड्यात नेमका कोणता नामजप करावा, हे ‘सर्वांसाठीचा नामजप’ या स्तंभाखाली ‘सनातन प्रभात’च्या सर्व नियतकालिकांतून आणि Sanatanprabhat.org संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येते. साधकांनी त्यानुसार प्रतिदिन न्यूनतम (किमान) २ घंटे (तास) नामजप करावा. काही कारणाने या नामजपाविषयीची माहिती उपलब्ध न झाल्यास ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप प्रतिदिन न्यूनतम २ घंटे करावा. वर्ष २०२१ पर्यंत आपत्काळाची तीव्रता असल्याने तोपर्यंत अशाच पद्धतीने नामजप चालू ठेवावा. समष्टी साधना करणार्‍या साधकांनी व्यष्टी जीवनाशी संबंधित कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप करण्याची आवश्यकता नाही.

२ ई. पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी दत्ताचा नामजप

आजकाल समाजातील बहुतांश लोक श्राद्ध, पक्ष इत्यादी करत नसल्यामुळे त्यांना अतृप्त पूर्वजांमुळे त्रास होऊ शकतात. विवाह न होणे, पती-पत्नीचे न जुळणे, गर्भधारणा न होणे, गर्भपात होणे, ही त्रासाची काही लक्षणे आहेत.

१. कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसल्यास पुढे त्रास होऊ नये म्हणून, तसेच जरासा त्रास असल्यास प्रतिदिन १ ते २ घंटे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करावा. उर्वरित वेळी प्रारब्धामुळे त्रास होऊ नये, तसेच आध्यात्मिक उन्नती व्हावी म्हणून कुलदेवतेचा नामजप जास्तीतजास्त करावा.

२. मध्यम त्रास असल्यास कुलदेवतेच्या नामजपासह ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप प्रतिदिन २ ते ४ घंटे करावा. तसेच गुरुवारी दत्ताच्या देवळात जाऊन सात प्रदक्षिणा घालाव्यात.

३. तीव्र त्रास असल्यास कुलदेवतेच्या नामजपाच्या जोडीला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप प्रतिदिन ४ ते ६ घंटे करावा. एखाद्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जाऊन नारायणबली, नागबली, त्रिपिंडी श्राद्ध, कालसर्पशांती, अशांसारखे विधी करावे. त्याच्याच जोडीला एखाद्या दत्तक्षेत्री राहून साधना करावी किंवा संतसेवा करून त्यांचा आशीर्वाद मिळवावा.

४. पितृपक्षात दत्ताचा नामजप केल्याने पितरांना लवकर गती मिळते; म्हणून त्या काळात प्रतिदिन दत्ताचा नामजप घरातील व्यक्तींनी वर दिल्याप्रमाणे आपापल्या त्रासाच्या तीव्रतेनुसार न्यूनतम तेवढा तरी करावा आणि जास्तीतजास्त म्हणजे सतत करावा.

२ उ. वास्तूशुद्धीसाठी उपयुक्त नामजप

वास्तूदोष घालवण्यासाठी वास्तूशांती, उदकशांती यांसारख्या उपाययोजना करतात. बर्‍याचदा वास्तूत रहाणार्‍या व्यक्तींचे स्वभावदोष, वास्तूच्या वापराचे कारण, वास्तूवर होणारा वाईट शक्तींचा परिणाम आदी कारणांमुळे वास्तूत त्रासदायक स्पंदने निर्माण होत रहाण्याची शक्यता असते. अशा त्रासदायक वास्तूत रहात असल्यास वास्तूतील अयोग्य स्पंदनांचा त्याच्या जीवनावर तसेच साधनेवर परिणाम होतो. वास्तू नेहमी चांगल्या स्पंदनांनी भारित रहावी आणि साधनेला पूरक व्हावी, यांसाठी ती स्वच्छ ठेवणे, वास्तूत नियमित तीर्थ किंवा गोमूत्र शिंपडणे यांच्या जोडीलाच वास्तूत नियमित नामजप करणे आवश्यक असते. नामजपातील शक्तीमुळे वातावरण शुद्ध होत असल्याने वास्तूदोष दूर होण्यास लवकर साहाय्य होते. ‘वास्तूत काहीतरी दोष आहे किंवा वास्तूतून येणारी स्पंदने त्रासदायक आहेत’, असे जाणवले, तर वास्तूसाठी कोणता नामजप करावा, हे सूक्ष्मातील कळण्याची चांगली क्षमता असलेल्यांना विचारावे. त्यांनी सूक्ष्मातून शोधून काढलेला नामजप श्रद्धेने करावा. असे विचारणे शक्य नसल्यास आपापल्या कुलदेवतेचा नामजप त्रासाच्या तीव्रतेनुसार ३ ते ९ माळा करावा.

टीप १ – याविषयीचे अधिक विवेचन लेखातील सूत्र क्र. २ इ आणि २ ई यांत केले आहे.(मूळस्थानी)

टीप २ – मांत्रिक किंवा भगत यांच्याकडे गेल्यास लवकर लाभ होऊ शकतो; पण पुनःपुन्हा त्रास होण्याची शक्यता असते. याउलट हनुमान, काली इत्यादी देवतांची उपासना केल्यास त्रास दूर होण्यास वेळ लागला, तरी साधनेने शक्ती वाढल्यामुळे पुनःपुन्हा त्रास होत नाही. जरासा त्रास असल्यास स्वतःच्या साधनेने तो दूर करावा आणि जास्त असल्यास मांत्रिक किंवा भगत यांच्याकडे जात असतांना स्वतःही साधना करावी.(मूळस्थानी)

 

मोठ्या वा दीर्घकाळ टिकणार्‍या शारीरिक किंवा मानसिक त्रासांवर मात करण्यासाठी साधना अपरिहार्य !

‘प्रत्येकाला जीवनात कोणता ना कोणतातरी शारीरिक किंवा मानसिक त्रास असतोच. लहानसा शारीरिक किंवा मानसिक त्रास हा शारीरिक किंवा मानसिक उपचारांनी बरा होऊ शकतो; परंतु या उपचारांनी लाभ न होणार्‍या, मोठ्या स्वरूपाच्या वा दीर्घकाळ टिकणार्‍या शारीरिक किंवा मानसिक त्रासांच्या मुळाशी शारीरिक किंवा मानसिक कारणांच्या जोडीला आध्यात्मिक कारणेही असतात. असे त्रास बरे होण्यासाठी शारीरिक किंवा मानसिक उपायांच्या जोडीला आध्यात्मिक उपायही करणे आवश्यक ठरते. अशा शारीरिक किंवा मानसिक त्रासांच्या संदर्भात पुढीलप्रमाणे करावे.

अ. शारीरिक त्रासासाठी शारीरिक उपाय करावेत, उदा. वैद्यांकडून उपाय करून घ्यावेत आणि त्याच्या जोडीला आध्यात्मिक उपाय, म्हणजे साधना, नामजप, यज्ञ, धार्मिक विधी इत्यादी करावे.

आ. मानसिक त्रासासाठी मानसिक उपाय करावेत, उदा. स्वयंसूचना घ्याव्यात किंवा मानसोपचार तज्ञांकडून उपाय करून घ्यावेत आणि त्याच्या जोडीला आध्यात्मिक उपाय, म्हणजे साधना, नामजप, यज्ञ, धार्मिक विधी इत्यादी करावे.

थोडक्यात मोठ्या वा दीर्घकाळ टिकणार्‍या शारीरिक किंवा मानसिक त्रासांवर मात करण्यासाठी साधना अपरिहार्य आहे.

– (पू.) श्री. संदीप आळशी, रामनाथी आश्रम, गोवा. (२२.४.२०१४)

 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘नामजपाचे महत्त्व आणि लाभ’

Leave a Comment