test 2

सनातनची संतरत्ने

६१ वे संत पू. अनंत (तात्या) पाटील

संतपद : १९.०७.२०१६
देहत्याग : २५.०३.२०२०

नागोठणे (जिल्हा रायगड) येथील पू. तात्या हे वृद्ध वयातही पायपीट करून दैनिकाचे वितरण करत असत. अत्यंत कठीण परिस्थितीत पू. तात्यांनी अखंड नामजप करून अनेक अडचणींवर मात केली. निरपेक्षपणाने प्रत्येक कृती करणे, हा तात्यांचा स्थायीभाव असून त्यामुळे वृद्धापकाळीही ते सतत आनंदी राहू शकतात. भगवंतावरील दृढ श्रद्धेमुळे कठीण प्रसंगांतही आनंदावस्थेत रहातात.

६२ व्या संत पू. (सौ.) सुमन नाईक

संतपद : १९.०७.२०१६

कपिलेश्‍वरी, फोंडा येथील पू. सुमन (मावशी) नाईक म्हणजे प्रेमभाव आणि तत्त्वनिष्ठता यांचा अनोखा संगम ! त्या सर्वांना सहजतेने आपलेसे करून घेतात. साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती व्हावी, याची त्यांना पुष्कळ तळमळ आहे. त्या साधकांना साधनेसाठी सर्वतोपरी साहाय्य करतात आणि वेळोवेळी तत्त्वनिष्ठतेने त्यांच्या चुकाही लक्षात आणून देतात. या वयातसुद्धा कोणतीही सेवा करण्याची त्यांची सिद्धता आहे. ऊन-पाऊस कशाचीही तमा न बाळगता त्या धर्मप्रसाराची सेवा तळमळीने करत आहेत. अधिकाधिक जणांपर्यंत साधना पोचावी, तसेच त्यांच्यात राष्ट्र-धर्म यांच्याप्रती जागृती व्हावी, यासाठी त्या गावा-गावांत जाऊन प्रसार करतात. (आता पू. (श्रीमती) सुमन नाईक)

६३ व्या संत पू. (सौ.) सुशीला मोदी

संतपद : १९.०७.२०१६

जोधपूर येथील पू. मोदीभाभींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी तन, मन आणि धन यांचा, म्हणजेच सर्वस्वाचा त्याग केला आहे. त्यांच्यात साधकांप्रती अतीव प्रेमभाव असून घरी येणार्‍या साधकांची त्या आईच्या वात्सल्याने काळजी घेतात. या वयातही त्या अखंड सेवारत असतात. प्रत्येक सेवेचा परिपूर्णरित्या अभ्यास करून तत्परतेने ती पूर्ण करण्याची त्यांना तळमळ आहे. संपूर्ण भार भगवंतावर सोपवून कठीण प्रसंगातही स्थिर रहाणार्‍या पू. भाभी अखंड भावावस्थेत असतात.या वयातही त्या अखंड सेवारत असतात. प्रत्येक सेवेचा परिपूर्णरित्या अभ्यास करून तत्परतेने ती पूर्ण करण्याची त्यांना तळमळ आहे. संपूर्ण भार भगवंतावर सोपवून कठीण प्रसंगातही स्थिर रहाणार्‍या भाभी अखंड भावावस्थेत असतात.

६४ व्या संत पू. श्रीमती शेऊबाई लोखंडेआजी

संतपद : ७.०२.२०१७

पू. (श्रीमती) लोखंडेआजी यांनी अनेक वेळा पंढरपूरची पायी वारी केली आहे. पू, आजी दिवसभर देवाच्या अनुसंधानात असतात आणि ‘कृष्ण, कृष्ण’, असा नामजप अखंड करत असतात. पू, आजी नेहमी परेच्छेने आणि ईश्‍वरेच्छेने वागतात. पू, आजींचा विवाह लहान वयातच झाला होता. त्यांना लहानपणापासूनच पुष्कळ कष्ट करावे लागले. त्यांना जीवनात पुष्कळ दुःख पचवावे लागले. त्यांची दोन मुले दोन वर्षांची असतांनाच मृत्यू पावली. त्याचे दुःख त्यांनी जड अंतःकरणाने सहन केले. सर्व भार देवावर सोपवून पू, आजी निरागसपणे सतत देवाच्या अनुसंधानात रहातात.

६५ वे संत पू. श्री. जनार्दन वागळेआजोबा

संतपद : १५.०२.२०१७

देवीहसोळ (तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी) येथील पू. (श्री.) जनार्दन वागळे आजोबा हे जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीला येतात, तेव्हा त्यांच्या मनात ‘त्यांना भेटावे आणि तो आनंद घेऊन पुढच्या भेटीपर्यंत हृदयात टिकवून ठेवावा’, असा भाव असतो. पू. वागळेआजोबांनी मन अर्पण करून देवाला जिंकून घेतले आहे. पू. आजोबा प्रत्येक प्रसंगात स्थिर असतात. पू. आजोबा प्रत्येक कृती नियोजनपूर्वक आणि विचारून करतात.  पू. आजोबा निर्विचार स्थितीमध्ये असतात.

६६ व्या संत पू. श्रीमती नंदिनी मंगळवेढेकरआजी

संतपद : २१.०२.२०१७

सोलापूर येथील श्रीमती नंदिनी नारायण मंगळवेढेकरआजी वयाची मर्यादा असूनही अडीच वर्षांत ९ टक्के आध्यात्मिक पातळी वाढलेल्या पू. मंगळवेढेकरआजी एकमेवाद्वितीय आहेत. सेवेसाठी बाहेर जाता येत नाही, याचे दु:ख करत बसण्यापेक्षा आजींनी घरात बसून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आळवले, तसेच अनेक संकटे येऊनही स्थिर राहून परिस्थिती स्वीकारली. आपला पृथ्वीवरचा जन्म हा सुख उपभोगण्यासाठी नाही, तर साधना करण्यासाठी आहे, हे सतत आपण लक्षात ठेवले पाहिजे. आजींच्या उदाहरणावरून साधना करण्यासाठी वयाचे बंधन नाही. हे बंधन तोडण्याची क्षमता ईश्‍वर देतो, हेच सिद्ध होते.

६७ व्या संत पू. श्रीमती प्रभा मराठेआजी

संतपद : २३.०४.२०१७

सिंहगड रस्ता (पुणे) येथील पू. मराठेआजींचा प.पू. डॉक्टरांप्रती पुष्कळ भाव आहे. त्यांच्या यजमानांचे निधन झाल्यानंतर आम्ही जेव्हा त्यांना भेटलो, तेव्हा आजींना विचारले, ‘आजी, आता थोडे एकटे वाटत असेल ना !’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘अगं, एकटे कशाला ! प.पू. डॉक्टर आहेत ना समवेत !’ त्या प्रत्येक कृती मानसरित्या प.पू. डॉक्टरांना अर्पण करतात. ‘प.पू. डॉक्टर सूक्ष्मरूपाने प्रत्यक्षात तेथेच आहेत’, असे त्या वेळी जाणवते. पू. मराठेआजी यांच्यामध्ये पुष्कळ प्रेमभाव असून त्यांची सेवेची तळमळही पुष्कळ आहे. उतारवयातही त्यांनी अध्यात्मप्रसार करणे, भर उन्हात भित्तीपत्रके लावणे, गुरुपौर्णिमेचा प्रसार करणे आदी सेवा उत्साहाने केल्या आहेत.

६८ व्या संत पू. (सौ.) केवळबाई पाटील

संतपद : ०३.०७.२०१७

प्रेमळ, स्थिर आणि सतत देवाच्या अनुसंधानात अन् भावावस्थेत असणार्‍या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावजवळील बोर्खेडे बु. येथील पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजी सनातनच्या ६८ व्या संतपदी विराजमान झाल्या. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रत्यक्ष पाहिलेले नसतांनाही शबरीप्रमाणे उत्कट भक्तीने गुरूंची कृपा संपादन केली. आजी अशिक्षित आहेत. तसेच त्या एका खेडेगावात रहातात, तरी त्या गावातील बरेच लोक आजींकडे सनातनची सात्त्विक उत्पादने घेण्यास येत. त्या वेळी आजी उत्पादनांचे महत्त्व एवढे पटवून सांगायच्या की, लोकांना उत्पादनांविषयी श्रद्धाच निर्माण होत असे. कोणाला काही अडचण असेल, तर आजी ती समजून घेऊन त्यांना कापूर, विभूती किंवा गोअर्क वापरण्याविषयी सांगत. ‘या उपायांनी बरे वाटते’, असे त्या सांगत. आजींचे बोलणे फारच प्रेमळ आहे. साधक वयाने लहान किंवा मोठा असो, तरी आजी सर्वांशी आदराने बोलतात.

६९ व्या संत पू. (सौ.) अश्‍विनी पवार

संतपद : ०९.०७.२०१७

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांच्याविषयी काढलेले उद्गार पुढीलप्रमाणे – “अवघ्या २७ व्या वर्षी तिने सनातनचे ६९ वे समष्टी संतपद प्राप्त करून सनातनच्या इतिहासात एक अनोखे पर्व निर्माण केले आहे. इतक्या लहान वयातही संत बनता येते, याचे अद्वितीय उदाहरण तिने सर्वांसमोर ठेवले आहे. साधनेत प्रगती होतांना काहीजण बाल्य, वानस्पत्य किंवा पैशाचिक अवस्थेतून पुढे वाटचाल करतात. बाल्यावस्थेतून संतपदापर्यंत कशी वाटचाल होते, हे सौ. अश्‍विनी हिच्या वाटचालीतून आम्हाला अभ्यासता आले. सनातन संस्थेचे विश्‍वस्तपद किंवा आश्रमाचे कोणतेही अधिकारपद नसतांना केवळ अंगीभूत असणार्‍या आध्यात्मिक गुणांच्या आधारे साधकांना साधनेत मार्गदर्शन करून सौ. अश्‍विनी पवार यांनी समष्टी संतपद गाठले.”

७० व्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन्

संतपद : १७.९.२०१७

श्रीकृष्णाप्रती उत्कट भाव असलेल्या चेन्नई येथील सौ. उमा रविचंद्रन् या संतपदी विराजमान झाल्या. चित्रकलेचे शिक्षण घेतलेले नसतांनाही कलात्मक दृष्टी आणि ईश्‍वराप्रती असलेला उत्कट अन् निरागस भाव यांमुळे सौ. उमा रविचंद्रन् यांनी बालक भावातील अनेक सुंदर चित्रे रेखाटली आहेत. त्यांची ही चित्रे म्हणजे कृष्णभक्तीचा एक अनोखा आविष्कार आहे. त्यांनी सहजतेने रेखाटलेल्या सर्वच चित्रांत अत्यंत जिवंतपणा आला आहे. त्यांच्या सर्वांगस्पर्शी चित्रकलेचे वैशिष्ट्य म्हणजे जगभरातील साधकांना आपल्या मनातील भाव या चित्रांतून व्यक्त होत आहे, अशी अनुभूती येते. चित्रकलेसोबत त्यांना वीणावादन आणि गायनही येते. ठिकठिकाणच्या हिंदुत्वनिष्ठांचे संघटन करून त्यांना हिंदुत्वाच्या कार्यात सहभागी करून घेणे, कोणत्याही परिस्थितीत गुरुसेवेशी शतप्रतिशत एकरूप होऊन समष्टी सेवेत रहाणे, ही पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांची काही वैशिष्ट्ये आहेत. व्यष्टी साधनेअंतर्गत अत्युच्च भाव आणि समष्टी साधनेअंतर्गत गुरुसेवेची तीव्र तळमळ असणे, असा व्यष्टी-समष्टीचा सुरेख संगम पू. (सौ.) उमाक्का यांच्या ठायी पहायला मिळतो.

७१ व्या संत पू. श्रीमती आशा दर्भेआजी

संतपद : ९.११.२०१७
देहत्याग : २२.७.२०२३

अखंड ईश्‍वराच्या अनुसंधानात रहाणार्‍या आणि प्रापंचिक दायित्व निरपेक्षतेने पार पाडून संसारही साधना म्हणून करणार्‍या श्रीमती आशा दर्भेआजी (वय ८८ वर्षे) यांनी संतपद प्राप्त केले. मूलतः सात्त्विक वृत्ती असलेल्या श्रीमती आशा भास्कर दर्भे यांनी हलाखीच्या परिस्थितीतही आनंदाने संसार केला. निर्मळ मन आणि निरपेक्ष प्रीती या गुणांद्वारे आणि धर्माचरणामुळे त्यांची संसारातही साधना होत राहिली. आजींच्या उदाहरणावरून लक्षात येते की, पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धतीमुळे संसार करता करता कोणत्याही बाह्य मार्गदर्शनाविना स्त्रियांची साधना होऊन त्यांचा मनोलय आणि अहंलय होऊन त्यांची साधनेत प्रगती होत असे. देवावर दृढ श्रद्धा आणि अल्प अहं यांमुळे जलद आध्यात्मिक प्रगती करणार्‍या आजींनी सर्व साधकांसमोर मोठा आदर्श ठेवला आहे.

७२ वे संत पू. श्री. नीलेश सिंगबाळ

संतपद : १८.१२.२०१७
सद्गुरुपद : २९.६.२०२२

पूर्व उत्तरप्रदेश, झारखंड, बंगाल आणि ओडिशा या राज्यांचे सनातनचे प्रसारसेवक तथा सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे पती श्री. नीलेश सिंगबाळ हे संतपदावर विराजमान झाले. श्री. नीलेश सिंगबाळ सतत शिकण्याच्या स्थितीत असतात. त्यांच्यात चिकाटी, वात्सल्यभाव, इतरांना समजून घेणे, शांत वृत्ती, स्थिरता, ध्येयनिष्ठता, तत्त्वनिष्ठता, सेवेतील परिपूर्णता, त्याग आणि निरपेक्ष प्रेम (प्रीती), अशा अनेक आध्यात्मिक गुणांचा समुच्चय आहे.’गृहस्थाश्रमी असूनही संन्यस्त जीवन कसे जगावे’, याचा आदर्श पू. नीलेश सिंगबाळ यांनी सर्वांसमोर ठेवला आहे. नम्रता, निरपेक्षता, विचारून करणे, सेवेचा उत्तरदायी साधकांना आढावा देणे आदी दैवी गुणांमुळे श्री. नीलेश सिंगबाळ यांनी संतपद गाठले आहे.

७३ वे संत पू. प्रदीप खेमका

संतपद : ५.६.२०१८

पू. प्रदीप खेमका यांनी संतपद प्राप्त केले. हे पहिले उद्योजक संत झाले आहेत. ते त्यांचा व्यवसाय सांभाळून तळमळीने धर्मप्रसाराची सेवा करतात. नम्रता, आज्ञापालन आणि भगवंतावरील निष्ठा यांमुळे कोणत्याही कठीण प्रसंगात ते नेहमीच सकारात्मक रहातात. साधकांची पित्याच्या भावाने काळजी घेऊन त्यांना साधनेत, तसेच सेवेत येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी ते तत्परतेने सर्वतोपरी साहाय्य करतात. ‘व्यवसाय माझा नाही, तर ईश्‍वराचा आहे’, असा भाव ठेवून ते प्रत्येक कृती करतात. यातून त्यांच्यातील श्री गुरूंप्रतीचा अत्युच्च भाव लक्षात येतो. पू. खेमकाभैय्या नेहमी सकारात्मक असतात. ‘ते स्वतः सकारात्मक रहातात आणि समवेतच्या सर्वांना सकारात्मक ठेवतात’, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे

७४ व्या संत पू. (सौ.) संगीता जाधव

संतपद : ५.६.२०१८

पू. (सौ.) संगीता जाधव यांनी संतपद प्राप्त केले. पू. (सौ.) संगीता जाधव यांना तीव्र शारीरिक आजार असतांनाही त्या झोकून देऊन परिपूणरित्या धर्मप्रसार करतात.सर्व सेवांचे त्या उत्तम नियोजन करतात. त्या साधकांच्या घरातल्यांची चौकशी करणे, रुग्णाईत साधकांची चौकशी करणे, त्रास होत असलेल्या साधकांना आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करणे इत्यादी गोष्टी करून त्यांच्याशी जवळीक साधतात. सौ. जाधवकाकू स्वतःच्या मनाने कोणताच निर्णय घेत नाहीत. साधकांनी विचारलेले प्रत्येक सूत्र काकू सद्गुरु अनुताईंना विचारतात.सौ. जाधवकाकूंच्या मनात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी अपार श्रद्धा आहे. त्यांच्या बोलण्यातून सतत गुरुदेवांप्रती कृतज्ञता प्रकट होत असते.

७५ वे संत पू. रमानंद गौडा

संतपद : ५.६.२०१८

पू. रमानंद गौडा यांनी संतपद प्राप्त केले. पू. रमानंद गौडा जेव्हापासून कर्नाटकचे धर्मप्रसाराचे कार्य सांभाळायला लागले, तेव्हापासून कर्नाटकातील २१० हून अधिक साधक ६० टक्के आणि त्याहूनही अधिक आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाले आहेत आणि राज्यात धर्मप्रसाराचे कार्यही वेगाने वाढले आहे. पू. रमानंददादांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आहे. ते सतत देवाच्या अनुसंधानात असतात आणि प्रत्येक क्षणी कृतज्ञताभावाने गुर्वाज्ञा म्हणून जीवन जगतात. भजन ऐकतांना आणि जप करतांना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वहातात. त्यांना ‘गुरुदेवांच्या साधकांनी संघटितपणे, एकमेकांना साहाय्य करत प्रगती करायला हवी’, हा एकच ध्यास असतो. त्यांना ‘प्रत्येक साधकाची व्यष्टी साधना नियमित व्हावी, यासाठी आणि साधकांची समष्टी साधनाही परिपूर्ण व्हावी’, याची तळमळ असते.’

७६ व्या संत पू. (श्रीमती) पुतळाबाई (माई) देशमुख

संतपद : २२.७.२०१८

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील सनातनच्या साधिका श्रीमती पुतळाबाई (माई) देशमुख (वय ७० वर्षे) यांनी संतपद प्राप्त केले. पू. माईंना तीव्र शारीरिक त्रास आहेत. असह्य वेदना सहन करत त्या धर्मप्रसाराची सेवा करतात. पावसात भिजत असतांनाही स्वत:च्या शरिराचा कोणताही विचार न करता त्या सेवा करतात.पू. माईंना लिहिता येत नाही, तरीही त्या कौशल्याने भावाच्या स्तरावर सेवा करतात. त्या कधीच कुणाविषयी वाईट बोलत नाहीत. त्यांना सहसाधक किंवा समाजातील व्यक्ती यांच्याविषयी पूर्वग्रह, राग किंवा नकारात्मक विचार नसतो.माईंना समाजात मान आहे; पण त्यांच्या वागण्या-बोलण्यातून मोठेपणा किंवा वेगळेपणा जाणवत नाही.

७७ व्या संत पू. (श्रीमती) सत्यवती दळवीआजी 

संतपद : २८.७.२०१८

गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी  सनातनच्या देवद येथील आश्रमात झालेल्या चैतन्यदायी सोहळ्यात पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी श्रीमती सत्यवती शांताराम दळवीआजी या संतपदी विराजमान झाल्याची भावपूर्ण घोषणा केली. श्रीमती दळवीआजींना जीवनात अत्यंत खडतर प्रसंगांना सामोरे जावे लागले. तसेच त्यांना अनेक शारीरिक आजारही आहेत; परंतु ही सर्व परिस्थिती त्यांनी कोणतीही तक्रार न करता स्वीकारली आहे. याही स्थितीत त्यांचा कृतज्ञतेचा भाव सतत जागृत असतो.पू. (श्रीमती) दळवीआजी रुग्णाईत असल्यावरही प्रतिदिन ७ – ८ घंटे सेवा करत होत्या. रुग्णाईत आहेत म्हणून त्यांच्या सेवेची गती कधीच अल्प झालेली नव्हती. एक दिवसही त्यांना सेवा नसेल, तर त्या अस्वस्थ होत.पू. आजींची ‘सर्व वस्तू गुरूंनीच दिल्या आहेत’, असा भाव असतो. त्यामुळे त्या कोणतीच वस्तू ‘माझी आहे’, असे म्हणत नाहीत.

७८ वे संत पू. श्री. चंद्रसेन मयेकर

संतपद : २९.७.२०१८

राजापूर (जिल्हा रत्नागिरी) येथील साधक श्री. चंद्रसेन मयेकर हे सनातनच्या ७८ व्या व्या संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सनातनच्या ७ व्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी रत्नागिरी येथे झालेल्या भावसोहळ्यांत दिली.काकांच्या पायाला जखम झालेली असतांनाही ते तळमळीने दैनिक सनातन प्रभातच्या वितरणाची सेवा करत असत.मयेकरकाकांचे वय ८० वर्षे असूनही त्यांची सेवा करण्याची पुष्कळ तळमळ आहे. ते नेहमी ‘आपण चांगल्या धर्माभिमानी युवकांचे संघटन करूया, म्हणजे आपल्याला सभा आणि आंदोलने घ्यायला अडचण येणार नाही. आपल्याकडे गुरुदेवांचे लक्ष आहे’, असे ते साधकांना सांगतात. नियमित २ घंटे समष्टी सेवा करणारे केंद्रातील ते एकमेव साधक आहेत. ते प्रत्येक सेवा समयमर्यादेत आणि परिपूर्ण करतात. त्यांच्या बॅगेत सेवेसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध असते.

७९ वे संत पू. श्री. श्रीकृष्ण आगवेकर 

संतपद : २९.७.२०१८

चिपळूण येथील साधक श्री. श्रीकृष्ण आगवेकर हे सनातनच्या ७९ व्या संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सनातनच्या ७ व्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी चिपळूण येथे झालेल्या भावसोहळ्यांत दिली. पू. श्रीकृष्ण आगवेकर सेवा पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असत. सर्व सेवा, पूजा अन् नामजप नियमित करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.त्यांनी सेवा करतांना कधीही आळस केला नाही. त्यांच्या क्षमतेनुसार शिकून ते सेवा करतात. त्यांना साधनेविषयी कधीही निराशा आणि विकल्प आला नाही. घरात अडचणी असल्या, तरी त्यांची गुरूंवर अखंड श्रद्धा आहे.काकांचे राहणीमान पुष्कळच साधे आहे.त्यांचे गुडघे दुखतात, तरीही गुरुपौर्णिमेच्या वेळी त्यांनी समाजात जाऊन अर्पण घेण्याची सेवा केली.

८० व्या संत पू. श्रीमती पार्वती ननावरेआजी 

संतपद : ०१.०८.२०१८

पुणे येथील श्रीमती पार्वती ननावरेआजी (वय ७४ वर्षे) ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातनच्या ८० व्या  संतपदी विराजमान झाल्या. पू. (श्रीमती) पार्वती ननावरेआजी घरी राहून व्यष्टी साधना, तसेच आश्रमासाठी पायपोस शिवण्याची सेवा करायच्या. त्यांचे अंतर्मनातून ईश्‍वराशी अखंड अनुसंधान होते. त्यांची आंतरिक साधना, तळमळ आणि भाव यांमुळे एका वर्षात चार टक्के आध्यात्मिक पातळी वाढून त्या संतपदी पोहोचल्या.

८१ व्या संत पू. श्रीमती माया गोखलेआजी

संतपद : ०१.०८.२०१८

चिंचवड येथील श्रीमती माया गोखलेआजी (वय ७४ वर्षे) ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातनच्या ८१ व्या संतपदी विराजमान झाल्या.आजी पुष्कळ प्रेमळ आहेत. प्रेमभाव हा त्यांचा  स्थायीभाव आहे. त्यांच्या मनात कोणाविषयीही कणभरही पूर्वग्रह नसतो. त्यांचा परमपूज्य गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव आहे. त्यांच्या सारणी लिखाणामध्ये, उपायांमध्ये सातत्य असते. रात्री झोपायला कितीही वाजले, त्या तरी ती पहाटे ५ वाजता उठून मानसपूजा करतात. त्यांच्यात स्वःला पालटण्याची आणि प्रयत्न करण्याची पुष्कळ तळमळ आहे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत सातत्य असते. परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांचा ‘छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ २४ घंटे त्यांच्यासह असतो. प्रतिदिन रात्री झोपतांना त्या सर्व संतांच्या छायाचित्रांना नमस्कार करून झोपतात.

८२ वे संत पू. श्री. बलभीम येळेगावकर

संतपद : ५.११.२०१८

देवद येथील सनातनच्या आश्रमामध्ये एका भावसोहळ्यात आश्रमातील साधक श्री. बलभीम येळेगावकर हे संतपदी विराजमान झाले. ‘श्री. बलभीम येळेगावकरआजोबा जसे येळेगावकर कुटुंबियांसाठी साधनेमध्ये आदर्श आहेत, तसेच ते सनातनच्या सर्व साधकांसाठी त्यांच्यातील साक्षीभाव, स्थिरता, नम्रता आणि मायेपासून अलिप्तता या गुणांमुळे आदर्श आहेत. देवद आश्रमामध्ये आध्यात्मिक उपायांसाठी मंत्रजप किंवा नामजप करायचा असेल, तर येळेगावकरआजोबांचेच नाव प्रथम तोंडामध्ये येते. ते ती सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करतात.

८३ व्या संत पू. श्रीमती गीतादेवी खेमका

संतपद : ९.१२.२०१८

जयपूर (राजस्थान) येथील सनातनच्या साधिका तथा झारखंड राज्याचे धर्मप्रसारसेवक पू. प्रदीप खेमका यांच्या मातोश्री श्रीमती गीतादेवी खेमका या संतरत्न पदावर विराजमान झाल्या. एकाच कुटुंबात माता आणि पुत्र संत असल्याचे हे दुर्मिळ उदाहरण होय ! पू. खेमकाआजी यांना कर्करोग झाल्यानंतर त्यांच्यावर ‘केमोथेरपी’ करण्यात आली. या उपचारामुळे रुग्णाचा तोंडवळा काळा पडतो; परंतु पू. खेमकाआजी यांचा तोंडवळा काळा पडण्याऐवजी उजळला आहे. साधनेचे बळ आणि चैतन्य यांमुळे असे झाले आहे.

८४ व्या संत पू. (सौ.) सुनीता खेमका

संतपद : १६.०२.२०१९

कुंभक्षेत्री एका भावसोहळ्यात सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी झारखंड येथील सनातनच्या साधिका सौ. सुनीता प्रदीप खेमका या सनातनच्या ८४ व्या संत झाल्याची घोषणा केली.पू. सुनीता खेमका या संतपदी विराजमान झाल्यानंतर एकाच परिवारातील ३ जण संत झाल्याची सनातनच्या इतिहासात नोंद झाली. पू. सुनीता खेमका यांचे पती पू. प्रदीपदादा आणि त्यांच्या सासू पू. गीतादेवी खेमका यांनीही संतपद प्राप्त केले आहे. कतरास येथे गेल्यावर पू. सुनीतादीदी साधकांची पूर्ण काळजी घेतात. त्यामुळे तेथून प्रवासाला निघतांना काही विचार करावा लागत नाही. त्यांचा नातू कु. श्रीहरि याच्यावरही ते साधनेचे संस्कारच करत आहेत. त्यांचे पूर्ण कुटुंब गुरुदेवमय आणि सनातनमय झाले आहे.

८५ व्या संत पू. (सौ.) संगीता पाटील

संतपद : ३०.०३.२०१९

भोसरी (पुणे) येथे झालेल्या भावसोहळ्यात भोसरी येथील सौ. संगीता पाटील या संतपदी विराजमान झाल्या. ‘आजारपणात आलेली दृष्टीहीनता, हालाखीची आर्थिक परिस्थिती, अल्प शिक्षण, शारीरिक आजार, यजमानांचे आजारपण, अशा परिस्थितीतही न डगमगता पू. (सौ.) संगीता पाटील भोळ्या भावाने आनंदाने साधनारत आहेत’, अशी त्यांची गुणवैशिष्ट्ये सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी उलगडून दाखवली.सौ. संगीता महादेव पाटील यांनी बालपणापासून अत्यंत खडतर आयुष्य जगतांना देवावरील निष्ठा कधीही ढळू दिली नाही. त्यांच्या भोळ्या भावामुळे देवही त्यांच्या प्रत्येक हाकेला जणू धावून येत होता. आजारपणामुळे त्यांना अंधत्व आले आणि साधना करू लागल्यानंतर त्यांना मोठी अनुभूती आली, ती म्हणजे त्यांना थोडे थोडे दिसू लागले. आपण संत जनाबाई, संत सखूबाई यांच्या गोष्टींमध्ये ऐकतो ना की, प्रत्यक्ष देवच त्यांच्या साहाय्याला येत होता.

८६ व्या संत पू. श्रीमती शालिनी माईणकरआजी

संतपद : २३.४.२०१९
देहत्याग : ११.५.२०२१

एका सत्संगसोहळ्यात पू. माईणकरआजी संतपदी विराजमान झाल्या. त्या प्रत्येक क्षणी शांत आणि आनंदी असतात.त्या गुरुचरित्राचे पठण करणे, दत्तमाला मंत्राचे पठण करणे, तसेच प्रार्थना आणि समष्टीसाठी दिवसभर नामजप करणे, अशी साधना करतात. मुळातच सात्त्विक वृत्ती आणि अहं अल्प असलेल्या श्रीमती माईणकरआजींनी संसारातील प्रत्येक खडतर प्रसंगाला सहनशीलतेने तोंड दिले. प्रत्येक प्रसंग त्यांनी ‘ईश्‍वरेच्छा’ म्हणून स्वीकारला आणि ‘अध्यात्म प्रत्यक्ष कृतीत कसे आणायचे ?’, याची शिकवण सर्वांना दिली. ‘संसारी असून देहे चित्त राहो चरणांसी’, अशी स्थिती असलेल्या आजींची अंतर्मनातून साधना होत राहिली. नम्रता, निरपेक्ष प्रीती आणि अनासक्त वृत्ती यांमुळे ‘संसारात राहूनही जलद आध्यात्मिक उन्नती करून घेता येते’, याचे उत्तम उदाहरण म्हणजे माईणकरआजी !

८७ वे संत पू. डॉ. नीलकंठ दीक्षित

संतपद : २५.४.२०१९
देहत्याग : २७.०७.२०२०

बेळगाव (कर्नाटक) येथील डॉ. नीलकंठ अमृत दीक्षित हे संतपदी ‍विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. आयुष्यभर तत्त्वनिष्ठतेने वागून रुग्णसेवा करणार्‍या आणि प्रसंगी रुग्णांवर विनामूल्य उपचार करणार्‍या डॉ. दीक्षितआजोबांनी सध्याच्या वैद्यकीय व्यावसायिकांपुढे मोठा आदर्श ठेवला आहे. त्यांनी आयुष्यभर आचारधर्माचे काटेकोरपणे पालन केले. या वयातही त्यांना असलेली ज्ञानग्रहणाची आवड आणि त्यांची जिज्ञासा कौतुकास्पद आहे. ते सतत निर्विचार स्थितीत आणि अखंड भावावस्थेत असतात.

८८ व्या संत पू. श्रीमती इंदिरा नगरकरआजी

संतपद : ६.५.२०१९

सोलापूर येथील श्रीमती इंदिरा नगरकरआजी संतपदी विराजमान झाल्या. आजींमधील स्थिरता, सेवाभावी वृत्ती आणि देवावरील दृढ श्रद्धा हे गुण सर्वच साधकांसाठी अनुकरणीय असून या गुणांद्वारेच आजींनी संतपद प्राप्त केले आहे. आजींना अनेक वेळा प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागले; पण देवावर असलेल्या दृढ श्रद्धेमुळे त्या प्रत्येक प्रसंगाला स्थिरतेने सामोर्‍या गेल्या. कठीण प्रसंगांकडेही साक्षीभावाने पाहून त्यांनी स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घेतली.संकटांची मालिका चालू असतांना श्रीगुरूंवरील ठाम श्रद्धा आणि साधना करण्याची तीव्र तळमळ यांमुळे आजी संत होऊ शकल्या.

८९ वे संत पू. सदाशिव परांजपे

संतपद : १३.५.२०१९

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचे वडील श्री. सदाशिव परांजपे संतपदी विराजमान झाले. हे दोघेही पहिल्यापासून धार्मिक वृत्तीचे आहेत. त्यांनी उतारवयात साधनेला आरंभ केला आणि या वयात संगणक शिकून ते तळमळीने संगणकीय सेवाही करू लागले. ते दोघेही एकमेकांना साधनेत साहाय्य करतात. ते परस्परांशी एवढे एकरूप झाले आहेत की, ‘पती-पत्नी’ या नात्याच्या पुढे जाऊन त्यांच्यात एक सुंदर आध्यात्मिक नाते निर्माण झाले आहे. व्यावहारिक कर्तव्ये उत्कृष्टपणे पार पाडतांना ‘आध्यात्मिक जीवन कसे जगायचे ?’, याचा त्यांनी वस्तूनिष्ठ आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. या उभयतांमधील भाव, निर्मळता आणि धर्माचरण यांमुळे त्यांच्या घरातही चैतन्य निर्माण होऊन त्यांच्या घराचा जणू आश्रमच बनला आहे. पू. परांजपेआजोबा आणि आजी यांच्यामध्ये पुष्कळ सहजता अन् मोकळेपणा आहे.

९० व्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपे

संतपद : १३.५.२०१९

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचे वडील श्री. सदाशिव परांजपे आणि त्यांच्या मातोश्री सौ. शैलजा परांजपे हे दोघेही संतपदी विराजमान झाले. व्यावहारिक कर्तव्ये उत्कृष्टपणे पार पाडतांना ‘आध्यात्मिक जीवन कसे जगायचे ?’, याचा त्यांनी वस्तूनिष्ठ आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. संत पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे यांच्यातील बोलणे अन् त्यांच्या कृती या समष्टीसाठीच असतात. दोघे सतत साधकांचा विचार करतात. साधकांसाठी नामजप करतात. ‘प.पू. गुरुदेव, मी सतत देवाच्या अनुसंधानात रहावे आणि माझे आयुष्य नामस्मरणात जावे’, असे पू. (सौ.) परांजपे आजींना सतत वाटते. शारीरिक दुखणे होत असले, तरी देवाचे केल्याविना पू. आजींना चैन पडत नाही.

९१ व्या संत श्रीमती हिरा मळये

संतपद : १३.५.२०१९

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मातोश्री निर्मळता, निरपेक्षता आणि भगवद्भक्ती या गुणांद्वारे संतपदी विराजमान झाल्या. त्या भक्तीमार्गी असण्यासह कर्ममार्गीही आहेत. त्या सकाळपासून रात्री झोपेपर्यंत सेवाभावी वृत्तीने अखंडपणे कार्यरत असतात. त्यांच्या अत्यंत शांत आणि सोज्वळ अशा स्वभावामुळे त्या सर्वांना प्रिय आहेत. त्यांचे पती पू. वसंत मळये स्वातंत्र्यसैनिक होते. स्वातंत्र्यसैनिक असल्यामुळे त्यांना कारागृहातही काही काळ रहावे लागले होते. या काळात गृहस्थी जीवन, मुलांचे संगोपन आणि कुलाचारांचे पालन करत असतांना त्या धैर्याने जीवन जगल्या. देशाच्या कल्याणासाठी त्यांनी सांसारिक जीवनाचाही त्याग केलेला आहे. स्वभावात कुणाविषयीही भेदभाव नसणे, व्यापक आणि निरपेक्ष प्रेम, सहनशीलता, नम्रता, भगवंताशी अनुसंधान, त्याग आणि अल्प अहं या गुणांमुळे त्या कर्मयोग अन् भक्तीयोग यांचा एक सुंदर संगम आहेत. त्यांच्या या दैवी गुणांमुळे जीवनातील कठीण प्रसंगांना त्या देवाला आळवून आणि शरण जाऊन सामोरे गेल्या.

९२ वे संत कै. वसंत मळये

संतपद : १३.५.२०१९
देहत्याग : २६.०६.२०१३

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे वडील कर्मयोगी, समाजसेवक आणि थोर स्वातंत्र्यसैनिक कै. पू. वसंत मळये संतपदी विराजमान झालेत. ते अत्यंत मनमिळाऊ, प्रेमळ, त्यागी, एक कर्मयोगी आणि समाजशास्त्रज्ञ होते. गोवा स्वातंत्र्य चळवळीत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. या काळात त्यांनी कारागृहातील यातनाही सहन केल्या होत्या. ते एक स्वातंत्र्यसैनिक होते. ‘समाजकल्याणासाठी त्याग करणे’, हा त्यांचा स्थायी स्वभावच होता. समाजकल्याण स्वरूपात त्यांच्याकडून अनेक कृती सहजपणे व्हायच्या. त्यामुळे त्यांना स्वत:च्या कुटुंबातच नाही, तर समाजातही आदरणीय स्थान होते. ‘कुणी तरी त्याग केल्याशिवाय समाज आणि राष्ट्र सुखी राहू शकत नाही’, असे त्यांचे विचार होते. जीवनातील या धोरणामुळे त्यांचे स्वत:च्या सुखाकडे लक्ष अल्प असायचे; मात्र समाजासाठी ते सातत्याने काहीतरी करत रहायचे.

९३ वे संत बन्सीधर तावडे

संतपद : १८.५.२०१९
देहत्याग : ९.६.२०२१

दृढ श्रद्धा, त्यागी वृत्ती आणि धर्मकार्याची तीव्र तळमळ या गुणांमुळे या दिवशी श्री. बन्सीधर तावडे हे संतपदी विराजमान झाले. शारीरिक आजारपण असूनही ते सतत आनंदावस्थेत असतात. अध्यात्माची आवड असल्याने नाम, सत्संग, सेवा आणि तन, मन अन् धन यांचा त्याग अशा टप्प्यांनी त्यांनी साधनेची सर्व तत्त्वे अंगीकारली. या सर्व टप्प्यांतून साधना करतांना ‘सनातनचा एकही शब्द असत्य असू शकत नाही’, अशी श्रद्धा त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यांची ‘दृढ श्रद्धा’ हेच त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीचे गमक आहे. त्यांच्यात धर्मकार्याची अतीव तळमळ आहे. प्रकृती अस्वास्थ्य असल्याने प्रत्यक्ष प्रसारसेवा करू शकत नाहीत; पण त्यांच्या ध्यानी-मनी सतत सेवेचाच ध्यास असतो.

९४ व्या संत पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये

संतपद : २०.५.२०१९

मूळच्या देवरुख येथील आणि आता मागील ७ वर्षांपासून तपोधाम येथे सेवारत, तसेच सतत वात्सल्यभावात असणार्‍या श्रीमती स्नेहलता शेट्ये या संतपदी विराजमान झाल्या.  पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये आजींना व्यष्टी साधनेसह समष्टी साधनेची तळमळ आहे. त्यांच्यात मातृवात्सल्यभाव असल्याने त्या सर्व साधकांची प्रेमाने काळजी घेतात. तपोधामात येणार्‍या-जाणार्‍या साधकांकडे त्या आईच्या मायेने लक्ष देतात. ‘त्यांची गुरूंवर दृढ श्रद्धा आहे. ‘गुरुदेवांच्या कृपेने सेवा सहज होते. गुरुमाऊली माझ्या समवेत आहेत’, असे त्या सांगतात.

९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारे

संतपद : २२.५.२०१९

मूलतः सात्त्विक प्रकृती असलेल्या पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी  संतपदी विराजमान झाल्या. त्यांना व्यावहारिक जीवनात अनेक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागले; पण शांत, सोशिक स्वभाव आणि समाधानी वृत्ती यांमुळे त्यांनी कोणत्याही परिस्थितीविषयी कधी तक्रार केली नाही. ‘ठेविले अनंते तैसेची रहावे । चित्ती असू द्यावे समाधान ॥’ अशा वृत्तीमुळे त्यांनी सांसारिक कर्तव्ये शांतपणे आणि देवावरील नितांत श्रद्धेच्या बळावर पार पाडली. हे करतांना त्यांनी आपल्या अपत्यांवर धार्मिक संस्कारही केले. सतत परेच्छेने वागणे, इतरांचा विचार करणे आणि ईश्‍वराप्रती लागलेली ओढ यांमुळे त्यांची आंतरिक साधना होत राहिली.

९६ वे संत पू. संकेत कुलकर्णी

संतपद : २४.५.२०१९

जन्मजात विकलांग असूनही त्याचा कुठेही लवलेश जाणवू न देता सतत आनंदाच्या स्थितीत असणारे, परिस्थितीविषयी कोणतीही तक्रार न करणारे, स्वत:च्या अस्तित्वाने इतरांना साधनेला प्रवृत्त करणारे श्री. संकेत कुलकर्णी संतपदी विराजमान झाले. त्यांना जन्मापासूनच अनेक दुर्धर आजारांना तोंड द्यावे लागले. जन्मतःच अपंगत्व असल्याने त्यांच्या कंबरेखालचे शरीर लुळे आहे. त्यामुळे त्यांना उठणे-बसणे या हालचाली करता येत नाहीत; पण कोणीतरी उठवून आधार देऊन बसवले, तर ते काही घंटे बसू शकतात. ते हाताच्या क्रिया काही प्रमाणात करू शकतात; पण हाताच्या स्नायूंमध्ये दौर्बल्य असल्याने हालचालींवर पुरेसे नियंत्रण नसते. त्यांचे बोलणे आणि उच्चार स्पष्ट नाहीत. वयाच्या २२ वर्षापर्यंत त्यांच्यावर अनेक गुंतागुंतीची शस्त्रकर्मे करण्यात आली. ‘परेच्छेने वागणे’, ‘सहनशीलता’ आणि ‘स्थिरता’ या गुणांमुळे संकेत यांनी या अत्यंत क्लेशदायी प्रसंगांनाही शांतपणे तोंड दिले. दिव्यांग (विकलांग) स्थितीत असलेल्या पू. संकेत यांची साधना अंतर्मनातून होत असल्याने बाह्य परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी तिचा त्यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. यातूनच त्यांचे वेगळेपण ध्यानात येते. तीव्र शारीरिक भोग भोगतांनाही ते सतत आनंदावस्थेत असतात.

९७ वे संत पू. (अधिवक्ता) सुधाकर चपळगावकर

संतपद : ३.६.२०१९

निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर हे व्यष्टी संतपदी विराजमान झाले.  ‘सध्याच्या काळात अन्याय आणि अत्याचार यांनी परिसीमा गाठलेली असतांना न्यायालयासारख्या रज-तमात्मक क्षेत्रात प्रामाणिकपणाने अन् निःस्पृहपणे काम करणारे पू. निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर यांच्यासारखे व्यक्तीमत्त्व दुर्मिळच म्हणावे लागेल. पारदर्शकता आणि तत्त्वनिष्ठता असलेल्या चपळगावकर यांनी आपल्या वकिली पेशाचा, तसेच अनुभवाचा धर्मासाठी वापर केला. सुधाकर चपळगावकर हे कर्ममार्गी असून प्रत्येक कर्म ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’ अशा प्रकारे व्हावे, यासाठी ते प्रयत्न करतात.  हिंदु धर्म आणि हिंदु धर्मग्रंथ यांचा सखोल अभ्यास करून न्यायदानाच्या कामकाजात त्या अभ्यासाचा चपखल वापर करणे, हे त्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सहजता, अहं अल्प असणे आणि साधकांप्रती प्रेमभाव ही त्यांची अन्य वैशिष्ट्ये आहेत. हिंदु धर्माला तुच्छ लेखणार्‍या धर्मद्रोह्यांप्रती त्यांच्या मनात अतीव चीड आहे.

९८ वे संत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

संतपद : ३.६.२०१९

अधिवक्ता सुरेश कुलकर्णी हे समष्टी संतपदी विराजमान झाले. पहिल्यापासूनच साधनेची आणि धार्मिकतेची आवड असलेले अधिवक्ता कुलकर्णी कर्ममार्गी अन् भक्तीमार्गी आहेत. त्यांचा स्वभाव अत्यंत विनम्र आणि प्रेमळ असून न्यायालयीन क्षेत्रात त्यांच्यासारखे व्यक्तीमत्त्व अभावानेच पहायला मिळते. असत्याची पराकोटीची चीड असल्याने न्यायालयात लढतांना मात्र त्यांच्यातील क्षात्रतेज जागृत होत असे. धर्मावरील आघातांच्या विरोधात अधिवक्त्यांनी काहीतरी ठोस कृती करावी, या तळमळीपोटी त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसह अन्य राज्यांत जाऊन तेथील अधिवक्त्यांना राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांचा स्वभाव अत्यंत विनम्र आणि प्रेमळ असून न्यायालयीन क्षेत्रात त्यांच्यासारखे व्यक्तीमत्त्व अभावानेच पहायला मिळते.

९९ व्या संत श्रीमती विजया लोटलीकर

संतपद : १६.६.२०१९

डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील ‘श्रीमती लोटलीकरआजी या संतपदी विराजमान झाल्या आहेत. लहानपणापासून आजारपण, गरिबी, लग्नानंतरही अनेक समस्यांना तोंड देत पू. आजींनी कष्ट करत आणि श्रद्धेची कास धरत मुले, नातवंडे आणि पतवंडे यांच्यामध्ये संस्कारांचे बीज रोवून त्यांना आदर्श असे घडवले आणि सर्व कर्तव्ये भगवंतावर श्रद्धा ठेवून पार पाडली. ‘आदर्श पत्नी’, ‘आदर्श माता’ आणि ‘आदर्श आजी’ अशा भूमिका बजावतांना त्यांनी त्यांच्या कुटुंबावर चांगले संस्कार केले.  पहिल्यापासून त्यांची देवावर श्रद्धा होती आणि जीवनातील खडतर प्रसंगांना तोंड देतांना त्यांची ही श्रद्धा आणखी दृढ झाली.

१०० व्या संत श्रीमती सीताबाई श्रीधर जोशीआजी

संतपद : २७.६.२०१९

भोळा भाव असलेल्या, देहभान विसरून देवाची भक्ती करणार्‍या आणि प्रत्येक क्षणी कृतज्ञताभावात रहाणार्‍या हुब्बळ्ळी, कर्नाटक येथील श्रीमती सीताबाई श्रीधर जोशीआजी व्यष्टी संतपदी विराजमान झाल्या. आज वयाच्या ९३ व्या वर्षीही आजी घरातील सर्व कामे उत्साहाने करतात आणि गेली अनेक वर्षे प्रत्येक काम करतांना त्या भावपूर्णपणे देवाचे भजन किंवा स्तोत्र म्हणतात. गेली अनेक वर्षे त्या प्रतिदिन न्यूनतम २ घंटे गुरु आणि देव यांचे स्मरण करत स्वतःला विसरून जातात आणि त्याच भावाच्या स्थितीत भजने म्हणतात.

Leave a Comment