भारतीय संस्कृती आणि विज्ञान

१. सहस्रो वर्षांची संस्कृती आणि विज्ञान कायम टिकविणारी विद्यापिठे 

प्राचीन काळी निरनिराळे ऋषि, संत आणि गुरु यांचे आश्रम अन् मंदिरे ही सर्व प्रकारच्या विद्या, कला आणि शास्त्रे शिकवण्याची स्थाने होती. त्याचबरोबर वेदकाळापासून आजपावेतो भारतात ठिकठिकाणी मोठमोठी विद्यापिठे स्थापन करण्यात आली. त्यात शास्त्रे, विद्या, कला, धर्म, तत्त्वज्ञान इत्यादी सर्व विषय शिकवले जात असत. या विद्यापिठांमुळेच सहस्रो वर्षांची संस्कृती आणि विज्ञान कायम राहिले. अनेक सत्ता आल्या आणि गेल्या; पण ज्ञानप्राप्तीचे विविध मार्ग अन् ज्ञानोपासना चालूच राहिली.

१ अ. भारतातील काही प्रमुख विद्यापिठे

१ अ १. ७०० वर्षे प्रसिद्ध असलेले तक्षशिला विद्यापीठ

ही गांधार देशाची राजधानी होती. चंद्रगुप्त आणि चाणक्य यांनी येथेच शिक्षण घेतले. येथे धनुर्वेद, आयुर्वेद, ज्योतिष, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान वगैरे विषयांचे फार मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन केले जात होते. हे विद्यापीठ भारताच्या सीमेलगत असल्याने शिक्षणासाठी युरोप आणि पश्‍चिम आशिया येथूनही विद्यार्थी येत होते. सुमारे ७०० वर्षे हे विद्यापीठ चालू होते.

१ अ २. तीन सहस्रे वर्षे प्रसिद्ध असलेले वाराणसी विद्यापीठ

साधारण तीन सहस्र वर्षे काशी (वाराणसी) येथील विद्यापीठ प्रसिद्ध होते. या विद्यापिठात हिंदु धर्म, वेद, उपनिषदे, शास्त्रे यांचे शिक्षण दिले जाई आणि सर्व शास्त्रांत पारंगत झालेल्या विद्वानांना शास्त्री अन् पंडित या पदव्या दिल्या जात. राजा अशोकाच्या वेळी येथून जवळच असलेले सारनाथ हे केंद्र बौद्ध धर्माचे फार मोठे विद्याकेंद्र म्हणून प्रसिद्ध होते. काशी येथील पंडित मदनमोहन मालवीय प्रस्थापित बनारस हिंदु विद्यापीठ आजही कार्यरत आहे.

 

२. परदेशी संशोधक रानटी अवस्थेतून
नुकतेच बाहेर पडत होते, त्या काळाच्याही फार 
पूर्वी
हिंदूंची उच्च संस्कृती असल्याचे परदेशी शास्त्रज्ञांनी मान्य करणे

सुप्रसिद्ध अमेरिकन विचारवंत आणि अभिनेता मार्क ट्वेन याने गंगाजलाचे शास्त्रीय मूल्यमापन केले आहे. फॉलोइंग दि इक्वेटर या प्रवासवर्णनात तो म्हणतो, आम्ही जेव्हा १८९६ मध्ये आग्र्‍याला गेलो, तेव्हा तेथे एका अविस्मरणीय अशा शास्त्रीय शोधाचा पत्ता लागला. तो शोध म्हणजे आम्ही हेटाळणी करत असलेले गंगेचे काही अंशी घाणेरडे पाणी हे जगात मोठे प्रभावी जंतूनाशक आणि शुद्धीकारक आहे. मि. हेन्किन या शास्त्रज्ञाने बनारसला जाऊन तेथील गंगेचे पाणी प्रयोगशाळेत तपासले. गंगेत सांडपाण्याची गटारे जेथे स्नानाच्या घाटावर मिळतात, तेथील घाणेरडे पाणी त्याने घेतले. एक लिटरच्या सहस्रांश भागात त्याला लक्षावधी जंतू आढळून आले; पण सहा तासांत त्यातील एकही शिल्लक उरला नाही. नंतर एक तरंगणारे प्रेत काठाला ओढून आणले आणि त्याच्या लगतचे पाणी तपासणीसाठी घेतले. त्यात कॉलर्‍याचे लक्षावधी जंतू आढळले; पण सहा तासांनंतर एकही जंतू शिल्लक उरला नाही, सर्व निर्जीव झाले. या पाण्यात त्याने पुनःपुन्हा कॉलर्‍याचे असंख्य जंतू घातले; पण ते सर्व सहा तासांत निर्जीव झाले. नंतर त्याने विहिरीचे स्वच्छ पाणी काढून आणले आणि तपासले. ते जंतूविरहित आढळले. त्यात त्याने कॉलर्‍याचे जंतू घातले, ते भराभर वाढू लागले. सहा तासांनी तर त्यांची खूपच वाढ झाली.

फार पुरातन काळापासून हिंदु लोक गंगेचे पाणी पवित्र मानत आले आहेत. ते अत्यंत शुद्ध असून विटाळत नाही आणि त्याच्या संसर्गाला जे जे येईल ते ते शुद्ध होते, अशी त्यांची दृढ श्रद्धा होती अन् अजूनही आढळते. आजवर या हिंदूंचा आम्ही उपहास केला; पण आता गंभीर होऊन विचार करण्याची वेळ आली आहे. या पाण्याचे रहस्य त्यांना एवढ्या प्राचीन काळी कसे कळले ? त्या काळात त्यांच्याकडे सूक्ष्मजंतू-शास्त्रज्ञ होते की काय ? पण एक गोष्ट फक्त आम्हाला माहीत आहे ती ही की, ज्या प्राचीन काळात आम्ही रानटी अवस्थेतून नुकतेच बाहेर पडत होतो, त्या काळाच्याही फार पूर्वी त्या हिंदु लोकांची उच्च संस्कृती होती.

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स, १९.१.१९८१, लेखक : धुंडिराज ना. वैद्य, कल्याण.