श्रीरामाच्या इच्छेविना काहीच घडत नाही, याची साधकांना अनुभूती देणारे श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज !

Article also available in :

 

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा जन्म माघ शुक्ल पक्ष द्वादशीला (१९ फेब्रुवारी १८४५ या दिवशी) सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे झाला. जन्मावेळी त्यांचे नाव गणपति ठेवण्यात आले होते. श्रीब्रह्मचैतन्य श्रीरामाचे उपासक होते. ते स्वतःला ब्रह्मचैतन्य रामदासी म्हणवत.

 

 

गुरुकृपा

वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी गुरूंच्या शोधार्थ घर सोडले. त्या वेळी त्यांच्या वडिलांनी कोल्हापूर येथून त्यांना परत आणले. काही काळाने त्यांनी पुन्हा गृहत्याग करून गुरुशोधार्थ पदभ्रमण चालू केले. अनेक संत, सत्पुरुष यांच्या भेटी घेतल्या. अखेर मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यापासून जवळ येहेळगावी श्रीतुकामाई यांच्याकडून त्यांना शिष्यत्व प्राप्त झाले. अतिशय कठोर अशा कसोट्या देत, गुर्वाज्ञापालन करीत, त्यांनी गुरुसेवा केली. या वेळी त्यांचे वय १४ वर्षांचे होते. श्रीतुकामाईंनी त्यांना ब्रह्मचैतन्य हे नाव दिले, रामोपासना दिली आणि अनुग्रह देण्याचा अधिकार दिला. यानंतर श्री तुकामाईंच्या आदेशानुसार महाराजांनी बराच काळ तीर्थाटन केले.

 

नंतरचे आयुष्य

गृहत्यागानंतर नऊ वर्षांनी श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवले येथे परतले. इथून पुढचे सारे आयुष्य त्यांनी राम नामाचा प्रसार आणि विविध ठिकाणी राममंदिरांची स्थापना यासाठी वेचले. गुर्वाज्ञेनुसार स्वतः गृहस्थाश्रमात राहून जनसामान्यांना प्रपंच करत परमार्थ कसा साधावा ? याचे मार्गदर्शन केले. कोणत्याही परिस्थितीत रामाचे स्मरण ठेवावे आणि त्याच्या इच्छेने प्रपंचातील सुख-दुःखे भोगावीत हे त्यांच्या उपदेशाचे सार आहे. गोरक्षण आणि गोदान, अखंड अन्नदान, अनेक वेळा विविध कारणांनी केलेल्या तीर्थयात्रा हे महाराजांच्या चरित्राचे काही ठळक विशेष आहेत. सुष्ट आणि दुष्ट, ज्ञानी आणि अज्ञ, यांच्याविषयी समभाव, निस्पृहता, कल्याणकारी वृत्ती, दीन अनाथांचा कळवळा, सहनशीलता, व्यवहारचातुर्य, जनप्रियत्व आणि रसाळ वाणी हे महाराजांचे सहजगुण आहेत. समोरची व्यक्ती कोणीही असो, ते प्रत्येकाला समजेल, अशा भाषेत मार्गदर्शन करत. सामान्यांशी ते घरगुती आणि सोप्या भाषेत संवाद साधत, तसेच वेदसंपन्न, ज्ञानी मंडळींशी चर्चा करण्याचा प्रसंग आला असता त्यांनाही वैदिक कर्मांच्या जोडीने नामस्मरण करण्याची आवश्यकता पटवून देत.

त्यांची श्रीरामाशी असलेली अनन्यता आणि दृढ श्रद्धा त्यांच्या वागण्याबोलण्यातून सतत व्यक्त होत असे. नामस्मरण या साधनाची आजच्या युगातली थोरवी त्यांनी कळकळीने आणि विविध मार्गांनी मार्मिक दाखले देऊन सांगितली. ॥ श्री राम जय राम जय जय राम ॥ या त्रयोदशाक्षरी मंत्राचे महात्म्य विषद करण्यासाठी त्यांनी भजन, कीर्तन, प्रवचन, चर्चा, शंकासमाधान या सर्व मार्गांचा अवलंब केला. श्रीरामाच्या इच्छेविना काहीही घडत नाही आणि अखंड रामनाम जपल्यास आनंद अन् समाधान लाभते, या महाराजांच्या सांगण्याचा अनुभव त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक साधकाने घेतला आहे.

संदर्भ : बालसंस्कार डॉट कॉम संकेतस्थळ

 

गंगास्नानाने पावन होण्यासाठी यात्रेकरूंमध्ये
खरा भाव आवश्यक ! – श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

एकदा काशीमधील मोठे तपस्वी शांताश्रमस्वामी यांचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याशी पुढील संभाषण झाले.

स्वामी : महाराज, इतके लोक काशीत गंगास्नान करूनही पावन का होत नाहीत ?

गोंदवलेकर महाराज : कारण त्यांच्यामध्ये खरा भाव नाही !

स्वामी (उत्तर न पटल्याने) : त्यांच्यात खरा भाव असल्याविना ते कसे येतील ?

गोंदवलेकर महाराज : ते लवकरच दाखवीन. नंतर चार दिवसांनी गोंदवलेकर महाराजांनी शांताश्रमस्वामींच्या हातापायांना चिंध्या गुंडाळून त्यांना महारोग्याचे रूप दिले आणि जेथे पुष्कळ लोक गंगास्नानासाठी उतरत, तेथे त्यांना नेऊन बसवले. महाराज स्वतः बैराग्याचा वेश धारण करून त्यांच्या शेजारी उभे राहिले. काही वेळाने बरीच मंडळी जमली. बैरागी उपस्थितांना म्हणाला, लोकहो, ऐका ! हा महारोगी माझा भाऊ आहे. गेल्या वर्षी आम्ही दोघांनी विश्‍वेश्‍वराची अत्यंत मनापासून सेवा केली. तेव्हा त्याने प्रसन्न होऊन भावाला वर दिला, या गंगेमध्ये स्नान केल्यावर आपले पाप नाहीसे होऊन आपण शुद्ध झालो, असा भाव असलेल्या यात्रेकरूने तुला एकदा आलिंगन दिले, तर तुझा रोग नाहीसा होईल. येथे आपण इतके जण आहात, कोणीतरी माझ्या भावावर एवढा उपकार करावा ! बैराग्याचे बोलणे ऐकून गर्दीतील ८-१० लोक पुढे सरसावले. त्या क्षणी बैरागी त्या लोकांना थांबवून म्हणाला, क्षणभर थांबा ! विश्‍वेश्‍वराने पुढे असेही सांगितले आहे, जो यात्रेकरू याला आलिंगन देईल, त्याला तो रोग लागेल; पण त्याने पुन्हा गंगेत स्नान केल्यावर त्याचा भाव शुद्ध असल्यामुळे तो रोगमुक्त होईल. असे सांगितल्यावर सर्व जण निघून गेले; मात्र तेथील एका तरुण शेतकर्‍याने अधिक विचार न करता मोठ्या निष्ठेने शांताश्रमस्वामींना आलिंगन दिले. त्यानंतर लगेच गोंदवलेकर महाराजांनी स्वतःहून शेतकर्‍याला आलिंगन दिले आणि ते उद्गारले, बाळ, तुझी काशीयात्रा खरी फळाला आली. तुझ्या जन्माचे कल्याण झाले, असे निश्‍चित समज ! शांताश्रमस्वामींना या सगळ्या प्रसंगाचा अर्थ आपोआपच कळला !

संदर्भ : पू. बेलसरेलिखित श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाड्मय

 

प्रत्येकाला नामजप करायला सांगणार्‍या प.पू. गोंदवलेकर महाराज
यांच्या प्रत्येक अवयवाला कान लावल्यावर नामजप ऐकू येणे

‘एकदा साहित्यसम्राट न.चि. केळकर प.पू. गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनास गेले होते. प.पू. महाराजांसमोर गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की, प.पू. महाराजांच्या दर्शनास येणार्‍या प्रत्येकाला ते नामाचा महिमा सांगून नामजप करायला सांगत; परंतु ते स्वतः मात्र कधी नाम घेतांना दिसले नाहीत. त्यांना आश्‍चर्य वाटले. त्यांनी धाडस करून प.पू. महाराजांना विचारले, ‘‘महाराज, आपण इथे येणार्‍या प्रत्येकाला नाम घ्यायला सांगत आहात; परंतु स्वतः मात्र नाम घेतांना आम्हाला जाणवत नाही.’’

केळकरांच्या या प्रश्‍नावर प.पू. महाराजांनी स्मित केले आणि ते म्हणाले, ‘‘नरसोपंत, तुमची शंका रास्त आहे. या माझ्या हृदयाला कान लावा.’’ उत्सुकतेने केळकरांनी प.पू. महाराजांच्या हृदयाला कान लावला. अन् काय आश्‍चर्य ! त्यांना प.पू. महाराजांच्या हृदयमंदिरातून स्पष्टपणे नाम ऐकू आले, ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’

काही  वेळानंतर प.पू. महाराज म्हणाले, ‘‘नरसोपंत, आता माझ्या या हाताला कान लावा.’’ केळकरांनी त्याप्रमाणे केले, तेव्हा त्यांना प.पू. महाराजांच्या हातातूनही ‘रामनामाचा’ ध्वनी ऐकू आला. नंतर प.पू. महाराजांच्या म्हणण्यानुसार केळकरांनी अशा प्रकारे प.पू. महाराजांचे पाय, गुडघे, बोटे इत्यादी अवयवांना कान लावला. प्रत्येक जागी रामनामच ऐकू येत होते. प.पू. महाराजांच्या रोमरोमातून रामनाम ऐकू आल्यावर केळकरांनी प.पू. महाराजांना साष्टांग दंडवत घातला.’

– श्री. मुरलीधर का. वानखेडे, नांदुरा

(शक्तिब्रह्माश्रम समाचार, जुलै २००९, पृ. २४)