साधकांना स्वतःच्या स्थूल रूपात अडकू न देता त्यांना घडवणारे आणि ‘स्थुलातून सूक्ष्माकडे’ नेणारे अवतारी दिव्यात्मा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कसे घडवले, याविषयी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भावपूर्ण मनोगत !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

 

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधना शिकवतांना साधकांना सूक्ष्म जगताचेही ज्ञान दिले. त्यांनी सूक्ष्म परीक्षणाच्या सेवेतून साधकांचा आध्यात्मिक प्रवास हळूहळू निर्गुण ईश्वराची ओळख होण्यापर्यंतच्या टप्प्याकडे नेला. त्यांनी ‘सूक्ष्म जगतातील घडामोडींचे परीक्षण करण्यास शिकवले आणि सूक्ष्मातील कळणारे साधक घडवले’. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

 

१. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर नामजपादी उपायांचा कसा परिणाम होतो ?’, याचा अभ्यास करायला साधकांना शिकवणे

‘उभ्या असलेल्या साधिकेकडे पाहून आध्यात्मिक त्रास, अहं, भाव, आनंद यांपैकी काय जाणवते ?’, असे साधकांना विचारतांना परात्पर गुरु डॉ. आठवले

‘परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून जाणू शकणार्‍या आम्हा साधकांना केवळ सूक्ष्मातील परीक्षण करण्यास शिकवले नाही, तर आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांवर उपाय करण्यासही शिकवले. परात्पर गुरु डॉक्टर आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांसाठी स्वतः अनेक घंटे नामजपादी उपाय करायचे आणि ‘त्या उपायांचा परिणाम कसा होत आहे ?’, हे आम्हाला अभ्यासायला सांगायचे. सूक्ष्मातील जाणणारे साधक याचा अभ्यास करायचे.

 

२. सच्चिदानंद अवस्थेत असूनही सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यासह श्रीरामचरण उमटलेल्या लादीची स्पंदने अभ्यासतांना परात्पर गुरु डॉ. आठवले

तेव्हा गुरुदेव म्हणायचे, ‘‘तुम्ही केलेल्या परीक्षणातून मलाही शिकायला मिळते.’’ अजूनही ते असेच म्हणतात. परात्पर गुरुदेव सांगतात, ‘‘प्रत्येक साधकाकडून मी नित्य शिकत असतो. त्यामुळे मला कधी कंटाळा येत नाही. अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. कुणीही परिपूर्ण नाही. ईश्वर एकमात्र परिपूर्ण आहे. सतत शिकल्याने आनंद मिळतो. ज्ञानात आनंद आहे. आनंदात सातत्य आले की, आपल्याला सच्चिदानंद अवस्था लवकर गाठता येते.’’

 

३. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांची जिज्ञासा जागृत करून त्यांना ज्ञान मिळण्याच्या ईश्वरी प्रक्रियेचे माध्यम बनवणे

देवतेच्या मूर्तीच्या रूपावर स्पंदने अवलंबून असतात, हे सौ. गाडगीळ यांना सांगतांना परात्पर गुरु डॉक्टर

अशा पद्धतीने ‘मोक्षप्राप्तीमध्ये अध्यात्मातील ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेचे महत्त्व कसे आहे ?’, याचा संस्कार परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हा साधकांवर केला. ज्ञानप्राप्तीचे महत्त्व सांगून त्यांनी आमची जिज्ञासा जागृत केली. पुढे ही जिज्ञासाच सनातनच्या साधकांना ज्ञान मिळण्याच्या ईश्वरी प्रक्रियेचे माध्यम बनली.

 

४. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना हाताच्या बोटांच्या विविध प्रकारच्या मुद्रांचा अभ्यास करायला शिकवणे

परात्पर गुरु डॉक्टर हाताच्या बोटांच्या विविध प्रकारच्या मुद्रा करून आध्यात्मिक उपाय करायचे. ते म्हणायचे, ‘‘हे जगत् पंचमहाभूतांनी बनलेले आहे. प्रत्येक मुद्रेला काहीतरी अर्थ आहे. या मुद्रेतून कोणत्या प्रकारच्या पंचतत्त्वाची (पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश) स्पंदने प्रक्षेपित होतात ?’, ते शोधून काढा. ती स्पंदने शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती या देहात दडलेल्या अन् कार्याच्या आवश्यकतेप्रमाणे जागृत होणार्‍या आध्यात्मिक ऊर्जेला जोडा !’’

४ अ. साधकांना सूक्ष्म परीक्षण आध्यात्मिक परिभाषेत सांगण्यास शिकवणे

त्या वेळी ‘सूक्ष्म परीक्षण सांगतांना ते नेमकेपणाने कसे सांगायचे ?’, हेही परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला शिकवले, उदा. ‘आता केलेल्या हाताच्या मुद्रेतून तेजतत्त्वाची स्पंदने शक्तीच्या रूपात बाहेर पडत आहेत.’ कालांतराने आम्हाला आध्यात्मिक परिभाषेत हे परीक्षण सांगता येऊ लागले. ही भाषा परात्पर गुरु डॉक्टरांनीच आम्हाला शिकवली.

 

५. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘आपल्यातील ईश्वरी ऊर्जेला स्मरून अध्यात्मातील उत्तरे शोधा’, असे सांगणे आणि तसे प्रयत्न केल्यावर ‘गुरुदेवच मार्गदर्शन करत आहेत’, अशी अनुभूती येणे

एकदा गुरुदेव म्हणाले, ‘‘आपल्यामध्ये एक ईश्वरी ऊर्जा दडलेली आहे. तीच आपली आध्यात्मिक गुरु आहे. तिला स्मरून आता उत्तरे मिळवा !’’ त्या वेळी आम्ही गुरुदेवांनाच प्रार्थना करून अध्यात्मातील उत्तरे शोधू लागलो आणि काय आश्चर्य ! आम्हाला गुरुदेवच पुढच्या पुढच्या टप्प्याच्या सूक्ष्मातील उत्तरांविषयी आतून मार्गदर्शन करू लागले. त्यानंतर सूक्ष्म परीक्षण करण्यात आम्ही कधी मागे वळून पाहिलेच नाही.

आम्ही गुरुदेवांना हे सर्व प्रत्यक्षात सांगायचो. तेव्हा ते पुष्कळ छान असे गालातल्या गालात हसत म्हणायचे, ‘‘देव आपल्यासाठी किती करतो ना !’’ त्या वेळी आम्ही त्यांना सांगायचो, ‘‘गुरुदेव, आमच्या डोळ्यांपुढे तुम्हीच असता. आम्ही तुम्हालाच आठवतो. आम्ही तुम्हालाच प्रार्थना करून परीक्षण करतो अन् आम्हाला लगेच सूक्ष्मातील उत्तर मिळते !’’ यावर ते पुष्कळ हसत. अशा प्रकारे परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला ‘साधकाच्या जीवनात गुरूंचे महत्त्व किती अनन्यसाधारण असते ?’, हे शिकवण्यास आरंभ केला.

 

६. ‘गुरु हा देह नसून ते एक तत्त्व आहे’, ही शिकवण देऊन साधकांना ईश्वरी तत्त्वाशी जोडणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

६ अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना स्वतःच्या स्थूल देहात न अडकवणे

हळूहळू परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला त्यांच्या देहात न अडकवता गुरुतत्त्वाच्या सूक्ष्म प्रकाशाकडे नेण्यास चालू केले. त्यांनी ‘गुरु हा देह नसून ते एक तत्त्व आहे’, ही शिकवण आमच्यात रुजवली. नाहीतर आम्ही त्यांच्या स्थूल देहातच अडकलो असतो. परात्पर गुरु डॉक्टरांच्या सततच्या शिकवणीमुळे सनातनचा कुठलाच साधक त्यांच्या स्थूल देहात अडकलेला नाही.

६ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी आपल्या शिकवणीद्वारे धर्मप्रसारकार्य सांभाळणारे सहस्रो गुणवंत आणि निष्ठावंत साधक निर्माण करणे

कलियुगात गुरु पहा ! आपल्या नावासह स्वतःचे प्रस्थ वाढवून शिष्यांना आपल्याच देहात अडकवून ठेवणारे काही सांप्रदायिक गुरु पाहिले आहेत. त्यामुळे एखाद्या संप्रदायाच्या गुरूंनी देहत्याग केल्यानंतर त्या संप्रदायाचा प्रचार हळूहळू थंडावतो. त्यांच्या अनुयायांना आध्यात्मिक स्तरावर सावरणारे पुढे कुणीही उरत नाही. परात्पर गुरु डॉक्टरांनी मात्र आजपर्यंत सहस्रो शिष्य निर्माण केले. ते त्यांच्या त्यांच्या स्तरावर संस्थेच्या आध्यात्मिक प्रसारकार्याचा कार्यभार अतिशय उत्तम रीतीने सांभाळत आहेत. ते साधक आपापल्या कार्यात गुरुदेवांचे जणू सक्षम उत्तराधिकारीच आहेत. असे गुणवंत, निष्ठावंत आणि चैतन्यसंपन्न साधक निर्माण करणारा हा दिव्यात्मा अवतारीच असू शकतो ना !

‘गुरुदेव, ‘तुम्ही श्रीविष्णूचे अवतार आहात’, असे महर्षि का म्हणतात ?’, ते आम्हालाही आता समजले आहे. आमची निष्ठा या गुरुचरणांशी अशीच टिकून राहू दे’, अशी ईश्वराच्या चरणी कळकळीची प्रार्थना !’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी (६.२.२०२२)

सूक्ष्म

व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे)

काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

सूक्ष्म-जगत्

जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला सूक्ष्म-जगत् असे संबोधतात.

सूक्ष्म-परीक्षण

एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.

सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग

काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते, याची चाचणी करतात. याला सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग म्हणतात.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार सद्गुरुंच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment