नास्तिकांचे धर्मश्रद्धांवर आघात करण्याचे षड्यंत्र !

डॉ. सच्चिदानंद शेवडे

१. ज्या विषयाचा आपला अभ्यास नाही, त्यावर बोलू नये, एवढेही न कळणारे विचारवंत !

आजकाल कोणीही उठतो आणि मला असे वाटते की, असे म्हणत बिनदिक्कतपणे आपले मत मांडतो. आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे हा अधिकार मान्य करायलाच हवा. तथापि ज्या क्षेत्रात आपला अभ्यास नाही आणि जे जाणून घेण्याची बिलकूल इच्छा नाही, अशा गोष्टीत जेव्हा असे बुद्धीवंत (?) आपले तोंड घालतात, तेव्हा आश्‍चर्य वाटते आणि समर्थांची उक्ती ‘अभ्यासे प्रगट व्हावे । नाहीतरी झाकोनी असावे । प्रगट होवोनी नासावे । बरे नव्हे ॥’ हे पटते. तोंडाने आजचा जमाना (काळ) आणि विज्ञान यांचा धोशा लावत जेव्हा अवैज्ञानिक आणि हास्यास्पद मते मांडून युक्तीवाद केला जातो, तेव्हा हसूच येते. त्यातही विषय जर देवा-धर्माशी निगडित असेल, तर त्यात अधिकारवाणीने आपले मत मांडणारे लोक पाहिले की, यांचा नेमका यातील अभ्यास काय आणि किती? हा प्रश्‍न पडतो.

२. धर्मावरील चर्चेमध्ये त्या त्या विषयातील तज्ञ व्यक्तीला न बोलावता नास्तिकांना बोलावणार्‍या आणि हिंदूंचा बुद्धीभेद करू पहाणार्‍या हिंदुद्वेषी वृत्तवाहिन्या !

आपल्याला एखादे घर बांधायचे असेल, तर आपण वास्तूविशारदाकडे जातो कि एखाद्या वैद्याकडे जातो? म्हणजेच ज्याचा ज्या विषयातील अभ्यास असेल, त्याच्याकडे तो विषय घेऊन जाऊ आणि आपल्या शंकांचे निरसन करून घेऊ. हीच साधी आणि सर्वमान्य पद्धत देवा-धर्माविषयी का पाळली जात नाही, असे कोणी विचारले, तर आपल्याकडे काय उत्तर आहे? वाहिन्यांवरील चर्चेत हा प्रश्‍न उपस्थित करण्यात काहीच अर्थ नाही; कारण त्यांना विरोधी भूमिका मांडणारे लागतात. त्यांच्या मतानुसार तसे असेल, तरच ती चर्चा होते. त्यामुळे नास्तिक वा अंधश्रद्धा निर्मूलन करणार्‍यांना ते पाचारण करतात. या व्यक्तीसुद्धा त्या क्षेत्रातील काहीही अभ्यास नसतांना, ठोकून देतो ऐसाजे या तालावर आणि जड शब्द वापरत आपली मते मांडतात. वृत्तपत्रातही हेच लोक आपले लेख लिहून आस्तिकांना ठोकून काढणार. हा प्रकार हिंदूंमध्येच चालतो. कारण ते फार पुढारलेले आहेत, असे स्वत:ला समजतात. मग खोट्या गोष्टी, विज्ञानाचा जप करत खुशाल मांडल्या, तरी आम्हाला चालते. त्यामुळे बुद्धीभेद होतो हे आम्ही लक्षात घेत नाही. साम्यवाद पुढच्या दाराने बाहेर पडतो आहे आणि मागल्या दाराने आपल्या घरात येत आहे तो असा. ही गोष्ट आम्हा पुढारलेल्या हिंदूंच्या लक्षात येत नाही. सर्व चालीरिती वाईट कशा आहेत, हे सातत्याने आमच्या मनावर बिंबवले जात आहे आणि त्यांचे समर्थन करणार्‍यांना आपसूकच मागासलेले अन् प्रतिगामी ठरवले जाते.

साधी गोष्ट सांगतो, योनी हे नरकाचे द्वार आहे हे विधान स्त्रियांसाठी नाही आणि गृहस्थ असलेल्या पुरुषांसाठी तर नाहीच नाही. त्याशिवाय विवाहाला एक धार्मिक संस्कार म्हणून का मान्यता मिळाली? मग हा इशारा अथवा हे विधान कोणासाठी आहे, याचा विचार नको का? परस्त्रीगमनाची प्रबळ इच्छा असणार्‍या अथवा त्याची चटक लागलेल्या बाहेरख्याली पुरुषांसाठी हा इशारा आहे. नरक म्हणजे अपकीर्ती अथवा जबरी शिक्षा असा अर्थ येथे अभिप्रेत आहे. कुठल्याही काळात शिक्षेचे भय हेच माणसाला अपराधीवृत्तीपासून परावृत्त करायला अधिक उपयोगी ठरते, हे साधे आणि सोपे मानसशास्त्र आहे. त्यातून हे विधान जन्माला आले. त्याचा कालसापेक्ष अर्थ समजून न घेता उगाच धर्माच्या नावाने शिमगा करायचा असेल, तर गोष्ट वेगळी. झोपेचे सोंग घेतलेल्याला कोण जागे करणार ?

३. रिकामटेकड्या माध्यमांनी सवंग लोकप्रियता मिळवण्याठी हिंदु धर्माला अपकीर्त करण्याचे षड्यंत्र रचणे आणि त्यासाठी नास्तिकांचे साहाय्य घेणे

माध्यमांची सध्याची अवस्था जाणून घ्या. दीड-दोन वर्षांपूर्वी त्यांच्याकडे आर्थिक घोटाळ्यांच्या शेकडो बातम्या होत्या. आता त्या नसल्यामुळे ते रिकामटेकडे झाले आहेत. तशात नवे सरकार हे हिंदुत्ववादी आहे, असा त्यांचा दृढ समज असल्याने वेळ घालवण्यासाठी ते सण-उत्सव-चालीरिती आदींना लक्ष्य बनवू लागले आहेत. मग विषय उकरून काढायचा आणि चर्चा घडवून आणायची अन् सवंग लोकप्रियता मिळते आहे ते पहायचे, असे सध्या चालले आहे. त्यातील एक विषय म्हणजे स्त्रियांच्या मासिक पाळीचा आणि त्या काळात त्यांनी मंदिरप्रवेश करावा कि न करावा यावरील चर्चेचा होय !

महिला या आस्तिक-श्रद्धाळू आणि नास्तिक-अश्रद्ध अशा दोन प्रकारच्या असतात. मासिक पाळीच्या त्या चार दिवसांत मंदिरात प्रवेश नाही; म्हणून भांडणार्‍या आणि हिरीरीने सोशल मीडिया अथवा प्रिंट-इलेक्ट्रॉनिक मीडियावर आपले मत मांडणार्‍या महिला यातील कोणत्या गटात मोडतात? या विषयावर ज्यांना मुद्दाम खोदून खोदून प्रश्‍न विचारले जातात, ज्यांना अगत्याने माध्यमांमधील चर्चांना सतत बोलावले जाते (विषय कोणताही असला, तरी काही खास सर्वज्ञ (?) असतातच!) ज्यांच्या कोणत्याही वक्त्तव्याला विचारवंत असल्याचे लेबल लावून समाजासमोर आणले जाते. त्या एकतर नास्तिक महिला असतात अथवा पुरुष असतात. नास्तिक महिला देव-धर्म मानतच नाहीत, तर त्यांना मंदिरात प्रवेश हवाय कशाला?

४. धार्मिक श्रद्धांवर आघात करण्याचे षड्यंत्र वेळीच थांबवले नाही, तर हानी हिंदूंचीच होणार असणे

आस्तिक महिला श्रद्धाळू असतात. त्या देवाला मानतात आणि तत्संबंधी असलेले नियमसुद्धा मानतात. त्यांना त्यात कमीपणा वाटत नाही. वाहन चालवणार्‍या शहाण्या व्यक्तीला जसे रहदारीचे नियम जाचक वाटत नाहीत आणि ते मनापासून पाळायचे असतात, तसेच आस्तिक महिला धार्मिक नियम स्वखुशीने पाळतात. त्यांना कदाचित् त्यामागची उत्तरे ठाऊक नसतील; पण पूर्वीपासून हे सांगितले आहे, ते काहीतरी विचार करूनच असणार, यावर त्यांची श्रद्धा असते. त्यात महिलांना दुय्यम मानले जाते वगैरे शंका त्यांच्या मनात येत नाहीत. श्रद्धावान महिलांनी याविषयी कधी तक्रार केली आहे काय? मग देव-धर्म हा ज्यांचा प्रांत नाही ते का दंगा करत आहेत ? नास्तिकांना ना धार्मिक प्रेरणा, ना त्यांना धार्मिक महिलांनी आपले वकीलपत्र दिले आहे. मग धार्मिक क्षेत्रात त्यांनी का नाक खुपसावे, असा प्रश्‍न कोणाला पडला तर काय उत्तर असेल? म्हणजेच काहीही करून हिंदूंच्या सर्व श्रद्धा नष्ट करा. देवाविषयी आमचे काहीच म्हणणे नाही, असे वरकरणी धूर्तपणे बोलत धार्मिक श्रद्धांवर आघात करत रहा, असेच हे षड्यंत्र आहे. ते समजून घेतले नाही, तर हानी आपलीच होणार आहे.

आपल्या पूर्वजांनी काहीतरी विचार करून नियम बनवले असतील, असा विचार करून त्या नियमांच्या मागचा नेमका हेतू काय? त्यांनी यामागे काही विचार केला होता कि केवळ अविचार केला होता, याचा शोध घेतला, तर अधिक उत्तम होईल, असे वाटत नाही का ?

– डॉ. सच्चिदानंद शेवडे, राष्ट्रीय प्रवचनकार (संदर्भ : दैनिक तरुण भारत, २७.१२.२०१५)

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’