गुरुकृपायोग

साधना करतांना गुरुकृपेशिवाय सर्व काही व्यर्थ आहे ! गुरुकृपेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होणे, यालाच ‘गुरुकृपायोग’ असे म्हणतात. ‘गुरुकृपायोग’ या योगाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग, भक्तीयोग अशा सर्व साधनामार्गांना सामावून घेणारा, असा हा ईश्वरप्राप्तीचा सहजसुलभ मार्ग आहे. प्रस्तुत लेखात गुरुकृपायोग या योगाची निर्मिती, त्याचे महत्त्व आणि गुरुकृपायोगानुसार साधना यांविषयी माहिती विशद करण्यात आली आहे.

१. गुरुकृपायोगानुसार साधना

‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।

अर्थ : ‘शिष्याचे परममंगल, म्हणजे मोक्षप्राप्ती, ही त्याला केवळ गुरुकृपेनेच होऊ शकते.’

कोणत्याही मार्गाने साधना करतांना गुरुकृपेशिवाय सर्व काही व्यर्थ आहे ! गुरुकृपा नेमकी प्राप्त कशी करायची, हे गुरुकृपायोग या योगमार्गात साधक शिकतो.

 

२. गुरुकृपायोगाची निर्मिती

१९९२ या वर्षी एकदा आमचे सद्गुरु प.पू. भक्तराज महाराज (बाबा) यांच्यासमवेत इंदूर येथील आश्रमात असतांना बाबा म्हणाले, ‘‘सर्व योगांत भक्तीयोग श्रेष्ठ.’’ त्यावर मी धारिष्ट्य करून म्हटले, ‘‘नाही बाबा, गुरुकृपायोग सर्वश्रेष्ठ आहे !’’ तेव्हा अतिशय आनंदून बाबा म्हणाले, ‘‘अगदी योग्य (बरोबर) बोललात !’’ तेव्हापासून मी `गुरुकृपायोग’ हा शब्द वापरू लागलो. पुढे त्याचे सिद्धांत आणि प्रत्यक्ष साधना हे भाग विकसित झाले.’

– डॉ. जयंत आठवले (सनातनचे प्रेरणास्थान)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘परात्परगुरु प.पू. डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये आणि कार्य (संक्षिप्त ओळख)’

 

३. गुरुकृपायोगामध्ये अंतर्भूत असलेले
कर्मयोग, भक्तीयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग आणि सहजयोग

गुरुकृपायोगामध्ये समष्टी साधनेचा पुरस्कार केला गेल्याने ईश्वरी संकल्पशक्तीच्या आधारे त्या त्या योगाच्या स्तरावर जिवाकडून आवश्यक त्या स्वरूपाची साधना घडून त्याची आध्यात्मिक उन्नती जलद होते.

अ. कर्मयोग आणि भक्तीयोग

भावजागृतीतून प्रत्यक्ष प्रार्थनेच्या स्तरावर कर्मयोग आणि भक्तीयोग घडतो.

आ. ध्यानयोग आणि ज्ञानयोग

अहं-निर्मूलनाच्या स्तरावर स्वतः अज्ञानी असल्याची भावना दृढ होऊन चिंतनात्मक ज्ञानप्राप्ती झाल्याने ध्यानयोग (अंतर्मुखता) आणि ज्ञानयोग घडतो.

इ. सहजयोग

स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेमुळे जिवाला पारदर्शकता प्राप्त झाल्याने सहजयोग घडतो.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २७.९.२००५, दु. ३.५४)

 

४. कर्मकांडातील सगुण भक्तीपेक्षा
गुरुकृपायोगानुसार निर्गुण भक्तीने जलद आध्यात्मिक उन्नती होणे

‘कर्मकांडातील सगुण भक्तीला ओलांडून निर्गुण भक्तीकडे जाणे, म्हणजेच गुरुकृपायोगाचा अवलंब करून जलद आध्यात्मिक उन्नती करून घेऊन कमी कालावधीसाठी प्राप्त झालेल्या मनुष्यजन्माचे खर्‍या अर्थाने सार्थक करणे होय.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.१.२००५, सायं. ७.०१)

 

५. गुरुकृपायोग

‘गुरुकृपायोग’ या योगातील सहजभाव, म्हणजेच ‘अध्यात्म’ आहे.

गुरुकृपायोगात कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग यांनुसार साधना प्रत्यक्षात कशी करायची, हेही सांगितले जाते. – प.पू. डॉ. आठवले

 

६. गुरुकृपायोगाची वैशिष्ट्ये

२ अ. सर्वसमावेशक साधनामार्ग

गुरुकृपायोग हा कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग आदी साधनामार्गांना सामावून घेणारा असा ईश्‍वरप्राप्तीचा सहजसोपा मार्ग आहे. ‘गुरुकृपायोगातील विविध योगमार्गांचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

२ आ. गुरुमंत्र देण्याची पद्धत नसलेला
साधनामार्ग म्हणजे गुरुकृपायोग !

‘गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍या साधकांपैकी कोणालाही मी गुरुमंत्र दिलेला नाही, तरीही ते आध्यात्मिक उन्नती करत आहेत आणि काही साधक तर आध्यात्मिक उन्नती करून सद्गुरुपदापर्यंत पोहोचले आहेत. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

१. गुरुमंत्र मिळणे, म्हणजे गुरूंनी दीक्षा देणे होय. गुरुदीक्षा म्हणजे गुरूंनी सांगितलेली साधना. गुरुकृपायोगात सांगितलेली गुरुतत्त्वाला काळानुसार अपेक्षित अशी व्यष्टी साधना (वैयक्तिक साधना) आणि समष्टी साधना (समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करण्याची साधना), ही एकप्रकारे गुरूंनी सांगितलेली साधनाच असून ती केल्याने गुरुकृपा होते, हे अनेक साधकांनी शब्दशः अनुभवले आहे.

२. गुरुमंत्रात ‘मंत्र’ हा शब्द असला, तरी बहुधा शिष्याने कोणता नामजप करावा, हेे गुरूंनी सांगितलेले असते. गुरुकृपायोगानुसार साधनेमध्ये ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’ हा सिद्धांत असून या साधनेचा ‘वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती’ हा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे साधक त्यांच्या साधनेला पूरक म्हणजेच स्वतःची प्रकृती, स्वतःला होणारा वाईट शक्तींचा त्रास, ते करत असलेल्या समष्टी साधनेसाठी आवश्यक आध्यात्मिक बळ इत्यादी कारणांसाठी आवश्यक असे निरनिराळे जप करतात. हे सर्व आध्यात्मिक उन्नतीसाठी पोषक असल्याने वेगळ्या गुरुमंत्राची आवश्यकता नसते.

३. ‘केवळ गुरुमंत्र घेतलेला शिष्य बनण्यापेक्षा ‘जाणूनी श्रीगुरूंचे मनोगत’, अशी गुरुसेवा करणारा शिष्य बनणे अधिक योग्य असते’, हे गुरुकृपायोगानुसार साधनेत शिकवलेले असल्याने साधक गुरुमंत्रात अडकून रहात नाहीत.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

७. व्यष्टी साधना आणि समष्टी साधना

व्यष्टी साधना आणि समष्टी साधना साधनेची दोन अंगे आहेत. वैयक्तिक म्हणजे स्वत:च्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाच्या प्रयत्नांना ‘व्यष्टी साधना’ म्हणतात, तर समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाच्या प्रयत्नांना ‘समष्टी साधना’असे म्हणतात.

साधकांच्या साधनेकडे व्यक्तीगत लक्ष देण्यासाठी व्यष्टी साधना
आणि समष्टी साधना यांचा आढावा देण्याची पद्धत निर्माण करणे

साधना करतांना स्वभावदोष आणि अहं यांमुळे साधकांकडून चुका होतात. या चुकांमुळे साधकांच्या साधनेची आणि सेवेचीही फलनिष्पत्ती घटते, तसेच गुरुकार्याचीही हानी होऊ शकते. असे होऊ नये, यासाठी प्रत्येक साधकाने त्याच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचा आढावा साधारणपणे प्रत्येक ७ दिवसांनी देण्याची पद्धत परात्पर गुरु डॉक्टरांनी घालून दिली आहे.

आढावा देण्याच्या निमित्ताने साधकांचे स्वतःच्या साधनेविषयी चिंतन होते. आढावा घेणार्‍याकडून साधकांना योग्य दृष्टीकोन मिळून साधनेची पुढची दिशाही कळते. यामुळे साधकांची साधना चांगली होण्यास साहाय्य होते. अशा प्रकारे साधनेचा एवढ्या काटेकोरपणे नियमित आढावा देण्याची पद्धत अन्य कोणत्याही संप्रदायात किंवा आध्यात्मिक संस्थेत पहायला मिळत नाही !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘साधना (सर्वसाधारण विवेचन आणि महत्त्व)’

 

८. साधनेच्या दृष्टीतून १४ विद्या आणि ६४
कला यांच्या शिक्षणाचे बीजारोपण करणे

‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, या सिद्धांताला अनुसरून परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांची विद्या ग्रहण करण्याची क्षमता आणि कलेची आवड यांनुसार त्यांना साधना शिकवली. वेदांचे अध्ययन करण्याची क्षमता असलेल्या साधकांसाठी ‘सनातन साधक-पुरोहित पाठशाळा’ स्थापन केली. आज परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी कला’, हे ध्येय ठेवून काही साधक चित्रकला, मूर्तीकला, संगीत, नृत्यकला, नाट्यशास्त्र, वास्तूविद्या आदी कलांच्या माध्यमांतून साधना करत आहेत.

परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली साकारत  असणार्‍या ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या माध्यमातून साधनेच्या दृष्टीतून १४ विद्या आणि ६४ कला यांचे शिक्षण देण्यात येणार आहे. ’

(संदर्भ : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सर्वांगीण कार्याचा संक्षिप्त परिचय)

 

९. ईश्वरप्राप्तीचा विहंगम मार्ग

ईश्वरप्राप्तीचा विहंगम मार्ग म्हणजे गुरुकृपायोगानुसार साधना करणे.

 

१०. गुरुकृपायोगानुसार करावयाच्या साधनेचा सिद्धांत

१०. अ. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’

गुरुकृपायोगानुसार करावयाच्या साधनेचा एकच सिद्धांत आहे आणि तो म्हणजे ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’. पृथ्वीवरची  लोकसंख्या सातशे कोटीहून अधिक आहे; म्हणून ईश्वरप्राप्तीचे सातशे कोटीहून अधिक मार्ग आहेत. या संख्येतील कोणतीही दोन माणसे एकसारखी नसतात. प्रत्येकाचे शरीर, मन, आवडी-निवडी, गुणदोष, आशाआकांक्षा, वासना निराळ्या असतात. प्रत्येकाची बुद्धी निराळी असते, संचित, प्रारब्ध निराळे असते; प्रत्येकातील पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ही तत्त्वे (मनुष्य या पंचतत्त्वांपासून बनला आहे.) अन् सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण यांचे प्रमाण निरनिराळे असते. थोडक्यात प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकृतीचा आणि पात्रतेचा असल्याने ईश्वरप्राप्तीचे साधनामार्गही अनेक आहेत. आपली प्रकृती आणि पात्रता यांना अनुरूप अशी साधना केल्यास ईश्वरप्राप्ती लवकर होण्यास साहाय्य होते. सनातन संस्थेचे सहस्त्रो (हजारो) साधक गुरुकृपायोगाच्या एकाच छत्राखाली आपापली निरनिराळी साधना करत आहेत. याउलट सांप्रदायिक आणि विविध पंथांतील साधना सर्वांसाठी एकच असते.

कोणी एखाद्या संप्रदायानुसार साधना करत असला, तरीही त्याने धर्मातील तत्वांची ओळख झाल्यावर त्यानुसार साधना करणे लाभदायक ठरते. गुरुकृपायोगानुसार साधना केली असता धर्माची शिकवण परिपूर्ण मिळते. गुरुकृपायोगानुसार साधना केल्यास आध्यात्मिक उन्नती जलद होते, सांप्रदायिक साधना आणि गुरुकृपायोगानुसार साधना यांमधील शिकवणीचे वैशिष्ट्य दर्शवणारी सारणी येथे देत आहोत.

साधकांना सांप्रदायिक साधनेनुसार गुरुमंत्र न देता गुरुकृपायोगानुसार साधना करण्याची शिकवण देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. १०.१०.२०१७, रात्री ११.१५)

 

११. साधनेत होणार्‍या मूलभूत चुका

व्यक्ती तितक्या कृती, तितके साधनामार्ग हा मूलभूत सिद्धांत ठाऊक नसल्यामुळे साधनेच्या संदर्भात प्रामुख्याने पुढील चार प्रकारच्या चुका होतांना दिसतात.

११ अ. स्वतःच्या मनाने साधना करणे

११ आ. सांप्रदायिकता : पृथ्वीवर सातशे कोटींहून अधिक माणसे आहेत, म्हणजे सातशे कोटींहून अधिक साधनामार्ग आहेत; परंतु कुठल्याही संप्रदायाच्या अनुयायाला केवळ एकच साधनामार्ग ठाऊक असतो. तो त्या एकाच मार्गाने साधना करत असतो. इतर साधनामार्ग त्याला ठाऊक नसतात.

११ इ. गुरु करणे : खरेतर आपण गुरु करायचे नसतात. गुरूंनी शिष्य म्हणून आपला स्वीकार करायचा असतो.

११ ई. स्वतःला साधक समजणे

गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने साधकांकडून अश्या प्रकारच्या चुका होणार नाही, याची काळजी गुरु घेतात किंवा चुका झाल्यावर लगेच लक्षात आणून देऊन साधनेतील हानी टाळतात.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘गुरुकृपायोगानुसार साधना’

Leave a Comment