हिंदु धर्मात मांसभक्षण करण्याला मान्यता दिली आहे, असे मानणे अयोग्य !

कालीमातेला मांसाचा नैवेद्य दाखवतात; म्हणून हिंदूंनी मांसभक्षण करण्याला मान्यता दिली आहे, असे मानणे अयोग्यच !

कालीमातेला मांसाचाच नैवेद्य दाखवतात, त्यामुळे हिंदु धर्मात मांसभक्षणाला मान्यता आहे, असे काहींचे म्हणणे असते. या शंकेचे खंडन पुढे देत आहोत.

 

१. हिंदु धर्मशास्त्रात कर्मकांडानुसार बळी देण्यामागे शास्त्र असणे

1374324110_p_charudatta_pingle
पू. (डॉ.) चारूदत्त पिंगळे

कालीमातेने असुराचे मुंडके तोडून त्याला मारले; म्हणून बळी देण्याची किंवा मांसाचा नैवैद्य दाखवण्याची प्रथा चालू झाली. मांसाच्या नैवेद्यात बळी दिलेल्या प्राण्याचे मांस असते. बळी देण्याविषयीही शास्त्र आहे, त्याला काही नियम आहेत. जसे ज्याला बळी द्यायचे, त्या पशूला पूर्वाभिमुख ठेवणे, खड्ग घेऊन बलीचे हनन करणार्‍या पुरुषाने उत्तराभिमुख रहाणे. तांत्रिक कर्मात ज्याचा बळी दिला जातो, उदा. बोकड त्याचेही पूजन केले जाते. त्या बोकडाला प्रार्थना करून त्याच्या कानातही मंत्र म्हटले जातात. या मंत्रांमुळे बळी जाणार्‍या प्राण्यालाही गती मिळते आणि ज्या कारणासाठी बळी दिला जातो, तो हेतूही साध्य होतो, असे शास्त्र सांगते. कालिका पुराणात देवीसाठी द्यावयाच्या बळीच्या संदर्भात तपशीलवार वर्णन आले आहे.

 

२. कालीमाता लयाशी संबंधित देवता असल्याने
तिला मांसाचा नैवेद्य दाखवला जात असणे

सत्त्व, रज आणि तम या ३ गुणांनुसार उपासनेचे सात्त्विक, राजसिक आणि तामसिक असे ३ प्रकार होतात. विशिष्ट देवता विशिष्ट गुणांशी संबंधित असतात आणि त्यामुळेच त्यांना तो तो गुणविशिष्ट असलेला नैवेद्य दाखवला जातो. कालीमाता ही लयाशी संबंधित देवता असल्याने तिला मांसाचा नैवेद्य दाखवला जातो. विठ्ठल ही सत्त्वप्रधान देवता असल्याने विठ्ठलाला मांसाचा नैवेद्य दाखवला जात नाही. विठ्ठलाची आराधना स्थितीशी संबंधित आहे, तर कालीमातेची आराधना लयाशी संबंधित आहे.

३. देवतांचे मानवीकरण करणे किंवा
देवतांची मानवाशी तुलना करणे चुकीचे असणे

मुळात मांसभक्षणासारख्या मानवाशी संबंधित विषयात देवतांना आणणेच चुकीचे आहे; कारण हा प्रकार म्हणजे देवतांचे मानवीकरण केल्यासारखे आहे. ज्यांना देवता म्हणजे काय, हेच ठाऊक नाही, त्यांनाच असा प्रश्‍न पडू शकतो. यावरून हिंदूंमधील धर्मशिक्षणाची निकड स्पष्ट होते.

३ अ. त्रिगुणातीत असलेल्या देवतांवर
त्यांनी केलेल्या तमोगुणी किंवा सत्त्वगुणी कृतींचा परिणाम होत नसणे

देवता त्रिगुणातीत असतात म्हणजे सत्त्व, रज आणि तम यांच्या पलीकडे असतात. त्यांनी दर्शवलेल्या सत्त्वगुणात्मक किंवा तमोगुणात्मक कृतींचा देवतांवर परिणाम होत नाही; मात्र मानवाने त्या गोष्टींचे अनुकरण केले, तर त्याचा परिणाम मानवावर होतो. हे समजण्यासाठी एक उदाहरण पाहूया. सीतेला रावणाने पळवून नेल्यानंतर रामाला मोठे दुःख झाले. राम सीते, सीते, असे म्हणत वृक्षवेलींना प्रश्‍न करत होता. त्यांना आलिंगन देत होता. तेव्हा कैलाश पर्वतावरून ते पहाणार्‍या पार्वतीने सीतेेचे रूप घेऊन ती रामासमोर आली. तेव्हा रामाने तिला माते, असे संबोधून नमस्कार केला. म्हणजे रामाने लोकांसमोर आदर्श पती कसा असावा, यासाठी दुःखी असल्याचे दर्शवणार्‍या कृती केल्या होत्या. वस्तूतः राम मूलतः त्रिगुणातीत असल्याने त्याला दुःख किंवा सुख असे काही नव्हते. तसेच देवीने मांसभक्षण केल्यामुळे किंवा रक्त प्यायल्यामुळे तिच्या त्रिगुणातीततेत कोणताही भेद होत नाही.

३ आ. देवतांच्या कृती सूक्ष्मातील असून त्यांचा हेतू
समष्टीला कल्याणकारी असणे, तर मानवाचा हेतू वैयक्तिक असणे

देवीने राक्षसाला नष्ट करणे किंवा त्याचे मांसभक्षण करणे, या गोष्टी सूक्ष्मातील असतात, तसेच देवतांचा अशा कृतींमागील हेतू हा समष्टीला कल्याणकारी असा असतो. यासाठी रक्तबीज असुराचे उदाहरण लक्षात घेतले पाहिजे. त्याला शिवाने त्याच्या रक्तापासून एक रक्तबीज सिद्ध होईल, असा वर दिला होता. त्यामुळे माता भगवतीने त्याचे रक्त भूमीवर पडू न देता, ते पिऊन सर्व रक्तबिजांचा नाश केला. म्हणजे देवीचे रक्त पिणे, हे समष्टीच्या कल्याणासाठी असुरांचा नाश करण्यासाठी होते. याउलट मानवाचा मांसभक्षणामागील उद्देश मात्र जिभेचे चोचले पुरवून पोट भरण्याचा असतो. त्यामुळे देवीची कृती मानवाला लागू होत नाही.

३ इ. देवीच्या कृतीचा भावार्थ घेणे आवश्यक असणे

देवतांच्या कृतींचा शब्दार्थ नव्हे, तर भावार्थ घ्यायचा असतो. साधकांनी स्वतःतील तमोगुणाचा नाश करावा, असा देवीच्या कृतीचा अर्थ आहे.

 

४. मांसाहाराचे दुष्परिणाम

मांसाहाराचे दुष्परिणाम पुढीलप्रमाणे होतात.

४ अ. मांसाहार हे अस्वाभाविक अन्न आहे. त्या अन्नामुळे पचनशक्ती न्यून होते.

४ आ. रुधिराभिसरण आणि श्‍वासोच्छ्वास यांत अडथळे येतात. मांसाहारी लोकांना हृदयरोग, छाती आणि पोट यांचा कर्करोग किंवा अन्य रोग होतात.

४ इ. मांसाहारातील प्रथिनांच्या अधिक प्रमाणामुळे रोग होतात.

४ ई. मांसाहारामुळे तमोगुणाची वृद्धी होते. मनुष्य तामसिक बनतो.

४ उ. या आहारामुळे मनुष्य ईश्‍वरापासून दूर जातो. व्यक्ती साधनेकडे वळत नाही आणि वळली, तरी साधनेत टिकत नाही.

४ ऊ. मांसाहारामुळे कामवासनेचे विकार तीव्र होतात.

४ ए. त्रासदायक शक्ती, नकारात्मक ऊर्जा यांना शरिरात प्रवेश करणे सोपे जाते.

(अधिक माहितीसाठी वाचा सनातनचा ग्रंथ असात्त्विक आहाराचे दुष्परिणाम)

 

५. मांसाहार समाजस्वास्थ्यासाठीही घातक असणे

मांसाहारामुळे व्यक्तीचा तमोगुण वाढतो. त्यामुळे समाजात अपप्रवृत्ती वाढतात. म्हणजे मांसाहार समाजासाठीही घातक ठरू शकतो. त्यामुळे समाजस्वास्थ्याच्या दृष्टीनेही तो वर्ज्य करणेच योग्य होय.

६. सामान्य प्रतिवादाची सूत्रे

देवतेला नैवेद्य दाखवलेल्या सर्व वस्तू जर माणूस खाणार असेल, तर ती देवता असुरांचे रक्त पिते, गळ्यामध्ये कवट्यांची माळ घालते. या गोष्टीही सामान्य व्यक्ती करू शकेल का ? देवीप्रमाणे कृती करण्यासाठी आपल्यात देवत्व आणावे लागेल. त्यासाठी व्यक्तीने साधना करणे आवश्यक आहे. केवळ देवी मांस खाते, म्हणून आम्ही पण खाणार, असे म्हणणे योग्य नाही.

– (पू.) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.