श्रीमद्भगवद्गीतेविषयी पाश्‍चात्त्य विद्वानांचे विचार

१. गीतेशी तुलना केल्यावर विश्‍वाचे
संपूर्ण आधुनिक ज्ञान मला तुच्छ वाटते !

 

प्राचीन युगातील सर्व रमणीय वस्तूंमध्ये भगवद्गीतेपेक्षा श्रेष्ठ कोणतीही वस्तू नाही. गीतेत असे उत्तम आणि सर्वव्यापक ज्ञान आहे की, तिच्या रचनाकार देवास असंख्य वर्षे झाली, तरीही असा दुसरा एकसुद्धा ग्रंथ लिहिला गेला नाही. गीतेशी तुलना केल्यावर जगाचे संपूर्ण आधुनिक ज्ञान मला तुच्छ वाटते. मी नेहमी प्रातःकाळी माझ्या हृदय आणि बुद्धी यांना गीतारूपी पवित्र जलाने स्नान घालतो. – तत्त्ववेत्ता थोरो, अमेरिका

 

२. भारताचा राष्ट्रीय धर्मग्रंथ होण्याच्या पात्रतेसाठी ज्या ज्या विशेष गुणांची आवश्यकता आहे, ते सर्व गुण श्रीमद्भगवद्गीतेत मिळतात !

श्रीमद्भगवद्गीता भारताच्या विविध मतांना जुळवणारा रज्जू, तसेच राष्ट्रीय जीवनाची अमूल्य संपत्ती आहे. भारताचा राष्ट्रीय धर्मग्रंथ होण्याच्या पात्रतेसाठी ज्या ज्या विशेष गुणांची आवश्यकता आहे, ते सर्व गुण श्रीमद्भगवद्गीतेेत मिळतात. यात केवळ उपयुक्त गोष्टीच आहेत, असे नाही तर हा भावी विश्‍वधर्माचा सर्वोपरी धर्मग्रंथ आहे. भारताच्या उज्ज्वल इतिहासाचे हे महादान मानवजातीच्या भावी उत्कर्षाचे निर्माते आहे. – एफ्.टी. ब्रूक

 

३. गीतेचा उपदेश अद्वितीय आहे

कोणत्याही जातीस उन्नतीच्या शिखरावर अग्रेसर करण्यासाठी गीतेचा उपदेश अद्वितीय आहे. – वॉरेन हेस्टिंग्स (भारताचे माजी व्हाइसरॉय)

 

४. गीता ही भारतीय प्राचीन इतिहासाच्या अत्यंत घातक युद्धाचे एक अभिनव दृश्यचित्र असूनही शांती, तसेच सूक्ष्मतेने परिपूर्ण आहे

विश्‍वातील संपूर्ण साहित्यात सार्वजनिक लाभाच्या दृष्टीने किंवा व्यावहारिकतेच्या दृष्टीने पाहिल्यास भगवद्गीतेसमान दुसरे कोणतेही काव्य नाही. दर्शनशास्त्र असूनही हे सदासर्वदा पद्याप्रमाणे नवीन आणि रसपूर्ण आहे. यात मुख्यतः तार्किक शैली असूनही हा एक भक्तीग्रंथ आहे. हे भारतीय प्राचीन इतिहासाच्या अत्यंत घातक युद्धाचे एक अभिनव दृश्यचित्र असूनही शांती, तसेच सूक्ष्मतेने परिपूर्ण आहे आणि सांख्य सिद्धांतांवर प्रतिष्ठित असूनही हे त्या सर्वस्वामीच्या अनन्य भक्तीचा प्रचार करते. अध्ययनासाठी यापेक्षा अधिक आकर्षक सामग्री अन्यत्र कुठे उपलब्ध होऊ शकते ? – जे.एन्. फरख्युहर

 

५. संपूर्ण मानवजातीसाठी उपयुक्त श्रीमद्भगवद्गीता !

श्रीमद्भगवद्गीता एक असा यौगिक ग्रंथ आहे, जो कोणतीही जात, वर्ण अथवा धर्म यासाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी उपयुक्त आहे. – डॉ. मुहम्मद हाफिज सैयद

 

६. भगवद्गीतेच्या विचारांमध्ये मग्न राहिल्यावर ती उपासकाचे आचरण पालटून टाकते !

श्रीमद्भगवद्गीतेला समजून घेण्याचा एकमेव उपाय म्हणजे, ती वाचणे, आणि वारंवार वाचत रहाणे, तिला आत्मसात करणे अन् मनात धारण करणे, ज्यामुळे ती स्मृतीपटलावर अमिट रूपाने अंकित होईल. भगवद्गीतेच्या विचारांमध्ये मग्न राहिल्यावर ती उपासकाचे आचरण पालटून टाकते. यामुळे लवकरच त्याचे विचार आणि कर्म आपोआपच गीतेनुसार होऊ लागतात. – हाल्डेन एडवर्ड सँपसन

 

७. गीता ही खरी शांती आणि खरे सुख प्रदान करणारी !

भारतवर्षाच्या धर्मात गीता बुद्धीची प्रखरता, आचाराची उत्कृष्टता आणि धार्मिक उत्साहाचे एक अपूर्व मिश्रण उपस्थित करते. गीता खरी शांती आणि खरे सुख प्रदान करते. – डॉ. मॅकनिकल

 

८. आत्म्यास ईश्‍वरोन्मुख करण्यात
गीता अत्यंत आशाजनक सिद्ध झाली आहे !

श्रीमद्भगवद्गीता असंख्य लोकांनी ऐकली, वाचली, तसेच शिकवली आहे. आत्म्यास ईश्‍वरोन्मुख करण्यात गीता अत्यंत आशाजनक सिद्ध झाली आहे. अनंत प्रेमाच्या इच्छुकांनी प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळी आपल्या असीम दयेचा वर्षाव करणे, तसेच जीवनातील सर्व कार्ये परमात्म्याच्या निःस्वार्थ सेवेप्रीत्यर्थ समर्पित करणे, हाच गीतेचा संदेश आहे. – डॉ. लिओनेल डी. बॅरट

 

९. विश्‍वात जितके ग्रंथ आहेत, त्या सर्वांमध्ये
भगवद्गीतेसारखे सूक्ष्म आणि उन्नत विचार कुठेही मिळत नाहीत !

जेव्हा मी हा ग्रंथ वाचला, तेव्हापासून मी विधात्याचा कायमचाच ऋणी बनलो; कारण त्याने मला या ग्रंथाशी परिचित करण्यासाठी जिवंत ठेवले. आध्यात्मिक काव्याचा जो खरा आदर्श आहे, त्याच्या जितक्या निकट गीता पोहचू शकली आहे, तितका या विषयांचा कोणताही प्राचीन ग्रंथ, जो आज आपल्याकडे उपलब्ध आहे, तो पोहचू शकलेला नाही. – डॉ. विल्हेल्म फान हुंबोल्ट (जर्मनी)

 

१०. भगवद्गीतेेसमान दुसरा कुठला ग्रंथ नाही

भारतातील धार्मिक साहित्याचा दुसरा कोणताही ग्रंथ भगवद्गीतेेसमान स्थान प्राप्त करण्यायोग्य नाही. – डॉ. रिचार्ड गार्वे

 

११. भगवद्गीतेनुसार ईश्‍वर विश्‍वाबाहेरही
आहे आणि विश्‍वाच्या आतसुद्धा आहे !

प्रसिद्ध दार्शनिक स्पीनोजा यांच्या मते तो सगुण ईश्‍वर विश्‍वापासून वेगळा रहात नसून प्रकृतीत अनुस्यूत (सामावलेला) आहे; परंतु भगवद्गीतेनुसार ईश्‍वर विश्‍वाबाहेरही आहे आणि विश्‍वाच्या आतसुद्धा आहे. हेच कारण आहे की, युरोपीयन विद्वानांना गीतेचा हा सिद्धांत नित्यनवीन भासला आहे. – डॉ. हेल्मुट ग्लाजेनप्प

 

१२. भगवद्गीता आणि भारताप्रती
आम्ही (जर्मन लोक) पूर्वीपासूनच आकर्षित होत आहोत !

भगवद्गीता हे भारतीय वाङ्मयाच्या बहुशाखीय वृक्षावरचे एक अत्यंत मनोहर आणि शोभासंपन्न सुमन आहे. या अत्युत्तम ग्रंथात अतीप्राचीन आणि अती नवनवीन प्रश्‍नांचे विविधरित्या निरूपण करण्यात आले आहे की, ज्यामुळे मोक्षोपयोगी ज्ञान प्राप्त होऊ शकते. या चमत्कारिक काव्यमय ग्रंथात आपल्याला वरील विचार नित्यनवीन रूपात मिळतात. भगवद्गीतेत दर्शनशास्त्र आणि धर्माची धारा प्रवाहित होऊन एकमेकांत मिळतात. भगवद्गीता आणि भारताप्रती आम्ही (जर्मन लोक) पूर्वीपासूनच आकर्षित होत आहोत. – डॉ. एल्जे. ल्युडर्स (जर्मनी)

संदर्भ : मासिक ऋषी प्रसाद, नोव्हेंबर २००४