महिला आणि बालविकास मंत्री सौ. पंकजा मुंडे-पालवे यांचे भगवान शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेशबंदी हा स्त्रियांचा अपमान नव्हे !, हे प्रतिपादन योग्य कि अयोग्य ?

शनिशिंगणापूरचे शनि मंदिर
 
महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी मंत्रालयातील पत्रकार परिषदेत पुढील विधाने केली आहेत.
 
१. शनिशिंगणापूरच्या शनि मंदिरातील चौथर्‍यावर महिलांना प्रवेशबंदी असेल, तर तो महिलांचा अपमान कसा होईल ?
 
२. महिलांच्या प्रवेशबंदीच्या संदर्भात काही प्रथा-परंपरा असतात. त्यामुळे हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही.
 
३. हा प्रश्‍न स्त्री-पुरुष समानतेशी संबंधित नाही. मुलीला जन्मालाच येऊ न देणे, शिक्षण आणि नोकर्‍यांमध्ये महिलांना संधी न देणे, हे विषय स्त्री-पुरुष समानतेशी संबंधित आहेत. 
 
४. शनि किंवा हनुमान मंदिरात महिलांना जाण्यास बंदी असेल, तर त्यात मानापमान मानण्याचे काही कारण नाही, हा परंपरेचा प्रश्‍न आहे, त्यासाठी हट्ट तरी कशाला करायचा ?
 
या विधानांच्या संदर्भात एबीपी माझा, साम इत्यादी वृत्तवाहिन्यांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या संदर्भातील सनातनचा दृष्टीकोन पुढे दिला आहे.
 

१. महिला आणि बालविकास मंत्री सौ. पंकजा मुंडे-पालवे यांची भूमिका योग्यच !

अ. केवळ प्रसिद्धी आणि स्टंटबाजी म्हणून सवंग भूमिका घेण्यापेक्षा योग्य आणि दिशादर्शक भूमिका आवश्यक आहे. सौ. पंकजा मुंडे-पालवे यांनी महिला आणि बालविकास मंत्री म्हणून धर्मशास्त्राला सुसंगत अशी भूमिका घेतली, याविषयी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

आ. सौ. पंकजा मुंडे-पालवे यांनी मांडलेले विचार योग्यच आहेत. हिंदु धर्मात स्त्री-पुरुष असा भेदभाव कधीच केला नाही. धार्मिक कृती आणि साधना यांविषयी जे नियम धर्मशास्त्रकार ऋषिमुनींनी सांगितले आहेत, त्यामागे आध्यात्मिक कारणे असतात. त्याचा आपण आदर करायला हवा.
 
 
इ. देशातील विविध मंदिरांमध्ये काही नियम असतात. ते एखाद्या महिलेने तोडू नयेत, असे प्रतिपादन आजच राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या सुषमा साहू यांनी केले आहे. देशातील कायदे आणि मंदिरातील नियम यांची सांगड त्या घालू शकल्या, हे महत्त्वाचे आहे.
 

२. शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश नसण्यामागील अध्यात्मशास्त्र

अ. सृजनाचा अधिकार स्त्रियांनाच आहे; म्हणून त्या ओटी भरतात आणि या सृजन शक्तीवरच शनिग्रहाच्या स्पंदनाचा प्रभाव पडतो.

आ. शनीला छायाग्रह असे म्हणतात. शनिग्रहापासून बाहेर पडणारी स्पंदने स्त्रियांसाठी घातक असतात. त्याचा परिणाम त्यांच्याच शरिरावर, विशेषतः ओटी-पोटावर होतो.
 

३. शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश नसण्यामागील वैचारिक प्रतिवाद

अ. गायीचे दूध चांगलेच असते; पण विषमज्वरात ते माणसाला विषासमान असते. यात दुधाचा किंवा त्या व्यक्तीचा दोष नसतो, तर त्या काळी व्यक्तीच्या असलेल्या शारीरिक क्षमतांचा विचार करून ते वर्ज्य असतेे.

आ. कावीळ झाल्यावर आपण तेलकट खात नाही; कारण त्या वेळी तो आहार आपल्या शरिराला घातक असतो. जर एखादा म्हणाला की, मला तेलकट खाण्यास देत नाहीत, हा माझ्यावर अन्याय आहे. माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे. तर मूर्ख कोण ? मला तेलकट द्या म्हणणारा कि त्याला ते खाऊ न देणारा !
 
इ. आण्विक भट्ट्यांमध्ये आपण प्रवेश करतांना आपले कपडे घालून तसेच जाऊ शकत नाही, तेथील किरणांचा आपल्यावर परिणाम होऊ नये, यासाठी तेथील वेगळे बनवलेले जॅकेट घालावे लागतात. तिथे आपण आमच्यावर असे निर्बंध का ? आम्ही जॅकेट न घालताच जाणार, असे म्हणतो का ? शस्त्रक्रियागृहात (ऑपरेशन थिएटरमध्ये) सर्वांनाच प्रवेश दिला जात नाही, तेथे आपण हट्ट करतो का, आम्हालाही आतमध्ये प्रवेश मिळायलाच हवा. व्यवहारात अनेक नियम आपण पाळतो, मग जो धर्म आपल्या सर्वार्थाने प्रगती होण्यासाठी काही नियम सांगतो (तेही केवळ कर्मकांडापुरतेच) आणि तेही आपण पाळणार नाही, असे म्हणतो. हे योग्य आहे का ?

 
 

४. स्त्री-पुरुष असमानता, हा केवळ स्त्रीमुक्तीवाल्यांचा भ्रम !

अ. मानवाच्या सर्व रोगांसाठी पुरुषांप्रमाणेच तज्ञ वैद्य (डॉक्टर) असतात, उदा. हृदयरोगतज्ञ (कार्डिओलॉजिस्ट), अस्थिरोगतज्ञ (ऑर्थोपेडीक) आदी; पण केवळ महिलांसाठीच स्त्रीरोगतज्ञ (गायनॅकोलॉजिस्ट) असतात. तिथे स्त्रीमुक्तीवाले म्हणत नाहीत, महिला म्हणून वेगळे समजणे, हा अन्याय आहे ?

आ. राजस्थानच्या सावित्री धाम येथे पुरुषांनाही प्रवेश नाही. देवीची ओटी स्त्रिया भरतात. पुरुषांना ओटी भरण्याचा अधिकार नाही. याचा अर्थ तेथे पुरुषांना अल्प प्रतीची वागणूक मिळते, असा होत नाही. या परंपरेचे कारण म्हणजे पुरुषाच्या ओटी अपत्याचा जन्म होत नाही.
 
इ. हिंदु धर्माइतके स्त्रियांना महत्त्व अन्य कोणत्या धर्मात दिले गेले नाही. हिंदु धर्मातील प्रत्येक विधीत पतीसह पत्नी असावीच लागते, तिच्याविना विधी पूर्ण होऊ शकत नाहीत. मुसलमान महिलांना तर मशिदीत प्रवेशही नसतो.
 
ई. लोकल ट्रेनमध्ये महिलांसाठी वेगळा डबा असतो, बसमध्ये वेगळी व्यवस्था असते, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण असते, ते काय महिलांना तुच्छ लेखण्यासाठी असते का ? ते त्यांच्या सोयीसाठीच असतात; मग महिलांना त्रास होऊ नये, या सोयीसाठी मंदिरात काही नियम वेगळे असले, तर ओरड का ?
 

५. पुरोगाम्यांचा अविवेक !

अ. धर्म न मानणारे नास्तिक लोक अशा धार्मिक विषयांवरील चर्चांमध्ये सहभागी होतात आणि सामाजिक गप्पा ठोकतात, हे आक्षेपार्ह आहे. हिंदु धर्मावर टीका करणे, हाच त्यांचा उद्देश असतो.

आ. मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आहेत. मंदिरांविषयीचे नियम हे धर्मशास्त्रात सांगितले आहेत. विज्ञानाच्या भाषेत लांबी-रुंदी-उंची हे मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर, फूट आदींमध्ये मोजतात. जर मी म्हटले की, तुमची उंची किती लीटर आहे, हे जेवढे हास्यास्पद होईल, तेवढेच हास्यास्पद धर्मशास्त्रातील नियमांना विज्ञानातील नियमांनी मोजणे होईल.
 
विज्ञानातील नियम हे प्रत्यक्ष प्रमाणावर असतात आणि धर्मशास्त्र हे शब्दप्रमाणावर आधारित असते. त्यामुळे धर्मशास्त्राचा अभ्यास केला, तर तुम्हाला सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळतील; पण धर्मशास्त्राचा अभ्यासच करायचा नाही आणि ते चुकीचे आहे, बुरसटलेले आहे, असे म्हणायचे, हा विवेक नव्हे ! 
 
– सौ. नयना भगत, प्रवक्ता, सनातन संस्था.