कर्नाटक येथील श्री सुब्रह्मण्यम् मंदिरात ब्राह्मणांच्या उष्ट्या पत्रावळींवर लोळण घेण्याची प्रथा धर्मसंमत आहे का ?

कर्नाटक येथील कुक्के श्री सुब्रह्मण्यम् मंदिर
 
ब्राह्मणांनी भोजन केलेल्या उष्ट्या पत्रावळींवर भाविक लोळण घेतांना
 
‘मंगळुरू, कर्नाटक येथील कुक्के श्री सुब्रह्मण्यम् मंदिरात प्रतिवर्षी कार्तिक कृ. षष्ठीला उत्सव असतो. या दिवशी देवतापूजनानंतर प्रथम ब्राह्मणभोजन केले जाते. या वेळी ब्राह्मणांनी भोजन केलेल्या केळीच्या उष्ट्या पत्रावळींवर भाविक लोळण घेण्याची प्रथा आहे. ‘यामुळे त्वचारोग बरे होतात’, अशी अनुभूतीही भाविकांना येते. काल ही प्रथा पार पडल्यानंतर ‘ही प्रथा म्हणजे बहुजनांना तुच्छ लेखण्याचा प्रकार आहे’, अशी आवई कर्नाटकमधील पुरोगाम्यांनी उठवली आहे, तर या प्रथेला अंधश्रद्धा ठरवून अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांनी विरोध केला आहे. या संदर्भातील सनातनचा दृष्टीकोन पुढे दिला आहे.
 
१. मंगळुरू येथील श्री सुब्रह्मण्यम् मंदिरात ब्राह्मणांनी भोजन केलेल्या केळीच्या उष्ट्या पत्रावळींवर भाविक लोळण घेण्याची प्रथा ही एक रूढी आहे. ही रूढी धर्मशास्त्रसंमत नाही; म्हणजेच धर्मशास्त्रात याला कुठलाही आधार नाही. 
 
२. ‘शास्त्रात् रूढिर्बलीयसी ।’ म्हणजे ‘रूढी शास्त्रापेक्षा अधिक प्रभावी असते.’ याविषयी प्राचीन आणि आधुनिक अशा सर्व विधीशास्त्रज्ञांचे याविषयी एकमत आहे. रूढी प्रभावी असण्याचे एकमेव कारण म्हणजे त्याविषयी समाजमनात असलेली श्रद्धा ! 
 
३. ब्राह्मणांच्या उष्ट्या पत्रावळींवर लोळण घेतल्याने त्वचारोग बरे होण्यामागेही भाविकांची श्रद्धा कारणीभूत असते. गुरुचरित्रात म्हटले आहे,
 
मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरौ ।
यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी ॥ – श्रीगुरुचरित्र, अध्याय ९, श्लोक ४८
 
अर्थ : मंत्र, तीर्थस्नान, ब्राह्मण, देव, भविष्यवेत्ता, वैद्य आणि गुरु यांच्या संदर्भात ज्याची जशी श्रद्धा असेल, तशी सिद्धी (फळ) त्याला मिळते. यानुसार ब्राह्मणांविषयी श्रद्धा असलेल्यांना अशा प्रकारची अनुभूती येते.
 
४. या प्रथेमुळे समाजाची वा व्यक्तीची कोणत्याही प्रकारची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक हानी होत नाही; उलट या प्रथेमुळे त्वचारोग बरे होत असल्याची अनुभूती अनेकांनी घेतली आहे. त्यामुळे या प्रथेविरुद्ध कांगावा करणे, हे अव्यावहारिक आहे. तरीही पुरोगामी आणि अंधश्रद्धा निर्मूलनवाले माध्यमांना हाताशी धरून त्याला विरोध करतात. या उलट धार्मिक उत्सवात होणार्या अनेक अनुचित प्रकारांमुळे व्यक्ती आणि समाज यांची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक हानी होते. या अनुचित प्रकारांच्या विरोधात मात्र ही मंडळी ‘ब्र’देखील काढत नाहीत. आध्यात्मिक संस्था किंवा धर्माचार्य यांनी या अपप्रकारांना विरोध केल्यास हीच माध्यमे लोकानुनयासाठी विरोध करतात. हा माध्यमांचा आणि पुरोगाम्यांचा दुटप्पीपणा नव्हे का ?’
 
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले