शनिशिंगणापूरच्या शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेशबंदी का ?

शनिशिंगणापूरचे शनि मंदिर

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानस्थित असलेल्या शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेशबंदी असतांना एका महिलेने चौथरा चढून शनिदेवाला तेलार्पण केले. या घटनेविषयी एबीपी माझा, आयबीएन् लोकमत इत्यादी दूरचित्रवाहिन्या आणि इतर माध्यमे यांवर स्त्रीमुक्ती, पुरुषसत्ताक संस्कृती, मंदिरसंस्कृतीचा प्रतिगामीपणा, बुरसटलेली विचारसरणी आदी दृष्टीकोनांतून चर्चा चालू आहे. हा विषय धार्मिक दृष्टीकोनातून अधिक महत्त्वाचा आहे; म्हणून सनातनचा दृष्टीकोन येथे दिला आहे.

१. शनिशिंगणापूर येथील शनिदेवाची स्वयंभू मूर्ती चौथर्‍यावर उभी आहे. मंदिर व्यवस्थापनाने काही वर्षांपूर्वीच चौथर्‍यावर चढून शनिदेवाला तेलार्पण करण्यास बंदी घातली होती. त्यामुळे सध्या तेथे सर्वच जाती-धर्माचे स्त्री-पुरुष श्री शनिदेवाचे दूरवरून दर्शन घेतात. त्यामुळे तेथे केवळ स्त्रियांना बंदी आहे, असे म्हणणे अयोग्य आहे.

२. अध्यात्मशास्त्रानुसार प्रत्येक देवतेचे कार्य ठरलेले असते. त्या कार्यानुसार त्या देवतेची प्रकटशक्ती कार्यरत असते. शनि ही उग्रदेवता असून तिच्यातील प्रकटशक्तीमुळे महिलांना त्रास होण्याची शक्यता असते. ४००-५०० वर्षांपूर्वी शनिशिंगणापूर येथे शनिदेवाचे मंदिर उभे राहिले. तेव्हापासूनच तेथे स्त्रियांनी चौथर्‍याच्या खालून दर्शन घेण्याची परंपरा आहे.

३. सुवेरसुतक असतांना, तसेच चामड्याच्या वस्तू (बेल्ट, घड्याळाचा पट्टा) आदी परिधान केलेल्या पुरुषांनाही शनिदेवाच्या चौथर्‍यावर प्रवेशबंदी आहे. एवढेच नव्हे, तर चौथर्‍यावर चढण्यापूर्वी पुरुषांनी स्नानाद्वारे देहशुद्धी करणे, तसेच केवळ धूत श्‍वेतवस्त्र परिधान करणे आवश्यक असते. हे नियम पाळणार्‍या पुरुषांनाच शनिदेवाच्या चौथर्‍यावर
प्रवेश आहे.

४. हिंदु धर्मात काही देवतांची उपासना विशिष्ट कारणांसाठी केली जाते. अशा देवतांपैकी एक शनिदेव आहेत. विशिष्ट ग्रहदशा, उदा. साडेसाती आदी काळी त्यांची उपासना केली जाते. ही सकाम साधना असल्याने सकाम साधना करणार्‍याने त्या साधनेशी संबंधित नियमांचे पालन केले, तरच त्याचे फल प्राप्त होते. मनानुसार नियम केले, तर केवळ मानसिक समाधान मिळेल; पण त्यातून आध्यात्मिक लाभ होणार नाही. 

५. हा विषय स्त्रीमुक्तीचा नसून पूर्णतः आध्यात्मिक स्तराचा आहे. त्यामुळे त्याची चिकित्सा सामाजिक दृष्टीकोनातून, तसेच धर्माचा अभ्यास नसणार्‍यांनी करणे अयोग्य ठरते. एखाद्या विषयातील तज्ञानेच त्या विषयावर चर्चा केली पाहिजे. एखाद्या वकिलाने एखाद्या रुग्णाला औषध देणे जसे अयोग्य असते, तसे एखाद्या धार्मिक विषयावर सामाजिक कार्यकर्त्यांनी दूरचित्रवाहिन्यांवर चर्चा करणे अयोग्य ठरते.

६. शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश मिळावा, म्हणून स्त्रीमुक्तीचा टाहो फोडणारे धर्मद्रोही मशिदींमध्ये महिलांना प्रवेश मिळावा, म्हणून आरडाओरड का करत नाहीत ?

– श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था