‘हर घर भगवा’ या मोहिमेअंतर्गत रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात भगव्या ध्वजाचे पूजन !

रामनाथी येथील आश्रमात ध्वज फडकावतांना श्री. वीरेंद्र मराठे

रामनाथी (गोवा) / देवद (पनवेल) – हिंदु जनजागृती समितीच्या २० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने देशभरात ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ साजरे केले जात आहे. या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु राष्ट्राच्या मागणीचा आवाज बुलंद करण्यासाठी समितीने ३ ऑक्टोबरपासून ‘हर घर भगवा’ या देशव्यापी मोहिमेचा शुभारंभ केला. ही मोहीम ५ ऑक्टोबरपर्यंत राबवण्यात आली.

देवद आश्रमाच्या परिसरात भगव्या ध्वजाचे पूजन करतांना श्री. अनिल कुलकर्णी, समवेत उपस्थित साधक

या मोहिमेच्या अंतर्गत रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रम परिसरात उभारलेल्या भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आले. रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी, तर देवद येथील आश्रमात ६९ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अनिल कुलकर्णी यांनी ध्वजपूजन केले. या वेळी आश्रमातील काही साधक-साधिका उपस्थित होते. सर्वांनी हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांना प्रार्थना केली. या वेळी ‘हर हर महादेव’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’, अशा घोषणाही उपस्थितांनी दिल्या.

Leave a Comment