पांडव पंचमी

श्रीकृष्ण आणि पाडव
श्रीकृष्ण आणि पाडव

पांडव पंचमी म्हणजे पांडवांचा विजय दिवस. श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली युद्ध करून अल्प संख्याबळ असूनही बलाढ्य अशा कौरवसेनेचा नायनाट करणार्‍या पांडवांनी जगासमोर मोठा आदर्श उभा केला. त्यांच्यासारखे गुण आपल्यात यावेत, यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या सणाचे महत्त्व आणि साजरा करण्याची पद्धत यांविषयीची माहिती या लेखातून जाणून घेऊया.

 

१. पांडव पंचमीचे महत्त्व

पांडवांनी ईश्वराच्या (श्रीकृष्णाच्या) आदेशानुसार कौरवांवर विजय मिळवला, तो दिवस म्हणजे पांडव पंचमी. ज्याप्रमाणे ऋषीपंचमी साजरी करतात, त्याप्रमाणे भारतीय संस्कृतीत पांडव पंचमी साजरी करतात. पांडव पंचमी म्हणजे पांडवांची मनोभावे पूजा करून त्यांच्यात असलेले आदर्श गुण ग्रहण करणे.

 

२. पांडवांची पूजा करण्याची कारणे

पांडवांसारखे पुत्र घरात जन्माला यावेत आणि पुत्रांत असलेल्या गुणांची वृद्धी व्हावी, यांसाठी पांडवांची पूजा करतात. हे करत असतांना श्रीकृष्णाची शक्ती कार्यरत असते.

 

३. पांडव पूजनाची पद्धत आणि लाभ

या दिवशी गायीच्या शेणापासून पांडव सिद्ध करतात आणि त्यांची पूजा करतात. या दिवशी वातावरणात ईश्वराकडून येणारी पांडवांची आदर्श तत्त्वे आणि गुण अधिक प्रमाणात असतात. गायीच्या शेणामध्ये ती मोठ्या प्रमाणात आकर्षिली जातात. घरात केलेल्या पांडवांच्या पूजेमुळे ती तत्त्वे आणि गुण आपल्यात येण्यास साहाय्य होते. गायीचे शेण सात्त्विक असल्याने त्याचा जिवाला मोठ्या प्रमाणात लाभ होतो.

 

४. प्रार्थना आणि नामजप

या दिवशी पुढील प्रार्थना आणि श्रीकृष्णाचा नामजप अधिकाधिक करावा. ‘हे श्रीकृष्णा, ज्याप्रमाणे तुझ्या आदेशाचे पालन करून पांडवांनी कौरवांच्या विरुद्ध युद्ध करून विजय मिळवला, पांडवांनी जसे तुझे आज्ञापालन केले, त्याप्रमाणे आम्हालाही गुरूंचे आज्ञापालन करून तुझ्यासारखे गुण आमच्यात आणता येऊ देत. आम्हा सर्वांवर तुझी कृपा सतत असू दे. ईश्वरी राज्य आणण्यासाठी आमची धडपड असू दे.’ – श्री गणेश (श्री. भरत मिरजे यांच्या माध्यमातून, ३१.१०.२००५, सायंकाळी ६.५०)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’
Categories सण