
अ. आपल्याजवळ आधीपासून लावलेली कुंडीतील झाडे असतील, तर कुंडीतील वरच्या थरातील माती मुळांना धक्का लागू न देता हळूवारपणे काढावी आणि तेथे पालापाचोळ्याचे आच्छादन करावे. (पालापाचोळा पसरावा.)
आ. शक्य तितक्या लवकर जिवामृताचा (देशी गायीचे शेण, गोमूत्र, बेसन आणि गूळ यांच्यापासून बनवलेल्या नैसर्गिक खताचा) नियमित उपयोग चालू करावा.
इ. कुंडीत उगवलेले तण काढून कुंडीतच आडवे पसरावे.
ई. पसरट टब किंवा पसरट पिशव्या (ग्रो-बॅग) यांमध्ये लागवड केलेली असेल, तर मधल्या रिकाम्या जागेत मेथी, कोथिंबीर यांसारख्या पालेभाज्यांचे बी पेरावे. याला ‘आंतरपीक’ म्हणतात.
उ. नियमित आच्छादन करावे (पालापाचोळ्याने रोपाच्या भोवतालची कुंडीतील माती झाकावी) आणि त्यावर १५ दिवसांतून एकदा १० पट पाणी घालून पातळ केलेले जीवामृत शिंपडावे.
असे केल्यावर साधारण एका मासाने रोपाची वाढ चांगली होत असल्याचे लक्षात येईल.’
तण काढून टाकून भूमी स्वच्छ करू नका !
‘मुख्य रोपाच्या बाजूला आपोआप उगवून आलेले लहान तण पूर्णपणे काढून भूमी उघडी करू नये. तणाची मुख्य पिकासमवेत मातीतील अन्नद्रव्ये घेण्यासाठी स्पर्धा होत नाही; उलट तण सजीव आच्छादनाचे कार्य करते. तणाची उंची अधिक झाल्यास त्याची छाटणी करून त्याच ठिकाणी आच्छादन म्हणून पसरून घालावे. तणाला फुलोरा येण्यापूर्वी वेळेवर छाटणी करत राहिल्यास छतशेतीमधील तणांची वाढ नियंत्रित राहते.’
कुंडी कशी भरावी ?
‘कुंडी भरण्यापूर्वी तिच्या तळाशी अतिरिक्तचे पाणी बाहेर जाण्यासाठी छिद्र असल्याची निश्चिती करावी. जुने डबे, प्लास्टिकचे टब यांमध्ये लागवड करतांना त्यांच्याही तळांशी साधारण वाटाण्याच्या आकाराएवढी १ – २ छिद्रे करून घ्यावीत. प्रत्येक छिद्रावर एखादा मातीच्या फुटलेल्या कुंडीचा किंवा कौलाचा तुकडा ठेवावा. यानंतर तळाशी सुमारे १ इंच जाडीचा नारळाच्या शेंड्यांचा थर पसरावा आणि त्यावर पालापाचोळा दाबून भरावा. पिशवीत असलेले रोप कुंडीत लावायचे असेल, तर रोपाची पिशवी ब्लेडच्या साहाय्याने कापून टाकावी. प्लास्टिक पूर्णपणे काढून टाकावे आणि आतील मातीच्या गोळ्यासहित रोप कुंडीत ठेवावे. हा मातीचा गोळा पूर्णपणे कुंडीच्या आत रहायला हवा. आता याच्या बाजूने पुन्हा पालापाचोळा दाबून भरावा. सर्वांत वर १ इंचाचा स्वयंपाकघरातील ओल्या कचर्याचा थर दिला, तरी चालतो; परंतु ओल्या कचर्याचा थर १ इंचापेक्षा जास्त नसावा. शेवटी त्यावर १० पट पाणी मिसळून पातळ केलेले जीवामृत घालावे. पातळ केलेले जीवामृत एका कुंडीला साधारण १०० मिलि, म्हणजे पाऊण वाटी या प्रमाणात घालावे. अशा पद्धतीने कुंडी भरली की, कुंडीत हवा खेळती रहाते. मातीने भरलेल्या कुंडीपेक्षा ही वजनाने पुष्कळ हलकी होते. काही दिवसांनी पालापाचोळा खाली बसला की, कुंडीत वरून पुन्हा पालापाचोळ्याचा थर घालावा. अशा प्रकारे भरलेल्या कुंडीमध्ये पुष्कळ पाऊस असतांनाही पाणी साचून रहात नाही आणि झाडाचे आरोग्य टिकून रहाते.
आच्छादन म्हणजे काय ?
‘भूमीच्या पृष्ठभागाला झाकणे’, म्हणजे ‘आच्छादन.’ मातीची सजीवता आणि सुपिकता टिकवून ठेवण्याचे कार्य आच्छादन करते. आच्छादनामुळे मातीतील झाडांसाठी उपयुक्त अशा जिवाणूंचे कार्य चांगल्या पद्धतीने चालू रहाते. ‘वाफसा स्थिती’ (मातीत झाडासाठी आवश्यक ओलावा) आपोआप टिकून रहाते. त्यामुळे नैसर्गिक शेतीमध्ये आच्छादनाला पुष्कळ महत्त्व आहे. छतशेतीमध्ये जर आच्छादन व्यवस्थित केलेले असेल, तर निराळी मशागत करण्याची आवश्यकता रहात नाही. आच्छादनासाठी (झाडाभोवतीची माती झाकण्यासाठी) पालापाचोळा, सुका काडी-कचरा, फळे किंवा भाज्या यांच्या साली, देठ असे विघटनशील पदार्थ वापरावेत.’ – सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१.८.२०२२)
झाडांना अती पाणी देणे टाळा !
‘केवळ पाणी देण्याची वेळ झाली; म्हणून झाडांना प्रतिदिन पाणी घातले, असे न करता झाडांचे आणि मातीचे निरीक्षण करून आवश्यकता असल्यासच पाणी द्या. कुंडीतील थोडी माती घेऊन त्याचा लाडूप्रमाणे गोळा बांधला जातो का ? ते पाहा. जर गोळा झाला, तर ‘पाण्याची आवश्यकता नाही. मातीत पुरेसा ओलावा आहे’, असे समजा. (एकदा अंदाज आल्यावर नेहमी माती उकरून पाहण्याची आवश्यकता नसते.) तसेच काही वेळा पाणी देण्याची आवश्यकता असेल, तर रोपांचे शेंडे मलूल झालेले दिसतात. अशा वेळी पाणी द्या. कोणत्याही परिस्थितीत झाडांना अती पाणी देणे टाळा !’ – सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (३०.७.२०२२)
सविस्तर माहितीसाठी भेट द्या. मार्गिका : https://www.sanatan.org/mr/a/83651.html
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२.८.२०२२)
_____________________________
सविस्तर माहितीसाठी ‘सनातन संस्थे’च्या संकेतस्थळाची मार्गिका
https://www.sanatan.org/mr/a/82985.html#i-8
______________